कन्याविक्रय व आसुरविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आता दर्शविल्याप्रमाणे प्राचीन काळी कुटुंबाच्या धन्याची सत्ता कुटुंबातील मनुष्यांवर अति मोठी असे. शेतात पिकलेले धान्य किंवा गोठ्यातली गुरेढोरे यांजवर आपली पूर्ण सत्ता असते, व ती आपण द्रव्य घेऊन विकून टाकू शकतो, त्याप्रमाणे प्राचीन काळी कुटुंबाचा धनी घरची माणसे खुशाल विकीत असे. अर्थात द्रव्यशेने अगर इतर कोणत्याही कारणाने माणसांचा विक्रय करण्यास तयार होणार्या धन्याचे अंगी प्रेमाचे लवमात्र वास्तव्य असेल अशी कल्पनाही करणे नको.
प्राचीन काळी आर्यमंडळात कन्याविक्रयाची निंद्य चाल होती. ‘ विक्रय ’ म्हणजे ‘ विकणे ’ हा शब्द सापेक्ष आहे, - म्हणजे ‘ विक्रया ’ बरोबर ‘ क्रया ’ चीही ( विकत घेण्याचीही ) कल्पना मनात आणावी लागते. कन्या विकावयाचे ती तिला विकत घेणारा कोणी असेल तेव्हा, अर्थात ‘ विक्रेता ’ ( विकणारा ) व ‘ क्रेता ’ ( विकत घेणारा ) या शब्दांचा विचार जोडीने करावा लागतो. कन्याविवाहाच्या संबंधाने ‘ विक्रेता ’ म्हणजे कन्येस विकणारा तिचा पिता, व ‘ केता ’ म्हणजे तिला विकत घेणारा वर, असे अर्थ होतात. हा ‘ क्रेता ’ वर कन्येच्या पित्याला द्रव्य देऊन त्याजपासून कन्या विकत घेऊन तिशी लग्न लावितो; अर्थात अशा प्रकारे झालेला विवाह हा आसुरविवाह होय. हा विवाह ब्राह्मणास निषिद्ध नाही, यास्तव मनुस्मृतिकाळी नागरिक स्थितीतील ब्राह्मणांमध्ये तो होत असेल असे मानण्यास हरकत दिसत नाही.
वैश्य व शूद्र या दोन्ही वर्णांस हा विवाह उक्त असल्याने ते तो करीत असतील यात नवल नाही. क्षत्रियास मात्र त्याचा स्पष्ट निषेध असून त्याच्याऐवजी राक्षसविवाहाची उक्तता वर्णिली आहे; तथापि व्यवहारात बहुतकरून राक्षसविवाहाच्या ऐवजी त्याला हाच विवाह पत्करण्याची पाळी येत असावी. निदान लोकसमुदायास राक्षसविवाहाचे जोपर्यंत भूषण वाटत असेल, तोपर्यंत तरी हा आसुरविवाह लोकांत फ़ारसा होत नसावा हे स्पष्ट आहे. या विवाहात कन्याविक्रय करण्याची पाळी पित्याकडे येते. व ती निंद्य अशी कल्पना त्या वेळी असलीच पाहिजे. ही कल्पना आजमितीस चालू व जिवंत आहे हे आपण पाहतोच. यासंबंधाने मनुस्मृती अ० ८ येथे पुढील महत्त्वाची वचने आली आहेत :
अन्यां चेद्दर्शयित्वान्या वोढु: कन्या प्रदीयते ॥
उभे ते एकशुल्केन वहेदित्यब्रवीन्मनु: ॥२०४॥
नोन्मत्ताया न कुष्ठिन्या न च या स्पष्टमैथुना ॥
पूर्वं दोषानभिख्याप्य प्रदाता दंडमर्हति ॥२०५॥
अर्थ : ‘ अगोदर एक कन्या वरास दाखवून आयते वेळी जर दुसरीच कन्या दिली, तर एकीबद्द्ल वराने जेवढी किंमत देण्याचे ठरविलेले असेल, तेवढ्याच किंमतीत त्याने दोन्ही कन्या खुशल घेऊन जाव्या ! कन्यादान करण्यापूर्वी तिला अमुक एक उन्मादव्याधी आहे, अगर तिला कोड आहे, अथवा तिला पूर्वी पुरुषाचा स्पर्श घडला आहे, इत्यादी प्रकारची तिजबद्दलची सर्व हकिकत सांगून नंतर कन्य त्या वराच्या ताब्यात द्यावी, म्हणजे मग दात्याकडे काही दोष नाही ! ’ कन्याविक्रयासंबंधाचा हा उपदेश सचोटीचा आहे, व तो हरप्रकारच्या व्यापार्यांनी व दुकानदारांनी ध्यानात ठेवण्यासारखा आहे हे सांगणे नकोच.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP