परंतु आताच्या या कलमात सुचविलेला तर्क राक्षसविवाहाच्या खर्या अर्थास अनुसरून जर विवाह झाला असेल तरच काय तो लागू समजावयाचा. स्त्रीवर झालेला जुलूम हे या विवाहाच्या अशक्यतेचे खरे कारण; अर्थात तेच नाहीसे होऊन विवाहाची घटना व जुळवाजुळव अगोदरच निराळ्या प्रकारे व्हावयाचे म्हटले, तर हा विवाह पाहिजे त्या काळी होणे शक्य होईल. लहान मुले नवराबायकोचे खेळ खेळतात, किंवा नाटकातून रामबाणांचे युद्धप्रसंग आपण पाहतो, परंतु या दोहीतही वास्तविक खरेपणा काही नसतो.
आपण जे निरनिराळे संस्कारविधी करतो अगर करवितो, त्यांतदेखील हा खोटेपणाचा प्रकार आपणाकडून पदोपदी होत असतो. खोटी ब्रह्मचर्यदीक्षा, विद्याधयनार्थ काशीयात्रेस जाण्याचे ढोंग, सीमान्तपूजनात वर गावात नवीन आल्याची बतावणी, इत्यादी अनेक खोट्या गोष्टी आपण करितो; - मग त्याचप्रमाणे विवाहाबद्दलची योजना, करार वगैरे सर्व अगोदर करून ठेवून आयत्या वेळी मात्र क्षत्रियवर शिमग्यातला वीर बनून यावयाचा, व नंतर त्याने बाह्यात्कारी पराक्रमाची ऐट करून वधू हरण करून न्यावयाची, असे म्हटले म्हणजे पुढील सर्व कारभार सुरळीत चालण्यास मुळीच हरकत नाही. स्मृतिकाळी राक्षसविवाह प्रचारात होते असे म्हणावयाचे असेल, तर ते विवाह या प्रकारचेच असले पाहिजेत. अशा विवाहास वरपक्षाकडून स्त्रीवर बलात्कार केल्याची बतावणी जरी कितीही उत्तम रीतीने वठली, तरी तिच्याबद्दल राजाच्या दरबारी फ़ौजदारी फ़िर्याद होऊ शकावयाची नाही.
खरा राक्षसविवाह कोणी करू पाहील तर त्याला मात्र न्यायासनाकडून कारागृही जाण्याची भीती, परंतु अशा खोट्या विवाहात त्या भीतीचे कारण न पडता नुसती गंमत म्हणून होऊन जाईल ! आणखी समाजाची उत्क्रांती होताना बहुधा खरा प्रकार हाच होत गेला असावा; व कालमनाने परिस्थिती बदलत जाऊन निरनिराळे विवाहाचे प्रकार अस्तित्वात आले, तथापि मूळच्या राक्षसविवाहाच्या काही निशाण्या चुकूनमाकून तरी पुढील काळच्या प्रकारांस चिकटून राहिल्या असाव्या. कुरमी, मेक, काचर्ये, सोळगे, खोंड, बडगे इत्यादी कित्येक जाती आजमितीला बंगाल प्रांताकडे हयात आहेत, व त्यांमध्ये राक्षसविवाहाची बतावणी होते. या बतावणीत दोघे नवरदेव भांडावयास उठतात व भांडणात एकाचा पराजय होतो. जय प्राप्त झालेल्या मनुष्याकडे लागलीच शेंदराचा मळवट भरलेली वधू येते, व लग्नाची पूर्तता होऊन सर्व मंडळी मिळून मेजवानी, मद्यपान इत्यादी प्रकार सुरू होतात. हे शेंदराचे मळवट म्हणजे नवर्याने केलेल्या बलात्काराच्या निशाण्या होत. हिंदुधर्माच्या सुधारलेल्या इतर जातींतही लग्नप्रसंगी वधूच्या कपाळी पिंजरेचा मळवट भरण्याचा रिवाज अद्यापि आहे, त्याची उत्पत्ती कदाचित मूळच्या याच प्रकारापासून झाली असण्याचा संभव आहे.