राक्षसविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
सातवा प्रकार ‘ राक्षसविवाह ’ हा होय. व तो एकट्या क्षत्रिय वर्गासच करिता येतो. क्षत्रियाचे मन एखाद्या स्त्रीवर बसले, म्हणजे तिच्या प्राप्त्यर्थ तो पाहिजे ती गोष्ट करील. एखाद्या भिक्षुक वृत्तीच्या मनुष्याप्रमाणे ‘ ही मला द्या ’ अशी याचना तो कदापि करणार नाही; तर तो तिला स्वपराक्रमानेच मिळवू पाहील. ती स्त्री एखाद्या मोठ्या अवघड बंदोबस्ताच्या ठिकाणी असली, तर तेथे प्रवेश होण्याकरिता तो घरांना भोके पाडील, प्रसंगी उच्छेदही करील. त्याला हरकत करण्यास कोणी आले, तर त्याच्या अंगाचे तिळातिळाएवढे तुकडे करण्यासही तो कमी करणार नाही. एखादे वेळी त्याच्या हातून खूनही होतील. एखाद्या भुरट्या चोराप्रमाणे तो कोणाच्या घरात न शिरता राजरोसपणे सर्वत्र संचार करील. त्या स्त्रीच्या अंत:पुरात जाऊन तिचा हात धरून तो तिला घेऊन जाऊ लागेल. तिने नेत्रांतून अश्रू गाळले किंव मोठ्या - मोठ्याने आक्रोश केला, तरी त्याची पर्वा न करिता साहसाने तो आपला हेतू तडीस नेऊन त्या स्त्रीस आपली करील.
प्राचीन काळी राजेलोकांत स्त्रीप्राप्तीकरिता आता लिहिल्या तर्येचे प्रकार होत असत, याची उदाहरणे महाभारतादी ग्रंथांत अनेक जागी दृष्टीस पडतात. कौरवपांडवांचा आजा विचित्रवीर्य याचा अंबिका नामक राजकन्येशी याच प्रकारे विवाह झाला होता. ही अंबिका काशिराजाची कन्या असून विचित्रवीर्याचे ज्येष्ठ बंधू प्रसिद्ध भीष्माचार्य यांनी तिचे युद्धात हरण केले होते, व तिचा विवाह आपल्या बंधूशी लागून दिला होता. मनुस्मृतीवर नंदनाची टीका आहे, तीत या विवाहाचे हेच उदाहरण लिहिले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP