गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
येथपर्यंत पैशाच विवाहाचा विचार झाला. आता गांधर्वविवाहाबद्दल थोडासा विचार करू. पैशाचविवाहाप्रमाणे हा विवाह निंद्य मानिला नव्हता, तथापि प्रत्यक्ष मनुस्मृतिकाळीदेखील समाजात त्याचा प्रसार कितपत असेल याविषयी बराच संशय आहे. याचे कारण स्त्रीजातीला केव्हाच स्वातंत्र्य असावयाचे नाही या तत्त्वाचा प्रसार समाजात झाला होता हे होय. महाभारत वगैरे प्राचीन ग्रंथांतून कोठे कोठे शकुंतलाविवाहासारखी आख्याने दृष्टीस पडतात, परंतु त्यांवरून सामान्यत: लोकसमुदायात हा विवाह होत असलाच पाहिजे असे अनुमान करिता येत नाही. अभिज्ञानशाकुंतल नाटकात -
गांधर्वेण विवाहेन बह्वयो राजर्षिकन्यका: ।
श्रूयंते परिणीतास्ता: पितृभिश्चाभिनंदिता: ॥
हा श्लोक आला आहे, त्यात “ राजर्षीच्या कन्या ” असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. विक्रमोर्वशीय, रत्नावली, इत्यादी नाट्यग्रंथांतही या विवाहाची वर्णने आली असून नायक व नायिका क्षत्रियवर्णाची असल्याचे सांगितले आहे. अर्थात या सर्व गोष्टींवरून क्षत्रियवर्गात, कदाचित विशेषत: राजेलोकांत, ही गांधर्वविवाहाची चाल होती असे मानण्यास प्रत्यवाय नाही. इतर वर्णांसंबंधाने या प्रकारच्या विवाहाची वर्णने असल्याचे कोठे पाहण्यात नाही. नाही म्हणावयास भवभूतिकृत मालतीमाधव नाटकातील नायक व नायिका ही दोघेही ब्राह्मण वर्णाची असून त्यांचा विवाह कवीने याच पद्धतीचा घडवून आणिला आहे, व यावरून ब्राह्मणांतदेखील चाल होती असा कोणाचा तर्क होईल, परंतु तो बरोबर आहे असे मानिता येणार नाही. या नाटकात --
शाकुंतलादीनितिहासवादान्प्रस्तावितानन्यपरैर्वचोभि: ।
( मालतीमाधव अंक २ )
इत्यादी श्लोक आला आहे, व त्यात मालतीचे मन वलविण्याच्या कामी शकुंतलाप्रभृती स्त्रियांच्या उदाहरणांचा उपयोग करण्यात आल्याचे वर्णिले आहे ही गोष्ट खरी; तथापि मालतीसारख्या प्रौढ वयाच्या ब्राह्मण वधूस गांधर्वविवाहाच्या जुन्या कथा मुद्दाम सांगण्याचा प्रसंग आला, एवढ्यावरून्च या विवाहाची प्रवृती निदान ब्राह्मण समुदायात तरी नव्हतीच असे उघड म्हणता येते.
ब्राह्मणांप्रमाणेच वैश्यवर्णाची उदाहरणेही प्राय: दुर्मिलच आहेत. मागे दशकुमारचरित ग्रंथात वर्णिलेली एक कथा सामुद्रिक विषयासंबंधाने आली आहे. तीतील नायक व नायिका ही दोन्हीही वैश्य आहेत. त्यांच्या उदाहरणावरून या वर्णात हा विवाह होण्याची बंदी नव्हती असे अनुमान वाटेल तर काढावे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP