असवर्ण विवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
होता होईल तोपावेतो सवर्णविवाहच व्हावे असा प्राचीनकाळचा नियम असे. तथापि केव्हा केव्हा असवर्ण विवाहाची उदाहरणेही पुराणादी ग्रंथांतून आढळतात. पुरुष कोणत्याही वर्णाचा असो, त्याला आपल्या स्व:च्या वर्णाशिवाय खालच्या कोणत्याही वर्णाची स्त्री वरता येत असे, व अशा विवाहास ‘ अनुलोम विवाह ’ म्हणत असत. याच्या उलट जर तो आपल्या वर्णाहून श्रेष्ठ वर्णांतील स्त्रीस वरू लागला, तर त्या विवाहास ‘ प्रतिलोम विवाह ’ अशी संज्ञा मिळे.
अनुलोम पद्धतीत श्रेष्ठ वर्णाच्या स्त्रीस जितका मान मिळे तितका कनिष्ठ वर्णाच्या स्त्रीस मिळत नसे, व दायविभागप्रसंगी ती व तिची संतती यास मिळण्याचा दायही कमी प्रमाणाचा देण्यात येई. दुसर्या पद्धतीचे विवाह तर निंद्यच मानण्यात येत असत, तथापि असे विवाह अनेक प्रसंगी होत असून त्यांचा दायनिर्बंधही विशेष पद्धतीस अनुसरून असे. एकाच वर्णाचे लोक फ़ार दिवस दूरदेशी राहिले, व त्यांच्या गाठी पडण्याचे बंद झाले, अशा कारणाने झालेले जातिभेद आजमितीसही आपण पाहतो; परंतु या जातिभेदात अनुलोमपद्धतीपेक्षा प्रतिलोम पद्धतीच्या विवाहापासून झालेली संख्या पुष्कळच अधिक असल्याचे दिसून येते.
या विवाहाची निंद्यता सर्वत्र मानण्यात येत असल्याने उत्पन्न झालेल्या जातीजातीत द्वेषभाव साहजिकच उत्पन्न होई; व प्रत्येक अल्पस्वरूप विवाहप्रसंगी जरा कोठे नाक मुरडण्यासारखा प्रकार झाला, की अधिक अधिक नीच संज्ञेच्या जातींची संख्या वाढत्या प्रमाणावर असे. प्रस्तुत प्रसंगी जातिभेदाबद्दल विशेष काही सांगण्याचे प्रयोजन नाही, यासाठी झाला इतका उल्लेख पुरे आहे.
पांडवांपैकी भीमसेनाने हिडिंबा राक्षसीस वरले, व कृष्णद्वैपायन व्यासाचा पिता पराशरऋषी याने कोळिणीशी लग्न लाविले, ही अनुलोम पद्धतीची उदाहरणे होत. दैत्यांचा गुरु शुक्र ब्राह्मण, याची कन्या देवयानी, इचा विवाह ययाती नावाच्या क्षत्रिय राजाशी झाला, व त्या संततीपासूनच पुढे क्रमाने कौरव - पांडावांची उत्पत्ती झाली, हे महाभारत ग्रंथावरून सर्वत्र प्रसिद्ध आहेच.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP