म्यरस्तजभ्रगेलांतें, ऐशीं हेचि दशाक्षरें.
वाङ्मात्र व्यापिलें येंहीं, कृष्णें त्रैलोक्य ज्यापरी. ॥७॥
गुरु संज्ञा अशी दीर्घसंयुक्ताक्षरआद्यकीं;
विसर्गबिंदुसंयुक्तां, विकल्पें चरणांतिचे. ॥८॥
गुरु संज्ञा वक्र रेखा, ऋजु रेखा लघुस्थळीं.
प्रस्तार लेखनी आहे रीति हे ऋषिनिर्मित. ॥९॥
अब्धिभूतरसाश्वांची जाण संख्या, जशी जनीं.
पद तोचि चतुर्थांश, जैसा योजेल ज्या गणीं. ॥१०॥
आदिमध्यांत जाणावी लघुता य र तां गणां
भ ज सां गुरुतायोग, म नां गौरवलाघव. ॥११॥
मा भू, श्रीद, गुरू तीनी; य पयोवृद्धि, आदिल;
र मध्यलाsग्नि, दे अंत; स वायु, भ्रमणांsतग; ॥१२॥
त व्योमांsतल, दे हानी; ज सूर्य, गुरुमध्य, रुक्,
भ चंद्र, यश दे, गाद्य; न स्वर्ग, त्रिल, आयुषें. ॥१३॥
देताति देवता साम्य, फळें वृत्तांसि योजितां.
मंगलाचरणीं माद्य योजिजे सर्वमंगल. ॥१४॥
यतिविच्छेदविश्राम ऐसी विरति जाणिजे;
यतिभंग जसा नोहे, श्लोक तैसाचि योजिजे. ॥१५॥
वर्णमात्रावृत्त तथा गणवृत्त ययापरी
त्रिधा संज्ञा असे केली पिंगलादि ऋषीश्वरी. ॥१६॥
समवर्ण चतुष्पाद छंद षड्विंशति क्रमें
वर्णवृत्त अशी संज्ञा जाणिजे चतुरीं ययां. ॥१७॥
आर्याभेद समस्तांतें, गणवृत्त ययापरी;
संज्ञा पिंगलसूत्रीं हे केली तत्वविचक्षणें. ॥१८॥
वैतालीय, यथावक्र मात्रासमक भेद हे;
मात्रावृत्त अशी संज्ञा सर्वज्ञें स्पष्ट दाविली. ॥१९॥
गणमात्रावृत्त सर्व जातिनामेंचि रूढलें.
व्यक्ति या समपादांतें पूर्वाचार्यीं निरूपिलें. ॥२०॥
जातिव्यक्तिद्वयामध्यें छंदःशास्त्र विरूढलें;
जैसें पुंप्रकृतिस्थानीं जग निर्माण जाहलें. ॥२१॥
भाषाकविजनां नाहीं उपयोग म्हणौनियां,
व्यक्तिस्वरूपमात्रातें वर्णिलें वृत्तविस्तरें. ॥२२॥
पद्यार्यागीतिभेदातें त्रयमात्र निरूपिले.
समार्धविषमांचाही दावितों मार्ग ये स्थळीं. ॥२३॥
त्रिधा दंडकभेदाचें रूपही दावितों पहा.
अनुष्टुपाख्य तेंही मी आतां लक्षण बोलतों. ॥२४॥
प्रस्तारादिक षडाव त्यांत तीनि विचक्षणा;
निवडोनि करूं व्यक्त चमत्कारार्थ या मना. ॥२५॥