इंद्रवज्रा.
गण - त, त, त, ग, ग.
यति - ५,६.
हे इंद्रवज्रा त त ता ग युग्मीं. । योजी, प्रिया, तूं; वरिं कीर्ति, लक्ष्मी.
पांचा, सहांनीं यति तूं विचारीं, । जो वृत्तवृंदीं अतितोषकारी. ॥५३॥
उपेंद्रवज्रा.
गण - ज, त, ज, ग, ग.
यति - ५, ६.
उपेंद्रवज्रा ज त जा ग गां हीं । रचोनि, ताता, जयवंत होईं.
असे यतीही शरषट्कवर्णीं, । जसा दिसे रंग तया सुवर्णीं. ॥५४॥
उपजाति.
हे वृत्त दोनी मिळती स्वभावें । पदोपदीं तैं उपजाति नांवें.
होवोनियां संकर, भेद याचे । अनेक होती कविवृंदवाचे. ॥५५॥
वृत्तद्वयीं या यतिनेम नाहीं, । असें कितेकीं कथिलें कवींहीं.
जसा घडे श्लोक तसा करी तूं. । नको धरूं नेम यतीवरी तूं ॥५६॥
सुमुखी.
गण - न, ज, ज, ल, ग.
न ज ज ल गीं कथिली सुमुखी. । कविवर वर्णिती ईस मुखीं.
सुजनवरां कवि पूर्ण सुखी, । म्हणुनि रची गणयुक्त सखी. ॥५७॥
दोधक.
गण - भ, भ, भ, ग, ग.
दोधक भत्रय दोनि गुरूंनीं । योजि भुजंगम सूत्रविधानीं.
सत्कविमंडण पद्य रचोनी, । पाव जगीं यश, सद्गुणखाणी. ॥५८॥
शालिनी. गण - म, त, त, ग, ग.
यति - ४, ७.
आहे उक्ता शालिनी या प्रकारीं. । योजीं ऐशी मा त ता दों गकारीं.
विश्रामातें जाण तूं अब्धिलोकीं. । वृत्तांमध्यें मानिली श्रेष्ठ लोकीं. ॥५९॥
वातोर्मी.
गण - म, भ, त, ग, ग.
यति - ४, ७.
वातोर्मी हे वद मा भा त गो गीं. । विश्रामा देउनि धीलोकसंगीं
ईची गोडी कथिजे काय तोंडें ? । श्लोका योजीं चतुरालागिं जोडे. ॥६०॥
श्री.
गण - भ, त, न, ग, ग.
यति - ५, ६.
भा न त गा गीं पवन रसांनीं । श्री सुखदात्री भजनविधानीं.
हे कविमान्या, सरस, गुणांची, । पूर्ण करीजे भडस मनाची. ॥६१॥
भ्रमरविलसिता.
गण - म, भ, न, ल, ग.
यति - ४, ७.
म्भा ना ला गा भ्रमरविलसिता । .........................
सिंधुस्वर्गीं गति यति समजें । दुर्बुद्धीतें किमपि न समजे. ॥६२॥
रथोद्धता.
गण - र, न, र, ल, ग.
यति - पदांतीं.
रा न रीं ल ग युता रथोद्धता । ज्या नरीं विरचिली महोन्नता,
विश्रमारहित पावती पदा । लोकदुर्लभ अपारसंपदा. ॥६३॥
स्वागता.
गण - र, न, भ, ग, ग.
स्वागता र न भ युग्मगुरूंशीं । योजिशील जरि सद्गुणराशी,
पावशी सुयशमौक्तिक हातीं, । मान्य होशिल बुधी गुणवंती. ॥६४॥
वृत्ता.
गण - न, न, स, ग, ग.
न न स ग गुरु रचिता वृत्ता । समजुनि करि कविता, ताता.
तवगुणगुण इह लोकांतीं । प्रगट करुनि, लभ विश्रांती. ॥६५॥
भद्रिका.
गण - न, न, र, ल ,ग.
न न र ल गुरुची सुभद्रिका । विरचुनि कविता सुभद्रिका,
यश जगिं मिरवीं गुणाकरा । जिणुनि कविरसें सुधाकरा. ॥६६॥
मौक्तिकमाला.
गण - भ, त, न, ग, ग.
मौक्तिकमाला भ त न ग गांता । योजुनि अर्पीं कविवरसंतां.
डोलशि तेव्हां परम सुखानें, । वानिति जेव्हां सुजन मुखानें. ॥६७॥
कुसुममालिका. ( शुद्धकामदा )
गण - न, र, र, ल, ग.
न र र ला ग कां काव्यकूसरी । कुसुममालिका योजिजे बरी.
सुखवि, रंजवी हे मनोरमा; । म्हणुनि वर्णिती लोक सत्तमा. ॥६८॥