बंधुर.
गण - न, न, न, न, स, भ, भ, भ, ग.
यति - ५, ५, ५, १०.
न न न न स भ भ भ सगुरु विरचितां बंधुरनाम घडेल, सुता.
त्रिकशरयुत यति दिगसह गणितां, वृत्त सुशोभित होय यथा.
कुनरमतिस तरि अति कठिण दिसे; रंक न पावत इंद्रपदा.
सुकृतरहित हरिभजनविरहितां केंवि घडे सुख पूर्ण कदा ? ॥२७॥
कामकळा.
गण - स, स, स, स, स, स, स, स, ग.
यति - ७, ६, १२.
स गणाष्टक एक गुरूसिं पदांत करी तरि होईल कामकळा हे.
अति पावन, पूर्ण करी कविकाम समस्तहि, दैवत विप्रकुळा हे.
प्रतिनित्य पुजोनि इला भजतांचि मना स्फुरवि बुधलोकनुता हे.
हयषड्रसभानुकळा मणिभर्म तया सदनीं वसवीत सदा हे. ॥२८॥