असंबाधा.
गण - म, त, न, स, ग, ग.
यति - ५, ९.
मा ता सा ना गा गुरुसहित असंबाधा
तेव्हां तूझी तो परिहरि जनिं संबाधा.
टाकीं पांचांतें ग्रहसह धरिं विश्रामा.
ध्यायीं भावें त्या अहरह हृदयीं रामा. ॥९४॥
अपराजिता.
गण - न, न, र, स, ल, ग.
यति - ७, ७.
न न र स ल घु गाक्षरीं अपराजिता.
रसिकजन करी सुखी गुणमंडिता.
द्वयहय यति हे धरी सुयशस्करी,
म्हणउनि र्चिजे बुधी नरशेखरीं. ॥९५॥
प्रहरणकलिका.
गण - न, न, भ, न, ल, ग.
यति - ७, ७.
न न भ न ल ग हे प्रहरणकलिका.
विकसन करितां प्रसुख सकळिकां.
यति सम तुरगीं विरचिशि चतुरा,
तरि दिसशिल तूं कविशिरसिं तुरा. ॥९६॥
वसंततिलका.
गण - त, भ, ज, ज, ग, ग.
ख्याता वसंततिलका त भ जा ज गौ गे.
सोमें इला निददिलें मधुमाधवीं हें.
सिंहोन्नता म्हणुनि हें मुनि कश्यपानें.
उद्धर्षिणी च कविराज वसुंधरानें. ॥९७॥
इंदुवदना.
गण - भ, ज, स, न, ग, ग.
इंदुवदना भ ज स ना दि गुरुयुग्में.
शोभित करी सकल रत्नमय सद्में.
दुर्लभ असे सुकृतहीन पुरुषातें.
फार तप जो करिल पावल अशी तें. ॥९८॥
लोला.
गण - म, स, म, भ, ग, ग.
यति - ७, ७.
मा सा मा भ ग गां नीं, द्विःसप्तीं यति, लोला.
हे आहे शुभवेळा संयोजीं गुणशीळा.
हातीं हे न धिरे, मा जैशी विद्युतलीला.
राहे सावध ईचां कंठीं अर्पुनि माळा. ॥९९॥