चंद्रवर्त्म.
गण - र, न, भ, स.
चंद्रवर्त्म कथिशील र न भ सीं । भारती प्रविलसेल कविरसीं.
मान्य होसिल बुधांसि नृपकुळां. । वश्य होईळ समुद्रपट इला. ॥६९॥
इंद्रवंशा.
गण - त, त, ज, र.
रे, इंद्रवंशा त त जें र संयुतें. । देवेंद्रवज्रीं लघु एक विस्तृतें.
हा वृत्त जाणें उपजाति ये स्थळीं । पूर्वप्रमाणें घडती सुनिश्चळीं. ॥७०॥
वंशस्थ.
गण - ज, त, ज, र.
यति
उपेंद्र वंशस्थपणें सुखें घडे । ज तीं ज रीं हा गणमेळ सांपडे,
विभाग जाणौनि कवी यथाविधी । नियोजिती युग्मसुवृत्त सत्पदीं. ॥७१॥
तोटक.
गण - स, स, स, स.
करि तोटकवृत्त चतुः सगणें. । सकळां तरि भूपति यासि म्हणें.
अमरां सुनरां प्रिय हाचि घडे, । म्हणवोनि वदें तुजला उघडें. ॥७२॥
द्रुतविलंबित.
गण - न, भ, भ, र.
द्रुतविलंबित जाण न भीं भ रीं. । वदल हे जरि सत्कविवैखरी.
सरस राजसभेंत दिसे भला. । घडल हा विबुधीं अति शोभला. ॥७३॥
प्रमुदितवदना.
गण - न, न, र, र.
प्रमुदितवदना घडे दों न रीं, । म्हणुनि अति विलासिनी हे बरी.
जपुनि विमल वृत्त तूं सांवरी, । तरि यश विलसेल सर्वांतरीं. ॥७४॥
कुसुमविचित्रा अथवा जलधारा.
गण - न, य, न, य.
द्वि न य समेता कुसुमविचित्रा । रमवि मनातें सरसिजनेत्रा.
समज इयेची रति अति चित्रा । रसिक जनांची रुजहर मात्रा. ॥७५॥
जलोद्धतगति.
गण - ज, ज, ज, स.
यति - ६, ६.
ज स द्वययुता जलोद्धतगती. । रसद्वयकृता असे सम यती.
सुचे मतिमतां इची विरचना, । रुचे कविजनां, शुची करि मना. ॥७६॥
भुजंगप्रयात.
गण - य, य, य, य.
भुजंगप्रयाता घडे चौं यकारीं. । कवी जाणते योजिती या प्रकारीं.
भुजंगेशतुल्यासि हा वृत्त माने, । रचीं पद्य येणें करीं नामगानें. ॥७७॥
स्रग्विणी.
गण - र, र, र, र.
चौं रकारीं घडे स्रग्विणी सुंदरी. । हे जयाचा असे नित्य वाड्मंदिरीं,
तो दिसे धन्य लोकीं कवींचां गणीं, । मुख्य वाचस्पती ठेंगणा तो गणीं. ॥७८॥
मणिमाला.
गण - त, य, त, य.
यति - ६, ६.
ता या त य मिश्रा शोभे मणिमाला. । ईचां रसयुग्मीं योजीं मति, बाळा.
पावे कविवाणीं ईशीं अति मोला; । भोगीं, मतिमंदा, वेगीं शुभलीला. ॥७९॥
ललिता.
गण - त, भ, ज, र.
ता भा ज रींच ललिता लता घडे. । ईचां फळींच रस सर्व आतुडे.
हे पंडितां, कविवरांसि मानली, । याकारणें तुज मनोज्ञ वाणिली. ॥८०॥
प्रमिताक्षरा.
गण - स, ज, स, स.
प्रमिताक्षरा स ज स सेसें गदिता. । कविताक्षरीं जरि घडे उदिता,
तरि ते सखी सुचतुरां सुजनां, । सरसानना विरचि तोष मना. ॥८१॥
नवमालिनी.
गण - न, ज, भ, य.
रचि नवमालिनी न ज भ यांनीं । हरिपद अर्चिशी विधिविधानीं.
परपुरुषार्थ पावशि वरिष्ठा. । इहसुख सर्व भोगिसिल, इष्टा. ॥८२॥
प्रभा.
गण - न, न, र, र.
यति - ७, ५.
स्वरशरयतिची द्विनारीं प्रभा । दिनमणिकिरणीं जशी सुप्रभा.
निरसन करिते हृदिस्थोत्तमा । विकसवि गुणपंकजा सत्तमा. ॥८३॥
मालती.
गण - न, ज, ज, र.
न ज ज र गुंफित मालतीस्रजा । करिशि समर्पण जैं अधोक्षजा;
तरशि भवार्णव तूं पळांतरीं; । परिणिशि साच विमुक्ति नोवरी. ॥८४॥