सूक्ष्मदेह निवारण
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज
॥ श्रीगणेशायनमः ॥ अथ सूक्ष्मदेह निवारण ॥
सूक्ष्मदेह कोण कसा । तोचि ऐकावा आभासा । स्थूळ देहाचा तमासा । सूत्रें चाळक बहु रूपी ॥१॥
आकाश सुक्ष्मी जाण ऐसें । अंतःकरण पंचकसें । त्याचा पर्याय जो असे । तोचि ऐका सावध ॥२॥
अंतःकरण मन मती । चित्त अहंकार पांच ती । तेचि ऐकावी निरुती । विशद करूनि सांगतों ॥३॥
निर्विकल्पीं आठवण । तेंचि जाण अंतःकरण । तेथें संकल्पपण । मन असे नांव त्या ॥४॥
तेथें निश्चय जो होणें । तेंचि बुद्धीचें लक्षण । पुढें कार्यानुसंधान । चित्त ऐसें नांव त्या ॥५॥
कार्याची जे उमेद । होऊनि धरणे सावध । प्रवृत्तिनें होतो बद्ध । अहंकार नांव त्या ॥६॥
आकाश पंच वृत्तीचिया । साक्षी एक आहे मिंया । वैष्णवांची मती काया । कर्ता राम निश्चयें ॥७॥
वायू पंचक तें आतां । ऐका श्रोते सावध चित्ता । स्थान कार्यही तत्वता । यथामती सांगतों ॥८॥
प्राण अपान व्यानोदान । समान जाणतो आपण । हृदयीं धुगधुगी तो जाण । प्राण त्यासी मी जाणे ॥९॥
अपान राहे गुदस्थानीं । मळोत्सर्गाची जी करणी । शौच न होतां मरणी । ते ही जाणे तो मी जाण ॥१०॥
व्यान सर्वांगी व्यापितो । समान नाभीस मानितो । उदान कंठी जो गिळितो । तया जाण तो मी जाण ॥११॥
ऐसें वायु पंचकासी । जाणे तो मी जाणतसी । कोण पुसे वैष्णवांसी । मी मी मात्र ओरडती ॥१२॥
माझे माझें जे बोलिले । तेंचि आपण हें नायिलें । आहे गेले आले मेले । सर्व माझें मी नव्हे ॥१३॥
आतां तेजाचा विस्तार । ऐका कथितों मी सार । श्रोत्र त्वक् चक्षू जिव्हाकार । घ्राणेंद्रिय मी जाणें ॥१४॥
कानानें मी ऐकतों । त्वचेनें मी स्पर्श घेतों । चक्षूनें मी पाहतों । जिव्हेनें मी रस घेईं ॥१५॥
घ्राणाचें मी गंध घेतों । ज्ञानेंद्रियेंसी पहातों । द्रष्टा साक्षी चैतन्यता । विष्णु तेथें न भासे ॥१६॥
जळों जळों त्याचें जिणें । माझें तेंचि मीं बोलणें । युक्ती बुद्धीनें पाहणें । खरें खोटें किंवा हें ॥१७॥
आतां आपाचा पर्याय । वाक् पाणि पाद पाय । उपस्थ ऐस्सी कर्मेंद्रियें । जाणे तो मी साक्षी गा ॥१८॥
वाचेनें मी बोलतों । हातानें मी देतों घेतों । पायांतूनि चालतों । गुदीतूनी मळत्यगी ॥१९॥
शिस्नातूनि रती घेतों । मी मी ऐसेंहि बोलतों । माझ्यावीण वैष्णव तो । मीचि कैसा होईल ॥२०॥
ऐका विषय पंचक । शब्द स्पर्श रूप देख । रस गंध याचा एक । पांचा जाण साक्षी मी ॥२१॥
ऐसें पृथ्वीचें रूप । कथियेलें पंचकरूप । इतुकियाचा मीचि भूप । सर्वांचा मी साक्षी गा ॥२२॥
शब्दादिक विषयांतें । अंतःकरणादि चारी तें । परस्परा आधारातें । वैष्णव सांगे मी एक ॥२३॥
ऐसीं पंचकें हीं पांच । मीचि जाणे साक्षी साच । एकमेकां मिळणीचें । रूप ऐका सावध ॥२४॥
अंतःकरण व्यानावारें । श्रोत्रेंद्रिया मिळे बरें । वाचे बोले खोटें खरें । विषय शब्द मी जाणें ॥२५॥
मन समान आधारें तें । त्वगींद्रियातरीं रिघतें । मग हातें देतें घेतें । स्पर्श विषय मी जाणे ॥२६॥
बुद्धी उदानाच्या आधारें । नेत्रेंद्रियें रिघे बरें । मग पायांनीं येर झारे । विषय रूपातें मी जाणे ॥२७॥
चित्त अपानाच्या आधारें । जिव्हेंद्रियें रिघे बरें । शिस्नेंद्रियानें घाबरें । विषय स्त्रीरस मी जाणें ॥२८॥
अहंकार प्राणाधारें । घ्राणेंद्रियें रिघे बरें । मळोत्सर्गं गुदद्वारें । विषय गंध मी जाणें ॥२९॥
ऐसी घड्याळाचें परी । येरझारा होय खरी । स्थूळ देहीं राहटी बरी । होतां साक्षी वैष्णव ॥३०॥
इति श्रीलघुआत्ममथने, गुरुशिष्यकथने, सूक्ष्म देह निवारण नाम द्वितिय पद समाप्तः ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP