अभंग - ८१ ते ९०
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
८१
वंश आपुला धन्य केला । आपण पगटुनियां भुमिकेला ॥१॥
नित्य आमुच्या हातें सेवा करुनि घेईं । राम्राया अखंड आत्म भक्ति देईं ॥२॥
नेणों वडिलांची किति पुण्याई । तेणें आळसि तूं प्रभूठाईं ॥३॥
येथें राहुनियां स्थीर रामराजा । रमवीं यावच्चंद्र सूर्य सत्समाजा ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा सच्चित्सूखा । विषय वृत्ती माझ्या करिं अंतर्मुखा ॥५॥
८२
झालें नयनाचें सार्थक । भेटला तूं जानकि नायक ॥१॥
तुज पाहुनि डोळेभरी । मुखें बोलेन रामकृष्ण हरी ॥२॥
आपणाची मज आवडी । घोंटिन निज सुख घडि घडी ॥३॥
सुंदर मदनाहुनि तूं रामा । कुंदरदना मंगळ धामा ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । मज सोडुं नको समर्था ॥५॥
८३
हातें वाजवूनि टाळी । तुझी गाइन नामावळी ॥१॥
चरणीं नाचेन सन्मुख । तुझें पाहुनि मंदहास्य मुख ॥२॥
कळला सच्चिदानंद तूं आपण । त्या तुज माझें लोटांगण ॥३॥
निरखुनि आपणातें निजडोळां । घोटिन आनंद वेळोवेळां ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नथा । भक्तां आवडति तुझी गाथा ॥५॥
८४
तुज सोडवेना रामा । सच्चिदानंदा सुख धामा ॥१॥
आत्मपद लंपट दासासी । तूं मज सोडुनि कैसा जाशी ॥२॥
तुझें वर्म आहे मजपाशीं । दृश्य त्यजुनि धरिन आपणासी ॥३॥
मग तूं सहजचि सांपडला । प्रेमपाशें आवडला ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मी न सोडीं तुज भगवंता ॥५॥
८५
तुज करुणा माझी आली । ह्मणउनि मज आत्म भेटी झाली ॥१॥
विसरे नाहीं उपकार । दे निज आत्म पदीं मज थार ॥२॥
रामा आनंदाच्याकंदा । आपण भेटला मज मति मंदा ॥३॥
सदय हृदय तुझें कळविलें । माझें दुःख दरिद्र पळविलें ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । शाश्वत आत्म लाभ हा तत्वता ॥५॥
८६
आला जन्मा तोचि ह्मणावा । ज्यासि तुजविण प्रपंच न ठावा ॥१॥
भिकारी हो भाग्यवंत । आवडसि ज्यासि तूंचि अनंत ॥२॥
थोटा पंगु अंध जरी झाला । प्रेमें आवडसि तूंचि एक ज्याला ॥३॥
ज्यासी अखंड आत्म भेटी । आत्म प्रेम ज्याचे पोटीं ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । साधिल जो नवविध भक्ति पथा ॥५॥
८७
आत्म भक्तां सम भाग्यवंत । नाहीं नाहीं कोणी त्रिजगांत ॥१॥
ज्याला स्फुरसी तूं सच्चित्सुखहृदयांत । षड्रग्णैश्वर्यसंपन्न भगवंत ॥२॥
झाला पूर्ण निश्चय ऐसा माझा । आपण आनंदहन रामराजा ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । सत्य सत्य हें बोलणें नोहे वृथा ॥४॥
८८
भला जन्म हा सुंदर मानवाचा । लाभ झाला तुझा राघवाचा ॥१॥
श्वान सूकर लक्ष चौर्यांशी योनी । फळ काय होतें त्यांत उपजोनी ॥२॥
मजमनुष्य केला रे त्वां रामा । आपण भेटला अखंड सुखधामा ॥३॥
हाचि आठवतो उपकार । आत्म लीलेचा चमत्कार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरीं लया ही प्रपंच भय व्यथा ॥५॥
८९
दयाघना तूं रामराजा । त्यांचि धरिला अभिमान माझा ॥१॥
मज काय कळे पामरा । आत्म आठवण विप्र अंतरा ॥२॥
तेणें आपण होउनि प्रसन्न । केलें माझें अखंड समाधान ॥३॥
आतां तुज मी न सोडीं । मज लागली आपुली गोडी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिल्या त्वां प्रपंच व्यथा ॥५॥
९०
माझे हृदयींचें जें सार । तें तुज कळवीलें साचार ॥१॥
आपण सांपडला जो स्वता । त्या तुज न सोडी सर्वथा ॥२॥
मज सोडुं नकोरे रामा । आदिअंतिं आपण एक सुखधामा ॥३॥
तूं मज धीरांचारे धीर । एक आपण श्रीरघुवीर ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । न करिं आत्म वियोग व्यथा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP