अभंग - १०१ ते ११०
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
१०१
आजि आनंद सुदीन । मज भेटला जानकि जीवन ॥१॥
वाटे आनंद आनंदा । सरला समुळ जो दुःखकंद ॥२॥
रामा सुख समुद्रा मज मीना । सुखी केलें अखंड करुनि मीना ॥३॥
चित्त वृत्ती झाल्यावर । येती आनंदाचे उद्गार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । स्वस्वरुप विलोकि न तत्वता ॥५॥
१०२
मज दिधली नर काया । इचें सार्थक तूं रामराया ॥१॥
तुज पहावा नयनीं । शामसुंदर चाप पाणी ॥१॥
दोनी जोडूनी हस्तक । चरणीं ठेवणें मस्तक ॥३॥
हेचि माझी सर्व जोडी । घ्यावी स्वस्वरुपाची जोडी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । शाश्वत आत्म लाभ हा तत्वता ॥५॥
१०३
मज कांहिं सुचेना आतां । सत्य कथितों श्री रघुनाथा ॥१॥
तूं लाविशि कां बहु उशीर । मनि धरवेना मज धीर ॥२॥
देह नाशिवंत पाहीं । आत्म भेटीविण सुख नाहीं ॥३॥
आपण आनंदाचा कंद । कळला कीं जरि मी मतिमंद ॥४॥
तुज नमितों जोडुनि हाता । येरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥
१०४
भेटला तूं सिता कांता । आतां उणें काय मज भगवंता ॥१॥
कोण पांगे संसारासी । आपण अखंड सुखाची राशी ॥२॥
अनुलक्षुनि आत्म पदास । सन्मुख राहिन होउनि दास ॥३॥
हेंचि मागणें आपणासी । स्पर्शु देउ नको मी पणासी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज नुरवि देह अहंता ॥५॥
१०५
धन्य संतांचा महिमा । आपण भेटला मज रामा ॥१॥
नसता संतांचा प्रसाद । तरि काय होति तुज माझी याद ॥२॥
मोठा संतांचा उपकार । आपण प्रगटविला साचार ॥३॥
संतकृपे आत्म प्राप्ती । एक आहे माझी विज्ञप्ती ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । घडविं आत्म भक्ति मज अनाथा ॥५॥
१०६
संतीं कळविली निजखूणा । तूझी ओळख होती कोणा ॥१॥
संतीं तुज मज भेटवीला । दुःख समुद्र आटविला ॥२॥
संत वचनीं धरिं विश्वास । आपण सांपडला मज स्वप्रकाश ॥३॥
दुःख दरिद्र अज्ञान गेलें दूरी । सच्चित्सुख आत्म प्रचिति आलि पुरी ॥४॥
रामा विष्णु कृष्ण जगन्नाथा । प्रपंच परमार्थ अभेद आपण स्वता ॥५॥
१०७
प्रेमा अंतरिं राघवा मज तूझा । नित्य सद्भावें करिन आत्म पूजा ॥१॥
अंतर दृष्टिनें हे नयन तूज पाहुं । आत्म दर्शनें हें चित्त स्थीर राहुं ॥२॥
चरणीं आपुल्या हें नम्र होऊ शीर । वाचा वर्णुं आपुले गुण गंभीर ॥३॥
नित्य हृदयीं देउनि आत्म धीर । संभाळीं अभिमानी तूं आमुचा रघुवीर ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नथा आत्म सेवा । अखंड घडवीं आपण पूर्ण सुखाचा ठेवा ॥५॥
१०८
रुपें कोटि मदनाहुनि तूं सुंदर । रामा प्रतापि तूं मोठा धुरंधर ॥१॥
कामादिक षट् शत्रुंला उपजों नेदीं । चित्त पडूं नेदीं माझें प्रपंच खेदीं ॥२॥
आपण वसवीं माझें हृदय मंदीर । सदय हृदय रामा देउनि धीर ॥३॥
मज सोडुं नको हेचि विनंति । जाणसी तु मज एक सीतापति ॥४॥
१०९
प्रभु तूं अनाथांचा नाथ । समर्थाहुनी तूं समर्थ ॥१॥
ऐसें कळविसी निज भक्तांस । बाह्याभ्यंतर्गत नुरवुनि त्रास ॥२॥
आत्म कृपेच्या षडिवारा । काय वर्णिन मी ऊदारा ॥३॥
अभिमानी भक्त जनांचा । झाला निश्चय हाचि मनाचा ॥४॥
रामा विष्णु कृष्ण जगन्नाथा । आत्मकृपुआ वृद्धींगत करीं आतां ॥५॥
११०
पूर्ण करुनि मनोरथ माझा । केला आनंद राम राजा ॥१॥
ऐसा आनंद सदोदित । करीं जानकी सहित ॥२॥
ध्यान तुझें मज आवडे देवा । आमुच्या हातें करुनि घेइं सेवा ॥३॥
करुनी शत्रूंचा संहार । देइं भक्तां आत्मसुख फार ॥४॥
सर्व पीडा रोग शांति । करीं दे आरोग्य भजाया तुज एकांति ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथासी । तुजपासि मागणें मागितलें हें मज दे अनाथासी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP