चतुर्थ स्कंधाचा सारांश
या स्कंधांत अध्याय ३१, मूळ श्लोक १४४५, त्यांवरील अभंग २३३
या स्कंधांत परीक्षिती राजाला शुक महामुनींनी विदुर-मैत्रेय संवादरुपानें सर्व कामना पूर्ण करुन, अंतीं भगवत्प्राप्ति करुन देणार्या अनेक पवित्र कथा सांगितल्या आहेत. प्रारंभीं स्वायंभुव मनु व त्याची कन्या प्रसूति यांचा वंश वर्णिला असून, पुढें दक्षयज्ञाचें सविस्तर वर्णन आलें आहे. त्यांतील सतीचा क्रोध, दक्षयज्ञाचा विध्वंस व शेवटीं दक्षाचें पुन:संजीवन हे विषय महत्वाचे आहेत. नंतर या स्कंधांत अधर्माचा वंश सांगून राजापासून ‘वेन’ नावाचा एक अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा पुत्र झाला. त्याच्या त्रासानें अंगराज सर्व त्याग करुन वनांत निघून गेला. पुढें वेनाच्या दुष्कृत्यामुळें ऋषींनीं त्याचा नाश केला. तेव्हां सर्वत्र अराजकता माजली असतां मुनींनीं वेनाच्या उजव्या हातापासून पृथुची उत्पत्ति केली व त्याला राजा केले. पृथु हा विष्णुअंशच होता. त्यानें पृथ्वि सपाट करुन सर्वत्र धन-धान्याची अभिवृद्धि केली आणि प्रजेला धर्मराज्यानें संतुष्ट केलें. हें पृथुचरित्र अत्यंत बोधप्रद आहे. पृथुराजाच्या पुढें प्राचीनबर्हि किंवा ‘बर्हिषद’ याला ‘प्रचेते’ नांवाचे दहा पुत्र झाले. या प्रचेत्यांना साक्षात् शंकरांनीं दर्शन देऊन त्यांना ‘रुद्रगीत’ स्तोत्राचा उपदेश केला त्याच्या योगानें ते कृतार्थ झाले. पुढें प्राचीनबर्हीला दयाळू नारदांनीं कर्ममार्गातून भक्तीचा आश्रय करण्यासाठीं उपदेश केला आणि आश्चर्यकारक रुपकात्मक अशी एक पुरंजनाची कथा सांगितली. त्यांत पुरंजनाची मृगया, त्याच्या नगरीला शत्रूचा वेढा व पुरंजनाचा नाश वर्णिला असून पुढें नारदांनीं पुरंजनकथेचा गूढार्थ सांगितला आहे. प्रचेत्यांना शंकरांनीं उपदेशिलेलें प्रत्यक्ष ‘रुद्रगीत’ ही या स्कंधांत सांगितलेलें आहे. प्रचेत्यांची ही अद्भुत व बोधप्रद कथा, भक्ति आणि वैराग्यकारक असून साधकाला परमपद प्राप्त करुन देणारी आहे. अशा विविध कथांनीं हा स्कंध नटला आहे.
======
ॐ नमो भगवते वासुदेवाय
अभंग-भागवत
श्रीमद्भागवताचें अभंगमय सुबोध रसाळ रुपान्तर
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2019
TOP