स्कंध ४ था - अध्याय ३० वा

N/Aसर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२२४
क्षत्ता म्हणे मुने, प्राचीनबर्हीचे । पुत्र प्रचेते भाग्यवंत ॥१॥
इहपरभोग, सिद्धीही कोणत्या । लाभल्या तें सांगा तयांप्रति ॥२॥
मुनि म्हणे गेले सागरीं तपासी । आज्ञा स्वपित्याची घेऊनियां ॥३॥
दशशस्त्राब्दें आचरिलें तप । दर्शनें ते क्लेश दूर होती ॥४॥
अष्टभुज तदा होते भगवान । गरुडवाहन मेघवर्ण ॥५॥
सुवर्णकांती तैं गरुड भासला । मेरु तो शोभला मेघयुक्त ॥६॥
वासुदेव म्हणे वनमालादिक । शोभती अपूर्व अलंकार ॥७॥

२२५
प्रचेत्यांसी देव बोलले कृपेनें । तपें बंधुप्रेमें तुष्ट झालों ॥१॥
स्मरतील तुम्हां सायंकाळीं त्यांची । नित्य बंधुप्रीति वृद्धि पावे ॥२॥
रुद्रगीतही जे गातील द्विकाल । तयांचे पुरतील सकळ हेतु ॥३॥
कीर्तिलाभ पितृआज्ञापालनानें । लाभेल सत्कर्मे तुमच्या तेंवी ॥४॥
ब्रह्मदेवासम सत्पुत्र होईल । त्रैलोक्य व्यापील वंश त्याचा ॥५॥
कांतेस्तव त्यांसी विष्णु भगवान । वृत्तान्त कथन करिती एक ॥६॥
वासुदेव म्हणे वृत्त तें अद्भुत । ऐकावें समस्त मैत्रेयोक्त ॥७॥

२२६
कंडूपासूनियां ‘प्रम्लोचा’ नामक । अप्सरेसी एक कन्या झाली ॥१॥
वृक्षातळीं तिज टाकूनि प्रम्लोचा । आनंदें स्वर्गाचा मार्ग धरी ॥२॥
क्षुधाकुल कन्या करितां रुदन । दयामय सोम द्रवला मनीं ॥३॥
तर्जनी वदनीं घालूनि अमृत । पाजिलें तियेस नित्य तेणें ॥४॥
स्वीकारुनि तया कन्येसी पित्याचें । प्रजोत्पादनाचे पुरवा हेतु ॥५॥
अनुरुप तुम्हां सकलाम ते एक । स्वीकारा मद्वच मानूनियां ॥६॥
अनुज्ञा माझी जें शास्त्र तेंचि जाणा । भोग भोगा नाना त्रैलोक्यांत ॥७॥
दशलक्ष देववर्षे सुखें नांदा । चित्तीं निर्भयता धरुनियां ॥८॥
निष्काम मजसी भजेल तयासी । सुखें लाभे मुक्ति गृहस्थाही ॥९॥
वासुदेव म्हणे आशीर्वाद ऐसा । लाभला प्रभूचा प्रचेत्यांसी ॥१०॥

२२७
तोषूनि प्रचेते प्रेमें करीती स्तवन ॥ दु:खनिवारका घेईं आमुचें नमन ॥१॥
जगन्निवासा त्वद्‍गुण कल्याणार्थ भावें ॥ श्रुतीही निवेदी स्पष्ट सर्वकाळ गावे ॥२॥
मन वाणी इंद्रियांही देवा, तूं अग्राह्य ॥ वंदितों सद्भावें प्रभो, तुझे आम्हीं पाय ॥३॥
निर्मल सर्वदा शांत गोजिरें स्वरुप ॥ कर्ता-करविता तूंचि नारायणा, एक ॥४॥
भक्तरक्षणार्थ घेसी अनंत स्वरुपें ॥ भवबंधच्छेदक तूं वंदितों पदांतें ॥५॥
ज्ञानद सर्वांतर्यामीं ब्रह्मांडनायका ॥ नमस्कार घेईं प्रेमें आनंदस्वरुपा ॥६॥
अनंता, अनंत घेई प्रणिपात माझे ॥ वासुदेव म्हणे नित्य दर्शन दे मातें ॥७॥

२२८
प्रचेते यापरी स्तवूनियां कर - । जोडूनियां, दूर म्हणती श्रम ॥१॥
सर्वज्ञा, आमुच्या इच्छा तूं जाणसी । परी वदविसी आम्हांलागीं ॥२॥
मागतों कृतार्थ होऊनि दर्शनें । अन्य एक प्रेमें पुरवीं हेतु ॥३॥
त्वदिच्छेनें किंवा प्रारब्धें या लोकीं । जन्मतां संतांची सेवा लाभो ॥४॥
मोक्षही आम्हांसी तयापुढें तुच्छ । गुणगान नित्य करिती संत ॥५॥
नैराश्य निर्वैर निर्भयता तेणें । सहजचि बाणे अंतरांत ॥६॥
ऐसा अनुभव साक्षात्‍ आम्हांप्रति । आतां प्रमाणांची गरज नसे ॥७॥
यास्तव सज्जनसंग देईं नित्य । मग दे असंख्य जन्म सौख्यें ॥८॥
वासुदेव म्हणे सर्वार्पणें धन्य । होऊनि नमन करिती अंतीं ॥९॥

२२९
निरीक्षिती ऐसें बोलूनि प्रभूसी । अंतर्धान तोंचि पावे देव ॥१॥
जळांतूनि येतां प्रचेते बाहेर । दिसले त्यां थोर थोर वृक्ष ॥२॥
गगन ते जणु धरिती तोलूनि । जाळावे ते मनीं प्रचेत्यांच्या ॥३॥
मुखांतूनि अग्निज्वाला जैं काढिती । ब्रह्मा तैं तयांसी शांत करी ॥४॥
‘मारिया’ कंडूची कन्या तदा वृक्ष । प्रेमें प्रचेत्यांस अर्पिताती ॥५॥
दक्षप्रजापती जाहला तियेसी । शिवक्रोधें ज्यासी पुनर्जन्म ॥६॥
ब्रह्मदेव त्यासी देई अधिकार । निर्मी तो अपार प्रजा जनीं ॥७॥
मरीचिप्रभृति अन्य प्रजापति । आपुल्या साह्यासी योजी हाचि ॥८॥
वासुदेव म्हणे प्रचेत्यांचें वृत्त । ऐकावें वैराग्य - ज्ञानदायी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP