स्कंध ४ था - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३०
वृत्तान्त हा शिवा कथिला नारदें । क्रोध तैं शिवातें येई बहु ॥१॥
उपटूनि एक जटा आदळितां । सहस्त्र भुजांचा प्रगटे वीर ॥२॥
प्रचंड शरीर मेघासम कांति । नरकपालाची माळ गळां ॥३॥
प्रज्वलित जटा आयुधें बहुत । जोडूनि करांस प्रार्थी शिवा ॥४॥
आज्ञापावें काज बोलतां शंकर । तयालागीं कार्य कथिती ऐका ॥५॥
वीरभद्रा, सेनानायक होऊनि । दक्षासी वधूनि त्वरित येईं ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि ते आज्ञा । घाली प्रदक्षिणा वीर शिवा ॥७॥

३१
कालाचाही काळ करुनि गर्जना । जाई दक्षयज्ञा वीरभद्र ॥१॥
चालतां तो वीर कांपली धरणी । धांवले गर्जूनि शिवदूतही ॥२॥
यज्ञमंडपांत दुश्चिन्हें जाहलीं । वाटे कीं पातली प्रलयवेळ ॥३॥
नभ धूलिमग्न स्तब्ध समीरण । मंडपींचे जन चिंतायुक्त ॥४॥
प्राचीनबर्हि तो नृपाळ रक्षील । मानिती सकल परी भय ॥५॥
दक्षकांता तदा बोलली ‘प्रसूति’ । सख्यांसवें सतीक्रोधचि हा ॥६॥
कोपला शंकर निश्चयें करुनि । वासुदेव पाणी जोडी तया ॥७॥

३२
प्रलयकालींचें नृत्य आठवे तयांसी । मोकळ्या जटा दिग्गज खोंची त्रिशूळासी ॥१॥
अट्टाहास्यध्वनि मेघगर्जनेसमान । आरोळ्या फोडीत नाचे शिव भगवान ॥२॥
फाटूनियां जाती जेंवी दशदिशा वाटे ॥ सहन न होई तदा तेज तें कोणातें ॥३॥
उन्मत्त नृत्य तें जनीं वर्णितांही कोणी ॥ ऐकूनीच जाई भयें काळीज फाटूनी ॥४॥
वक्र भुंवया क्रोधानें करितां शंकर ॥ बोबडी वळोनी काळ कांपे थरथर ॥५॥
ब्रह्मदेवासही असह्य क्रोध शंकराचा ॥ वासुदेव म्हणे पाड काय त्या दक्षाचा ॥६॥

३३
स्तविती शंकरा निंदिती दक्षासी । सर्वत्र तों होती बहु उत्पात ॥१॥
दुश्चिन्हें पाहूनि दचकला दक्ष । विघ्न तों यज्ञांत प्राप्त झालें ॥२॥
मोडिला मंडप विझविला अग्नि । नाश शिवदूतांनीं मांडियेला ॥३॥
मूत्रोत्सर्ग कोणी केला होमकुंडीं । जाहला मंडपीं हाहा:कार ॥४॥
मुनिपत्न्यातेंही दावूनिया भय । बंधनांत देव टाकियेले ॥५॥
वासुदेव म्हणे मुनींचाही छळ । करिती सकल शिवदूत ॥६॥

३४
मणिमान बांधी भृगुऋषीप्रति । चंडीश पूषासी बद्ध करी ॥१॥
नंदिकेश्वरानें पाडिलें भगातें । धरिलें दक्षातें वीरभद्रें ॥२॥
ताडूनि पाषाण इतरांसी अन्य । क्रोधें शिवगण दंडिताती ॥३॥
शिवालागीं दाढीमिशा दाखवूनि । पूर्वी भृगुमुनि हंसला होता ॥४॥
यास्तव तयाची उपटी दाढीमिशी । वीरभद्र ऐशी शिक्षा करी ॥५॥
निंदासमयींच्या नेत्रसंकेतानें । काढिले क्रोधानें भृगुनेत्र ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसें क्रूरकर्म । करुनियां यज्ञ विध्वंसिला ॥७॥

३५
दक्ष शापितां शंकरा । ‘पूषा’ ऋत्विज हांसला ॥१॥
त्याचे पाडूनियां दंत । केलें उताणें दक्षास ॥२॥
बैसूनियां छातीवरी । खड्गें शरीर विदारी ॥३॥
त्याची न तुटेचि त्वचा । बुकली अंतीं जेवी अजा ॥४॥
यज्ञपशूसम वध । करुनि छेदियेला कंठ ॥५॥
दिधली आहुती अग्नीसी । जाळी मंडप तो अंतीं ॥६॥
गेले कैलासी शिवगण ‘ । शांतं पापं’ म्हणती जन ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा । घोर परिणाम गर्वाचा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP