स्कंध ४ था - अध्याय १८ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१२६
क्रुद्ध नृपाळासी पाहूनियां पृथ्वी । धरुनि अंतरीं धैर्य म्हणे ॥१॥
आंवरुनि क्रोध शांतपणें राया । वचन या ठाया परिसें माझें ॥२॥
भ्रमर पुष्पींचा सेवी मकरंद । तैसा घेईं बोध साररुप ॥३॥
आजवरी इहपर कल्याणार्थ । उपाय बहुत तत्त्वज्ञांनीं - ॥४॥
योजिले, त्यापरी प्रयोगही केले । निर्णय पाहिले सुनिश्चित ॥५॥
योग्य ते उपाय आचरी जो नित्य । तयासी निश्चित फलप्राप्ति ॥६॥
अव्हेरुनि तयां स्वेच्छेनें जो जाई । सिद्धी तया नाहीं श्रमतां बहु ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसे पूर्वाचार्य । गेले थोर थोर करुनि यत्न ॥८॥
१२७
आजवरी राया, यज्ञविध्वंसक । जाहले बहुत जनांमाजी ॥१॥
ऐशा निंद्य जनीं सेविल्या औषधि । वेनासम जगीं राजे झाले ॥२॥
तदा म्यां ग्रासिल्या औषधि यज्ञार्थ । पावल्या क्षीणत्व बहुत काळें ॥३॥
योजूनि उपाय काढीं त्या बाहेरी । उपाय सत्वरी कथितें एक ॥४॥
पान्हा फुटे ऐसा वत्स करीं सिद्ध । तेंवी पात्र योग्य दुग्धास्तव ॥५॥
सर्व इच्छा मग पुरवीन तव । दोग्धाही अपूर्व आवश्यक ॥६॥
बलप्रद अन्न लाभेल या मार्गे । समान तूं मातें करीं राया ॥७॥
तेणें वर्षाकाल लोटतांही जल । राहील सकल पृष्ठीं माझ्या ॥८॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें पृथु । साधी निज हेतु कौशल्यानें ॥९॥
१२८
स्वायंभुव मनु योजुनियां वत्स । दुग्ध धान्यरुप करीं घेई ॥१॥
बृहस्पति वत्सें, कर्णी तैं वदनीं । दुग्ध वेदवाणी संपादिलें ॥२॥
वीर्य, ओज, बलदायक अमृत । कनकपात्रीं इंद्र वत्स घेई ॥३॥
दैत्य-दानवही सुरासव घेती । प्रल्हाद वत्सेंसी लोहपात्रीं ॥४॥
विश्वावसु वत्स, मुख त्याचें पात्र । गायन सुस्वर गंधर्वांतें ॥५॥
मृत्पात्रीं अर्यमा घेई कव्यदुग्ध । सर्वसिद्धि दुग्ध कपिला नभीं ॥६॥
आसुरमाया ते मयासुर नभीं । रुधिर नरकपात्रीं राक्षसांसी ॥७॥
बिलपात्रीं विंचू - सर्पादिकां विष । वत्स त्यां तक्षक होत असे ॥८॥
वासुदेव म्हणे पशूंस्तव नंदी । तृण दुग्ध योजी अरण्यांत ॥९॥
१२९
हिंस्त्र पशु निजदेहीं घेती मांस । योजूनियां वत्स सिंहाप्रति ॥१॥
तैसेंचि गरुडा योजूनियां पक्षी । फळें कृमि कीटीं रमले बहु ॥२॥
वटवृक्षरुपें सर्व वनस्पति । सर्व रस घेती दोहूनियां ॥३॥
हिमालयद्वारा सर्व धातुदुग्ध । दोहिती पर्वत अत्यानंदें ॥४॥
विदुरा, यापरी सकलांच्या इच्छा । पूर्ण होतां राजा संतोषला ॥५॥
पुढती पर्वत भेदूनि समान । पृथ्वीतें करुन पृथुराजा ॥६॥
नगरें, ग्रामें, तट, दुर्ग, वाडया, व्रज । निर्मूनि जनांस सौख्य देई ॥७॥
वासुदेव म्हणे पूर्वी यथासुख । व्यवस्थारहित वास होता ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 06, 2019
TOP