स्कंध ४ था - अध्याय २३ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१६८
यापरी आपुलें कर्तव्य पाळून । चिंती वयोमान पृथुराजा ॥१॥
पुत्रांच्या स्वाधीन करुनियां राज्य । कांतेसवें तप करण्या जाई ॥२॥
वियोगें तयाच्या सकलांसी दु:ख । परी राव श्रेष्ठ निर्धाराचा ॥३॥
कंद-मुळें, फळें, पर्णे तैं उदक । सेवून वायूच प्राशी अंतीं ॥४॥
पंचाग्नीसाधनादिक क्लेश भोगी । सिद्ध योगमार्गी प्राणायामें ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा तप:सिद्ध । होतांचि विशुद्ध, चित्त त्याचें ॥६॥
१६९
गेले कामक्रोधादिक । वासनांचे तुटले बंध ॥१॥
ईशआराधना करी । कुमारांनीं जी कथिली ॥२॥
ऐसी सवैराग्य भक्ति । जडतां होई ज्ञानप्राप्ति ॥३॥
दृढबंध अहंकार । सकल संसाराचें मूळ ॥४॥
भिन्न भिन्न मार्गे तोचि । भ्रष्ट करितो योग्यासी ॥५॥
परी लाभतांही सिद्धि । उपजे न त्या आसक्ति ॥६॥
नित्य ईशपदीं प्रेम । गुणगानीं रंगे मन ॥७॥
अंतीं ब्रह्मरुप झाला । शरीराचा त्याग केला ॥८॥
वासुदेव म्हणे कैसा । देह त्यागिला तें ऐका ॥९॥
१७०
गुदद्वारीं टांच लावूनियां बैसे । आकर्षी वायूतें मूलाधारीं ॥१॥
पुढती क्रमानें लल्लाटीं तो नेई । ब्रह्मरंध्रीं जाई सावकाश ॥२॥
भूतांमाजी भूतकार्ये करी लीन । जीवांत विलीन महत्तत्व ॥३॥
पुढती जीवही ब्रह्मांत विलीन । करुनियां ब्रह्मरुप होई ॥४॥
वासुदेव म्हणे कृतार्थता ऐसी । येई साधकासी ईशप्रेमें ॥५॥
१७१
‘अर्चि’ नृपाळाची कांता । महा साध्वी पतिव्रता ॥१॥
नव्हतें पाऊल भूमीसी । स्पर्श पावलें कदापि ॥२॥
सुकुमार तेचि वनीं । गेली तयांत रंगूनि ॥३॥
पतिसेवाचि साधन । मानूनियां सेवामग्न ॥४॥
अचेतन पतिदेह । ठेवूनियां चितेवर ॥४॥
स्नान करुनि उदक । देई आपुल्या पतीस ॥५॥
प्रदक्षिणा घाली तीन । पतिचरणातें वंदून ॥७॥
पतिध्यानें अग्नीमाजी । प्रवेशतां देव राजी ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसी । होई कृतार्थ ती सती ॥९॥
१७२
पुष्पवृष्टि तदा होई तिजवरी । तुष्टल्या अंतरीं देवस्त्रिया ॥१॥
धन्य धन्य अर्चि शब्द हें नभांत । उमटले स्पष्ट तयावेळीं ॥२॥
पाहतां पाहतां आमुच्या समक्ष । जाई परमोच्च विष्णुपदीं ॥३॥
पुण्यवतीची हे उन्नती प्रत्यक्ष । पाहावीच मात्र सुखें आम्हीं ॥४॥
योग्यता न आम्हां म्हणती देवस्त्रिया । स्तविती मानवा पुण्यवंता ॥५॥
मानव देहचि मोक्षाचें साधन । तेथ विषयमग्न होतां नाश ॥६॥
देवस्त्रिया ऐसें बोलती तों अर्चि । परमोच्च पदासी प्राप्त झाली ॥७॥
मैत्रेय बोलती विदुरा, हे कथा । गातां ऐकवितां पुरती काम ॥८॥
वासुदेव म्हणे सद्गतिलाभार्थ । पृथूचें हें वृत्त गावें ध्यावें ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 06, 2019
TOP