स्कंध ४ था - अध्याय २८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२०३
सैन्यासवें जरा हिंडतां अवनी । पुरंजनपुरीं प्राप्त झाली ॥१॥
जिंकिलें तियेनें पुरंजनाप्रति । उध्वस्त पुरासी करी सैन्य ॥२॥

मोहमग्न राजा जाला बुद्धिभ्रष्ट । राज्य होतां नष्ट दीन झाला ॥३॥
पुत्रपौत्रादिक करिताती यत्न । व्यर्थ ते जाणून दु:खी राजा ॥४॥
नष्टही सत्तेची मनीं धरी आशा । देहादिममता सुटेचिना ॥५॥
अंतीं नाइलाजे इच्छी पुरत्याग । ‘प्रज्वार’ तैं आग नगरा लावी ॥६॥
वासुदेव म्हणे पंचफणी नाग । पावला उद्वेग पुढती ऐका ॥७॥

२०४
नागासवें राव रडे धाय धाय । करील हे काय म्हणे कांता ॥१॥
कोणतेंही कर्म केलें न मजवीण । होईल तो दीन काय करुं ॥२॥
प्रिये, केवढा हा पातला प्रसंग । नाव सागरांत बुडूनि गेली ॥३॥
स्वयें येऊनियां यवन, नृपासी । बांधूनियां ओढी क्रूरपणें ॥४॥
नागरिक त्याच्या जाती मागोमाग । मित्र अविज्ञात स्मरला नाहीं ॥५॥
स्मरण तयाचें होतें जरी पूर्वी । सोडविता तरी तोचि एक ॥६॥
वासुदेव म्हणे पुरंजन ऐसा । दास यवनाचा झाला दीन ॥७॥

२०५
यज्ञपशु तेथ गांजिती तयासी । आठवी कांतेसी नित्य राव ॥१॥
दीर्घकाल घोर नरकनिमग्न । पुढती स्त्रीजन्म विदर्भात ॥२॥
स्वयंवरीं तिज वरी पांडयराव । ‘कृष्णेक्षणा’ होय प्रथम कन्या ॥३॥
पुत्रही तियेसी होती वीर सप्त । द्रविडदेशांत करिती राज्य ॥४॥
कोट्यवधि पुत्र जाहले तयांतें । अगस्तीकन्येतें वरिती सौख्यें ॥५॥
‘दृढच्युत’ तयां पुत्र एक होई । इध्मवाह पाहीं पुत्र त्याचा ॥६॥
पुढती मलयध्वज पांड्यपति । अर्पूनि पुत्रांसी राज्य गेला ॥७॥
कुलपर्वतीं तो आराधी कृष्णासी । मागोमाग त्याची कांता जाई ॥८॥
चंद्रवसा, ताम्रपर्णी, वटोदका । वासुदेव नद्या म्हणे तेथ ॥९॥

२०६
निर्मळ त्या जळीं करुनियां स्नान । आचरी सत्कर्म राव तेथें ॥१॥
महा चोर तप करी बहु वर्षे । कांताही तयातें साह्य करी ॥२॥
स्वप्नमय सृष्टि मानूनि देहाची । सोडिली आसक्ति नृपाळानें ॥३॥
कांताही वल्कलें परिधानूनियां । रात्रंदिन सेवा करी त्याची ॥४॥
एकदां चेंपितां पाय होती थंड । जाणूनि उदंड दु:ख करी ॥५॥
पेटवूनि चिता अंतीं होई सिद्ध । करावया त्याग स्वदेहाचा ॥६॥
इतुक्यांत कोणी परिचित विप्र । करी आत्मबोध येऊनियां ॥७॥
वासुदेव म्हणे अद्भुत तें वृत्त । होऊनियां शांत श्रवण करा ॥८॥

२०७
विप्र म्हणे बाई, कोण तूं कोणाची । शोक हा करिसी कोणास्तव ॥१॥
पूर्वजन्मस्मृति देऊनियां म्हणे । ‘अविज्ञात’ जाणें नाम माझें ॥२॥
मानसीचें हंस दोघेही आपण । होतों सदनावीण दीर्घकाळ ॥३॥
त्यागूनियां मज भोगेच्छा धरुनि । राज्य पूर्वजन्मीं केलेंसी त्वां ॥४॥
पुढती विदर्भकन्या जाहलासी । मलयध्वजाची कांता न तूं ॥५॥
पुरंजनीचाही नव्हसी तूं पती । जाणावी सर्वची माया माझी ॥६॥
नरनारीही तूं नव्हेसी हें जाण । अमंगल भ्रम अज्ञानें हा ॥७॥
वासुदेव म्हणे आपण अभिन्न । ऐसें तो ब्राह्मण वदला तिज ॥८॥

२०८
हंस तोचि जाणा ईश । जीव मानसींचा हंस ॥१॥
बोधें स्वरुपाची प्राप्ति । होई येऊनियां स्मृति ॥२॥
विषयांच्या संगतीनें । भ्रम तयासी अज्ञानें ॥३॥
ब्रह्मस्वरुपचि होता । प्राप्त झाला स्वस्वरुपा ॥४॥
कथी प्राचीनबर्हीसी । ब्रह्मपुत्र रुपकासी ॥५॥
विश्वचालकासी ऐसें । रुपक हें बहु रुचे ॥६॥
वासुदेव म्हणे बोध । ऐशा रुपकें सहज ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP