स्कंध ४ था - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


८५
प्रजापति शिशुमार कन्या ‘भ्रमि’ । कांता ध्रुवालागीं तेंवी ‘इला’ ॥१॥
वायूची ते कन्या ‘उत्कल’ तत्पुत्र । कन्या तिज एक ‘रुपवती’ ॥२॥
कल्प, वत्सर ते पुत्र त्या भ्रमीचे । ध्रुवासी अपत्यें ऐशापरी ॥३॥
विवाहचि नाहीं केला उत्तमानें । एकदां हौसेनें वनीं गेला ॥४॥
मृगयेस्तव तैं यक्षानें वधिला । ऐकूनि मातेला खेद बहु ॥५॥
वासुदेव म्हणे केला प्राणत्याग । झालें ईश्वरोक्त वचन सत्य ॥६॥

८६
ऐकूनि तें वृत्त ध्रुव बहु क्रुद्ध । विजयरथ सज्ज करीतसे ॥१॥
हिमाचलीं जाई अलकापुरीतें । भरलें शंखनादें नभ सारे ॥२॥
यक्ष गुह्यकांच्या स्त्रिया घाबरल्या । वीरांच्या स्फुरल्या भुजा नादें ॥३॥
शिवगणांसवें यक्ष घेती धांव । असामान्य ध्रुव वीर होता ॥४॥
प्रतियोद्धयावरी सोडी तीन बाण । लल्लाट भेदून नवल करी ॥५॥
प्रशंसूनि तदा खवळले यक्ष । वासुदेव युद्ध घोर म्हणे ॥६॥

८७
ध्रुवावरी बाणषट्‍क प्रत्येकाचें । खड्‍ग परिघ ते प्रास बहु ॥१॥
शूल, शक्ति, ऋष्टि, भ्रुशुंडी, कुठार । भडिमार थोर करिती यक्ष ॥२॥
हाहा:कार तदा जाहला नभांत । सेनासमुद्रांत बुडला ध्रुव ॥३॥
जयजयकार शब्दें यक्ष तैं गर्जले । ध्रुवावरी आलें विघ्न घोर ॥४॥
मानवसूर्य हा बुडालारे ऐसी । नभांत सिद्धांची वाणी येई ॥५॥
इतुक्यांत मेघ विदारुनि सूर्य । तळपे तैं ध्रुव तळपूं लागे ॥६॥
छिन्न भिन्न करी दक्षसेनेप्रति । सर्वत्र दिसती यक्षप्रेतें ॥७॥
वासुदेव म्हणे पळाले तैं यक्ष । ध्रुव परी दक्ष, सिद्ध राहे ॥८॥

८८
जिंकितांचि यक्षांप्रति । ध्रुव चिंतीतसे चित्तीं ॥१॥
अवलोकावी अलकापुरी । परी संशय अंतरीं ॥२॥
सारथ्यासी म्हणे दुष्ट । वाटे करितील कपट ॥३॥
इतुक्यांत सिंधुतीरीं । वायूसमचि अंबरीं ॥४॥
गेला भरुनियां नाद । दिशा धूलिकणें धुंद ॥५॥
नेत्र कोंदले अभ्रांनीं । चमकूं लागे सौदामिनी ॥६॥
रक्त, पूय, मूत्र, विष्ठा - । वर्षावचि रणीं साचा ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसी । माया प्रबल यक्षांची ॥८॥

८९
धडाधड धडें कोसळूं लागलीं । नवल त्या स्थळीं होई एक ॥१॥
प्रचंड पर्वत आविर्भूत झाला । पाषाण त्या स्थळा वर्षू लागे ॥२॥
खड्‍ग मुसळांची होई बह वृष्टि । सर्वत्र ओकती विष व्याळ ॥३॥
व्याघ्र सिंहादि ते पशु येती हिंस्त्र । क्षोभला समुद्र बुडावी धरा ॥४॥
अनिवार ऐसी असुरांची माया । लवही न ध्रुवा परी भय ॥५॥
सिद्ध मुनि तदा प्रार्थिती प्रभूतें । मोद आशीर्वादें ध्रुवाप्रति ॥६॥
नाममात्रें ज्याच्या आटे भववारी । संकटीं तो तारी भक्तांप्रति ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि ते शब्द । जाहला सावध राजपुत्र ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP