स्कंध ४ था - अध्याय १५ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
११४
निषाद अयोग्य जाणूनि राज्यासी । पुनर्मंथनासी करिती मुनि ॥१॥
बाहूसी मंथितां मिथुन जाहलें । आनंद पावले मुनिश्रेष्ठ ॥२॥
पाहूनियां मुनि म्हणती विष्णूचा । अंशचि हा साचा आदिराजा ॥३॥
प्रथितयशत्वें ‘पृथु’ नाम यासी । शोभा भूषणांची कांता ‘अर्चि’ ॥४॥
वाद्यनाद तदा जाहला गगनीं । येती तयास्थानीं ब्रह्मा, विष्णु ॥५॥
म्हणती हा भाग्यवंत होवो राजा । अर्चि तया कांता अनुरुप ॥६॥
हस्तावरी त्याच्या शोभे यवचिन्ह । विराजलें पद्म चरणावरी ॥७॥
वासुदेव म्हणे आनंदकारक । ऐसा होई पुत्र तपोबळें ॥८॥
११५
अभिषेकार्थ पुढती । सर्व साहित्य आणिती ॥१॥
झाला अभिषेकविधि । भूतें उपायनें देती ॥२॥
पृथु अर्चीच्या सान्निध्यें । सालंकृत बहु शोभे ॥३॥
सिंहासन त्या कुबेर । वरून अर्पी तया छत्र ॥४॥
कांति त्याची चंद्रासम । सलिल स्त्रवे जयांतून ॥५॥
वालव्यजनें वायूचीं । कीर्तिमाला धर्म अर्पी ॥६॥
इंद्रदत्त तो कीरीट । यम अर्पी दिव्य दंड ॥७॥
वेदकवच विरंची । हार अर्पी सरस्वती ॥८॥
वासुदेव म्हणे चक्र । प्रेमें अर्पी शार्ड्गधर ॥९॥
११६
ऐश्वर्य ते लक्ष्मी, दश चंद्रांकित । शिव अर्पी खड्ग अत्यादरें ॥१॥
शतचंद्रयुक्त ढाल ते भवानी । बैसवी स्यंदनीं विश्वकर्मा ॥२॥
शुभ्र अश्व चंद्र, अग्नी अर्पी चाप । सूर्य किरणरुप बाण अर्पी ॥३॥
योगपादुक त्या दिधल्या पृथ्वीनें । दिव्यमाला प्रेमें गगन अर्पी ॥४॥
नाट्य, गान, वादित्र ते अंतर्धान - । विद्या, देती जाण विद्याधर ॥५॥
कल्याणकारक आशीर्वाद मुन । सागर अर्पूनि धाला शंख ॥६॥
सागर, सरिता, पर्वत तयासी । नित्य मार्ग देती आनंदानें ॥७॥
उपायनें ऐसीं स्वीकारुनि सर्व । पृथु उपकार मानीतसे ॥८॥
वासुदेव म्हणे स्तुति मागधोक्त । ऐकूनि तो श्रेष्ठ राव बोले ॥९॥
११७
सूत मागधहो, ऐसें । व्यर्थ स्तवन हें माझें ॥१॥
प्रगट जाहल्या सद्गुण । योग्य होईल स्तवन ॥२॥
नसती जे गुण अंगीं । वर्णितां ते कासयासी ॥३॥
सर्व ऐश्वर्यसंपन्न । ईश्वराचे गावे गुण ॥४॥
गुणवंत मी पुढती । होईन हें जरी चित्तीं ॥५॥
तरी अद्य मी गुणहीन । निंदाचि हें गुणगान ॥६॥
स्तुति योग्य ते साधूंसे । कदा नावडे मजसी ॥७॥
कांहींचि न घडतां कर्मं । कैसें स्वीकारुं स्तवन ॥८॥
वासुदेव म्हणे सभ्य । व्यर्थ स्तवनें न तुष्ट ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 06, 2019
TOP