स्कंध ४ था - अध्याय २७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१९९
पुरंजनी महाधूर्त । जाणूनियां रावचित्त ॥१॥
आसक्ति ते ध्यानीं घेई । विलासांत मग्न होई ॥२॥
झणीं होऊनि सुस्नात । पुढती येई सालंकृत ॥३॥
मग झाली प्रेमभेटी । गुजगोष्टी त्या एकांतीं ॥४॥
राव ऐसा विषयांध । नष्ट तयाचा विवेक ॥५॥
ऐसीं गेलीं बहु वर्षे । भान तया न काळाचें ॥६॥
पुरंजनीतें पुरुषार्थ । वेंची मानूनि आयुष्य ॥७॥
क्षीण जाहलें यौवन । परी राही ज्ञानहीन ॥८॥
वासुदेव म्हणे काम । ऐसे व्यर्थ नेई जन्म ॥९॥

२००
एकादशशत तयां होती पुत्र । कन्या दशाधिक पुत्रांहुनि ॥१॥
सुशील उदार प्रजा ते सकळ । ‘पौरंजनी’ थोर नाम त्यांचें ॥२॥
पंचालाधिपति पुरंजन त्यांचे । विवाह आनंदें करीतसे ॥३॥
प्रति पुत्राप्रति होई पुत्रशत । पुरंजनवंश ऐसा वाढे ॥४॥
पौत्रही पुढती पाही आनंदानें । होई ममतेनें दास त्यांचा ॥५॥
पुढती सकाम आरंभिले यज्ञ । पशूंचें हनन बहुत केलें ॥६॥
देवपितरांसी संतुष्ट करुन । जाहले निमग्न संसारांत ॥७॥
वासुदेव म्हणे कामुकांचा वैरी । जरा प्राप्त झाली अंतीं तया ॥८॥

२०१
‘चंडवेग’ नामें गंधर्वाधिपति । तया त्रिशतषष्ठी अनुचर ॥१॥
कांताही तयांच्या तितुक्याच होत्या । शुक्ल कृष्ण त्यांचा वर्ण शोभे ॥२॥
परिवारासवें गंधर्व यापरी । पुरंजनपुरी लुटिती यत्नें ॥३॥
पंचफणी तयां प्रतिकार करी । शतवर्षे गेलीं ऐशापरी ॥४॥
महानाग परी थकलाचि अंतीं । संकट नृपासी कळलें नाहीं ॥५॥
करभार तेंवी प्रियतमासंग । नृपाळासी गुंग करी बहु ॥६॥
वासुदेव म्हणे अन्य एक विघ्न । आलें कळल्याविण नृपाळासी ॥७॥

२०२
जरा नामें कालकन्या । पावे ‘दुर्भगा’ जे संज्ञा ॥१॥
वरालागीं हिंडें वनीं । भेटे मजसी म्हणे मुनि ॥२॥
अव्हेरितां मी तिजसी । दु:खे शापी ती मजसी ॥३॥
कदाही न मुने, तुज । एकस्थळीं घडो वास ॥४॥
शापूनियां ऐशापरी । गेली यवनदरबारीं ॥५॥
भय नामें नृपाळासी । विनवी जोडूनि करांसी ॥६॥
यवन बोलला तिजसी । गुप्तरुपें सकलां भोगीं ॥७॥
सैन्यासवेंचि ‘प्रज्वार’ । बंधु माझा हा चतुर ॥८॥
साह्य करील तुजसी । होईं भगिनी तूं माझी ॥९॥
वासुदेव म्हणे ऐसा । हेतु साधला जरेचा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP