स्कंध ४ था - अध्याय ३ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
N/A१७
पुढती जामात-श्वशुरांचा द्वेष । अर्पिला न भाग शिवा यज्ञीं ॥१॥
शिवद्वेषाचें त्या केवळ अवमान । नव्हतें कारण परी गर्व ॥२॥
आधिपत्य सर्व प्रजापतींमाजी । अर्पिलें दक्षासी विरंचीने ॥३॥
तेणेंचि तो धुंद होऊनि शिवासी । आमंत्रण सत्रीं केलें नाहीं ॥४॥
देवदेवतांच्या मुखानें सतीसी । वार्ता ते यज्ञाची कळली यदा ॥५॥
तैसेचि यज्ञार्थ जाती देववृंद । विमानीं हर्षित कांतांसवें ॥६॥
पाहूनि तें जावें माहेंरी हे इच्छा । धरुनि, पतीचा कौल घेई ॥७॥
वासुदेव म्हणे अनिवार मोह । सतीसम थोर भ्रमती स्त्रिया ॥८॥
१८
युक्तिनें शिवासी बोले सती आदरानें ॥ पित्याच्या सदनीं देव चालले थाटानें ॥१॥
आरंभिला यज्ञ मोठा येतील भगिनी ॥ पारिवारासवें माझ्या हर्षूनियां मनीं ॥२॥
माहेरीं जाऊनी दिन जाहले बहुत ॥ निमित्तें होईल मज मातेचीही भेट ॥३॥
भेटतील सर्व आप्त यज्ञाची ही शोभा ॥ पाहूं तातमंदिरींचा समारंभ मोठा ॥४॥
तातवैभव पहाया जाहलें उत्सुक ॥ चिंतितां हें मनीं नाथा, पावेन आनंद ॥५॥
वासुदेव म्हणे सतीं बोले पतीलागीं ॥ आमंत्रण केलें नाहीं पित्यानें तुम्हांसी ॥६॥
१९
सन्मित्र, पालक, गुरु, आई-बाप । सर्वदा विमुक्त द्वार त्यांचें ॥१॥
यास्तव दयाळा, जावें उभयांनीं । पित्याच्या सदनीं ऐसें वाटे ॥२॥
नीलकंठचि हा दयाळुत्वसाक्षी । मम माहेरासी चला जाऊं ॥३॥
पित्याच्या सदनीं होतां हा आनंद । नसावें मी तेथ हें न योग्य ॥४॥
मायामोह कदा बाधे न आपणा । परी माझ्या मना खेद वाटे ॥५॥
प्रभो, अर्धांगीची पुरवावी आस । मम माहेरास येऊनियां ॥६॥
वासुदेव म्हणे सतीचे वचन । बोलला ऐकून शिव ऐका ॥७॥
२०
प्रिये, भल्याप्रति अवघेचि भले । तैसेंचि हें झालें कर्म तव ॥१॥
पाचारणाविण आप्तांच्या सदनीं । जावें, परी मनीं वसतां प्रेम ॥२॥
अभिमानें जरी मानितील तांठा । त्यागचि तयांचा करणें योग्य ॥३॥
देहाभिमानें पिता तव अंध - । जाहला, विवेक नुरलाचि त्या ॥४॥
विद्या, वित्त, तप, वपु, कुल, सत्ता । उपयोग यांचा न कळे मूढा ॥५॥
पितां तव ऐशा गुणांनीं गर्विष्ठ । जाहला, देहास समजे आत्मा ॥६॥
वासुदेव म्हणे शंकर सतीसी । देती पूर्वस्मृति प्रसंगीं या ॥७॥
२१
आतिथ्य, नमन, विनय, बहुमान । करिती सज्जन ईशभावें ॥१॥
देहबुद्धि ऐशावेळीं न मानिती । मूल्य सद्भावासी अंतरींच्या ॥२॥
आतिथ्यादि तेणें मनानेंहे घडॆ । रहस्य अज्ञातें न कळे याचें ॥३॥
सत्रामाजी केलें वंदन मनांत । न कळतां मूर्ख क्रुद्ध झाला ॥४॥
दुरुक्तीनें शापवचन बोलूनि । गेला जो निघूनि अविकानें ॥५॥
ऐशा आप्तांचेंही वर्जावें सदन । इच्छिसी सन्मान जरी कांते ॥६॥
वासुदेव म्हणे प्रेमानें शंकर । कथिती व्यवहार सतीलागीं ॥७॥
२२
दु:खद ते शराघात । परी मर्मभेदी शब्द ॥१॥
करिती हृदय विदीर्ण । सज्जनाचें रात्रंदिन ॥२॥
पितृप्रेम स्वाभाविक । परी माझा तया द्वेष ॥३॥
तेणें अपमान तुझा । निश्चयानें तेथ जातां ॥४॥
वंदितों मी सर्वव्यापी । तया वासुदेवाप्रति ॥५॥
मानसिकचि वंदन । करितों समस्तांस्वी जाण ॥६॥
दक्ष जरी तुझा पिता । तरी वैरीचि तो माजा ॥७॥
सदनीं तयाच्या न जाईं । वदन कोणाचें न पाही ॥८॥
आप्तकृत अपमान । संभाविताचें मरण ॥९॥
वचन न ऐकतां जासी । तरी मुकसील श्रेयासी ॥१०॥
वासुदेव म्हणे मूढ । जाणती न योग्यायोग्य ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2019
TOP