स्कंध ४ था - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


७१
गरुडवाहन भक्तकाजकल्पद्रुम ॥ सन्मुख बाळाच्या उभा ठाकला येऊन ॥१॥
हृदयकमळीं जेणें कोंडिलें प्रभूसी ॥ ध्यानमग्न बालक तो उघडी न दृष्टि ॥२॥
अंतीं ध्यानांतूनि त्याच्या देव होई गुप्त ॥ तदा ध्रुवबाळ चित्तीं होई कासावीस ॥३॥
काय जाहलें म्हणूनि उघडितां नेत्र ॥ प्रत्यक्ष तयासी दिसे गोजिरें स्वरुप ॥४॥
आनंदे बाळासी काय करावें न कळे ॥ अंती जगन्नाथाच्या तो पदांबुजी लोळे ॥५॥
मिठी मारुनी कटीसी देई आलिंगन ॥ टक लावूनियां अंतीं घेतसे दर्शन ॥६॥
वासुदेव म्हणे दोन्हीं हात जोडियेले ॥ करावें स्तवन बहु ऐसें मनीं आले ॥७॥

७२
ओळखूनि इच्छा बाळाची प्रभूनें । स्पर्शिलें शंखानें कपोलासी ॥१॥
शंखस्पर्श होतां स्फुरे दिव्य वाणी । बालक स्तवनीं दंग झाला ॥२॥
म्हणे जो अंतरीं प्रवेशूनि माझ्या । स्फुरण प्रसुप्ता वाणीसी दे ॥३॥
निज तेजें स्फूर्ति दिली हस्तपादां । असो त्या ज्ञानदा नमस्कार ॥४॥
अद्यपि देवता तत्तदिंद्रियांसी । प्रभो, तूंचि स्फूर्ति परी तयां ॥५॥
मायामय विश्व रचिलें अतर्क्य । आभास तो सत्य तूंचि एक ॥६॥
वासुदेव म्हणे स्तवन हरीचें । ध्रुवबाळ कैसें करी पहा ॥७॥

७३
सर्वव्यापी अग्नि काष्ठासम भासे । तैसें रुप तुझें भक्तांस्तव ॥१॥
देवा, तूंचि एक ब्रह्मयाचें सामर्थ्य । सर्व परतंत्र, स्वतंत्र तूं ॥२॥
कृतज्ञ जो तेणें भजावें तुजसी । भक्तीचि या जगीं पार नेई ॥३॥
मजसम देवा, कामनिक भक्त । होती ते वंचित निश्चयानें ॥४॥
विषयसौख्य तें नरकलोकींही । विफलचि होई सेवा तेणें ॥५॥
व्हावें ध्यानमग्न लीला गुणगान । चरित्रश्रवण हेंचि सौख्य ॥६॥
स्वरुपानंदींही सौख्य तें नसेचि । यास्तव रंगती गुणगानीं ॥७॥
तयांची संगती व्हावी सर्वकाळ । वासुदेव बाळ विनवी म्हणे ॥८॥

७४
कथामृतास्वाद घेईन सर्वदा । हीच एक इच्छा प्रभो, मज ॥१॥
गुणगानीं दंग होती तयांप्रति । पुत्र-कलत्रांची क्षति नसे ॥२॥
अगाध हें विश्व तुझेंचि स्वरुप । सर्व यज्ञात्मक विष्णु तूंचि ॥३॥
उत्पत्ति, पालन, संहारक तूंचि । विद्या, अविद्यादि सकलही तूं ॥४॥
तल्लीन जे पादपद्ममकरंदीं । तुच्छ त्यां राज्यादि उपभोग ॥५॥
अनन्य मी तुज शरण अनंता । आधार वत्साचा धेनुमाय ॥६॥
न मागतांचि ते सोडी प्रेमपान्हा । तेंवी मत्कामना पूर्ण करीं ॥७॥
वासुदेव म्हणे बाळ ध्रुव ऐसी । प्रार्थना प्रभूची करी भावें ॥८॥

७५
प्रसन्न श्रीहरी बोलले ध्रुवासी । क्षत्रिया मजसी कळलें सर्व ॥१॥
आजवरी पद अर्पिलें न कोणा । रुचतें त्वन्मना अर्पीन तें ॥२॥
श्रेष्ठता तयाची बाळा, थोर असे । कल्पांतींही त्यातें नाश नसे ॥३॥
प्रदक्षिणा जया घालिताती सर्व । नक्षत्रगोलक धर्मादीही ॥४॥
खळ्यावरी तया मेढीसभोंवतीं । भ्रमण करिती वृषभ जेंवी ॥५॥
अद्वितीय लाभो स्थान तें तुजसी । प्रथम उपभोगीं पितृराज्य ॥६॥
छत्तीस सहस्त्र वर्षें करी राज्य । इंद्रियसामर्थ्य स्थिर राहो ॥७॥
वासुदेव म्हणे सर्वान्तर्यामीसी । ध्रुव बालकाची कळली इच्छा ॥८॥

७६
म्हणे सापत्न मातेनें । व्यर्थ तुज अवमानिलें ॥१॥
इच्छिसी न तिज शासन । परी विफल न कर्म ॥२॥
पुत्र तियेचा मृगयेसी । जातां त्यजील देहासी ॥३॥
तया शोधितां मातेचा । नाश वणव्यामाजी साचा ॥४॥
यज्ञकर्ता तूं होसील । दानें देसील विपुल ॥५॥
अंतीं अढळपदप्राप्ति । सुटे संसाराची भीति ॥६॥
बोलूनियां नारायण । क्षणीं पावे अंतर्धान ॥७॥
वासुदेव म्हणे दु:खें । बाळ जाई स्वस्थळातें ॥८॥

७७
क्षत्ता म्हणे मुने, एकाचि जन्मांत । अढळपद प्राप्त ध्रुवालागीं ॥१॥
मग ऐशा भक्ता दु:ख कासयाचें । मुनि म्हणे ऐकें विदुराप्रति ॥२॥
कैवल्यदाता तो होतांही प्रसन्न । मुक्तीविणें अन्य धरिती इच्छा ॥३॥
सुरुचीवचनविद्ध मी होऊनि । भेदभाव मनीं धरिला ऐसा ॥४॥
नृपाळ तोषतां धान्य एक मुष्टि । मागावें हे तैसी स्थिति माझी ॥५॥
थोरथोरांतेंहीं दुर्लभ जे भेटी । व्यर्थ ऐशारीति जाहली ते ॥६॥
बुद्धिभ्रम ऐसा केला कीं देवांनीं । उत्कर्ष त्यां मनीं रुचला नाहीं ॥७॥
असो आतां व्यर्थ पश्चात्ताप ऐसा । वासुदेव ऐका पुढती म्हणे ॥८॥

७८
विदुरा, त्वत्सम निष्काम जे भक्त । इच्छिताती नित्य सेवा मात्र ॥१॥
यदृच्छालाभें ते संतोष पावती । जाणूनियां शक्ति ईश्वराची ॥२॥
उत्तानपादासी निवेदिती दूत । येई नगरास ध्रुवबाळ ॥३॥
नारदवचन स्मरुनि नि:शंक । जाहला हर्षित भूमिपाळ ॥४॥
दूतासी सुवर्ण अर्पूनि तोषवी । रथारुढ होई आनंदानें ॥५॥
परिवार मोठा घेऊनि सांगाती । सामोरा बाळासी जाई प्रेमें ॥६॥
वासुदेव म्हणे विप्र, मंत्रि,सेना । माता हृष्टमना पुढती जाती ॥७॥

७९
पाहूनियां बालकासी । राव त्यागी स्यंदनासी ॥१॥
धांवूनियां हृदयीं धरी । पूर प्रेमाचा अंतरीं ॥२॥
कंठ सद्‍गदित झाले । प्रेमें मस्तक हुंगिलें ॥३॥
ध्रुव करी नमस्कार । आशीर्वाद घेई थोर ॥४॥
उभय मातांसी वंदिलें । मातांनीं त्या कुरवाळिलें ॥५॥
हृदयीं धरुनि सुरुची । म्हणे होईं शतायुषी ॥६॥
वासुदेव म्हणे ईश - । कृपा, होतां सकळ इष्ट ॥७॥

८०
बालकाच्या अंगस्पर्शे । सुरुचीचा कंठ दाटे ॥१॥
शब्द एकही उमटेना । प्रेमभरें फुटला पान्हा ॥२॥
दुग्धधारा वाहताती । वंद्य सकलांतें सुनीति ॥३॥
दु:खनिवारिता पुत्र । एकुलता जरी एक ॥४॥
भेटला गे पुनरपि । सुनीति तूं भाग्यवती ॥५॥
पुण्य तुझें वाटे थोर । राजा ध्रुवचि होईल ॥६॥
वासुदेव म्हणे जन । हर्षे वदती अभिनंदून ॥७॥

८१
बंधूसवें बाळ करिणीवरी बैसे । नगरीं प्रवेशे आनंदानें ॥१॥
स्तवन रायाचें करिताती जन । शृंगारिलें पूर्ण नगर हर्षे ॥२॥
मकराकृती तीं तोरणें सर्वत्र । पुष्प फलयुक्त कदलीस्तंभ ॥३॥
फलसंपन्न ते पूगपोत मार्गी । अपूर्व तयांची शोभा दिसे ॥४॥
साम्रपल्लव ते उदककलश । मुक्तामाला पुष्पविराजित ॥५॥
उजळले दीप तया कलशांवरी । ऐसी घरोघरीं दीपशोभा ॥६॥
छतें झालरीही मंदिरीं जरीच्या । मंगल अक्षता संमार्जनें ॥७॥
नगरांत ऐशा पाहूनि बाळासी । करिती पुष्पवृष्टि नारी नर ॥८॥
वासुदेव म्हणे कल्याणकारक - । निनादें, बालक सदनीं जाई ॥९॥

८२
राजमंदिराची शोभा वर्णवें न मज ॥ दुग्धफेनासम शुभ्र शय्या जागोजाग ॥१॥
हस्तिदंतमंचकीं त्या विराजल्या होत्या ॥ झळकती भित्ती बहु पाचु स्फटिकाच्या ॥२॥
रुक्मपरिच्छद मूल्यवान तीं आसनें ॥ जागजागीं विराजलीं सुवर्णसाधनें ॥३॥
कनकपुतळ्या करीं घेती रत्नदीप ॥ अनुपम शोभा केंवी वर्णितील शब्द ॥४॥
वासुदेव म्हणे ऐशा मंदिराभोंवतीं ॥ स्वर्गीय वृक्षांनीं बहु शोभे वनराजी ॥५॥

८३
देवलोकींचे त्या उपवनीं वृक्ष । त्यावरी विहंग कूजताती ॥१॥
भ्रमरगुंजननादित तें वन । इंद्राचें उपवन तुच्छ वाटे ॥२॥
उपवनीं तया होत्या बहु वापी । वैडूर्य रत्नांचीं सोपानें त्यां ॥३॥
उत्पलें, कुमुदें, बहुविध पद्में । नील श्वेत वर्ण आरक्तहीं ॥४॥
हंस, कारंडव तेंवी चक्रवाक । सारसही तेथ करिती क्रीडा ॥५॥
वासुदेव म्हणे उपवन ऐसें । सभोंवार होतें मंदिराच्या ॥६॥

८४
ध्रुवबाळ त्या मंदिरीं । वसे, आनंद अंतरीं ॥१॥
हर्ष पावला नृपाळ । अनुरुप होई बाळ ॥२॥
प्रजा मंत्रीही तयासी । अत्यादरें वागवीती ॥३॥
पाहूनियां प्रेमें राज्य । अर्पी तया राजराज ॥४॥
सर्वसंगपरित्यागें । जाई परमार्थमार्गें ॥५॥
वासुदेव म्हणे वनीं । गेला नृपाळ निघूनि ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP