स्कंध ४ था - अध्याय ७ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
४२
ब्रह्मस्तवनें धूर्जटी । बहु तोषला मानसीं ॥१॥
म्हणे अपराध्यां दंड । झाला आतां नसे क्रोध ॥२॥
अजमस्तक दक्षासी । मित्रदृष्टी ते भगासी ॥३॥
पूषा यजमानदंतें । करो पिष्ट भक्षणातें ॥४॥
भग्न बाहूंचें कुमार । करितील सर्व कार्य ॥५॥
छिन्नहस्तांप्रति पूषा । सर्वकाजीं साह्य साचा ॥६॥
दाढी अजाची भृगूतें । प्राप्त होईल क्षणार्धे ॥७॥
वासुदेव म्हणे मोद । ऐकूनियां शिवशब्द ॥८॥
४३
आनंदित देव प्रार्थिती शिवासी । दक्षाच्या यज्ञासी म्हणती यावें ॥१॥
शंकरही जाती आनंदें मंडपी । लाविती दक्षासी अजमुरव ॥२॥
अमृतदृष्टीनें शिव अवलोकी । येई दक्षाप्रति जीव तदा ॥३॥
वैरभावाचें न राहिलें स्मरण । सिद्ध तो स्तवन करावया ॥४॥
परी आठवूनि सतीतें सद्गद । आंवरुनि दु:ख प्रार्थी शिवा ॥५॥
वासुदेव म्हणे अपराधज्ञान । होतां जे शरण तेचि थोर ॥६॥
४४
दक्ष जोडूनि करांसी प्रार्थी शंकरातें ॥ म्हणे दंडिलेंसी मज उपकार मोठे ॥१॥
दोषहीन झालों तेणें पावलों दर्शन ॥ क्षमाशील रक्षियेले देव जनीं शिव नारायण ॥२॥
धर्महीन रक्षियेले पशूही कृपेनें ॥ रक्षिसील कां न देवां, धार्मिक जनांतें ॥३॥
आत्मतत्त्वरक्षणार्थ निर्मियेले विप्र ॥ धार्मिका तयातें देवा, संरक्षितां नित्य ॥४॥
उपकार केले बहु तेणें तोष तुम्हां ॥ फेड केंवी करावी तें मजसी कळेना ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसें प्रार्थूनि शिवासी ॥ यज्ञ आरंभूनि देती आहुती विष्णूसी ॥६॥
४५
दु:खनिवारक गरुडवाहन । होऊनि प्रसन्न प्रगटा झाला ॥१॥
उज्ज्वलित होई मंडप तत्तेजें । किरीट झळकें सूर्यासम ॥२॥
छत्रचामरांची शोभा अलौकिक । चतुर्भुज पीतवस्त्रधारी ॥३॥
शिव ब्रह्ययादिक उठूनि तयासी । प्रेमें सन्मानिती गहिंवरुनि ॥४॥
षोडशोपचारें पूजूनियां दक्ष । जोडूनि करांस स्तवन करी ॥५॥
वासुदेव म्हणे दक्षकृत स्तुति । ऐकूनि विष्णुसी शांति लाभे ॥६॥
४६
शुद्ध चैतन्याचा गाभा । सच्चिदानंदस्वरुपा ॥१॥
यत्नें चिंतितां तुजसी । प्रभो, होई कुंठित मति ॥२॥
मायाचालक असूनि । तदंकित भास जनीं ॥३॥
तुझा अवतार पिनाकी । अपराध घाली पोटीं ॥४॥
वासुदेव म्हणे भेद । विलय पावो म्हणे दक्ष ॥५॥
४७
ऋत्विज पुढती प्रार्थिती ईश्वरा । प्रभो, जगदाधारा निरंजना ॥१॥
पुण्याचें साधन वेदोक्त हा यज्ञ । तूंचि नारायण यज्ञरुप ॥२॥
कर्मामिमानीचि आम्ही नंदिशापें । अपराध आमुचे क्षमा करीं ॥३॥
वासुदेव म्हणे सदस्य प्रार्थिती । जोडूनि करांसी तेंचि ऐका ॥४॥
४८
देवा, तूंचि सर्वाधार । भयप्रद हा संसार ॥१॥
लवहीन सौख्य यांत । संकटेंचि ओतप्रोत ॥२॥
टपला मृत्युसर्प दंशा । विषयीं भुले जीव कैसा ॥३॥
सुखदु:खादिक द्वंद्व - । गर्तेमाजी फंसती जीव ॥४॥
भवाटवीमाजी धाक । दुष्ट पशूंचा सर्वत्र ॥५॥
दावानल शोकरुप । नित्य भडकला एथ ॥६॥
गृह-कलत्रादि भार । नित्य मस्तकीं साचार ॥७॥
ऐसे कामांध होऊनि । हिंडताती ही अवनी ॥८॥
देवा, ऐसीया नरांसी । कदा होईल त्वत्प्राप्ति ॥९॥
वासुदेव म्हणे ऐसें । नित्य प्रार्थावें विष्णूतें ॥१०॥
४९
प्रार्थिती शंकर हे इच्छापूरका । मुनींद्रही पूजा करिती तव ॥१॥
ऐशा तुजमाजी बुद्धी झाली लीन । वाटे न वैषम्य निंदितांती ॥२॥
भृगु म्हणे देवा, देवही अद्यापि । यथार्थ तुजसी जाणती ना ॥३॥
आम्हां अज्ञान्यांचा तेथ काय पाड । क्षमावे अपराध दयावंता ॥४॥
ब्रह्मा म्हणे देवा, भासे तें न सत्य । अगाध सामर्थ्य त्वन्मायेचें ॥५॥
इंद्र म्हणे प्रभो, स्मशानसदृश । स्थान हें पवित्र करीं आतां ॥६॥
वासुदेव म्हणे ऋषीही प्रार्थिती । अगाध प्रभूची लीला ॥७॥
५०
मनोवारण हा म्हणताती सिद्ध । क्लेश वणव्यांत पोळूनियां ॥१॥
कथामृतडोहीं करी नित्य पान । दावानल भान नसे तया ॥२॥
ब्रह्मज्ञासम तो विषयविन्मुख । होऊनियां सौख्यरुप झाला ॥३॥
दक्षपत्नी म्हणे मस्तकविहीन - । देहासम, यज्ञ तुझ्याविणें ॥४॥
नमस्कार असो तुज विश्वरुपा । शरण त्वत्पदां असों आम्हीं ॥५॥
इंद्रियचालका म्हणती लोकपाळ । भास हे सकळ त्वन्मायेचे ॥६॥
योगेश्वरमुनि होऊनि अनन्य । करिती नमन कर्माध्यक्षा ॥७॥
वासुदेव म्हणे वंदूनियां वेद । म्हणती न अंत आम्हां तुझा ॥८॥
५१
अग्नि म्हणे देवा, तूंचि यज्ञरुप । सकल सामर्थ्य माझें तूंचि ॥१॥
वंदूनियां देव म्हणती कल्पांतीं । आंवरुनि सृष्टि निद्रा घेसी ॥२॥
शेषशय्येवरी, तोचि तूं प्रत्यक्ष । जाहलासी अद्य रक्षीं आम्हां ॥३॥
गंधर्व बोलती खेळणें हें विश्व । जयाचें त्या नित्य नमन असो ॥४॥
विद्याधरोक्ति ते देहाहंभावानें । कीर्तनीं न रमे बद्ध तोचि ॥५॥
ब्राह्मण म्हणती कर्ता करविता । भोग्य भोग भोक्ता तूंचि एक ॥६॥
केवळ त्वन्नामें विघ्ननिवारण । असो हें नमन सदा तुज ॥७॥
वासुदेव म्हणे सकलही ऐसी । प्रार्थना हरीची करिती प्रेमें ॥८॥
५२
विदुरा, यापरी यज्ञरक्षकातें । प्रार्थूनि यज्ञातें आरंभिती ॥१॥
सदा स्वस्वरुपीं असूनि निमग्न । दक्षसमाधान करी देव ॥२॥
म्हणे दक्षा, ब्रह्मा, विष्णु तेंवी शिव । दिसे मूर्तित्रय परी एक ॥३॥
भेद तयांमाजी न ठेविसी जरी । पावसील तरी शांतिलाभ ॥४॥
पुढती दक्षानें यज्ञ पूर्ण केला । हवीही अर्पिला शंकरासी ॥५॥
मंगलाशीर्वाद अर्पूनि तयासी । देव स्वस्थळासी निघूनि गेले ॥६॥
हिमालयकांता मेनेच्या उदरीं । जन्मूनियां वरी सती शिवा ॥७॥
बृहस्पतिशिष्य उद्भवोक्त वृत्त । ऐकेल जो नित्य भक्तिभावें ॥८॥
सर्व दु:खें त्यांचीं पावती विनाश । वंदितो शिवास वासुदेव ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2019
TOP