श्रीगणेशायनम: ॥
जय जयाजी सद्गुरु । सिद्धचरित्र ग्रंथ थोरु । आरंभिला साचारु । तो सिद्धीतें पाववी ॥१॥
तुझिया कृपेची वोल । तरीच ग्रंथवेल उंचावेल । अमृतफळीं पूर्ण फळेल । उपेगा येईल सर्वांच्या ॥२॥
षष्ठ प्रकरणाचे अंतीं । विप्रस्त्रीस जाहली संतति । नाथ आशीर्वादें निगुती । सुखी राहे ती सदैव ॥३॥
पुढें काय वर्तलें गहन । तें परिसा श्रोते सज्जन । नाथ तेथूनि करिती गमन । संगें घेऊन गोरक्षा ॥४॥
अनुद्वेग महीं विचरतां । कित्येक काल गेला तत्त्वतां । अवसर पाहून प्रसन्नता । विनविलें नाथा गोरक्षें ॥५॥
अनंत जन्मींचें सुकृत । शुद्ध पुण्य सुशोभित । तैंचि हीं पाउलें आतुडत । कीजे कृतार्थ कनवाळें ॥६॥
जन्म मरनाचिया कोटी । पावोनि, जाहलों परम कष्टी । करोनियां कृपादृष्टि । अमृतवृष्टि करावी ॥७॥
नाथ कृपेचें पूर्ण फळ । गोरक्ष जन्मत:चि सिद्ध केवळ । परी लोकसंग्रहार्थ प्रांजळ । उपदेशक्रम दाखविती ॥८॥
नाथ म्हणती तयालागून । जो तनुमनधनेंसी अनन्य । त्यासीच उपदेश योग्य जाण । नातरी पाषाण समतुके ॥९॥
पृथ्वीमाजी घरोघरीं । गुरुशिष्य असती निर्धारी । गुरु अनुभवी - शिष्य अधिकारी । इतुकेंचि दुर्लभ ॥१०॥
गुरु स्वार्थी शिष्य स्वार्थी । तेथें कैची परमार्थ मति ? । एक गाती, एक ऐकती । ग्राम्य गीतें जयापरी ॥११॥
मोठें ज्ञान तें तत्त्वज्ञान । म्हणोनि दाविती प्रांजल करुन । `तत्त्वमसि' महावाक्य विवरण - । करुनि म्हणती `ब्रह्मचि तूं' ॥१२॥
ऐसें परोक्ष ज्ञान सांगती । तेणें कैं होय अपरोक्ष प्राप्ति ? । जंव मन उन्मन नोहे निश्चितीं । तंव गुरुप्रतीति ते नोहे ॥१३॥
साधनचतुष्टय संपन्न । तेथें ज्ञान ठसावेचि जाण । यालागीं अधिकार आलिया पूर्ण । उपदेश तुज होईल ॥१४॥
ऐसी नाथमुखींची वाणी । गोरक्षरायें येतांचि श्रवणीं । कमंडलूमाजिलें जळ घेऊनी । उभे राहिले गुरुपुढें ॥१५॥
म्हणती तनु मन धन । हें म्या केलें गुरुस अर्पण । यासी साक्ष तुझेचि चरण । म्हणोनि उदक सोडिलें ॥१६॥
नाथें हास्यवदन केलें । म्हणती वत्सा जळ सोडिलें । इतुकेन मुमुक्षुत्व आलें । न लगती भले बोल हे ॥१७॥
तरी तूं आग्रहातें न धरी । जैं अधिकार देखे निर्धारी । तैंचि हस्तकु तव शिरीं । ठेवीन जाण निश्चयें ॥१८॥
गोरक्ष विनविती कर जोडून । म्हणती व्रत, देत-धर्म जाण । पाप-पुण्य सुख-दु:ख ध्यान । तुझेचि चरण सर्व माझें ॥१९॥
ज्ञान उपासना कर्म मंत्र । पूजाविधि यंत्र तंत्र । कांहींच नेणे मी अणुमात्र । हें तव चरण जाणती ॥२०॥
ऐसें बोलोनि स्वस्थ राहिले । पुढें कित्येक दिवस गेले । नाथ `गिरी' पर्वता चालिले । गोरक्ष निघाले समागमें ॥२१॥
मार्गी जातां जातां जाण । पर्वत राहिला एक योजन । तेथें जाहला अस्तमान । म्हणवोनि वस्तीसी पैं केलें ॥२२॥
दुसरे दिवशीं प्रात:काळीं । गोरक्ष निघाले चरणचालीं । नाथ म्हणती भूक लागली । मिष्टान्न जेवूनि पुढें जाऊं ॥२३॥
आज्ञा वंदूनियां शिरीं । गोरक्ष गेले ग्रामाभीतरीं । तों यावनाळ-पिष्ठ बाजरी । लोक भिक्षेसी घालिती ॥२४॥
गोरक्ष म्हणती आपुले चित्तीं । गुरुसी जाहली मिष्टान्नप्रीति । तें न मिळे; तरी निश्चिती । व्यर्थ मम जन्म जाहला ॥२५॥
गुरुमनोरथ न करिती पूर्ण । तो शिष्य अभागी सत्य जाण । तरी मागुती श्रम घेऊन । मिष्टान्नप्राप्ति करीन मी ॥२६॥
म्हणोनि भिक्षेसी करिती गमन । तों तेथींचा ग्राम-लेखक जाण । करीत ब्राह्मणसंतर्पण । तेथें गोरक्ष पातले ॥२७॥
तो विप्र परम कृपण । परी गोरक्षाचें होतां दर्शन । सद्बुद्धि जाहली पूर्ण । म्हणे पात्र वाढून देइजे ॥२८॥
जे जे सिद्ध असती पदार्थ । ते पात्र-पूर्ण भरोनि यथार्थ । विप्रस्त्री अर्पण करीत । गोरक्षासी ते समयीं ॥२९॥
परम संतोषले मनीं । आले स्वस्थळालागुनी । तों नाथा निद्रा लागली जाणुनी । स्वस्थ तेथेंचि बैसले ॥३०॥
सावध होऊनि नाथ पाही । म्हणती कांहीं मिळालें कीं नाहीं ? गोरक्ष म्हणे तव कृपें कांहीं । न्यूनता नाहीं समर्था ॥३१॥
ऐसें बोलून ते वेळे । सिद्ध पात्र पुढें ठेविलें । नाथ सेवूनि, तृप्त जाहले । शेष दीधलें गोरक्षा ॥३२॥
तैं उभयासी जाहला आनंद । ते दिनीं तेथेंचि राहती सिद्ध । रात्री जाऊनि; दिशा शुद्ध- । प्रात:काळ जालिया ॥३३॥
प्रयाणसमय जाणोनी । गोरक्ष सिद्ध जाहले गमनीं । नाथ म्हणती तयालागोनी । भोजन सारोनि चलावे ॥३४॥
काल आणिलेंसी मिष्टान्ना । तैसेंचि आणी आजही भोजना । ऐसी होतां गुरुची आज्ञा । गोरक्ष निघाले भिक्षेसी ॥३५॥
जाऊनियां ग्रामाआंत । वाचे `अल्लख' शब्द वदत । भिक्षार्थी अटण करी यथार्थ । परी मिष्टान्न न मिळेचि ॥३६॥
कोणी भात कोणी भाकरी । भिक्षेसी आणिती नरनारी । परि मिष्टान्न न मिळेचि निर्धारी । चिंता वसे अंतरी यालागीं ॥३७॥
म्हणे हतभाग्य मी सत्य । पूर्ण न होती गुरु-मनोरथ । मानवजन्मा येऊनि व्यर्थ । झालें माझें जिणें पैं ॥३८॥
जया नाचरवे गुरुवचन । तो जीतचि मृतासमान । अजागलीचे गलस्तन । कीं फळ पूर्ण अर्कीचें ॥३९॥
ऐसा विचार करुनि मनीं । म्हणती काल मिळालें जे सदनीं । तेथें तरी पाहूं जाउनी । म्हणोनि ते गृहीं पातले ॥४०॥
तंव त्यांचें जाहलें भोजन । पुरुष गेले स्वकार्यालागुन । स्त्रिया गोधूम-पिष्ट घेऊन । वळवट करीत बैसल्या ॥४१॥
तों गोरक्षें `अल्लख गुरुजी' । म्हणतां, आणिली भाकरी भाजी । गोरक्ष म्हणती हें नको माँ जी । मिष्टान्नींच इच्छा असे ॥४२॥
बाई म्हणे तयालागून । आज कोठून मिळे मिष्टान्न । गोरक्ष म्हणती घेतल्यावांचून । येथून गमन न करुं ॥४३॥
बाई म्हणे अरे तूं साधू । किंवा खरखर मुंडया भोंदू ? मिष्टान्नाचा न वचतां स्वादु । षडरिसिंधु जाहलासी ? ॥४४॥
गोरक्ष म्हणे माते परियेसी । गुरुआज्ञा प्रमाण आम्हासी । नेणे, न मनी षड्रिपूंसी । जिंकणें कासयासी म्हणणें तें ? ॥४५॥
ऐसा दुराग्रह पाहोनी । बाईनें हास्यवदन करोनी । म्हणे गुरु-वचन साभिमानी । बरा दिससी उदरार्थी ! ॥४६॥
जरी गुरुसी मिष्टान्न पाहिजे । तरी मागेन तें मजसी देइजे । गोरक्ष म्हणती अवश्य घेईजे । इच्छा असे ते जननीये ॥४७॥
स्त्री म्हणे जरी तूं गुरुदास । तरी देई सव्य नेत्रास । गोरक्ष म्हणती मिष्टान्न पात्रास । सिद्ध करी लवलाहें ॥४८॥
बाई म्हणे मम पति । श्रीहरिकृपें समर्थ असती । आतांच सिद्ध करीन; निगुति - । नेत्र काढून ठेविजे ॥४९॥
गोरक्ष म्हणती तव पतीहून । कोटिगुणें मम गुरु संपन्न । सायुज्य-पद दाते तूर्ण । तेथें नेत्रार्थ कवण कथा ! ॥५०॥
बाईस आश्चर्य वाटलें । म्हणे धारिष्ट पाहीन वहिलें । भात पुर्या करुन ते वेळे । शर्करा घृतेंसी सिद्ध केलें ॥५१॥
आणोनि ठेविलें गोरक्षापाशीं । म्हणे दे आतां सव्य नेत्रासी । ऐसें म्हणतां; तिजपाशीं नेत्र काढूनि ठेविला ॥५२॥
तंव तो चालिला रक्तपूर । बाईचें घाबरलें अंतर । म्हणे पात्र घेऊनि सत्वर । आणिक विचार सुचेना ॥५३॥
घरा आलिया घरधनी । मम प्राणाची होईल हानि । सत्वर जाई येथुनी । अरिष्ट क्रिया-कारका ॥५४॥
नाथ म्हणती तिजलागुनी । चिंता न करी वो मायबहिणी । आजि तुझिये दयेकरुनी । पूर्ण मनोरथ मी जाहलों ॥५५॥
आजि माझी गुरुमाउली । करील कृपेची साउली । चिंता न करी वो वेल्हाळी । स्वस्थचित्तें असावें ॥५६॥
ऐसें अभय देऊन तिजसी । गोरक्ष पातले श्रीगुरुपाशीं । दक्षिण नेत्र वामहस्तेंसी । आच्छादूनि घेतला ॥५७॥
ऐसें देखोनि; सद्गुरु । म्हणती कां गा झाकिला नेत्र । गोरखें आद्यन्त वृत्त साचारु । निवेदिलें श्रीचरणीं ॥५८॥
तदा नाथ क्रोधायमान । म्हणती अन्नासाठीं नयन । दिधलासी, तूं परम सुजाण । दे दुजा काढोन मज माझा ॥५९॥
ऐसी आज्ञा होतांचि जाण । तात्काळ काढिला वाम नयन । श्रीचरणासी अर्पण करुन । आनंद मनीं ठाकला ॥६०॥
एकलव्यें अंगुष्ठास । कीं शिबीने दिधलें स्वमांसास । तैसेंच गोरक्षें निज नेत्रास । अति उल्हासें दीधलें ॥६१॥
देखोनि नाथ आनंदे मनीं । आलिंगिलें शिष्यालागुनी । कृपाहस्त नेत्रावरुनी । फिरवितां सतेज जाहले ॥६२॥
पहिल्याहून विशेष गुणी । नेत्र सतेज दिसती ते क्षणीं । जे उदार ज्ञानाक्षदानी । तया हे करणी अघट कें ? ॥६३॥
असो, उभयतां भोजन सारोन । तेथून करिते जाहले गमन । पावले `गिरी' पर्वतालागून । जेथें व्यंकटरमण' वास करी ॥६४॥
जेथें भूमध्य रेखा । श्रीरामें वोढिली असे देखा । जे भूवैकुंठ भाविका । इच्छिलें फळ देतसे ॥६५॥
तेथें पावले मच्छिंद्रनार्थ । श्रीशें जाणितलें सत्य । सामोरें येवोनि निश्चित । प्रेमभरें विलोकिती ॥६६॥
नाथ आणि व्यंकटरमण । ऐक्यरुपेंचि भिन्नाभिन्न । उभयही ब्रह्म सनातन । जगदुद्धरणीं अवतरले ॥६७॥
गोरक्षें उभयतांच्या पायीं । मस्तक ठेविला तये समयीं । कांहीं काळ तये ठायीं । वास करिती आनंदें ॥६८॥
सुदिन सुमुहूर्त पाहुनी । नाथ पाचारिती गोरखालागुनी । संप्रदायें सन्मुख बैसवोनी । पुसती, मनीं काय इच्छा ? ॥६९॥
गोरख म्हणती नाथ समर्था । काय तुजपाशीं मागूं आतां ? कल्पतरु कल्पिलें देता । अकल्पित-दाता तूं येक ॥७०॥
तव पद-सेवा एक सार । इतर सर्व मायिक असार । तरी तें दास्य देई निरंतर । अन्य विचार नलगेचि ॥७१॥
ज्ञानाविणें मोक्ष प्राप्ति । नाहीं; ऐसें बहुता ग्रंथीं । ऐकिलें; म्हणवोनि श्रीचरणांप्रति । पूर्वी विनंति केली मीं ॥७२॥
तेवेळीं अधिकार पाहूनी । योग्यायोग्य करीन करणी । ऐसें आज्ञापिलें स्वामींनीं । तें धरोनि मनीं, सुखी राहे ॥७३॥
आतां मज तव दास्यापरतें । अधिक कांहीं न निरुतें । ज्ञान पाहिजे हेंही चित्तें । विशेष मातें न वाटे । ऐकोनि गोरखाचिया वचना । सद्गद जाहला गुरुराणा । म्हणती वत्सा तुझिये गुणा । दुजी तुलना नसेचि ॥७५॥
जैशा विषयसुखाच्या गोष्टी । कन्यकेसी सांगूनि होइजे कष्टी । तेचि नवोढा स्त्रीचे दृष्टीं । आणितां वेळ नलगेचि ॥७६॥
तैसेंचि ज्ञानाधिकारिया ज्ञान । सांगतां, होय समाधान । अनधिकारिया सांगोन । व्यर्थ शीण होतसे ॥७७॥
अधिकारियाचें मुख्य लक्षण । आधीं पाहिजे स्वधर्मरक्षण । वरी गुरुदास्यीं आवडी पूर्ण । ते अधिकारी जन ज्ञानासी ॥७८॥
तूं साक्षात् शंकरावतार । तुज सांगणेचि नलगे निर्धार । तथापि गुरुसंप्रदाय थोर । जगदुद्धारार्थ वाढविसी ॥७९॥
ऐसें बोलूनियां नाथें । मनीं चिंतिलें शंकरातें । तों पावोनिया पूर्ण समाधीतें । स्वानंदातें सेविती ॥८०॥
पुनरपि अवलंबूनि माया । म्हणती धन्य धन्य शिष्यवर्या । स्वस्थ चित्तें करोनियां । वेदगुह्या परिसिजे ॥८१॥
वत्सा जें जें दिसे दृश्य । त्याचा करोनियां ग्रास । अविनाश स्वसुखास । शोधूनियां पाहिजे ॥८२॥
पृथ्वी आप तेज समीर । आकाश, पंचभूतें निर्धार । रज तम सत्त्व त्रिप्रकार । मिळोनि अष्टधा प्रकृति हे ॥८३॥
इयेचें रचिलें वोडंबर । तें जना वाटे साचार । हेचि भगवन्माया निर्धार । शोधूं जातां ठायीं पडे ॥८४॥
पंचभूतात्मक शरीर । तम सत्त्व रजाचें विढार । कां तयाचे ठायीं षडविकार । तेचि आपण मानिले ॥८५॥
जरी तूं शरीर न होसी । तरी याचे विनाशीं नाश न पावसी । कां जे `माझें शरीर' म्हणसी । मा तेंचि तूं होसी कैसेनि ? ॥८६॥
माझी झोळी माझी कंथा । म्हणसी, तैसें शरीर तत्त्वतां । तें तूं नव्हेसी निभ्रांता । याचा द्रष्टा अतीन्द्रीय तूं ॥८७॥
जें जें कांहीं दृश्य भासे । त्या सर्वांस नाश असे । अविनाशी तूं स्वयंप्रकाश । सर्वसाक्षी अगोचर तूं ॥८८॥
तुझिया एके कलेंवरुन । माया रचिलें त्रिभुवन । तूं पूर्णानंद ज्ञानघन । ब्रह्मरुप अससी तूं ॥८९॥
आम्ही विचार करुनि देख । तुज नाम ठेविलें गोरख । गो-इंद्रिय यांचा तूं चालक । म्हणवोनि गोरक्षक नाम तुझें ॥९०॥
तुझें स्वरुप निर्विकार । शरीरादि सृष्टि स-विकार । हें तूं नव्हेसी हा निर्धार । वाणला कीं शिष्यराया ? ॥९१॥
चहुं वेदांचें मुख्य सार । जगत् ब्रह्म हें साचार । साही शास्त्रांचा विचार । अठरा पुराणें हेंचि कथिती ॥९२॥
मायोपाधि परमात्मा । अविद्योपाधि जीवात्मा । उपाधित्यागें उभय नामा - । अतित असे परब्रह्म ॥९३॥
तूं आमुचेनि सहवासें । अनेक ग्रंथ इतिहासें । श्रवण मननाचे सौरसे । जाणसी अंतरीं आघवेंही ॥९४॥
म्हणोनि सृष्टीचिया उपक्रमा । अथवा त्याचिया उपरमा । नाहीं बोलिलों शिष्योत्तमा । आतां पुसणें काय असे ? ॥९५॥
ऐकोनि शिष्यांचा राणा । लागला सद्गुरुचिया चरणां । म्हणे ऐकावी जी विज्ञापना । दयाळुवा गुरुराया ॥९६॥
जें जें स्वामींनीं आज्ञापिलें । तें तें सर्वही हृदयीं धरिलें । परी मन समाधान पवलें - । नाहीं, किमर्थ सद्गुरो ॥९७॥
झालिया गुरुकृपामृत् - वृष्टि । आनंदें निर्भर व्हावी सृष्टि । परी या अनुभवाची गोष्टी । माझे दृष्टीं कां न ये ? ॥९८॥
जैसा परिस लागतां खापरा । सुवर्ण न होय जी दातारा । तैसें जाहलें ये अवसरा । हतभाग्य खरा मी एक ॥९९॥
गुरु वर्षता कृपाघन । शिष्य - चातक समाधींत मग्न - । होवोनिया, स्वरुपीं लीन । आनंदमय वर्ततसे ॥१००॥
तें कां न ये माझे अनुभवा ? काय पूर्वकर्माचा ठेवा ? तें मज सांगा देवाधिदेवा । म्हणोनि चरणा लागला ॥१०१॥
ऐकोनि गोरखाचे बोल । नाथांसी आले प्रेमाचे डोल । म्हणती, पुशिले प्रश्न परम सखोल । ऐकोनि संतोष पावलों ॥१०२॥
याचें उत्तर पुढिलिये प्रकरणीं । श्रीगुरु सांगती विस्तारुनी । तें परिसावे श्रोती सज्जनीं । चित्त सावधानी ठेवोनिया ॥१०३॥
आधींच सिद्धचरित्र ग्रंथ । उपनिषदाचा मथितार्थ । त्याहीवरी स्वमुखें श्रीनाथ । गोरक्षा सांगे निजगुह्य ॥१०४॥
ते दोघे पूर्णावतार । एक विष्णु एक शंकर । स्वेच्छाचारें जगदुद्धार । करावया अवतरले ॥१०५॥
श्रीपति त्यांचा दासानुदास । प्रार्थीतसे सज्जनांस । गुरुगुह्याचा सौरस । स्वानुभवें सेविजे ॥१०६॥
श्रीरामचंद्रा त्रिकुतवासिया । पतितपावना सद्गुरुराया । समाधिसुखीं पडो काया । हेचि पाया विनवणी ॥१०७॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सदुगुरु रामराव । त्याणें उपाव रचिला ह्गा ॥१०८॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत् सोऽहं हंस: ॥
अध्याय सातवा संपूर्ण ॥
==
कठिण शब्दांचे अर्थ :- आतुडणें = सांपडणें, लाभणें,
(६) यावनाळ पिष्ठ = ज्वारीचें पीठ.
(२४) अटण = भ्रमण, संचार
(३६) अजागलस्तन = शेळीच्या गळ्याजवळचा [दूध न देणारा] स्तन, लाक्षणिक अर्थ - निरुपयोगी
(३९) अर्की = रुईचें फळ
(३९) गोधूमपिष्ट = गव्हाचें पीठ; वळवट = गव्हले, शेवया इ.
(४१) अरिष्टक्रियाकारका = अचाट क्रिया करणार्या किंवा संकट ओढवेल असें करणार्या ( हे गोरक्षा)
(५४) अघट कें ? = अशक्य कोठून ?
(८४) वोडंबर = अवडंबर, विस्तार, पसारा
(८४) सृष्टीचा उपक्रम व उपरम = सृष्टीची उत्पत्ति व लय कसा होतो याची प्रक्रिया उपनिषदांतून इ. वर्णिली आहे (९५)