श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु कैवल्यनाथ । भवार्कतापें जीव संतप्त । त्यांतें निजकृपेचें अमृत । वर्षोनि सुशांत त्वां केलें ॥१॥
तुझा वर्णू अशेष महिमा । तरी तो नेणेचि निगमागमा । तेथें विश्वव्याप्ता पुरुषोत्तमा । वाक्शून्य रामा, केउता मी ? ॥२॥
असो; निरुपण गताध्याय । मनोजय आणि वासनाक्षय । झाल्याचि स्वरुपप्राप्ति होय । ऐसा निश्चय दर्शविला ॥३॥
तोचि दृढ व्हावा निर्धार । यालागीं अवसरू ज्ञानसागर । पाहे; तों एकदां क्षुधातूर । मत्तात रघुवीर जाहला ॥४॥
अत्यंत कोमेला मुखमृगांक । पाह्तां माध्याह्नीं ठाकला अर्क । ते दिनीं कुळींचें नैमित्तिक । नैवेद्य अशेख देवांसी ॥५॥
तें जाणवले कृपामूर्ति । (१)म्हणती रघुराया क्षुधेहातीं । गिंवसिलासी; तरी योगामृतीं । आपुली तृप्ति करी कां ॥६॥
अरे कामादि षड्रिपु थोर । क्षुधा तृषा सुषुप्ति घोर । याचा राजयोगीं बडिवार । लव अणुमात्र न चलेचि ॥७॥
आणि तूं कासया म्लानमुखीं । झालासी ? म्हणवोनि घेतला अंकीं । चुंबन देऊनि, प्रेमकुतुकीं । निजासन सन्मुखीं बैसविला ॥८॥
सप्रेम आलिंगनाचे मिषें । प्रियात्मत्व सोऽहं हंसें । संस्थापिले लीलाविलासें । धारणाघोषें अन्योन्य ॥९॥
एक गिळी एक उगळी । प्रकृति पुरुष खेळीमेली । एक ऊर्ध्व एक पाताळी । क्षराक्षर कल्लोळीं क्रीडती ॥१०॥
ऐसें परस्परें आपणांस । ध्येय ध्यान द्वैताद्वैत । शिष्य सद्गुरु नुमगेचि मात । झाला अंत कल्पनेचा ॥११॥
तंव सद्गुरु सावधान । म्हणती राघवा होऊनि भिन्न । पाहे आपुलें स्थान मान । पिंडीं अभिधान काय कोणा ॥१२॥
वर्ण व्यक्ति रुपरेखा । देह देवता स्वर मातृका । अवस्था त्रय़ीं आजपा लेखा । सप्रतीत संख्या अवधारी ॥१३॥
रघुराया हा योगाचळ । उल्लंघावया वाढवेळ । पाहिजे; येथ निजधैर्यबळ । अढळ अविकळ अचिन्त्य ॥१४॥
नाना जप तप अनुष्ठान । मंत्र यंत्र योग हवन । तीर्थे, व्रतें मौन शीतोष्ण । साधिल्या पंचाग्न; न ठके रे ॥१५॥
येथें एक श्रीगुरुची । कृपाचि व्हावी लागे साची । तो कनवाळू निजनिष्ठेची । अनन्याची वाट पाहे ॥१६॥
तरी साधकें येथ धडफुडें । सद्गुरु सद्वाक्या करुनि पुढें । आपण लक्ष्यांशीं जाऊनि भिडे । तैचि रोकडे निज लाहे ॥१७॥
नातरी जन्म जरा मरण । विविध कर्मे दोष गुण । त्रिविध भोगाचें आयतन । कुश्वळ सांठवण हें तनु ॥१८॥
तीतें लावितां सन्मार्गी । ब्रह्मस्वरुप स्वयें अंगीं । होऊनि ठाके राजयोगी । विचरे जगीं प्रतिसूर्य ॥१९॥
राघवा नेति नेति वचन । वेदें विसर्जिलें आन भाषण । दृष्टान्त माघारले वाहोनि आण । अनिर्वाच्य मौन शास्त्रोक्ती ॥२०॥
तेथ देशिक दयाघन । सुलभोपाय अक्षरें दोन । सांगोनि, विमुक्तत्वाची खूण । वस्वी निरंजन अविनाशी ॥२१॥
जेथें व्यास वाल्मीक नारद । शुक सनकादिक ब्रह्मवृन्द । भीष्म जनक बली प्रम्हाद । अक्षयानंद भोगिती ॥२२॥
अरे ह्या विदेहानंदासाठीं । एकीं जाऊनि गिरिकपाटीं । बैसले साधनाचे कचाटी । शीण शेवटीं आसमास ॥२३॥
असो ऐसे अनंतापार । शीणले; त्यांचा नागवे पार । परी तूं आतां आसनीं तत्पर । (२)राहे रघुवीरा साक्षित्वें ॥२४॥
ऐकोनि, पदरजीं ठेविलें भाळ । स्वामी सदय सकृप कनवाळ । विनवी म्हणे जी प्रणव प्रांजळ । विवरोनि अढळ मज बोधी ॥२५॥
जगत्प्रसूति-स्थिति -नाश सार । याचें आदिकारण ॐकार । तो विधियुक्त मातें गोचर । कीजे कृपाकार स्वामिया ॥२६॥
ऐसे ऐकोनि अमृतवचना । श्रीगुरु म्हणती रघुनंदना । अकार उकार मकार त्रिशून्यां । जागृत स्वप्न सुषुप्ति ॥२७॥
आतां राहिले अर्धशून्य । तें तुर्येचें निवासस्थान । बिंदु परात्पर असे पूर्ण । इतुकें विवरण प्रणवाचें ॥२८॥
अकार अधःशून्यीं ब्रह्मा । उकार उर्ध्वेसी विष्णुनामा । महेशशून्या मध्यनुक्रमा । अर्धशून्यीं रामा मायाराणी ॥२९॥
एवं ऐसा हा ॐकार । पिंडाण्डोद्भवा सर्वाधार । सद्गुरुविना याचा विवर । नोहेचि निर्धार साधका ॥३०॥
अकार सृजन रजाचा ठावो । उकार स्थितीचा सत्त्वनिर्वाहो । मकार तमीं लयप्रभावो । अघवे जी साटवले ॥३१॥
अर्धशून्यीं सर्वसाक्षी । महामाया गुणविलासी । शिवांगसंगिनी अलक्षलक्षी । लीलें प्रकाशी ब्रह्माण्डें ॥३२॥
ते पिंडब्रह्माण्ड स्थितिनिश्चय । द्वितीय उकार मात्रेंचि होय । हा एक प्रतीतीचा अन्वय । जाण रघुराया अंतरीं ॥३३॥
देह चारी वाणी चार । तेवींच चहूं देहीं बिढार । स्वसत्ते व्यापूनि अहंकार । ठेले कीर तें अवधारी ॥३४॥
आणिक चौ वेदांचें मूळ । तैसेच स्वर्ग मृत्यु पाताळ । देव मानव राक्षस कुळ । विवरु अविकळ तुज वत्सा ॥३५॥
अकारीं मानव उकारी अमर । मकारीं जन्मले रजनीचर । अर्धमात्रेंसी दयाकर । सज्जन माहेर अनन्याचें ॥३६॥
बा हें साचोकारेम सगुण । जेणें उभविलें आब्रह्मभुवन । त्यांतेंचि बोलती ॐकार पूरण । जें हें आयतन त्रिपुटीचें ॥३७॥
शुध्द स्वरुपीं ब्रह्मस्फूर्ति । तियेतें बोलिले मूळ प्रकृति । तिचीच इच्छा जाहल्या सरती । गुणमय प्रतीति रुढविली ॥३८॥
तेथूनि विमल अज अव्यय । जगदाधार आनंदमय । ज्याचा आद्यन्तातीत अन्वय । जें रुप अद्वय शिवशक्ति ॥३९॥
ती या विश्वा ताताम्बभावीं । क्षराक्षररुपें देवदेवी । त्रिजगा पाळी लीलालाघवी । स्थित्यन्त दावी त्रिशून्यीं ॥४०॥
तें हें स्थित्यन्तोद्भव स्थान । सांगेन, रघुराया सावधान । जेथें सामाइलें आब्रह्मभुवन । तो ठाय गिंवसोन ॐ म्हणे
॥४१॥
अरे जे अकार आणि उकार । मकार इकार आणि एकार । पंचशून्यात्मक प्रणवाकार ! जो वाक् गोचर तुजलागीं ॥४२॥
तरी ते अकारीं पहिलेनि जाण । पंचीकृत औटप्रमाण । अन्नमय स्थूला झाले जनन । कर्मार्जिताधीन सर्वस्वें ॥४३॥
ऐसा या स्थूळाचा निरास । सांगेन तूंतें सावकाश । तो तूं लंघुनि, सूक्ष्मीं प्रवेश । द्वितीय शून्यास आक्रमी ॥४४॥
तंव शिष्य म्हणे वो सद्गुरु । सांगोनि अकाराचा विवरु । मातें पाववी पैलपारु । भवानिधितारुं जगदीशा ॥४५॥
म्हणवोनि सुदृढ धरिलें पद । तंव श्री म्हणती वत्सा सावध । अकारीं बोलिले दशविध । भिन्न भेद त्यागार्थी ॥४६॥
तैसेंच देहत्रयीं जाण । विवरोनि पावावे निजनिर्वाण । त्यातेंचि बोलिले सच्छिष्य पूर्ण । आत्मलक्षणप्रकाशी ॥४७॥
त्या तूं माझिया अविनाशधना । पात्र जोडलासी रघुनंदना । आतां आघव्या जीवींच्या खुणा । अवधारी; प्राणा माझिया गा ॥४८॥
म्हणवोनि निजात्मतेचिया गोडी । बोलों आदरिले आवडी । तया वाग्रसीं श्रीपति दडी । देवोनि, पैलथडी पावेल ॥४९॥
असो, आतां त्रितनु त्रिकोण । प्रणव बोलिजेल वक्ष्यमाण । तयाचे अकार मात्रा अधःशून्य । रक्तवर्ण विराजे ॥५०॥
जागृतावस्था रजोगुण । ’ विश्वाभिमानी ’ कमलासन । वैखरी वाचा, नेत्रस्थान । क्रियाशक्ति सगुण साक्षित्वें ॥५१॥
भोगप्रतीति तेथ स्थूल । जीव तो वायुरुपीं चंचल । एवं त्रिकुटींचा स्थूल गोंधळ । तूंतें अळुमाळ निरोपिला ॥५२॥
आतां मागां, आक्रमी ऐसें । बोलिजेले त्या सूक्ष्मीं प्रवेशे । जें मन बुध्दयादि आनारिसें । तेथ मद्वचनासरिसें तुं येई ॥५३॥
बापा त्रिगुण त्रिपुटीचें निज । तया सूक्ष्म तनूचें चोज । दशधा, परि मी दशा तुज । सांगेन गूज अवधारी ॥५४॥
बा रे अनिर्वाच्य अबुभुति । ज्याचि सर्वत्र समान व्याप्ति । तेचि मी तूंतें स्वयंज्योति । सांगेन निगुती शुभेच्छा ॥५५॥
अगा जेथ मन आणि पवना । लयो होय; ऐशिया स्थाना । नेईन सांगावे, निरंजना । चाल मद्वचनासारिसाचि ॥५६॥
परि हें न सांडोनि आसन । गमनागमनाचा न करी शीन । नेत्रेंविना अवलोकन । करोनि, चिद्गगन लक्षावे ॥५७॥
स्वरुपीं शब्दाचा नोहेचि रीघ । परी शब्देविना न गिंवसे माग । जेथ शब्द उपरमे लागवेग । तेथे अचिन्त्य अव्यंग तूं राहे ॥५८॥
अरे अनुभवें अनुभवितां नये । तें शब्दें केउतें अनुवादावे ? । परी नवल तयाची अघट सोय । सद्गुरु सदुपाय दाविती ॥५९॥
अकार उकार मकार इकार । हा चौ शून्याचा गिरिवर । लंघूनि, निजानुभवागार । लाधलासी कीर तूं एक ॥६०॥
परी ह्या नाथिल्या नेणिवेतें । घेवोनि, पुससी पुनः मागुतें । तरी त्या अकारीं स्थूलदेशेंतें । मागाचि तूंतें निरुपिलें॥६१॥
आतां राहिलें देहत्रय । तयाचा अवधारी निश्वळ । म्हणवोनि श्रीगुरुचे पाय । स्मरोनि निजमाय वदतसे ॥६२॥
बा रे औटाकार स्थूल । जैसा विवरिला प्रांजळ । तैसाचि सूक्ष्मासी अळुमाळ । लंघोनि, उतावीळ हो पुढां ॥६३॥
पहिला विरंचि दुसरा विष्णु । तिसरा रुद्र पर्वार्ध श्यामतनु । हे योगाचळमार्ग रोधुनू । बैसले धरोनि महाठक ॥६४॥
तयासी दशविधा दशलक्षणी । भातुकें ओंवाळूनि सांडणी । केली पाहिजे, शिखामणि । शिष्य टिळका रघुराया ॥६५॥
स्थूळ जे अंधःशून्याकार । तेंचि लंघावया दुस्तर । नाना मत मार्ग एकाकार । करोनि, पारम बुडाले ॥६६॥
चुकले सद्गुरुची सोई । पडिले चौर्यांशी लक्ष प्रवाही । अहं कर्ता अहं देही । म्हणवोनि उपायीं नाडले ॥६७॥
असो, तूं आतां सूक्ष्म श्वेत । लंघोनि कारणाचा अंत । पाहे तुर्येचा पैलप्रांत । अच्युतानंत सुखद जो ॥६८॥
येथें देह अहंता मुळीहूनी । तैसाचि तदंग दशलक्षणीं । दशेची ओंवाळूनि सांडणी । केलिया; समाधानी दैवतें ॥६९॥
अकार पंचात्मक स्थूली जाण । जैसा सकर्म देहाभिमान । न्यासिला; तैसाचि सूक्ष्मी दारुण । अपंचीकृत आडरान कल्पनेचें ॥७०॥
तेथ साधकीं एक क्षण । ठाकल्या; नेमेंसी ओढवे विघ्न । यालागीं पर्वार्ध शिव सगुण । निरभिमानी निःकारणी भजावा ॥७१॥
तेंचि परिसे तूं आतां । अनिर्वचनीय विवरु सुता । येणें मुमुक्षू मोक्षपंथा । लावी तत्त्वतां मद्वचनीं ॥७२॥
म्हणोनि रघुराया अमृतोक्ति । वोपिते झाले कैवल्यपति । दुजे ऊर्ध्वशून्य सूक्ष्माकृति । श्वेतांग निगुती संचले ॥७३॥
उकार मात्रा अंगुष्ठ प्रमाण । स्वप्नावस्था कंठस्थान । इच्छाशक्ति सत्त्वगुण । तैजसाभिमान जागरु ॥७४॥
मध्यमा वाचा प्रविविक्त भोग । वासनात्मकीं जीव संयोग । हें त्वंपदामाजिलें चांग । देहद्वय अव्यंगीं प्रकाशिलें ॥७५॥
आतां जे कां पर्वार्धकारण । अशेष उरलियाचें लक्षण । अंगीं अंगवोन, पुढारा गमन । करी अर्धशून्य तुर्येसी ॥७६॥
म्हणवोनि मध्यशून्य करणीची । प्रस्तावना मांडिली साची । निर्द्वन्द्व परि निबिड तमाचि । अवस्था याचि अतिघोत ॥७७॥
’ कारणदेह ’ गोल्हाट शून्य । मकारमात्रा ह्र्दयस्थान । सुषुप्त्यावस्थाभिमानी प्राज्ञ । तमोगुण द्र्व्यशक्ति ॥७८॥
पश्यन्ती वाचा आनंदभोग । चैतन्यीं आत्मत्वीं संयोग । हें म्यां देहत्रयाचें चांग । निरुपण अव्यंग तुज केले ॥७९॥
बा रे यातेंचि सद्गुरुरावो । नेमें निश्चयीं सांडवी ठावो । कां जे जन्ममरण निर्वाहो । गुणमय प्रवाहो म्हणवोनी ॥८०॥
यापरी देहत्रयाचा न्यास । जाहलिया; तो परमपुरुष । निजानुभवाचा सौरस । दे परमहंस निजदासा ॥८१॥
ते हे चतुर्थ तनु सुभट । ’ महाकारण ’ या नामें स्पष्ट । महामायेचें मूळपीठ । आब्रह्मकीट जियेमाजी ॥८२॥
ती ज्ञानकळा आदिजननी । त्रिभुवनपतीची पट्टराणी । स्वरुपें लावण्याचीच खाणी । प्रणवरुपिणी तुर्याम्बा ॥८३॥
तिचें अर्धमात्रा मूर्ध्निस्थान । ज्ञान शक्ति शुध्द सत्त्वगुण । परा वाचेचा अभिमान । प्रत्यगात्मा पूर्ण परवस्तु ॥८४॥
भोग आनंदावभास पद । जीव ब्रह्मैक्य निर्द्वन्द्व सिध्द । हे तत् पदामाजिले भेद । चिन्मयानंद सुखराशि ॥८५॥
हें द्वितीय पद देहद्वय । निरसोनि, माझी रामराय । मुमुक्षूंलागीं ज्ञानसूर्य । आचरें सदुपाय मेदिनी ॥८६॥
तोचि आतां विद्यमानी । अवधारिजे श्रोतेजनीं । जेथें वेद वाचाळ. परी मौनी । तन्न तन्न वचनीं राहिले ॥८७॥
शब्दशास्त्र क्रियाजात । मागांचि त्रिदेहीं जेथिंच्या तेथ । परम लाज शिणोनि, निवांत । ठेले मूकवत विरमोनि ॥८८॥
तया अलक्षीं अकुंठित । सदैव माझा श्रीरघुनाथ । सच्चिदानंदी देहातीत । देहीच नांदत विदेही ॥८९॥
तयाते पुनरपि सद्गुरु । तत्त्वोपदेशें शून्याकारु । पूर्वमार्गीचा अशेष विवरु । प्रबोधी, दृढतर व्हावया ॥९०॥
बा रे त्रिशून्य त्रिपुरोत्पत्ति । जे म्यां सांगितली तुजप्रति । अकारीं सृजन उकारीं स्थिति । मकार आब्रह्मभूती लय ठावो ॥९१॥
तरी तो अवधारी अकार भेद । जे स्थळी जन्मला ऋग्वेद । तेथेंचि त्रिपदेचा प्रथम पाद । विषयानंदी क्षरभावी ॥९२॥
प्रणव सर्वाश्रयो गणनाथ । पूर्व दिशेसी इंद्र दैवत । तंतवाद्य वडवाग्नि विख्यात । रजोद्भव पंचीकृत शिष्यराया ॥९३॥
इतुके न्यसोनि अकार भूमि । पुढारा प्रवेशे सूक्ष्मागमी । अंगुष्ठाकार श्रीहाट नामीं । यजुर्वेद अनुक्रमें बोलिला ॥९४॥
गायत्रीचा द्वितीय पाद । मरीचि दैवत वितंत वाद्य । अक्षर निश्वयो योगानंद । कोऽहं प्रसिध्द प्रतीति ॥९५॥
हे मंद्दाग्नि लिंगतनूसी । न्यासोनि, निर्द्वन्द्व मकारेसी । जाऊनि बिलगे स्वानंदराशी । सर्वधीसाक्षी रघुराया ॥९६॥
देवता आणि अंतःकरण । ह्यातें सत्त्वगुणापासाव जनन । परी हे आघवे तेथ सांडून । गोल्हाट कारणीं रिघे तूं ॥९७॥
गोल्हाट मंडळ अर्ध परव । जेथ सामासीं जाहला उद्भव । दिग्दक्षिणे रबिसूनु धर्मराव । कूटस्थ निश्वयो निजज्योति ॥९८॥
गायत्रीचा तृतीय चरण । अद्वयानंदी सोऽहं आपण । गिळोनि ठेला मीतुं स्मरण । अवीट लक्षण सुखाचें ॥९९॥
कां जे एकी एकत्त्व भान । उडोनि; स्वस्वरुपीं चैतन्य । निबिड कोंदाटले परिपूर्ण । अनुभव मनोन्मन कें कोठें ? ॥१००॥
ऐसा त्रितनूसी साक्षिरुप । होवोनि राहिला आपेआप । त्रिपुटीं क्रियाकर्म-कलाप । सांडी खटाटोप रघुरावो ॥१०१॥
अहो तो पूर्णपात्र कृपायतन । तत्काळ द्विपदें उल्लंघोन । आसत, निजानुभवी खूण । पावोनि, लीन जाहला ॥१०२॥
नील वर्ण मसुरप्रमाण । केउतें ईशाचें अधिष्ठान । इकार मातृका चतुर्थ चरण । ॐकार अथर्वण विवरवेना ॥१०३॥
प्रत्यगात्मा विदेहानंदु । शुध्द सत्त्वदि एकार बिंदु । अगोचर अनिर्वाच्य प्रणवबोधु । विमुक्त सुखसिंधु जाहला ॥१०४॥
देखोनि सद्गुरु दयाघन । म्हणे म्या कवणापें निरुपण । करावें ? ह्यातें अणुमात्र भान । ध्येय ध्यातेपण गिंवसेना ॥१०५॥
म्हणवोनि उभयकरिं इटिमिठी । घेवोनि, निजांकें उठाउठी । बैसवोनि; स्वानंदगोठी । आदरी, ह्र्त्संपुटीं कळवोनि ॥१०६॥
बा तूं मुक्ताभरणमंडित । र्हस्व दीर्घ आणि प्लुत । सांडोनि देहत्रयाचा प्रांत । सोऽहं ब्रह्मातीत विलससी ॥१०७॥
परी पुण्यगिरी भ्रामरीचा । अलक्ष उल्लेख परा वाचेचा । विवरु ॐकार तूं मातृकेचा । निरामय साचा अवधारी ॥१०८॥
सूक्ष्म वेद पराशक्ति । ब्रह्मानंद ब्रह्माग्न व्यक्ति । सच्चिदानंद स्वयंज्योति । पराख्य प्रकृति अनुपम ॥१०९॥
जें सर्वादि सर्वापरतें । अकळ विरंची महेन्द्रातें । तें तुवां रामराया आमुतें । अनुभवोनि, सुखातें पावविलें ॥११०॥
म्हणवोनि कवळोनि सप्रेमभरीं । सांगती वत्सा ब्रह्माण्डजठरीं । जे ईश्वराचे देहचारी । ते तूं अवधारी सुगुणाब्धि ॥१११॥
स्थूल लिंग आणि कारण । चौथें सर्वसाक्षी शुध्द चैतन्य । त्यातेंचि बोलती संतजन । ’ महाकारण ’ म्हणवोनी ॥११२॥
तेथील स्थूलाचा प्रथम विवर । तो हा दृग्भास ब्रह्माण्डाकार । तयाची सृजनक्रिया हा जागर । तेवींच दुजा प्रकार बुझावा ॥११३॥
लिंगतनु हिरण्यगर्भ । बुद्बुद ऐसी अति सुप्रभ । जेवी साच भावी स्वप्नारंभ । कीं अचल बिंब दर्पणीचें ॥११४॥
ऐसें उकार स्थितीचे भलें । स्वरुप तूंतें निरुपिलें । आतां देहद्वयाचें राहिलें । तेंही वहिलें अवधारी ॥११५॥
बा रे आब्रह्म भूती जाण । अविद्या मायेचें जें आवरण । तेंचि ईशाचें तृतीय कारण । प्रलय तें निर्वाण सुषुप्ति ॥११६॥
यापरी सर्गस्थित्यन्त माळा । तूंतें निरुपिली अवलीळा । आतां मूळ प्रकृति ज्ञानकळा । चतुर्थ तनूला अवलोकी ॥११७॥
भूर्भुवःस्वः निरालंब । स्थूल कारण हिरण्यगर्भ । अजया पिंडाण्डीचे वालभ । तीतेंहीं स्वयंभू तूं साक्षी ॥११८॥
घटद्र्ष्टा घटाहून । भिन्न; ऐसें वेदान्तवचन । हे सप्रतीत अनुभवी जाण । साक्षित्व परिपूर्ण तुजमाजीं ॥११९॥
(३)एवं पिण्डाण्ड अष्टधेसी । अमल निरंजन सर्वसाक्षी । तूंचि तूं; स्वानुभवें निरीक्षी । वत्सा गुणराशि रामराया ॥१२०॥
ऐकोनि राघवें लोटांगण । घातलें, उभयपदां कवळोन । तदुपरी आरंभिलें स्तवन । अतीत राहोन वैखरीये ॥१२१॥
हे शांत दान्त विज्ञानवर्या । ब्रह्मानंदा निजभक्ता कार्या । साकारलासी सद्गुरुराया । सुरेन्द्र पदा या इच्छिती ॥१२२॥
अहा त्या श्रीपदा साचे । लाभलो; म्हणवोनि गाये नाचे । आकल्पकोटी जन्मजन्मीचें । जपतप व्रताचें सुफल हें ॥१२३॥
म्हणवोनि भोजन शयनासनीं । कर्माकर्मी गमनागमनीं । जागरीं हो का निजेला, स्वप्नी । सदैव सच्चितनीं रघुरावो ॥१२४॥
देखोनि निजाचा सोयरा । म्हणे बा अचलधी रामचंद्रा । तूंतें जगदीशें जगदुध्दारा । प्रेषिलें; सुखकरा मेदिनीं ये ॥१२५॥
तरी तें साचोकारें वचन । माथां वंदोनि; आमुचे चरण । स्पर्शोनि; आमुतें देई प्रमाण । जे ही आचरीन तव सेवा ॥१२६॥
तईं तो रघुनाथ सदगदून । म्हणे मी विष्णु विरिंची ईशान । नेणेचि तुजवीण आन कोण । हे श्रीचरण जाणती १२७॥
माता पिता सद्गुरु, देव । बंधु कुंवासा, विद्या वैभव । तूंचि तूं माझें अखिल सर्व । तुजवीण गौरव नापेक्षी ॥१२८॥
म्हणवोनि द्ण्डसम देह भूमी । न्यसोनि गर्जे सद्गुरुनामीं । म्हणे मी वाक् काय, मनोधर्मी । तुजवीन आन कर्मी न वर्ते ॥१२९॥
इतुक्यामाजी नवल साचार । तयाचा ज्येष्ठ सहोदर । ’ आप्पा ’ नामे धीर गंभीर । ग्रामाहूनि मंदिरी पातलें ॥१३०॥
तयाची कान्ता प्राशनार्थ नीर । घेवोनि ठाकली अति सत्वर । तियेतें म्हणे ’ वो रामचंद्र । न दिसे साचार गृही कां ? ’
॥१३१॥
येरी विमल विनोदभाव । म्हणे ’ जी त्यानेम सद्गुरुराव । आणोनि; पूजाविधि गौरव । मांडिला अपूर्व तयांचा ॥१३२॥
तेणें कायसें ब्रह्मज्ञान । उपदेशूनि देवरा धन्य । केलें म्हणोनि; वर्तमान । बोलती जन परस्परां ॥१३३॥
तेंचि सत्य मी स्वामीप्रति । विज्ञापिली जनवदंती ’ । ऐकोनि आप्पा विस्मित चित्तीं । म्हणे राम-मति सान नव्हे ॥१३४॥
सतासत् जाणितल्याविण । कदांही रघुराय न करील मान्य । म्हणवोनि त्वरा तांतडी स्नान । करोनि, दर्शना चालिले ॥१३५॥
जाऊनि साष्टांग दंडवत् । घालोनि, म्हणे हे सद्गुरुनाथ । पतितोध्दारा ’मी शरणगत । पातलों; पुनीत मज कीजे ’ ॥१३६॥
(४)जाणोनि रामाचा सहोदर । तात्काळ केला अंगीकार । तैसेचि अनेक नारीनर । तारिले अपार कनवाळें ॥१३७॥
पाहोनि रघुरायाची स्थिति । सद्गुरु दर्शना कित्येक येती । वंदोनि चिद्घनानंदमूर्ति । उध्द्री म्हणती दयाळा ॥१३८॥
तयामाजी सुजन सात्त्विक । कर्म उपासनी कोणी एक । नामें रामाजीपंत देख । परम भाविक तेथ वसे ॥१३९॥
तयाची कन्या गुणैक मान्य । ’ काशी ’ नामें परम धन्य । तिने सद्गुरुसी होऊनि शरण । आत्मसाधन साधिलें ॥१४०॥
तन मन धनेंसी उदार । म्हणवोनि महादेवपदी नीर । सोडिलें; त्याचा आजन्म आदर । लव-क्षणें निर्धार वाढविला ॥१४१॥
असो; मागां दंडाकारी । राघवें निजकाया मेदिनीवरी । सांडोनि; बोलिला मी आन न वरी । तुजवीण निर्धारी सद्गुरो ॥१४२॥
तई तो कैवल्यपदीचा रावो । ’ तथास्तु ’ म्हणोनि महादेवो । राघवा उठवोनि विश्वनिर्वाहो । वोपित पहा हो हातवटी ॥१४३॥
(५)बा रे यम नियम त्याग मौन । ध्यान धारणा विधि आसन । सुवर्म संप्रज्ञान परिपूर्ण । समाधि लक्षण हेंच हें ॥१४४॥
तैसेंचि आपुलें पूजाविधान । जगदन्तरीं जनार्दन । जाणोनि; भूतमात्रीं लीन । अद्वेषमनीं विचरावे ॥१४५॥
आपण पंचात्मक देहधारी । यालागी काळाचे आहारीं । पडणें लागेल केधवां तरी । अचल अंतरी समरे हें ॥१४६॥
राघवा विमल सुकृताराशी अनंत जन्मींच्या उदयासी । उदेल्या, म्हणोनि अवचट आपैसी । लाधली सुवंशीं नरकाया ॥१४७॥
तियेचा ’ कांताकांचनीं ’ सारा । हा हा ’ मानवखरीं ’ मातेरा । केला; के वानूं पशूपामरा । निरया घोरा आवंतिलें ॥१४८॥
अरे ज्या देही धर्मार्थमोक्ष । जोडोनि भोगणें चिद्विलास । तेणें जोडूनि धन-दार क्लेश । मी श्लाघ्य पुरुष म्हणवितु ॥१४९॥
बा ह्या अष्टदेही जाण । पिंडाण्ड प्रकृति ते भिन्न । स्वयें साक्षित्व विलक्षण । नेणोनि; कुलक्षण जाहला कीं ॥१५०॥
असो त्या हतभाग्याचा गोठी । पुनरपि कदाही न यो होटीं । आलिया; त्यातेंचि होऊनि कष्टी । पदाम्बु घोटी सद्गुरुचें ॥१५१॥
अखिल प्रायश्चित्त जिहीं कोडी । लाजवोनि केल्या देशोधडी । त्या श्रीरामपदाची प्रौढी । वानूं धडफुडी कें आतां ? ॥१५२॥
जें सर्वादि सर्वापरतें । अनकल मघवा- चतुरास्यातें । त्या मी अक्षय रामपदातें । मनोन्मनातें पावलों ॥१५३॥
जेथ विसर्ग बिंदू मात्रेसी । रिगमु नोहेचि क्षर वाक् घोषी । अहा त्या अचिन्त्याव्यक्तासी । अच्युताक्षरासी जोडलों ॥१५४॥
ऐसें स्वानुभवें येरयेरातें । वोसणतां, निवाले संतश्रोते । मागुतें सद्गुरु रघुरायातें । निजनूतनातें अनुवादें ॥१५५॥
हे अरविंदाक्ष रघुनाथ । तूंतें स्वर व्यंजनें व्यक्ताव्यक्त । आधारापासोनि सहस्त्रपर्यंत । दावीन संकेत सुबुध्दा ॥१५६॥
अगा निर्विकल्पा दिनमणि । तुझ्याचि उदयें तुजलागोनी । दावीन माझिया विज्ञानखाणी । कल्पक मांडणी नोहेचि जे ॥१५७॥
वर्ण व्यंजनें द्वात्रिशत । आधाराहूनि अनाहत । परियंत्त, नेम हा शास्त्रोक्त । विशुध्दीं विलसत आकारादि ॥१५८॥
तेचि षोडशदळीं साचार । षोडश नामें कुंजती स्वर । अ इ उ ऋ लृ इत्यक्षर । परि हे निर्धार पिंडस्थळीं ॥१५९॥
तरी पिंडस्थ ते व्यक्त जाण । त्याहूनि ब्रह्माण्डीं अव्यक्त आन । अखिलचालकु अनाम पूर्ण । परिसे अभिधान तयाचें ॥१६०॥
जेणें योगें दृग्भास झाली । स्वर वर्ण व्यंजनें रुपा आली । परा पश्यंती मध्यमा बोली । वैखरी दुमदुमलि निजगजरें ॥१६१॥
तें परेचें पराख्य द्योतक । स्वर वर्ण व्यंजनें अभिन्नैक । शब्दानुवादें नुमगेचि देख । योगीन्द्र निर्भ्रामक सेविती ॥१६२॥
त्यातेंचि साधकें दिवारातीं । गिंवसावया; सद्गुरुप्रति । शरण रिघोनि अनन्यभक्तीं । हा ठाय निगुतीं साधावा ॥१६३॥
मनाचें मनत्वा निवटोनि चोख । पवनीं मिळवावें सम्यक । इहींच साधनें तयाचा थाक । गिंवसे निष्टंक रघुराया ॥१६४॥
आधार, लिंग आणि मणिपूर । अनाहत, विशुध्द, अग्निचक्र । प्राणापान एकत्र कीर । करोनि ब्रह्मरंध्रीं रिघावें ॥१६५॥
तेथींचि राणीव एकछत्र । ओमित्येकाक्षर हाचि स्वर । तैसेंचि ’ हम् ’ इति व्यंजनाकार । आतां वर्णनिर्धार तो ऐसा ॥१६६॥
अलक्ष्य लक्षेना निरवयव । तेथिल्या वर्णाचा व्यक्त भाव । तो हाचि जाण कीं शुध्दसत्त्व । ज्याचेनि सदैव सुखरुप ॥१६७॥
ऐसी पिंडाण्ड उभयांची । संस्थिति स्वरवर्ण व्यंजनाची । राघवा परिसिली कीं साची । योगमार्गीची व्यवस्था ? ॥१६८॥
आतां प्राण आणि उपप्राण । ह्याचें स्थानमानोपलक्षण । पिंडीं वसतयाचें अभिधान । आणि ब्रह्माण्डी कोण वसिन्नले ॥१६९॥
ह्र्दिं प्राण गुदीं अपान । विषम विषादें दोघेजन । अधोर्ध्व राहिले त्यालागोन । नाभिस्थ ’ समान ’ संबोखी ॥१७०॥
पाहोनि ’ उदानें ’ अकारण निकुर । कंठप्रदेशीं घेतली थार । शेखीं ’ व्यानें ’ राहावया बिढार । न देखोनि; शरीर व्यापिलें ॥१७१॥
यापरी पांचही पांचापरी । स्वसत्ते व्यापूनि कलेवरीं । नांदती, तेवींच ब्रह्माण्डजठरीं । उपकला अवधारी तयाच्या ॥१७२॥
नाग कूर्म कृकल देख । व्यापोनि ठेले श्रोत्राक्षमुख । उचकीसी ’ देवदत्तें ’ सम्यक । घेतलें नेमक वस्तीसी ॥१७३॥
आतां जो व्यानांश साच देहीं । तया ’ धनंजया ’ ठावचि नाहीं । यालागीं जीवा संधि-देहीं । घेतलें पाही वस्तीसी ॥१७४॥
परी तेणे आपणां थार । दिधला, त्याचा कृतउपकार । मानूनि, उत्तीर्णतेसी सादर । जिही अवसर योजिला ॥१७५॥
तो हा परिसे, प्राणोत्क्रमण । झालिया, मनबुध्दयादि लीन । केवळ तृणाचें बुजावण । ’ हंसें ’ वीण राहिले ॥१७६॥
तेथें इष्ट आप्त स्वजन । मिळोनि, म्हणती आतां चिताग्न । द्यावयालागीं विलंब क्षण । न करा; म्हणवोन उचलिती ॥१७७॥
परी तो ब्रह्माण्ड भेदेंविण । सर्वथा ’ धनंजयो ’ आपण । न वचेचि, तेणें तदा आण । दिधली रक्षीण तुज मागां ॥१७८॥
तेणें परिचारें वर्तमानीं । शंखप्रहारें यतीचा मूर्घ्नि । भेदिती; अंतीं सायुज्यसदनीं । विचरो, म्हणवोनि बुध जन ॥१७९॥
असो ऐसे दशलक्षण । तूंतें निरोपिले पवन । आतां कर्मानुबंध प्रमाण । राहिला पूर्ण ओढियाणा ॥१८०॥
तो देहार्जित अहोरात्र । सुखदुःख द्वन्द्वें कर्मपात्र । भोग भोगवी ओढियाणसूत्र । नेणवे स्वतंत्र अज्ञातें ॥१८१॥
जेधवां ओढियाणाबंधु । तुटला तेव्हांचि कर्मप्रारब्धु । भोग भोगणें देहसंबंधु । सरला सुबुध्द प्राणियाचा ॥१८२॥
इतुकें सांगूनि तो योगींद्र । निवांत ठेला निमिषमात्र । तंव श्रीरामें चरणावर । साष्टांग नमस्कार घातला ॥१८३॥
मग षोडशोपचारें पूजन । करोनि, आगमोक्त विधिविधान । फल तांबूल प्रदक्षिण । अर्पूनि, श्रीचरण प्रार्थिले ॥१८४॥
लेह्य, पेय चोष्य खाद्य । भक्ष्य भोज्यादि नानाविध । षड्रस अन्नें सेवूनि स्वाद । दासा प्रसाद मग दीजे ॥१८५॥
आजि माझें भाग्य धन्य । श्रींचें शेषोच्छिष्ट भोजन । लाहेन, ज्यातें ब्रह्मेन्द्र आपण । लाळ घोटोन वांछिती ॥१८६॥
तो परमान्न प्रसाद सार । देऊनि निववी हा परिचर । ऐकून, सद्गुरु जयजयकार । करोनि सत्वर आदरी ॥१८७॥
अहो तो सोहळा निरुपणीं । केवीं मी वानूं एकाननीं ? । सेविलाचि स्वयें श्रीरामवदनीं । कवळ कवळोनि भरवितु ॥१८८॥
ऐसा आनंदानंद सघन । इष्टाप्तवर्गासमवेत सुजन । सारोनि, भोजनोपचारा पूर्ण । तिष्ठे कर जोडून श्रीसेवे ॥१८९॥
असो, तें सद्वृत्त; परि कुजनीं । ग्रामाधि पातें बहुभाषपणीं । कथितां; क्षोभोनि अंत:करणीं । तात्काळ रघुनंदना बाहिलें ॥१९०॥
बाहुनि पुशिले तयाप्रति । तुम्हीं तों धरिली सत्संगति । आतां काम काजादि प्रपंचरीति । कैसेनि कळती तुम्हांतें ? ॥१९१॥
(६)तथापि सद्गुरु की आम्हां । मान्य करणें सांगिजे रामा । येरू म्हणे वो ’ उभय नेमा । चालविणें आम्हां अवश्य ’ ॥१९२॥
नवल मायेची अभिनव ख्याति । हो कां ज्ञातेही महामति । परी स्वार्थावरोधी सक्षोभ चित्तीं । सतासत् नेणती आपपर
॥१९३॥
तेवी हा नोहे माझा तात । सद्गुरुचरणीं सदैव निरत । जेणें वाक् कायमनेंसहित । चौदेहातें अर्पिलें ॥१९४॥
’ आयुरन्नं प्रयच्छति ’ । येणे बोधें सुशांत वृत्ति । काय वदला श्रीराम; श्रोतीं । ग्रामाधिपातें, अवधारा ॥१९५॥
अहो जी अन्नदातया स्वामी । मातें दापितां अनित्य अकामीं । परी इहपर जेणें अव्यंग हमी । घेतली, तया मी अविसंबी ॥१९६॥
असो तें मागील मागें आतां । नेणोनि झालें की समर्था । परी मी आतां सद्गुरुनाथा । न संडी सर्वथा त्रिसत्य ॥१९७॥
म्हणवोनि नमस्कारोनि त्यातें । वेगी परतला निजात्मपंथें । सद्गुरु महादेव बैसले जेथें । साष्टांग तयातें वंदिलें ॥१९८॥
तंव हे कर्णोपकर्णी वार्ता । आद्यन्तरुपें श्रीगुरुनाथा । विश्वाक्षवदनीं आघवी कथा । सर्वज्ञ ह्रदिस्था जाणवली ॥१९९॥
तदा तो अक्षोभ करूणावचन । म्हणे हें कायसें रघुनंदन । तुवां केलें विपरीत चिह्न । काय अज्ञान तुज म्हणों ? ॥२००॥
बाप रे वंदोनि वेदाज्ञेस । पुत्र कलत्र दासानुदास । निमित्तमात्र होऊनि, यांस । द्यावा तोष उचितपणें ॥२०१॥
रघुराय बोले, सद्गुरुमूर्ति । तूंतें निंदूनि जो दुर्मति । दे जरी मातें राज्यसंपत्ति । त्या मी रौरवाप्रति सेवूं कां ? ॥२०२॥
जधीं मज नवनिधि तुझे पाय । गिंवसले; तधींच इहपर सोय । तूंतें निरवून, सद्गुरुमाय । मी तरी आहे निश्वल ॥२०३॥
परिसूनि कनवाळें निश्वयोत्तर । परिपूर्ण ध्रुववाक्य ओपिला वर । बाप तूं भोगूनि निजसुखसार । निववी साचार विश्वातें ॥२०४॥
तूं निजकृपें ओपिसी जया । तो शीघ्र पावेल अक्षय ठाया । त्रिवाचा सत्य हें रामराया । बा गा माझिया भवतारुं ॥२०५॥
परी जो पंचानन द्विपंचाक्ष । भीमरुपी कर्माध्यक्ष । रघुवीर दास्यत्वीं सर्वदा दक्ष । (७)तयाच्या कवचासी जपे तूं ॥२०६॥
तो भद्रमूर्ती इहामुत्र । राघव प्रियकर अंजनीपुत्र । ईप्सित तव अर्थ अहोरात्र । पुरवील साचार मद्वत्सा ॥२०७॥
म्हणवोनि धरिला ह्रदय कमळीं । गुरुनामगजरें सुखकल्लोळीं । रघुराय कवळूनि, आनंदजळीं । वर्षोनि; प्रेमळी दे हांका ॥२०८॥
हे श्रीसदगुरो करुणामूर्ति । हे श्रीसद्गुरो कैवल्यपति । हे श्रीसद्गुरो तारिली जगती । अनन्या मजप्रति रक्षुनी ॥२०९॥
हे सद्गुरो कृपामृतघना । हे श्रीसद्गुरो अखिल कल्याणा । हे श्रीसद्गुरो निरंजना । मजलागीं अनन्या बैसविलें ॥२१०॥
हे श्रीस्वामिन् सद्गुरु आरामा । हे श्रीसद्गुरो निजसुखधामा । हे श्रीसद्गुरो परिपूर्ण कामा । नामा अनामातीत तूं ॥२११॥
यापरी ’ महादेव-स्तुतिवाद ’ । करितां, मत्तात विदेहानंद । वत्स रघुराय होऊनि सद्गद । श्रीपद अरविंद चोखि तु ॥२१२॥
तईहुनि सद्गुरु आनंदानंद । ग्रंथगर्भीचे अखिल भेद । प्रकटिता झाला चिद्घनानंद । जे जगद्वंद्य ह्र्त्साक्षी ॥२१३॥
श्रीआदिकवि मुकुंदराव । जनार्दन एका, ज्ञानदेव । ह्यांचे गुह्यार्थी गुह्य भाव । ग्रंथ गर्भोद्भव अनुवादे ॥२१४॥
ऐसा सदैव अघोषानामी । घेतिल्या छंदा देखोनि स्वामी । समागमेंसी पंढरी ग्रामीं । नेलें सुखधामीं महादेवें ॥२१५॥
तेथें नित्यानित्य नूतन । सेवा, सन्निधी सद्वाक्यश्रवण । लाहोनि, पुनरपि पूर्वस्थान । पावला रघुनंदन आनंदें ॥२१६॥
पुढें नाथपंथीचें मंडण । चिंचणी ग्रामी किती येक दिन । राहोनि; उभयाही अनाथदीन । असंख्य जन उध्दरिले ॥२१७॥
यापरी महादेवें जगतीवर । अवतरोनि केला जगदुध्दार । शेखी रामचंद्रीं स्व अधिकार । अर्पूनि, परत्र पावले ॥२१८॥
आश्विन वद्य तृतीये दिनीं । स्वलीलें स्वतनूतें मेदिनीं । सांडोनि, रघुरायाचा धनी । कैवल्यभुवनीं राहिला ॥२१९॥
तईं ते रामाजीची कन्या । मागां वर्णिली लोकमान्या । काशी नामें परमधन्या । तिनें रघुनंदना बाहिलें ॥२२०॥
तेव्हां मुक्ताचें मुक्त कृत्य । मुक्तेचि मुक्तरहणी दशान्त । कर्मे सारोनि; आब्रह्मभूत । देखती गुरुनाथ जनविजनीं ॥२२१॥
सद्गुरु देही तो निकटवासी । सेवेसी तिष्ठली श्रीराम-काशी । शेखी सर्वत्रीं विदेहवासी । झाल्या, समाधीसी मांडिलें ॥२२२॥
ऐशिया परी देह विदेह । धरुनि सद्गुरुचे पाय । श्रीरामभगिनी काशीमाय । अद्यापि आहे तेथेंचि ॥२२३॥
तैसाचि माझा सद्गुरु तात । त्रिकुटवासी श्रीरघुनाथ । पुत्रादि परिवारासमवेत । विमुक्त नांदत मेदिनीये ॥२२४॥
शिरसा सद्गुरुचें वचन । वंदूनि उध्दरी असंख्य जन । त्रितापें तापूनि पातले शरण । प्रतापें पावन त्या केलें ॥२२५॥
जयानें सोऽहंकार गजरीं । होड घालोनि दंडधारी । जिंकोनि, कळिकाळातें हारीं । आणिलें व्यवहारी वर्ततां ॥२२६॥
आत्मप्राप्त्यर्थ जनीं विजनीं । गिरिकंदरीं तीर्थाटणीं । व्रत तप यज्ञादि श्रांत हवनीं । ते रामदर्शनीं निवाले ॥२२७॥
(८)तोचि हा चिद्रुप साकार पूर्ण । सद्गुरु माझा रघुनंदन । जेणें जन्ममृत्य कर्मबंधन । निरसोनि, निज चरण दाविले ॥२२८॥
तयाचें उत्तीर्ण कवण्या गुणें । केवीं म्यां होईजे सेवाहीनें ? । अधमाधमें परवशपणें । आयुष्याकारणें वेचिलें ॥२२९॥
परी तेणें गुणदोष भाव । न गणूनि, माझे तांतडी धांव । घेवोनि, कैवल्यपदींचा राव । पुरवीत हांव घडोघडीं ॥२३०॥
अहा त्या अखिल सुखदभोगा । काय मी वानूं ? सज्जना सांगा । जिहीं विषम विश्वाक्षा सारुनि मागां । घेऊनि वोसंगा
निवविलें ॥२३१॥
कां जे अत्यंत क्षुत्तापतप्त । करकंजोद्भव अनन्य अपत्य । ब्रह्माण्ड विवारितां, त्याविना सत्य । आन आप्त मज नाही ॥२३२॥
निवविलें; पिवविले प्रेमभरित । परमवात्सल्यें स्वानंदामृत । भोग भोक्ता भोग्य ही मात । नुरवूनि; सुशांत मज केलें ॥२३३॥
ऐसिया सज्जना सद्गुरुसी । कामदुहा कल्पद्रुम कीं परिसीं । उपमोनि, अतुलातुल्य तुलनेसी । वाग्विडंबासी कां करुं ? ॥२३४॥
यालागीं तूंतें विश्वंभरा । वानवेचि ना मज पामरा । तुझिया पदपद्माची मुद्रा । श्रीरामचंद्रा मज देई ॥२३५॥
नेणवे कर्म धर्म धारणा । नेणवे जप तप ज्ञानोपासना । तव पदाविना रघुनंदना । अन्यत्र साधना न मनी मी ॥२३६॥
अहा ! तूं माझी अद्वयपणीं । ताताम्बमूर्ति अभिन्न जनीं । अपत्यमोहे लावोनि स्तनीं । संगोपी जननी गुरुमाय ॥२३७॥
परि हे अहो जी सद्गुरुनाथा । म्या तुज उपमिले तात-माता । तरी ते एकेचि जन्मी समर्था । संगोपितां उबगती ॥२३८॥
आणि तू इहपराचा भार । अक्लेशपणीं नाभिकार । देऊनि, अनन्या भवसागर । तारिले दुस्तर अवलीळा ॥२३९॥
यालागीं सनातन जगज्जनका । वांछी तव पदरजपीयुखा । आणि माथांही पदमुद्रिका । अढळ भक्तसख्या मज देई ॥२४०॥
बाप ’ परब्रह्म ’ शब्द पूर्ण । हा त्वत्कृपेंचि मुमुक्षा सप्रमाण । येर्हवीं वाचेसी विग्लापण । अनंत शीण जाणवला ॥२४१॥
म्हणोनि सच्चिद्घन माय कृपाळ । मातें न करी पदावेघळ । त्वत्पदसेवनीं आघवा काळ । सारी अविकळ जननीये ॥२४२॥
अखंड वाचेसी तुझें नाम । ह्रदयावकाशीं सगुण सुनेम । पदसेवेचा देवोनि प्रेम । राखी अविश्रम तव चरणीं ॥२४३॥
हेचि शेवटची विज्ञप्ति । तवोच्छिष्ट शेषान्नातें निगुती । देऊनि; दासानुदासा मजप्रति । पदरजीं निश्विती राखावें ॥२४४॥
यापरी बहुसाल दीन वाणी । ऐकोनि श्रीपतीची विनवणी । सद्गुरु रघुरायें पसरोनि पाणि । ’ तथास्तु ’ म्हणवोनि कवळिलें ॥२४५॥
सप्रेमभरें ह्रदयान्तरी । कवळोनि, आश्वासिला निर्धारी । तैं मनोवृत्ति अमनाकारी । होऊनि, चरणावरी पडियेला ॥२४६॥
ह्रदया ह्रदय मिळतां भाव । सांगणें मागणें अवघेंचि वाव । झालें; श्रोतयां शब्द ठाव । कें वदों नवलाव खेवेंचा ? ॥२४७॥
यापुढें मज्ज्येष्ठ सहोदर । रघुरायाचा करकंजपुत्र । अवाप्तकामी नाम ’ शंक्दर ’ । जगदुध्दारा प्रेरील ॥२४८॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥२४९॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय बत्तिसावा संपूर्ण ॥
टीपा - (१) रघुराया क्षुधेहातीं गिंवसलासी.....योगामूर्ति तृप्ति करी -ओवी ६ :-
या ठिकाणीं असा कथाभाग आहे की एके दिवशीं श्रीरामचंद्रमहाराजांच्या घरीं कांहीं कुलधर्म असल्यानें त्या दिवशीं भोजनाची
नेहमींची वेळ टळून गेली होती. भुकेमुळें त्यांची मुद्रा श्रीगुरु महादेवनाथांना म्लान दिसली म्हणून श्रीगुरुंनीं त्यांना जवळ
घेऊन चुंबन घेतलें व सोऽहं धारणा धरण्याचा अभ्यास पुनः करवून घेतला. पूर्वी एका टीपेंत लिहिल्याप्रमाणें श्रीसिध्दचरित्रा
सारखें संतप्रणीत ग्रंथ हे निरनिराळ्या प्रसंगांतून, धर्म, नीति, अध्यात्म शिकवीत असतात. साधकाची मनोभूमिका व
साधनमार्गावरील प्रवासाचे सर्व टप्पे लक्षांत घेऊन त्यांत अधिकारानुरुप विवेचन केलेले असते. सदरच्या प्रसंगांतून
साधकांनीं हेंच लक्ष्यांत घ्यावयाचे आहे कीं सद्गुरुंचा अनुग्रह झाल्यानंतरही कांहीं काळ कामक्रोधादि विकार, निद्रा, आळस,
जिव्हालौल्य, तसेच क्षुधा तृषा हे प्राणधर्म ही सर्व मंडळी अभ्यासी व्यक्तीला स्वतःच्या तंत्रांत वागवीतच असतात. त्यावर
विजय मिळविण्यासाठीं म्हणजेच त्यांचे साक्षी होण्यासाठी श्रीगुरुपदिष्ट अभ्यास, नेटानें, उत्साहानें व दीर्घ काळ करावा
लागतो. ’ माझी भोजनाची रोजची वेळ अमुक आहे ....आज स्वयंपाकाला सुरुवातच उशीरा झाली ....अजून नैवेद्य व्हायला
किती वेळ आहे कुणास ठाऊक ....दुसरीकडे भोजनाला जायचे म्हणजे थोडाफार उशीर होणारच ...भुकेनें आंत कावळें
कोकलु लागले आहेत; थोडा चहा तरी घ्यावा ....अशासारख्या वृत्ति जर साधकाच्या मनांत उठूं लागल्या तर त्या खळबळीमुळे
भोजनाला झालेला उशीर त्याला अधिक जाणवतो व ही सूक्ष्मांतील जाणीव स्थूल देहावर येऊन त्या व्यक्तीचा चेहरा
व्याकुळ दिसतो. अशा वेळीं या कल्पनांच्या जाळयांत न अडकतां साधक जर ’ क्षुधा व तृषा हे प्राणधर्म आहेत. मी त्यांचा
साक्षी आहे. जेथे क्षुधा तहान नाहींत असें आत्मस्वरुप म्हणजेच मी. सोऽहं सोऽहं ’ या चिंतनांत राहील तर त्याला भुकेची
बाधा म्हणतात ती होणारच नाहीं हा अभ्यास जरूर करण्यासारखा आहे. सोऽहं भावें पारंगत झालेले सिध्द पुरुष अन्न-
पाणी न मिळतांही प्रसन्नमुखी राहतात त्याला कारण हाच अंगीं बाणलेला साक्षित्वाचा अभ्यास !
(२) तूं आसनीं तत्पर ....राहे रघुवीरा साक्षित्वें-ओवी २४ :-
येथील १४ ते २४ या ओव्य़ांतील श्रीगुरुंचा उपदेश सांप्रदायिकांना अतीव महत्त्वाचा आहे. धैर्यानें , चिकाटीनें, दीर्घकाळ
अभ्यास करण्याची आवश्यकता,....यंत्रतंत्र, पंचाग्निसाधन हठयोग - इत्यादींचें आत्मप्राप्तीच्य़ा तुलनेनें गौणत्व ....केवळ अनन्य शरणागतीची श्रीगुरुंची अपेक्षा व गुरुकृपा हेंच खरें सामर्थ्य,...श्रीगुरुवाक्यांतील लक्ष्याशांचें दृढ मनन.....शरीराची अमंगलता...सोऽहं ही दोन अक्षरेंच मुक्तीचा सुलभ मार्ग .....शुकसनकादिका याच सोऽहं बोधावर अक्षय परमानंद भोगतात. इत्यादि महत्त्वाचे मुद्दे या अकरा ओव्यांतून आले आहेत. ते सर्व नित्यशः चिंतनीय आहेत. ’ कोनत्याही कर्माचा मी कर्ता नव्हें.
कसल्याही कर्मफळाचा ( सुखदुःखाचा ) मी भोक्ता नाही; मी साक्षी आहे. सर्व कर्तृत्व प्रकृतीचें आहे आणि भोक्तृत्व अहंकाराला
असते. मी प्रकृतीपासून व अहंक्दारापासून वेगळा आहे. मी सच्चिदानंद परमात्मा ( तत्त्वतः ) आहे अशी ज्या वेळी जागृति
स्वप्न सुषुप्ति या तिन्ही अवस्थांतून पक्की धारणा राहते त्या वेळीं तो थोर साधक जीवन्मुक्त अवस्थेचा आनंद अखंडपणें
सर्वकाळ भोगतो. या ओवींत अशा साक्षित्वानें राहण्याचा श्रीरामचंद्रमहाराजांच्या निमित्तानें साधकांना श्रीगुरुंचा उपदेश आढळतो.
(३) एवं पिण्डाण्ड अष्टाधेसी । अमल निरंद्जन सर्व साक्षी । तूंचि तूं .....ओवी १२० :-
ओवी क्र. २५ मध्यें श्रीरामचंद्रमहाराजांनीं सद्गुरुंना विनंति केली की ’ प्रणवप्रांजळ, विवरोनि मज बोधी ।’ त्यावर ओवी
क्र. २७ पासून येथील १२० सुमारे शंभर ओव्यांतून, श्रीमहादेवनाथांनी प्रणवोपासनेचा प्रदीर्घ खुलासा केला आहे, या विवेचनांत
ॐ काराच्या साडेतीन मात्रांचे प्रामुख्यानें वर्णन असून तदंतर्गत असे प्रत्येक मात्रेचे दैवत, शक्ति, अवस्था, लोक, स्वर, वेद,
गुण, भोग, स्थान, वाचा, देह इत्यादींचा उल्लेख आढळतो. श्रीपतींनीं पुढे ३८ व्या अध्यायांत नमूद केल्याप्रमाणे या पोथींत
जेथें उपदेश प्रकरण आले आहे ते विवेचन महायोगिनी गोदामाई कीर्तने यांनीं केलें आहे. प्रचंड धबधब्याप्रमाणे, हा
स्वानुभवाचा विषय मातोश्री गोदूताईच्या मुखावाटे आला असल्यानें, येथील निरुपणांत कांटेकोर ग्रांथिक भाषासरणीची
अपेक्षा करणें वाजवी होणार नाहीं. याच विवरणांत प्रसंगानें कांहीं पंचीकरणाचा व वेदान्तशास्त्रांतील प्रमेयांचाही उल्लेख
आहे. तसेंच स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाचा निरास हाही विषय आला आहे.
प्रस्तुत भागांतील ओव्यांचे परोक्ष म्हणजे शब्दज्ञान अधिक शास्त्रीय परिभाषेतून करुन घेण्याची जिज्ञासा असणार्या
वाचकांना आम्ही एवढेंच सुचवूं इच्छितों की ज्यांनी शंकासमाधानपुर्वक , गुरुशिष्यपरंपरनेम प्राचीन ग्रंथांचें पांक्त अध्ययन
केलें आहे अशा निगर्वी व ज्ञानदानशील असलेल्या कोणा शास्त्रीपंडितांजवळ त्यांनीं योगपर उपनिषदें, तसेच विशेषतः
माण्डुक्य उपनिषद व त्यावरील भगवान् गौडपादाचार्याच्या कारिका, त्याचप्रमाणें श्रीशंकाराचार्याचे भाष्यवाड्.मय, पंचदशी
वगैरेचा अभ्यास करणें आवश्यक आहे. प्राकृत ग्रंथांत विवेकसिंधु, परमामृत दासबोध, हंसराज स्वामींची वाक्यवृत्ति इत्यादि
ग्रंथांतून वरील निरुपणांतील कांही विषय आला आहे. तोही जाणत्याकडून समजून घ्यावा.
(४) जाणोनि रामाचा सहोदर । तात्काळ केला अंगीकार ।- ओवी १३७ :-
श्रीरामचंद्रामहाराजाचे थोरले बंधु श्री अप्पा हेहीं परमार्थ जिज्ञासु होते. श्रीमहाराजांनीं महादेवनाथांकडून उपदेश घेऊन त्यांची
पूजा वगैरे केली त्या वेळीं अप्पा घरीं नव्हते, ते बाहेरुन येतांच धर्मपत्नीनें म्हणजे महाराजांच्या भावजयीनेम अप्पांना
थोडे विनोदी भाषेंत सांगितलें " अहो, ऐकलं का ? रामरायानें म्हणे गुरु केलाय ! केवढी पूजा केली. त्या गुरुंनीं ब्रह्मज्ञान का
काय म्हणतात ना, त्याचा उपदेश केला म्हणे ! " हें ऐकन आप्पा मात्र गंभीर झाले, राम मति सान नव्हे ’ अशी त्यांची
खात्री होती. आपला राम योग्य गुरुचेच पाय धरणार या निश्चितीनेम अप्पाही लगेच स्नान करुन श्रीमहादेवनाथांच्या
दर्शनास अनुग्रहाच्या इच्छेने गेले. ’ हा आपल्या प्रिय शिष्योत्तमाचा भाऊ आहे ’ असें कळतांच बोवांनीही अप्पांना तात्काळ
मंत्रदीक्षा दिली असा हा प्रसंग आहे, स्वामी स्वरुपानंद सद्गुरुचें गुरुजी पू. बाबामहाराज वैद्य हेही एका घरांतील नातलग
अनुग्रहासाठी आले तर बहुधा चटकन् अनुग्रह देत आसत. हे स्वभावसाधर्म्य येथें सहजी आठवते.
(५) ओव्या १४४ ते १८२ -----या अडतीस ओव्यांतून पुनः श्रीमहादेवनाथांचे उपदेशपर विवेचन आलें आहे त्यांतील सांप्रदायिक
सोऽहं राजयोग दीक्षेचे पुढील सूचक निर्देश विशेष महत्त्वाचे आहेत. (१) आधारापासोनि सहस्तपर्यंत । दावीन संकेत सुबुध्दा
(२) मनाचें मनत्व निवटोनि चोख । पवनीं मिळवावे सम्यक । (३) प्राणापान एकत्र कीर । करोनि ब्रह्मरंध्रीं रिघावे ॥......
(६) तथापि सद्गुरु की आम्हां । मान्य करणे, सांगिजे रामा । - ओवी १९२ :-
श्रीरामचंद्रमहाराज हे चिंचणीकर दाजीबा पटवर्धनांचे नोकरीत होते याचा उल्लेख पूर्वी आला आहे. श्रीमहाराजांनीं गुरुपदेश
घेलता हे कळल्यावर कांहीं मत्सरग्रस्त दुष्ट लोकांनीं ’ बहुभाषपणीं ’ जहागिरदारांच कान फुंकलें की आतां महाराज नीट
लक्षपूर्वक राजसेवा करणार नाहींत ! त्यावर दाजिबांनींही तात्काळ महाराजांस बोलावून विचारलें " एक तर सद्गुरुंची नाहीतर
आमची -एकाचीच -सेवा केली पाहिजें. बोला . तुम्हांस काय मानवते ? "
(७) तयाच्या कवचासी जपे तूं । -ओवी २०६ :-
या संबंध ओवीचा अर्थ असा आहे कीं पंचमुखी व दशनेत्री अशा श्रीशंकरानें श्रीरामप्रभूच्या दास्यभक्तीसाठी हनुमंत रुपाने
अवतार घेतला अशा त्या मारुतीची उपासना करण्यास श्रीमहादेवनाथांनी सुचविले. हनुमान कवचाचे पाठ करण्याची आज्ञा
केली. सोऽहं दीक्षांपरंपरेंत सगुण उपासनेचा अधिक्षेप नाहीं याचे स्पष्ट दिग्दर्शन या ओवींत आढळते.
(८) तोचि हा चिद्रूप साकार पूर्ण । सद्गुरु माझा रघुनंदन :-ओवी २२८ :-
या ओवीपासून अध्यायसमाप्ती पर्यंत श्रीपतींनीं ( आत्मकथनपर ) सद्गुरुंची, स्तुति केली आहे. उत्तम गुरुभक्ताचे श्रीगुरुचरणीं
कसे भाव असावेत त्याचे या ग्रंथांत्त जे अनेक भाग आले आहेत त्यापैकी हा एक होय.
कठीण शब्दाचे अर्थ :- कोमेला = कोमेजलेला, सुकलेला (५) गिंवसणें = सांपडणें, आधीन होणें (६) उगळणें = गिळलेली वस्तु
बाहेर टाकणें (१०) अभिधान = संज्ञा, नांव (१२) न ठके =(ठाकणें- उपस्थित होणें, लाभणें ) लाभत नाही (१५) ताताम्ब =[ तात+अम्ब ] वडील व आई (४०) वाग्रस= [ वाक्+रस ] वाणीचा प्रवाह (४९) वक्ष्यमाण = पुढें बोलले जाणारे (५०) तन्न तन्न वचनें =तें नाहीं तें नव्हें’ अशा वाक्यांनीं (८७) सदैव = दैववान् (८९) कुवासा = आधार, आश्रयस्थान (१२८) देवर=दीर (१३३) मधवा =इंद्र; चतुरास्य = ब्रह्मदेव (१५३) कुजन =दुष्ट लोक (१९०) दापणें =दटावणें, जुलमानें एखादी गोष्ट करुन घेणें (१९६) पंचानन=पांच मुखांचा; द्विपंचाक्ष = दहा नेत्रांचा [ शंकर ] (२०६) विग्लापन = ग्लानि, शीण (२४१)