श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसद्गुरु समर्थ ॥
नमो श्रीगुरु रामराया । जयाच्या कृपें दुर्धर माया । जे ब्रह्मादिकां नये आया । ती जाय विलया क्षणार्धे ॥१॥
ब्रह्माहमसिम महावाक्य । हे उपदेशी श्रुतिसांख्य । कीं ब्रह्मीं सदा तुझें ऐक्य । हेंचि मुख्य तात्पर्य ॥२॥
परी जे बहिर्मुख जन । तयांतें न वाटे प्रमाण । जैसें नवज्वरिता जाण । कडुवटपण दुग्धातें ॥३॥
नवज्वर जाय दुवाड । तैं दुग्ध पहिलेंचि गोड । तैसें भवभ्रांतीचें वेड । जाय; तैं जोड स्वसुखाची ॥४॥
परी न मिळे धन्वंतरी । रोग कैसा जाय तोंवरी । अशास्त वैद्याचिये करीं । पडतां, दुरी निरुजत्व ॥५॥
तैसा सप्रचीत श्रीगुरु । न ठेवी शिष्य-माथां करु । तंव न जाय भवज्वरु । हा निर्धारु सर्वांचा ॥६॥
कोणतें तरी वृक्षमूळ । कोणीतरी खंडी सबळ । कोणातरी द्यावे; तात्काळ । कांहीं चाळ होतील ॥७॥
तैसा कोणीतरी गुरु । कांहींतरी शास्त्राधारु । कोणातरी शिष्य करुं । सुविचारु कैचा तेथें ? ॥८॥
गुरु न जाणे ब्रह्मज्ञान । शिष्य विषयासक्त मन । गांठी पडे दोघांलागून । समाधान मग कैचें ? ॥९॥
ऐसा नोहे माझा तात । जयाचें बोल सप्रचीत । स्वात्मानुभूति अचुंबित । करतलगत जयाच्या ॥१०॥
जो मोक्षसुखाचा दाता । जयाचें नामें भवव्यथा । नासोनि जाय तत्त्वतां । न लगतां क्षण एक ॥११॥
तयासी माझा नमस्कार । साष्टांग भावें वारंवार । पुढील कथेचा विस्तार । वदवी साचार सर्वज्ञा ॥१२॥
सिध्दचरित्र महाग्रंथ । सद्भक्तांसी मोक्षपंथ । दाविता तो तुंचि येथ । परियंत सत्य आणिला ॥१३॥
पुढेंही तूंचि चालविला । तूंचि श्रोता आणि वक्ता । तुजविणें जगीं जगन्नाथा । आदि अंतीं दुजा नसे ॥१४॥
तुझे शक्तीचेनि मेळें । एकांशें हें जग चाले । तेथें ग्रंथ कोण बोले । हें जाणवलें सर्वांसी ॥१५॥
असो, गेलिया प्रकरणीं । गोपाळातें उपदेशुनी । धन्य केलें त्रिभुवनीं । जगदुध्दरणीं योजिला ॥१६॥
पुढें श्रीरामें काय केलें । कोणां सुपथातें लाविलें । कैसे काय नवल वर्तले । तें परिसिले पाहिजे ॥१७॥
बाप पढियंत्याची गोडी । ह्र्दयीं वाहोनि धडफुडी । मार्गी लावी अनंत क्रोडी । इतर जोडी न मनोनी ॥१८॥
वर्षी वर्षे पर्जन्यधारा । सरी सर्वत्र सैरावैरा । पात्र पाहोनि धरी थारा । सांठवण येरा, समुद्र ॥१९॥
की सुटतां वैलवारा । सुपीक पिके चौबारा । लाभ होय भुक्त्यनुसारा । पात्रापात्र विचारें ॥२०॥
गंगा सर्वत्र सदा वाहे । भाग्यवंत तो संगति लाहे । दुर्दैवा दुष्प्राप्य तोय । बिंदुही होय ज्यापरी ॥२१॥
कीं पौर्णिमा मासीं आश्विनी । कोजागरी विख्यात जनीं । ’ को जागर्ती ’ ति भाषणीं । लक्ष्मी अवनी निशी फिरे ॥२२॥
परी सभाग्य तो जागा राहे । लक्ष्म्यागमन संधी पाहे । येतां सामोरा, धांवूनि जाये । धरुनि पाय घरा आणी ॥२३॥
हतभाग्य तो निंदा करी । आली लक्ष्मी जाय दुरी । क्लेश भोगी नाना परी । जन्मदारिद्री करंटा ॥२४॥
तैसा रामचंद्र सद्गुरु । भवसिंधूचें महातारुं । करावया जगदुध्दार । करी संचार सर्वत्र ॥२५॥
परी जयाची शुध्द मति । जयाचे घरीं दैवी संपत्ति । तो पात्र होय कृपेप्रति । आत्मस्थिति पावेल ॥२६॥
आतां रामाचें जिकडे गमन । तो देशचि होय पावन । तृण लता गुल्म पाषाण । होती धन्य चरणरजें ॥२७॥
हें वस्तुमाहात्म्य सहज । परंतु आत्यंतिक गुज । अद्वयानंदाचें चोज । तें मात्र बीज सच्छिष्या ॥२८॥
असो, ऐसे फिरत फिरत । करवीरीं आले अकस्मात । जेथें चित्कळा मूर्तिमंत । असे नांदत जगदंबा ॥२९॥
मुळींच तें क्षेत्र पावन । दक्षिण काशी नामाभिधान । सर्व तीर्थांचें माहेर जाण । अत्रिनंदन जेथ वसे ॥३०॥
वाराणसी क्षेत्र विख्याति । वरी पाअली भागीरथी । तैसे राम करवीरीं येती । कुलधर्म मूर्ति पाहावया ॥३१॥
राम-कुलींची कुलस्वामिनी । एकवीरा करवीरवासिनी । जे दुजेवीण एकासनीं । वसे, त्रिभुवनीं व्यापक ॥३२॥
जे एकचि जाहली अनेक । अनेकीं वसे सदा एक । पूर्णब्रह्मीं चित्कळा देख । तेंचि एक एकवीरा ॥३३॥
तिचें घेऊनियां दर्शन । अवलोकिलें करवीर पत्तन । जें आदिमायेचें निजस्थान । पाहूनि मन आनंदलें ॥३४॥
कांहीं दिवस क्षेत्रीं वास । करी, राम सावकाश । निजानंदे पूर्ण मानस । बाह्य सुखदुःखास नातळे ॥३५॥
वर्तले विविध चमत्कार । वर्णितां ग्रंथ वाढेल फार । तथापि जे पावन सार । तेंचि चरित्र सांगेन ॥३६॥
तुम्हांऐसे श्रोते श्रीमंत । तुमचे भाग्यें मी भाग्यवंत । यास्तव गूज सांगेन अत्यंत । स्वस्थचित्त असों द्यावे ॥३७॥
तुमचे अवधानें मज दीना । ग्रंथीं होते प्रस्तावना । दयाळु श्रीगुरुराणा । करिता प्रेरणा तुम्हानिमित्त ॥३८॥
केवळ जडातिजड माती । तियेची जीर्ण जाहली भिंती । चांगयानिमित्त चालविती । श्रीआदिमूर्ति ज्ञानराज ॥३९॥
तैसें तुम्हां सज्जनासाठीं । बैसूनि श्रीपतीचे वाकपुटीं । ग्रंथरचनेचिया कोटी । स्वयें जगजेठी श्रीगुरु वदे ॥४०॥
श्रोते म्हणती पुरे पुरे । ग्रंथरचना चालवी त्वरें । श्रवणीं बैसलों अत्यादरें । चंद्रीं चकोर ज्यापरी ॥४१॥
श्रीसद्गुरुचेम चरित्र । पुण्यपावन परमपवित्र । ऐकतांचि, अधिक श्रोत्र । भुकेले; पात्र तृप्तीस नव्हती ॥४२॥
केव्हां मिळेल तुझेवं वचन । म्हणोनि श्रवणा लागली तहान । श्रीगुरुकथा गर्जोनि गहन । करी ’ पान-पात्र ’ वदना ॥४३॥
ऐसी आज्ञा वंदिली शिरीं । श्रीगुरुतें नमस्कारी । तुम्ही बैसोनिया वैखरीं । ग्रंथ कुसरी चालवा पुढें ॥४४॥
(१)श्रीगोदावरीचें आख्यान । करीन म्हणतों जी लेखन । मी तंव अज्ञान मतिमंद हीन । साभिमान तुज असो ॥४५॥
माझा अभिमान तूं धरी । म्हणतां; अंगे वाजे थोरी । येथें ग्रंथ वदे वैखरी । तें तूंचि श्रीहरी बोलसी ॥४६॥
गोदावरी तुझीच मूर्ति । कीं ब्रह्मीं चित्कळा स्फूर्ति । अवतरोनि इये क्षितीं । भाविक पंथीं लाविले ॥४७॥
तियेचं साद्यन्त चरित्र । वर्णितां, ग्रंथचि होईल स्वतंत्र । परी वर्णितों ध्वनितमात्र । तव कृपापात्र व्हावया ॥४८॥
श्रीगुरु म्हणती श्रीपति । जें आमुचे होते चित्तीं । तेंचि कथानक अतिप्रीति । तुवां निगुती आरंभिलें ॥४९॥
तरी निर्भय चालवी ग्रंथ । वर्णन करी यथातथ्य । विन्ध्याद्रि जया अंगिकारीत । सन्निध होत रवि त्यासी ॥५०॥
ऐसे पावोनि आशीर्वचन । पुनरपि करुनि साष्टांग नमन । चरणरज मस्तकीं धरुन । ग्रंथलेखन आरंभी ॥५१॥
गोदावरीची वंशस्थिति । वर्णितां विस्तार होईल ग्रंथी । म्हणोनि सांगतों त्रुटितार्थी । क्षम्दा श्रोतीं करावी ॥५२॥
तुम्हां श्रोतियांची आस । मी जाणतसे सावकाश । जे गोदावरी वर्णनीं हव्यास । विशेष मानसीं धरावा ॥५३॥
परी हा सिध्दचरित्र ग्रंथ । सिध्दी पावावा त्वरित । ऐसा बहुतेकांचा हेत । ऐसेंच आज्ञापित श्रीगुरुही ॥५४॥
म्हणवोनि येयें बोलतों त्रुटित । हा ग्रंथ व्हावया समाप्त । जरी श्रीगुरु पुरवील हेत । तरी स्वतंत्र ग्रंथ करीन ॥५५॥
मी करीन हें केवढें । आम्हां लेकराचे चाडे । त्यांचे तेचि वाडेकोडें । करितील धडफुडें तें खरें ॥५६॥
गोदावरीचे पितामह ’ हरी ’ । श्रीपांडुरंग तयाचे घरीं । सांडोनि निजभुवन पंढरी । वास करी सर्वदा ॥५७॥
जुन्नरानजीक राजोरी । ग्रामीं वास करी हरी । ’ भावा ’ निमित्त सोडूनि पंढरी । विठ्ठ्ल घरीं येत त्याच्या ॥५८॥
किती येक वारकरी । जे नैष्ठिक येणार पंढरीं । त्यांसी दृष्टान्तीं आज्ञा करी । तुम्हीं ’ राजोरी ’ या आतां ॥५९॥
मी असे तये ठायीं । भावास्तव भुललों पाही । पंढरीचा महिमा सर्वही । तये ठायीं देखाल ॥६०॥
ऐसी आज्ञा होतां सर्वा । वारकरी मनीं गर्वा । न धरोनि; साधिती पर्वा । राजुरीं बरवा उत्साह करिती ॥६१॥
असो; हरी विख्यातकीर्ति । जो केवळ सत्त्वैकमूर्ति । प्रपंच परमार्थ यथास्थिति । करुनि, वरिती निजपद ॥६२॥
तयाचे उदरीं पांच पुत्र । सर्वही राज्य धुरंधर । पांचांचाही वंश विस्तार । अति पवित्र कीर्तिमंत ॥६३॥
ज्येष्ठ पुत्र नारायण । तयाची पत्नी लक्ष्म्याभिधान । उभय शुचिष्मंत पावन । लक्ष्मी नारायण साक्षात् ॥६४॥
उभयतांचें धर्मी मन । दीनीं सदय अंतःकरण । विठ्ठल चिंतन रात्रंदिन । करिती भजन विठ्ठलाचें ॥६५॥
प्राप्त काळाचा मानूनि संतोष । अप्राप्ताचा न करिती हव्यास । राजसेवानिमित्तें त्यांस । करवीरीं वास जाहला ॥६६॥
एकनिष्ठें राजसेवा । करिती, एके मनोभावा । पासूनि नित्य स्मरती देवा । म्हणती वैभवा भुलों नेदी ॥६७॥
ते उभयतां सद्बुध्दि । सोडूनि बाह्य सुखोपाधि । भाव ठेवोनि, श्रीचे पदीं । रमती गोविंदीं अनुदिनी ॥६८॥
ऐसें वर्ततां संसारीं । विठ्ठल चिंतिती अहोरात्रीं । तो लक्ष्मी आपुले उदरीं । गर्भ धरी तृतीय ॥६९॥
जों जों उदरीं गर्भ राहे । तों तों सद्भुध्दि वाढताहे । प्रपंच क्षणिक वाटताहे । ऐसें लाहे भाग्यतम ॥७०॥
आधींच ते पवित्र माय । वरी सद्गर्भ संभवु होय । दिवसेंदिवस वाढत जाय । सद्बुध्दि ते काय वर्णावी ॥७१॥
काय सांगूं देहदपरी । विठ्ठल वाटे चराचरीं । सर्व छंदे अहोरात्री । नामी वैखरी तेंचि घे ॥७२॥
असो, नवमास भरतां पूर्ण । लक्ष्मी प्रसूर जाहली तूर्ण । पुढें देखिलें कन्यारत्न । जें कां भूषण वंशाचें ॥७३॥
कन्या न रडे गदारोळ । सुहास्यमुख शोभे वेल्हाळ । माता आप्त देखोनि बाळ । सुपर्वकाळ मानिती ॥७४॥
होतां द्वादश दिवस पूर्ण । सुह्र्दाप्त करिती नामकरण । ’ गोदावरी ’ पुण्यपावन । म्हणवूनि अभिधान स्थापिती ॥७५॥
शुक्लपक्षीं वाढे चंद्र । तैसें दिवसेंदिवस सुकुमार । बाळ वाढों लागले साचार । मातापितर आनंदती ॥७६॥
तावन्मात्र स्तनपान । करुनि बाळ समाधान । राहे, आकर्ण पद्मनयन । सुहास्य वदन सर्वदां ॥७७॥
जैसें बाळ वाढों लागे । तैसी संपत्तीही वाढ घे । मायबाप म्हणती दोघे । पूर्वपुण्यौघें हें रत्न ॥७८॥
बाळलीला न दिसे अणुमात्र । सर्वदा समनेत्र, सुहास्यवक्त्र । न कळे ईश्वर लीला चरित्र । कैसा पवित्र पिंड हा ॥७९॥
ऐसा कांहीं लोटला काळ । बोबडें बोलूं लागे बाळ । तों ध्वनीसरिता तात्काळ । नाम गदारोळ मुखीं प्रकटे ॥८०॥
विठ्ठल रामकृष्ण वाणी । गोविंद गोपाळ चक्रपाणि । ऐशा अपार नामश्रेणी । वदनीं अनुदिनीं बोभाई ॥८१॥
पांच वरुषें लोटतां अंगीं । खेळूं लागे चत्वर भागीं । समवयी कन्या, प्रसंगी । म्हणे नामरंगीं नाचूं या ॥८२॥
झिम्मा फुगडी नाना खेळीं । अथवा डोल्हारा बैसतां बाळी । ओविया परिये दे वेल्हाळी । हरिनाम मेळीं गातसे ॥८३॥
मातापितर पुसती सुखें । खेळीं आवडे काय भातुकें ? । ती म्हणे इतर खेळ फिके । विठ्ठलनायकेवांचुनी ॥८४॥
विठ्ठल आणि रुक्मिणीमाता । या मूर्ती सुंदर असाव्या ताता । पूजा उत्साह करुनि तत्वतां । खेळों चित्ता आवडे बहु ॥८५॥
ऐकोनि कन्यामुखीचें बोल । मूर्ति आणविली तात्काळ । पाहूनि वैकुंठलोकपाळ । प्रेमें वश्य गोदामाय ॥८६॥
धुडधुडां धांवत ये सत्वरीं । म्हणे ताता दे झडकरी । तातें घेतलें अंकावरीं । मूर्ति करीं देवोनी ॥८७॥
अश्ममय मूर्ति गोजिरिया । श्रीविठ्ठल आणि रुक्मिणीमाया । पाहूनि, आनंदली ह्र्दया । माजी, पायां लागतसे ॥८८॥
नित्य काळीं करुनि स्नान । करी विठठलाचें पूजन । आपण जें जें करी भक्षण । तें नैवेद्य समर्पण करुनियां ॥८९॥
समग्र बाळलीला वर्णितां । वाढी होईल विशेष ग्रंथा । म्हणवोनि बोलितों त्रुटितार्था । क्षमा श्रोता करावी ॥९०॥
असो, करवीर पश्चिम दिकभागीं । ब्रह्मेश्वर नामें प्रसिध्द जगीं । चतुरानन स्थापित लिंगी । प्रीती अनेकीं धरियेली ॥९१॥
परी देवालय थोर । असतां, जीर्ण जाहलें फार । त्याचा करावा जीर्णोध्दार । ऐसें समग्र इच्छिती ॥९२॥
परी सामर्थ्य अथवा सत्ता । स्वाधीन कांहीं एक नसतां । कैसी होईल सिध्दता । ऐसी चिंता बहूतांसी ॥९३॥
(२)गोदावरीचे पितृव्य पितर । तयांसी श्रुत जाहलें समग्र । म्हणती करुं जीर्णोध्दार । ब्रह्मेश्वर देवालयाचा ॥९४॥
ऐसें आणितां अंतरीं । उभयतां राजसत्ताधारी । उदित जाहले जीर्णोध्दारी । तें सत्वरी सिध्दी पावे ॥९५॥
आधींच लिंग अनादिसिध्द । वरी देवालय सुशोभित प्रसिध्द । होतां, येती साधुवृंद । ब्रह्मानंद पावावया ॥९६॥
तयांत एक यतिवेष मूर्ति । ब्रह्मसाक्षात्कार संवित्ति । येती करवीर क्षेत्राप्रति । अनाहत गति जयाची ॥९७॥
गोदावरीचे पितृव्य पितर । नित्य पूजिती ब्रह्मेश्वर । तयांसवें हेही सुंदर । जाय शंकर दर्शना ॥९८॥
तों देखिले यतिवेषधारी । सुहास्यवदन मनोहरी । साष्टांअ नमन केलें पितरीं । पाहूनि; गोदावरीही नमी ॥९९॥
कन्या पाहूनि सुहास्यवदन । यतीनें कांहीं प्रश्न । विनीतपणें उत्तरें ऐकून । सुप्रसन्न यति जाहलें ॥१००॥
म्हणती वय तरी हें सान । उत्तरीं दिसे प्रौढता गहन । ऐसें हें गुणनिधान । कन्यारत्न दिसतसे ॥१०१॥
तीस पुसती अहो कन्यके । तुझें नाम काय सांग निकें । जन्मलीस कवणे भूमिके । सांग सुटंके वेल्हाळे ॥१०२॥
कन्या म्हणे अहो स्वामिया । ’ नारायण ’ पिता, ’ लक्ष्मी ’ माया । पवित्रोदरीं जन्मोनियां । ’ गोदावरी ’ देहा म्हणताती ॥१०३॥
ऐसें उत्तर ऐकतां श्रवणीं । स्वामी संतोषले मनीं । म्हणती, विचित्र दिसे करणी । ऐसी नयनीं न देखों ॥१०४॥
स्वामीची पूर्ण देखोनि संवित्ति । क्षेत्रस्थ दीन विनंती करिती । यास स्थळीं कांही काळ निश्चिती । राहवे; चित्ती वाटतें ॥१०५॥
ब्रह्मेश्वर पाहूनि स्थान । स्वामीही देती अनुमोदन । सर्वी पुसतां नामाभिधान । ’ मथुरा ’ म्हणोनि सांगती ॥१०६॥
प्रतिदिवशीं वेदान्तग्रंथ । स्वामी सांगती, शिष्य पढत । गोदावरी तेथें जात । खेळ निमित्त करोनी ॥१०७॥
परी खेळावरी कैची दृष्टीं । स्वामी काय सांगती गोष्टी । तिकडे लक्ष ठेवूनि गोरटी । सार तें पोटीं सांठवी ॥१०८॥
तयांत कांहीं संशय वाटे । तरी संधि पाहूनि भेटे । म्हणे जी निरसूं संदेह कोठें । ऐसे मोठे दैवतेविणें ? ॥१०९॥
स्वामी संदेह ऐकोनि श्रवणीं । हे कन्या न; म्हणती ज्ञानखाणी । अरे हे शब्द सखोलपणीं । प्रौढालागूनि न सुचती ॥११०॥
हे दिसे योगभ्रष्ट । ऐसें म्हणतां न वाटे कष्ट । यापरी बोलोनि दाविती स्पष्ट । म्हणती, अदृष्ट न कळे इचें ॥१११॥
वय तरी दिसे अत्यल्प । परी जे बोलती वाग्जल्प । ते अभ्यासितांही कोटिकल्प । येरा स्वल्प न साधती ॥११२॥
म्हणोनि अत्यंत प्रीति करिती । कांहीं नियम धर्म सांगती । ते ते गोदावरी वागवी चित्तीं । प्रानापरती लक्ष ठेवी ॥११३॥
गोदावरीचें चरित्र । जें जें वर्णावें तें तें पवित्र । परी अवकाश स्वल्पमात्र । म्हणोनि स्वतंत्र ग्रंथेच्छा ॥११४॥
असो; वय काळानुसार । विवाह करिती मातापितर । स्वल्पकाळें तोही भ्रतार । दैवें परत्र पावला ॥११५॥
आप्त गणगोत इष्टमित्र । शोकसागरीं निमग्न समग्र । परी गोदावरी तिळमात्र । चित्त व्यग्र होऊं नेदी ॥११६॥
म्हणे य मृत्युलोकींची वस्ती । एक मेले; दुजे मरती । आपणाही पुढें निश्चिती । मग शोकगति वृथा कां ? ॥११७॥
अनेक जन्माचिये अंती । अवचटा नरदेहाची प्राप्ति । तो वृथा चालिला दिवसरातीं । शोच्य त्या न शोचिती जन सर्व ॥११८॥
असो, स्वामीस समाचार । कळतां, धांवूनि आले सत्वर । पाहती गोदावरीचें वक्त्र । तो चिंता अणुमात्र न करी ते ॥११९॥
माता पितर धांवोनि येती । स्वामी घात झाला म्हण्ती । स्वामी हांसोनि बोलती । अहो घात आघातीं कदा नये ॥१२०॥
पिता माता पुत्र पति । कोण कोणाचे निश्चितीं ? अन्य जन्मींचे येथें न येती । सांगाती न होती पुढे जन्मीं ॥१२१॥
जिला जन्मवैधव्य प्राप्त । ती तरी नसे शोकाकुलित । तुम्ही विचारेवीण व्यर्थ । शोक किमर्थ करितां हो ? ॥१२२॥
कन्या म्हणे स्वामिनाथा । (३)नरजन्म पावूनि पराधीनता । होती; तीपासूनि मुक्तता । कृपावंता पावलें ॥१२३॥
असो, माता पिता विठ्ठदेव । स्वामी जयाचें ’ मथुरा ’ नांव । या चहूं ठिकाणीं समभाव । करी गौरव सेवेचा ॥१२४॥
मुळीं शरीरसुखा विन्मुख । ती काय मानी पतीचें दुःख । अहोरात्र सेवा-सुख । आराणूक तिचे जीवा ॥१२५॥
शौचविधि मुखमार्जन । शयन किंवा करी भोजन । हा काळ मात्र व्यर्थ जाण । इतर साधन सेवेचें ॥१२६॥
स्वामीस म्हणे कृपा करा । मज पाववा साक्षात्कारा । तेणें पावेन परपारा । भवसागरा भवाच्या ॥१२७॥
भक्तिज्ञान वैराग्ययोग । स्वामी सांगती यथासांग । परी गोदावरीचें अंतरंग । न पवे चांग समाधान ॥१२८॥
जोंवरी नोहे आत्मशोधन । तोंवरी कैचें समाधान । गोदावरीचें अंतःकरण । तळमळी आत्मखूण जाणावया ॥१२९॥
विशेष प्रयास न करितां । अथवा कोणी न शिकवितां । लिहितां आणि वाचितां । शिके तत्त्वतां गोदावरी ॥१३०॥
अनेक ग्रंथावलोकन । किंवा विठ्ठलाचे अर्चन । माता पितर शुश्रूषण । ऐसा अनुदिन काळ कंठी ॥१३१॥
स्वामी न जाणति आत्मत्व खूण । अथवा संचित करिती कथन । हें न जाणे मी पामर दीन । त्यांचें महिमान तो
जाणे ॥१३२॥
कालगति आहे विचित्र । पुढें स्वामीही पावले परत्र । गोदा तयेवेळीं मात्र । दुःखपात्र जाहली ॥१३३॥
म्हणे न करितां समाधान । मथुरा स्वामी पावले निधन । आतां नेत्रीं कैं देखेन । सद्गुरुचरणा मागुती ? ॥१३४॥
पडिले स्त्रीदेहाचे बुंथी । स्वतंत्र फिरतां न ये जगतीं । त्याचे ते कृपामूर्ति । दर्शन होती तैं सरे ॥१३५॥
स्वामीचें देहमात्र पतन । परी जनीं जनार्दन । यारुपें जगीं वर्तती जाण । संत निधन न पवती ॥१३६॥
ऐसा धरोनि विश्वास । सत्कर्म करी रात्रंदिवस । परी न मिळे सद्गुरु रहस्य । म्हणोनि उदास सर्वदा ॥१३७॥
जैसा कृषीवल आपुली भूमि । शुध्द करुनियां, व्योमी । दृष्टी लावी तोयागमीं । तैसे आम्ही तीस मानूं ॥१३८॥
कीं तृषित चातक । जैसा इच्छी मेघोदक । कीं चकोर शशिनायक । किंवा बालक मातेतें ॥१३९॥
ऐसे जे जे दृष्टान्त द्यावे । ते गोदावरीचे एकांशा न पवे । मुमुक्षु मस्तकीं चढता वैभवें । धांव दैवें घेतली ॥१४०॥
काय सांगूं सकल जनां । मुमुक्षुत्वचि न घडे मना । येर्हवी आनाथाचा पाहुणा । सद्गुरुराणा जवळी असे ॥१४१॥
असो, गोदावरीचे ह्र्द्गत । एक जाणे सद्गुरुनाथ । श्रीराम त्रिकुटस्थ । करवीरागत होतेचि ॥१४२॥
गजेन्द्राचिये हांके । धांव घेतलि वैकुंठनायकें । दुःखमुक्त भक्तसखे । करुनि; सुखें आलिंगी ॥१४३॥
कीं वामन चिंताक्रांत । म्हणे भवसमुद्राचा अंत । लावूनियां, सुपंथ । दाविता गुरुनाथ कैं भेटे ? ॥१४४॥
त्या काळीं परमहंस अवतार । घेऊनि करी याचा उध्दार । तैसाचि श्रीरामचंद्र । दीनोध्दारी दया करी ॥१४५॥
सर्वांचिया अंतःकरणा । जाणता अयोध्येचा राणा । जाहल्या राजयोग जीर्णो । उध्दरणार्थ अवतार ॥१४६॥
’ कलीमाजीं धर्मग्लानि । होतां, अवतरेन जनीं । ’ या वचन सत्यत्वालागुनी । धरी अवनीं अवतार ॥१४७॥
त्या रामचंद्राची कीर्ति । कर्णोपकर्णी होय ऐकती । गोदावरी निज मातेप्रती । विनवी एकान्ती तें ऐका ॥१४८॥
कोणी कांही उपदेशिती । परी तें न मम माने चित्ती । म्हणे प्रत्यक्षावीण प्रचीति । कोण निश्चिती मानील ? ॥१४९॥
आतां सत्पथींचा उपदेश । म्हणोनि गुरुत्व मानी त्यास । परंतु सद्गुरुदर्शनीं हव्यास । तो तैसाचि राहिला ॥१५०॥
वेदशास्त्रपुराण सार । देहींच देव हा निर्धार । तैसा नसतां साक्षात्कार । कैसेनि स्थित मन होय ? ॥१५१॥
म्हणे सकल सौभाग्यसरिते । मला जननी सद्गुणभरिते । अहर्निशीं चित्त एक वरिते । आयुष्य रितें न दवडावे ॥१५२॥
सद्गुरुवांचुनी वाचुनी । विफल जिणें म्हणती जनीं । तो कैवल्य मोक्ष दानी । आला ये स्थानी म्हणताती ॥१५३॥
तरी कृपा करुनि मजवरी । तुवां येऊनि तेथवरी । मजसी श्रीचरनावरी । घाली निर्धारी जननीये ॥१५४॥
ऐसें ऐकोनियां वचन । मातेस वाटलें समाधान । म्हणें अनंत पुण्येंकरुन । प्राप्त निधान ऐसें हें ॥१५५॥
पतीचें अनुमोदन घेऊनी । कन्येस घाली सद्गुरुचरणीं । गोदावरीची पुरली धणी । चरण नयनीं देखतांचि ॥१५६॥
हांसोनि पुसती कन्येसी । काय इच्छा असे मानसीं । ती म्हणे जी स्वात्मसुखासी चरणदासी भुकेली ॥१५७॥
पाहूनि तिचीं क्रियाकर्मे । पूर्वोध जाणितला रामें । म्हणे हे योगभ्रष्ट श्रमे । योग सीमे न पवे तों ॥१५८॥
ऐसें जाणोनि तिसी । म्हणती उदईक नित्यनेमासी । सारोनि; यावे आम्हापासी । तूं निजासी पावशील ॥१५९॥
मरतया अमृत जोडलें । की वणव्यांत जळतां जळ वर्षिलें । तैसें गोदावरीस वाटलें । म्हणे भेटलें परब्रह्म ॥१६०॥
दुसरे दिनीं प्रातःकाळीं । स्नान करुनियां बाळी । पूजा साहित्य घेऊनि वेल्हाळी । त्वरें चालली दर्शना ॥१६१॥
श्रीगुरु समासनीं सुशांत । सन्मुखी तीस बैसवीत । अभयकर मस्तकीं ठेवीत । चरणीं लागत सुंदरा ॥१६२॥
विधियुक्त करवूनि आचमन । मग गुरुपीठिकेचें स्मरण । म्हणती वत्से सावधान । अंतःकरण तुझें असों ॥१६३॥
इच्छित होतीस मानसीं । तो राजयोग आजि पावसी । बहुतां जन्मींची उपवासी । पुण्ये तृप्तीसी पावशील ॥१६४॥
ऐसी आश्वासूनि गोदा । सद्गुरु पावले प्रमोदा । सोऽहं हंसाची मर्यादा । दावितां, बोधा पावली ॥१६५॥
मुळीं कानीं सांगोनि मंत्र । मन तियेचें करि स्वतंत्र । मग करवूनि वागुच्चार । आपपर विसरविले ॥१६६॥
मग करवूनि सुबध्दासन । मूळ बंधा गांठी देऊन । (४)प्रणवोच्चार वोढितां पवन । गजबजे मन तियेचे ॥१६७॥
जाणो नक्षत्रें चितवती । की मोतिये रिचवती । जंबूनदरजःकण क्षिति । नभपर्यंत भरलीसे ॥१६८॥
सहस्त्र विद्युउल्लतेचे उमाळे । कीं अनंत सूर्य येकवटले । तयाहुनी तेजागळे । पाहूनि डोळे झांकिती ॥१६९॥
जें चर्मचक्षु न लक्षे पाहतां । ज्ञान दृष्टीचेही न ये हाता । केवळ स्वयंज्योति प्रकाशविता । एक सद्गुरुदाता समर्थ ॥१७०॥
नाद ध्वनीचे कडकडाट । चहूंकडे लखलखाट । प्रकाशमय घनदाट । पाहतां, वाट न सुचे कांहीं ॥१७१॥
म्हणे हे जागृति कीं सुषुप्ति । अथवा आहे स्वप्नावस्थीं । हें कांहींच नकळे स्थिति । कैशी गति करावी अतां ? ॥१७२॥
ऐसी नावेक वेळ । चित्ती करितसे तळमळ । तो पूर्वपुण्यौघ पर्वकाळ । लंघूं निराळ पाहतसे ॥१७३॥
तों पूर्व मार्गीची वाट । रोधूनि, काकीमुखींचें कपाट । उघडूनि, प्रणव चाले सुसाट । घेत घोट सत्रावीचा ॥१७४॥
घाबरी चहूंकडे पाहे । म्हणे मी कोठे जात आहे । तंव दीन अनाथाची माय । सद्गुरुराय देखिले ॥१७५॥
गजबजोनि धरी चरण । म्हणे हे तात दीनोध्दरण । महागिरी कपाटें लंघून । कोणतें स्थान पावलें मी ॥१७६॥
प्रथम पाठी थापटून । म्हणती सावधान सावधान । ज्यास्तव योगी श्रमती अनुदिन । निर्वाणस्थान तुझीं हें ॥१७७॥
स्वस्थ करुनि अंतःकरण । पाहे आपणां आपण । नाही ध्येय ध्याता ध्यान । त्रिपुटीविणें वेगळी तूं ॥१७८॥
तूं नव्हेसी कीं जागृती । ना स्वप्न ना सुषुप्ति । विश्व तैजस प्राज्ञ निगुती । हे अभिमानी निश्चिती तुं नव्हे ॥१७९॥
रक्त पीत ना श्वेत । श्यामही नव्हेसी तूं निश्चित । नामरुपरंगातील । स्वयंप्रकाशित तूं अससी ॥१८०॥
तुझेनि प्रकाशा प्रकाश । तुं सर्व शक्तिमंताची ईश । तुझेनि सर्व डोळ्स । परी तूं तयासही नातळसी ॥१८१॥
ऐसें सांगतां सांगता । त्रिकुट श्रीहाट गोल्हाटा पंथा । वोलांडूनि भ्रमरगुंफा तत्त्वतां । तुरीय अवस्था पावली ॥१८२॥
सत्रावीचे पाझर सुट्ले । अंती रोमांच दाटले । अष्टभाव अंगी उमटले । स्वेदें लिगटले सर्वांग ॥१८३॥
अष्टा महासिद्धी कर जोडूनी । म्हणति ऐका जी विनवणी । सेवा घ्या जी आमुचें हातुनी । तो धणी पुरेल आमुची ॥१८४॥
कोण पाहे तयाकडे । अमृत सेवी त्या कांजी नावडे । की चर्मकी पद्मिनीचे रुपडें । न पाहे धडफुडे अग्निहोत्री ॥१८५॥
तैसें ते सर्व डावलुनी । गोदा तटस्थ पाहे नयनीं । तो सहस्त्रदळ पद्मासनीं । श्रीगुरुमुनी देखिले ॥१८६॥
आकर्ण शोभती पद्मनेत्र । सुहास्य वदन चारुगात्र । प्रकाशें कोंदाटालें अंबर । पाहूनि, चित्रवत् तटस्थ राहे ॥१८७॥
भाळ ठेऊनियां चरणी । म्हणे विश्वव्यापका चक्रपाणि । धन्य धन्य तुमची करणी । दाता भवतरणीं तूंचि एक ॥१८८॥
यापरी स्वरुप न्याहाळितां । गोदा पावली ताटस्थता । सुखसमाधि भोगितां । देहावस्थातीत जाहली ॥१८९॥
राहिले स्त्रीपुरुष भान । राहिले ज्ञाति, कुल, वर्ण । एक परब्रह्म निर्वाण । सच्चिद्घन कोंदलें ॥१९०॥
ऐसी एक प्रहरपर्यंत । अद्वयानंद सुख भोगित । गोदा राहिली समाधिस्त । तें सुख अद्भुत कोण वर्णी ? ॥१९१॥
रामें थापटूनि सुंदरी । पुन्हां आणिली देहावरी । म्हणती शुभानने वृत्ति आवरी । तुझी तृप्ति पुरी जाहली की ? ॥१९२॥
तुझी तुज पावली किली । आम्ही जाऊं आपुले स्थळीं । ऐसें ऐकोनियां बाळी । घाबरी जाहली तेधवां ॥१९३॥
अहो अहो जी गुरुराया । मी न विसंबे तुझिया पाया । महाराजा करुणा वरूणालया । दुरी दीना या न करावे ॥१९४॥
तुमचे दयें आजि देवा । सांपडला मज माझा ठेवा । रंका देऊनि राणिवा । तारिसी जडजीवां तूंचि एक ॥१९५॥
भवसाग्रा मी भयाभित । तो तूं आजि मृगजळवत । करुनि दाविलासी; अत्यंत । तुझें कौतुक मज वाटे ॥१९६॥
जरी तूं न मिळताती धनी । तरी लागले होते वाहवणी । धांव घेतली कृपादानी । कोण तुजहूनी श्रेष्ठ म्हणों ? ॥१९७॥
सद्गुरु म्हणती गोदावरी । आतां स्तुति पुरें करी । मुमुक्षुमाजीं तुझी थोरी । तुजचि खरी साजतसे ॥१९८॥
अगे या कलियुगामाजीं । आणि स्त्रीदेहसमाजीं । धन्य धन्य बुध्दि तुझी । ऐसी दुजी न देखों ॥१९९॥
सहज समाधि राहणें । लोकाचारीं सांग वर्तणें । जना सुपथा लावणें । हेंचि करणें उरलें तुझें ॥२००॥
तूं पूर्वीचीच योगभ्रष्ट । प्रारब्धास्तव हे खटपट । उरली, तीही सारुनि, स्पष्ट । निजीं निजनिष्ठ राहशील ॥२०१॥
ऐसी मेघगर्जना वाणी । ऐकोनि गोदा लोळे चरणीं । म्हणे माझी कुलस्वामिनी । पिता जननी तूंचि तूं ॥२०२॥
चरणांगुष्ठ मुखीं धरुनी । चोखीतसे क्षणोक्षणीं । म्हणे मज या सुखाहूनी । अपवर्ग खाणी नावडे ॥२०३॥
सद्गुरु म्हणती पुरे करी । तुझा सद्भाव आम्ही अंतरीं । जाणो; म्हणवोनि येथवरी । केलें निर्धारी गमन ॥२०४॥
मग षोडशोपचारीं । सद्गुरुची पूजा करी । प्रेम न माये अंतरी । पादुका शिरीं घेतसे ॥२०५॥
त्या काळीची सुखसंपत्ति । कोण वर्णिल यथानिगुती । जया सुखा सनकादिक गाती । ते, मंदगती, मी काय वानूं ? ॥२०६॥
गोदावरी सम गोदावरी । तारितां एक रामचि निर्धारी । त्यासी उपमा द्यावया दुसरी । ब्रह्माण्डोदरीं दिसेना ॥२०७॥
वेदीं वर्णिल्या किती येक । शास्त्रीपुराणी वर्णिल्या अनेक । तियासमान गोदा देख । परी अधिक एक दिसे ॥२०८॥
कलीचा वाढला प्रताप गाढा । अधर्माचाराचा वाढला हुडा । तयामाजीं लाविला झेंडा । मारिलें तोंडावरी कलीच्या ॥२०९॥
कित्येका सत्पथा लाविले । व्याधिग्रस्त मुक्त केले । मूर्खाहाती ग्रंथ करविलें । हें तों या ग्रंथींच वहिलें जाणा तुम्ही ॥२१०॥
आपणही ग्रंथ प्रबंध । गद्यपद्यादि नानाविध । केले; ते सर्व जाणती प्रसिध्द । मी मतिमंद किती वर्णूं ? ॥२११॥
इयाही ग्रंथी जेथें जेथें । उपदेश प्रकरण आलें निगुतें । स्वयें वर्णूनियां तें तें । नामें श्रीपतीतें पुढें करी ॥२१२॥
तिचा एक एक चमत्कार । वर्णिता ग्रंथ वाढेल फार । याचि ग्रंथी ग्रंथान्तर । वाढवितां साचार मज नये ॥२१३॥
आणि माझे शिरी शिरताज । असती श्रीगुरु महाराज । तयांची आज्ञा असे मज । सत्वर ग्रंथकाज साधिजे ॥२१४॥
गोदावरीचे वोसंगामधीं । तुज घातलें म्हणती कृपानिधि । येवढेनें सर्वसिध्दी । मानूनि, त्रिशुध्दि सुखी मी ॥२१५॥
वेडया वाकुडिया बोलीं । गोदावरी मियां वर्णिली । परंतु हाव नाही पुरलीं । पुरवील माउली तो सुदिवस ॥२१६॥
गोदावरीचे वर्णनी । माझी पवित्र केली वाणी । माझ्या सोसूनि आपराधश्रेणी । आपुले चरणीं लावीतसे ॥२१७॥
जैसें लाडके वर्णितां बाळ । पिता अधिकाधिक स्नेहाळ । होतसे; तैसे दीनदयाळ । सद्गुरु कृपाळ तुष्टती ॥२१८॥
श्रीगुरु कल्पद्रुमाखाली । सहस्तावधि शिष्यमंडळीं । विश्रांति पावले; परी माउली । गोदा वेल्हाळीसम गोदा ॥२१९॥
मागे जे जे जाहले साधु । त्यांच्या क्रिया वर्णिल्या विविधु । त्या ऐकिल्या; परि सुबध्दु । नेत्रीं प्रसिध्दु पाहिल्या येथें ॥२२०॥
ग्रंथी ग्रंथान्तर पसरे । म्हणोनि प्रकरण करितों पुरें । क्षमा कीजे मज दातारें । करद्वयें चरण स्पर्शितसे ॥२२१॥
रामा रामा मंगलधामा । दीन जनांचिया विश्रामा । वदनीं वसवोनियां नामा । नामा अनामातीत करी ॥२२२॥
तुझ्या चरणींच्या पादुका । त्या मज दान देई एका । इतुके जिया समतुका । सनकादिका होईन मी ॥२२३॥
ही नव्हे माझी अभिमानोक्ती । सद्भक्त ते निर्द्वन्द्व जाणती । जया प्रसन्न श्रीगुरुमूर्ति । त्रिजगतीं तो धन्य धन्य ॥२२४॥
रामा त्रिकुटवासिया । मस्तक राहो तुझ्या पायां । हेंचि मागणे मागूनियां । प्रकरणा या संपविलें ॥२२५॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥२२६॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय छत्तिसावा संपूर्ण ॥
टीपा - (१) श्रीगोदावरीचें आख्यान । करीन म्हणतों जी लेखन- ओवी ४५ :- श्रीतिकोटेकर महाराजांच्या अपार शिष्यमंडळांत
कोल्हापूर येथील महायोगिनी गोदामाय कीर्तने या फार अधिकारसंपन्न शिष्या होत्या. श्रीपतींनी पुढे एका अध्यायांत
महाराजांच्या दुसर्या एक शिष्येला वेणाबाईची उपमा दिली आहे ती योग्यच आहे. तशीच उपमा गोदामाईंनाही फारच साजते.
वेणाबाईप्रमाणेंच त्या महान गुरुभक्त होत्या. बालविधवा होत्या आणि कवयित्रीही होत्या. कोणत्याही गुरुसंप्रदायांत उच्च
कोटीला पोचलेल्या स्त्रिया अल्पसंख्य आढळतात. मातोश्री गोदामाईचा योग मार्गातही मोठा अधिकार होता. ज्ञानदेवांची
जशी मुक्ताबाई, समर्थाची जशी वेणाबाई, गोदूताईच्या लगतच्या पिढींतील उमदीकर महाराजांची जशीं ’ शिवलिंगव्वा ’ तशाच
श्री रामचंद्रयोगी महाराजांच्या गोदावरी होत्या आणि म्हणूनच श्रीपतींनी गोदूताईसंबंधी स्वतंत्र अध्याय रचावासा वाटला.
इतकेंच नव्हे तर त्यांचे संबंधीं स्वतंत्र पोथी लिहिण्याचा मनोदयही श्रीपतींनीं व्यक्त केला आहे. प्रस्तुतची पोथीही
गोदामाईच्या देखरेखीखालीच पुरी झाली. उपदेशपर ओंव्या तर त्यांनींच सांगितल्या. धन्य ती साध्वी !
(२) गोदावरीचे पितृत्व पितर । करुं म्हणती जीर्णोध्दार - देवालयाचा - ओवी ९४ :-
कोल्हापूरच्या परिसरांतील पश्चिमेच्या ’ ब्रह्मेश्वर ’ नामक शिवमंदिराचा गोदावरीच्या वडील, चुलत्यांनी जीर्णोध्दार केला.
दोघेधी सरकार दरबारीं अधिकारी असल्यानें सत्तेचा सदुपयोग करुन त्यांनी हें देव कार्य केलें त्याचा या ओवींत उल्लेख आहे.
(३) नरजन्म पावूनि पराधीनता । होती तीपासूनि मुक्तता पावले - ओवी १२३ :-
मनुष्यजन्म मिळालेल्या कांहीं जीवांना पूर्वपुण्याईमुळें आयुष्यांतला जास्तीत जास्त काळ हरिचिंतनांत घालवावा, कोणत्याही
व्यावहारिक चिंतेंत मन व्यग्र होण्याची वेळ येऊंच नये असें वाटतें व त्यामुळें मनुष्य जीवनांतील रुढ आयुष्यक्रमाप्रमाणें,
नोकरी, विवाह, संसाराचा व्याप यांतील तथाकथित सुखाची त्यांना इच्छाच नसते. ही मनःस्थिति कांही थोड्या स्त्रियांचीही
असते. पण अशा वृत्तीचा पुरुष जितका स्वातंत्र्यानें राहूं शकतो तितकी, विरक्त स्त्री आजच्या काळांतदेखील स्वच्छंदानें
राहूं शकर नाहीं. पिता, पति व पुत्र यांच्या आश्रयाने, आधारानें सर्व आयुष्य स्त्रियांनीं राहावे अशी समाजस्थास्थ्याच्या
हेतूनें स्मृतीची आज्ञाही आहे. हें सर्व खरें आहे पण त्यांतून उदासीन स्त्रीच्या मनाचा फार कोंडमारा होतो हेंही तितकेंच
खरे आहे. जुन्या काळाप्रमाणें गोदामाईचा अगदी लहान वयांत विवाह झाला पण त्या जात्याच अंतर्मुख वृत्तीच्या होत्या.
परिनिधनानंतर या ओवींत त्यांनी व्यक्त केलेला विचार त्यांच्या प्रखर वैराग्याचा व परमार्थप्रेमाचा मोठा द्योतक आहे.
(४) प्रणवोच्चार ओढितां पवन । गजबजे मन तियेचे -ओवी १६७ :- मागे अनेक ठिकाणी आपण सांप्रदायिक साधनपध्द्तीचे
उल्लेख बघितले येथेंही मन पवन एक करण्याचा, सोऽहं गजराचा व प्रणवस्वरानें पवन ऊर्ध्वगामी करण्याचा - असे तीनदां
स्पष्ट निर्देश आढळतात.
कठिण शब्दांचे अर्थ :-
निरुजत्व = निरोगीपण (५) त्रुटितार्थ = थोडक्यांत, संक्षेपानें (५२) दोहद = डोहाळे; परी =प्रकार, स्वरुप (७२) बोभाई (क्री) =
गर्जना करीत असे, टाहो फोडणें (८१) चत्वर भागीं = चारीं दिशांना, चौफेर (८२) डोल्हारा = झोपाळा (८३) परिये देणे = झोके देणें
(८३) अश्वमूर्ति = पाषाणाच्या मूर्ति (८७) संवित्ति = विमल ज्ञानस्थिति (९६) अग्रजन्मीं = पुढच्या जन्मांत
(१२०) आराणूक = करमणुक, आवडता छंद (१२४) तोयागम = [ तोय + आगम ] पाण्याचें आगमन, पाऊस (१४१) वामन = (येथें)
वामनपंडित (१४७) समतुका = समान योग्यतेचा (२२८)