मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय अकरावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय अकरावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला

श्रीगणेशायनम: ॥
मनोजय वासनाक्षय । जियेचे सर्व कृपेनें होय । ती म्यां(१) वंदिली राममाय । ग्रंथसिद्धीतें जावया ॥१॥
गोरक्षनाथें राजयासी । उपदेशोनि दिव्य ज्ञानासी । म्हणती : न पडे मोहपाशीं । सुखें प्रपंचीं असावें ॥२॥
प्रपंच सांडोनि अरण्यांत । बैसोनि; चित्तीं विषय ध्यात । तो बहिस्त्याग ऐसें बोलत । अतिबद्धता त्या त्यागें ॥३॥
संसारीं जो राहूनि निगुती । अलिप्त ते राखे वृत्ति । तोचि त्याग साधू मानिती । इतर त्याग निंद्य पैं ॥४॥
म्हणोनि तुवां कीज राज्या । यथान्यायें रक्षी प्रजा । आम्ही जातो आपुले काजा । पृथ्वी-प्रदक्षिणा करावया ॥५॥
राजा बोले नम्र वचनीं । मजही नेइजे सेवेलागुनि । नाथ म्हणती न्यायें मेदिनी - । प्रतिपाळावी हेचि सेवा ॥६॥
राजा म्हणे स्वामिराया । वास करावा याचि ठाया । नाथ म्हणती जग उद्धरावया । आज्ञा असे सद्गुरुची ॥७॥
जेधवां तूं मातें स्मरसी । तेधवां मी सदैव तुजपाशीं । ऐसा वर देऊनि रायासी । पृथ्वी-प्रदक्षिणे निघाले ॥८॥
तीर्थक्षेत्रें ठायीं ठायीं । तेथें नाथें दिनत्रयीं - । राहूनि, तोषवी सर्वांही । पुढती पंथ क्रमावया ॥९॥
तीर्थक्षेत्रें प्रार्थिती देवा । आमुचे मार्गे श्रीनाथ यावा । त्याचा चरणरज आम्हां लागावा । पुनीत त्या योगें ॥१०॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चहूं वर्णांचे मुमुक्षु नर । सकृपें उपदेशूनि समग्र । सन्मार्गासी लाविले ॥११॥
नाथ पद-न्यास जये देशीं । पाप नुरे वोखदासी । सद्‍बुद्धि होय अज्ञान जीवासी । नाथ चरणांसी लागतां ॥१२॥
चौदा विद्या चौसष्ट कला । ह्या जयासी करतल-मळा ॥ सत्पथा लावी सहज लीला । कुमतान्तरा खंडोनी ॥१३॥
ऐसें करीत करीत जाण । पृथ्वी प्रदक्षिणा केल्या तीन । पुन्हां पावले महास्मशान । आनंदवन म्हणती जे ॥१४॥
नवखंड वसुंधरा जाण । दहावे खंड काशी भुवन । जे मुक्ति-पुरी विख्यात पूर्ण । नाथ तेथें पातले ॥१५॥
कांहीं काळ तये स्थानीं । राहिले स्वानंदें करुनी । आपण विश्वेश आणि भवानी । गुज-गोष्टी नित्यानें करिती पैं ॥१६॥
ऐसा कांहीं काल गेला । गोरखमनीं हेतु उद्भवला । म्हणती सद्गुरुदर्शनाला । बहुत दिवस लोटले ॥१७॥
(२)`गिरी' हुनि मज आज्ञापिलें । त्यासी दिवस बहुत झाले । आतां कैं देखेन त्याचीं पाउलें । कोणे स्थलीं असे तो ?
॥१८॥
त्रिवार मेदिनी प्रदक्षिणा । करितां, मार्गी लोक नाना - । भेटले; परी सद्गुरुराणा । माझ्या दृष्टीं कां नये ? ॥१९॥
आतां कैं देखोन नयनीं ? माय ती असे कोण्या स्थानीं ? । ऐसी चिंता करीत मनीं । गेली रजनी उद्वेगें ॥२०॥
ब्राह्य मुहूर्ती उठोनियां । आसनीं बैसती लवलाह्या । समाधि - सुख पाहावया । तंव त अपूर्व वर्तलें ॥२१॥
कांहीं स्वप्न कांहीं जागर । ऐसा पाहूनियां अवसर । प्रत्यक्ष प्रकटोनि नाथ मच्छिन्द्र । श्रीफल दिधलें करांबुजीं ॥२२॥
हनुवटे धरुनि, बाळका । म्हणती विसरलासी मज गोरखा । वत्सा किती रे धरुं आवांका । वाट पाहतां शिणलों ॥२३॥
ऐसें शब्द पडतां कानीं । नाथ जाहले सावधानी । तों श्रीफल असे; परी नयनीं । सद्गुरुचरण दिसती ना ॥२४॥
सद्गदित जाहला कंठ । नेत्रीं अश्रूंचे वाहती पाट । म्हणे केवढा मी पापिष्ट । श्रीगुरुचरणा विसरलों ॥२५॥
मजकरितां गुरुमाउली । जैसी वत्सालागीं गाउली । तैशी शिणे ते वेळोवेळीं । हा नष्ट चांडाळ मी एक ॥२६॥
आम्हां गुरुदास्याविण । युग समजावा एक क्षण । आज पंच वरुषें जाहलीं पूर्ण । म्यां गुरुचरण न देखिले ॥२७॥
ऐसें बोलतां बोलतां । नाथा नावरे ती अवस्था । हंबरडा फोडिला तत्त्वतां । दीर्घ स्वरें त्या काळीं ॥२८॥
ते समयींची भाववृत्ति । ते तों एक नाथचि जाणती । का जे सद्गुरुपुत्र असती । तेचि जाणती हे दशा ॥२९॥
वंध्या नेणे प्रसूति - व्यथा । तेवींच नकळे हें अभक्तां । सद्गुरु-दास्याची गोडी जाणता । तोचि जाणे समय हा ॥३०॥
असो; नाथें दृष्टि उघडिली । तों अरुणोदय - संधि आली । गंगास्नान करोनि घेतलीं । दर्शनें उमा शंकराचीं ॥३१॥
आज्ञा घेऊनि विश्वेशाची । नाथ निघाले दिशे प्राची । आवडी लागली गुरुदर्शनाची । दुजें कांहीं सुचेना ॥३२॥
मार्गक्रमण करीत करीत । पावले ग्राम `कालिकत' । सांप्रत कलकत्ता विख्यात । ऐसें बोलती जयातें ॥३३॥
ग्रामाचिये उत्तरभागीं । उपवनीं राहिले नाथ-योगी । कानीफही तये जागीं । अकस्मात पातले ॥३४॥
उभयतां आम्रछायेसी बैसले । आदेश गुरुजी इहीं बोले - । संप्रदाय-क्रमें वंदन केलें । समाधान जाहलें उभयांही ॥३५॥
पुसती कुशल वृत्तान्त । गोरख म्हणती जाहलों क्षुधाक्रान्त । कानीफ म्हणे फलभार फलित । आम्रवृक्ष आहे की ॥३६॥
तयाचिये मंदिरांत । अतिथि पातलों अभ्यागत । तोचि करील क्षुधा शांत । उचित दानें करुनियां ॥३७॥
यापरी कानीफ जंव बोले । तंव तीं रसाळ चूतफळें । वृक्ष फलभारें डोलोनि गळे । नाथाजवळी उभयांही ॥३८॥
तदा तृप्तीपर्यंत । उभयतां फल आहार करीत । शेष जीं फळें राहिलीं तेथ । तयाचा वृत्तान्त परियेसा ॥३९॥
कानिफासी गोरक्ष राणा । म्हणे शेष फळें पाववी स्वस्थाना । कानीफ म्हणे हे अघट घटना । माझेनि कदा न करवे ॥४०॥
ऐसें ऐकोनि योगमूर्ति । फलांतें आज्ञापि : ``सोडोनि क्षिति । जेथील तेथें जा वो मागुती । आमुतें तृप्ति जाहली'' ॥४१॥
म्हणतांचि आघवा फलसंभार । लगटला जेथील तेथें समग्र । कानिफ देखोनि चमत्कार । आनंदे निर्भर अंतरीं ॥४२॥
गोरक्ष म्हणती कानिफासी । मच्छेन्द्र श्रीगुरु कोणे देशीं । ठावे असेल जरी तुम्हांसी । तरी मज सांगे दयाळा ॥४३॥
कानिफा देती प्रत्युत्तर । सिंहलद्वीपीं नाथ मच्छिन्द्र । आहेति; मोठा सत्कार - । करोनि, पद्मिनीनें राहविले ॥४४॥
परी कानफाटिया तेथ । येऊं न दे ती सीमेआंत । मच्छेन्द्रनाथ जातील निश्चित । याच भीतीकरोनियां ॥४५॥
ऐसें ऐकतांचि, त्वरित । गोरख जाहले आनंदभरित । मातेचा शोध लागल्या यथार्थ । बालक जैसें सुख पावे ॥४६॥
कानिफा म्हणे गोरखालागीं । जालंधर गुरु कोणे जागीं - । आहेत ? हें तुम्हालागीं । शुद्धी असल्या सांगिजे ॥४७॥
गोरख म्हणती कानिफासी । गोपीचंदरायें जालंधरासी । आपुले अश्वशाळेपाशी । (३)लिदींत गाडून ठेविलें ॥४८॥
ऐसें ऐकतांचि वर्तमान । दचकलें कानिफाचें मन । म्हणे द्वादश वर्षे जाहलीं पूर्ण । तीर्थाटणा मी गेलों ॥४९॥
मागें काय जाला वृत्तान्त । तो तुम्हासी असेल श्रुत । तरी सांगिजे मातें यथार्थ । केलें अनुचित गोपीचंदें ॥५०॥
तेधवां आद्यन्त वृत्तासी । गोरक्ष सांगे कानिफासी । तें मी संकलित श्रोतयांसी । सांगेन त्वरेंसी अवधारा ॥५१॥
कां जे उभयांही तांतडी । श्रीगुरुदर्शनाची वोढी । तदा विस्तार परवडी । न लगेचि गोडी मानसा ॥५२॥
याचिलागी ते कहाणी । विस्तारभेणें न वाखाणी । ग्रंथवृद्धीची उत्साह करणी । श्रीगुरुदर्शनीं मग करुं ॥५३॥
ऐसें श्रीपति श्रोतयांलागुनी । विनवोनि माथा ठेविला चरणीं । पुढील कथेतें निजावधानी । वदवा वाणी सेवकाची ॥५४॥
जालंधराचें सुरस रसाळ । चरित्र वदवाचि प्रेमळ । तुमचा पोसणा मी लडिवाळ । घेतली आळ पुरवावी ॥५५॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥५६॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥
॥ अध्याय अकरावा संपूर्ण ॥
==
टीपा (१)ती म्यां वंदिली राममाय-ओवी :१ - या ग्रंथांत बहुतेक ठिकाणी जेथें राममाय, राममाउली, रामराया इत्यादि मोघम उल्लेख आढळतात ते बहुधा पोथी-लेखक श्रीपति यांचे सद्गुरु श्रीतिकोटेकर रामचंद्र महाराज यांचे संबंधीं आहेत.

(२) गिरीहुनि मज आज्ञापिले-ओवी १८ :- आठव्या अध्यायाचे शेवटीं मच्छिंद्रांनीं गोरक्षनाथांना संचार करीत लोकोद्धार करण्याची आज्ञा केली त्यावेळीं हे गुरुशिष्य गिरी (बालाजी) क्षेत्रीं होते. प्रस्तुत ओवींत गोरक्षांना ती स्मृति होत आहे.

(३) जालंधरासी लिदींत गाडून ठेवले - ओवी ४८ :- ही कथा नवनाथ कथासागरांत व या ग्रंथांत पुढील अध्यायांत आहे.

कठिण शब्दांचे अर्थ :- पृथ्वी प्रदक्षिणा = भारतवर्षाची भ्रमंती [आसेतुहिमाचल अशा अर्थी]
(५) वोखद=औषध (१२) आवांका धरणें = धीर धरणें, (मन) आवरुन धरणें (२३) प्राची दिशा = पूर्व दिशा (३२) चूतफळें=आंबे
(३८) शुद्धि असिल्या = शोध लागलेला असल्यास, माहीत असल्यास (४७) भेणें=भयानें (५३) पोसणा = पालनपोषण केला गेलेला (५५).

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP