श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु एकाक्षरा । साकार प्रणवा रामचंद्रा । आब्रह्मभुवनाचिया माहेरा । निजसुखसारा मम ताता ॥१॥
आमुचे लळे नानापरी । पाळिलेस, घेऊनि अंकावरीं । मुखींचा कवळु प्रेमपडिभरी । भरविसी उदरीं मज कोडें ॥२॥
अक्षरद्वयाच्या बोली बोधी । अवाग्जपणें पढविसी सुधी । पढवोनि बैसविसी अच्युतपदीं । अभंगसिध्दि देऊनि ॥३॥
करावया जगदुध्दार । तुवां धरिलासी अवतार । अव्हाटाभरीं भरले पामर । ते जीव अपार तारिले ॥४॥
हें साचचि; परी राघवा । जे श्रीसद्गुरु महादेवा । अनन्यपणीं चतुर्विध ठेवा । साधिले तुवां पुरुषार्था ॥५॥
तरी ते पावनाच्या पावना । संत श्रोते आपुलिया श्रवणा । ल्यावया इच्छिति, सद्भूषणा । प्राप्त लक्षणा जे तुझी ॥६॥
मागां त्रिंशताध्यायीं जाणा । सरितातटी संध्यावंदना । महादेव पातले पाहोनि; चरणां । विज्ञापना त्वां केली ॥७॥
तरी ते मम ह्र्दयाभीतरीं । वसोनि वदवी प्रसुप्त वैखरी । जेणें श्रोतयाचे अंतरी । सप्रेम लहरी दाटती ॥८॥
रामा वाच्य वचन वक्तृत्व । श्रोता वक्ता तूंचि सर्व । गौल्य माधुर्य कथा-लाघव । नवरसीं भाव तूंचि तूं ॥९॥
ऐसी ऐकोनि करुणा वाणी । ह्रदिस्थ श्रीगुरु कैवल्यदानी । माथां ठेवोनि वरदपाणी । म्हणे ’ वद कथा; वदनी मी ठेलों ’ ॥१०॥
तदा श्रोते वक्त्यालागुन । म्हणती, आतां विलंब क्षण । झणें करिसी, तूंतें वरदान । सद्गुरुचे जाहलें ॥११॥
परिसोनियां सज्जनोत्तरा । सरसावूनि गंभीर गिरा । म्हणे हो जी स्वामिया अवधारा । साच सुखकरा निजमूर्ति ॥१२॥
माझा स्वामी नित्यमुक्तु । चित्सुखराशि श्रीरघुनाथु । निष्काममूर्ति मायातीतु । लोकसंग्रहार्थु संपादी ॥१३॥
आम्हां दीन जनांची कणव । स्वपदी पावावया जीव । केलें कनवाळें लीलालाघव । सद्गुरु महादेव प्रार्थिला ॥१४॥
प्रार्थोनि म्हणे एकनिष्ठ । स्वामी या संसारी झाले कष्ट । निजसुखाची नुमगेचि वाट । परमार्थ स्पष्ट कळेना ॥१५॥
तरी माउलिये तुजवांचून । कोण दावील निजसुखसदन ? । माझें मातें नकळेचि जाण । म्हणवोनि चरण धरियेले ॥१६॥
तईं तो करुणेचा अंबुधि । देखोनि श्रीराम भाग्यनिधि । म्हणे उठी उठी बापा सु-धी । घेई निजसिध्दि आपुली गा ॥१७॥
तेचि वरद-वचन माथां । वंदोनि, श्रीराम विनविता । झाला; म्हणे जी श्रीगुरु ताता । सांगिजे निजस्वार्था माझिया ॥१८॥
परिसोनि; भवगज पंचानन । दुर्घट मोहाटवी कृशान । म्हणे बा राघवा सावधान । ऐके विमलज्ञान सुभद्रा ॥१९॥
तेव्हां श्रीपदाचें नीर । सकल तीर्थाचें माहेर । तेणें प्रक्षाळोनि बाह्याभ्यंतर । असनीं रघुवीर बैसला ॥२०॥
मग तो मुमुक्षुचा ईश । आपणही परे उपरीं वास । करोनि, चिद्रत्नाची मांदुस । उघडी अनन्यास ल्यावया ॥२१॥
जेणे आदिनाथें आदि जननी । अलंकारितां मच्छेन्द्रमुनि । लाभला अवचिता चिद्रत्नखाणी । ते रामालागोनि ओपित ॥२२॥
ऐसे मच्छेन्द्र गोरक्ष गहिनी । निवृत्ति ज्ञानेश चूडामणी । गुंडाख्य सद्गुरु कैवल्यदानी । कर्मोपासनीं मम तात ॥२३॥
तेणें ’ रामचंद्र ’ श्रीसद्गुरु । जे भवनिधीचें तारक तारूं । ज्याचेनि अहं मायान्धकारु । लंघोनि परपारु पावलों ॥२४॥
तयाचे उत्तीर्ण कैसेनि आता । व्हावे ? सांग पां रघुनाथा । म्हणतां, स्वेदकंपादि अवस्था । सद्गुरुनाथा नावरती ॥२५॥
परी पुनरपि सावधान । अचिन्त्यागारीं अचल मन । धैर्यबळें राखोनि जाण । विकळपण दुराविले ॥२६॥
मग म्हणे बा वत्सा राघवा । तूं निजाचा निजसुख ठेवा । असोनि; कां हे जीवभावा । माजी गोंवा नाथिलाचि ? ॥२७॥
बाप चौवर्णामाजीं वर्ण । ब्रह्म जाणावया श्रेष्ठ ब्राह्मण । ते तूं लाहोनि; संचित मन । कासया ? आचमन करी वेगी ॥२८॥
म्हणवोनि चोवीस नामीं सुबध्द । स्मरविला अनुक्रमें गोविंद । (१)यावरी सद्गुरु ब्रह्मानंद । परमसुखद वंदिला ॥२९॥
उपरी महानुभवी भागवत । प्रल्हाद नारदादि विख्यात । तदुपरी योगीन्द्र आदिनाथ }। प्रणवातीत स्मरविला ॥३०॥
शेखीं गुह्यातिगुह्य गुप्त । निजबीज वेदान्तीचें मथित । ’ हंस गायत्री ’ न्यासयुक्त । श्रीगुरु उपदेशीत राघवा ॥३१॥
आतां निगमतरुचेंबीज । वेद्य महावाक्य मंत्रराज । तत्त्वमस्यादिकांचें गूज । तें तूं निज अवधारी ॥३२॥
म्हणवोनि शक्तित्रया चेईरे । करोनि; मस्तक कृपाकरें । स्पर्शोनि, रघुराज सोऽहंकारें । स्वरुपी गजरें मिरविला ॥३३॥
अहंब्रह्म ब्रह्नाहमस्मि । अवाग्ज अद्वय सोऽहं ब्रह्मी । राम सांडविला कर्माकर्मी । मी तूण ऊर्मी नाठवे ॥३४॥
(२)अक्षरद्वयाच्या गजरीं । स्वरुप दाटलें बाह्मान्तरीं । दृश्यजात जाहली बोहरी । गुणागुण-परी तेथ कैची ? ॥३५॥
शेखीं पाहते पाहणें तेंही । विरोनि गेले ठायींचे ठायीं । विदेहानंदीं स्वरुप डोहीं । (३)माझी राममाय तटस्थ ॥३६॥
जीव शिव माया ब्रह्म । कैचे केउतें रुप नाम । वृत्ति निवृत्तपदीं विश्राम । पाव्ली निजधाम आपुलें ॥३७॥
तें देखोनि कैवल्यनाथें । सप्रेमभरें राघवातें । म्हणती मुक्तामुक्त रहणीतें । सांगिजे आमुचे लडिवाळ ॥३८॥
रे तूं सावध चेइरा निका । होवोनियां, शिष्यटिळका । माझ्या आनंदानंदपोषका । स्वानंद सुखा अनुवादे ॥३९॥
म्हणवोनि थापटोनि कृपाकरीं । रघुराय आणिला देहावरी । तदा अष्टभावें अंतरीं । सैंघ पदावरी लोळतु ॥४०॥
म्हणे कां वो सदय माउले । मातें चेइरे कासया केलें ? आताम कैं तें लाहेन भलें । जें सुख अनुवादलें नवजाय ॥४१॥
ताता ब्रह्माण्डमण्डपी पाही । तव पदरजासी तुकियां कांहीं । ठायीं न पडेचि भुवनत्रयीं । मा कें उतराई त्या असे ॥४२॥
तंव गुरुमाय म्हणे वोजा । बा रे माझिया विजयध्वजा । चिंतिलें पावलासी कीं ? निजगुजा । सांगे रघुराजा मद्वत्सा ॥४२३॥
आतां इतुकेनि ऋण । जाहलो तुझें मी उत्तीर्ण । आठवी गाणगापुरीचें वचन । ऐकोनि रघुनंदन गंहिवरला ॥४४॥
रोमांचित जाहली काय । कंठ सद्गद, नेत्री तोय । स्वेदें डंवरला आपाद देह । देखोनि निजमाय कळवळली ॥४५॥
अंतरीं कळवळोनि स्नेहाळ । म्हणे बा कासया येतुला विकळ । तुवां स्वरुपीं अमलाचल ऐक्य प्रांजळ असावे ॥४६॥
पिंडा ब्रह्माण्डींचा निरास । मायाब्रह्मींचा विलास । शुद्ध ज्ञान स्वप्रकाश । केल्या पृच्छेस अनुभविलें ॥४७॥
बाप अज्ञानचि मुळीं वाव । तेथ ज्ञानासी कायसी हांव ? परि तूं उगाचि आमुचा गौरव । करुनि, शास्त्रभाव रुढविला ॥४८॥
जे वंध्यासतीचा बळिया कुमर । तेणें प्रजा दायाद राष्ट्र । स्वसामर्थ्ये पीडिले अपार । तेवीं मायान्धकार तुज रामा ॥४९॥
अज्ञान निरसोनि, ज्ञानासी । कवणें तूंतें विज्ञानराशि । देवोनि ? नाथिल्या दातृत्वासी । कां अह भावासी मिरवावे ? ॥५०॥
ऐसे ऐकोनि कठिणोत्तर । वाटलें एकाएकीं अंबर । कडडोनि पडले आपणावर । तेवी रघुवीर गजबजला ॥५१॥
ते देखोनि दयामृतघन । म्हणे बा मियां तुझें मन । वत्सा पाहिलें सत्य जाण । तें त्वां निर्वाण मांडिलें ॥५२॥
म्हणवोनि दो बाहीं कवटाळून । ह्र्दयी धरिला रघुनंदन । तदा अनंत जन्मीचा शीण । गेला हरपोन तात्काळ ॥५३॥
धन्य भाग्याची अतुल परी । स्वानंदसुखाचिये सागरी । राम पहुडला देहधारी । अभयवरदकरीं कळविला ॥५४॥
बाप आलिंगनीं नवलावो । दोघांही नाही देहभावो । स्वरुपसागर आनंदडोहो । निदेले पहा हो निजरुपीं ॥५५॥
धन्य सच्छिष्य रामराव । धन्य सद्गुरु महादेव । श्रीपति वदे माझेंही अपूर्व । भाग्य तद्गौरव वर्णनीं ॥५६॥
यापरी पूर्ण पदी लीन । परात्पर सेजे केलें शयन । तो सदगुरु म्हणे सावधान । चैतन्यघन रघुवीरा ॥५७॥
पुरे नीज; आतां फिरे मगां । माझिया प्राणा अंतरंगा । लीलाविग्रहें उध्दरी जगा । योग- योगाड्.गा आचरोनी ॥५८॥
म्हणवोनी कृपाळीं कृपापाणि । फिरवोनि, चेइरा माझा धनी । केला; तथापि दृदयमांडणी । न देखे नयनीं रघुराय ॥५९॥
कां जें अनंत जन्मीचें उणें । परिपूर्ण आपुले वासने । भरोनि पावोनि, केलें पारणें । मग धालेपणें डोलतु ॥६०॥
तें विलोकून देशिकनाथ म्हणे रामें कृतकत्यार्थ । केलें माझें धन्य जीवित । म्हणवोनि सद्गदित जाहला ॥६१॥
अहो पुढील भविष्यार्थ गति । जगदुध्दार याचेनि हातीं । हा नियम नेमिला जो भगवंती । ते आज प्रतीति मज आली ॥६२॥
येथून आतां आपुलें कार्य । रामी निरविलें अशेष सर्व । झाले अवतार लीलालाघव । निजमूळ ठाव देखावया ॥६३॥
परी या आतां विचरतां जनीं । विश्वाचि दिठी झोंबेल झणीं । म्हणवोनि जीवभावा सांडणी । करोनि, आसनीं बैसविला ॥६४॥
तरी तो न येचि देहावरी । दृष्टी जात आहे चाचरी । स्मरोनि सद्गुरु-नाम गजरीं । मागुती चरणावरी पडियेला ॥६५॥
तेव्हां अभ्यंतरींचा धीर । देवोनि बोलती " हे रघुवीर । आतां येथूनि निजकुलाचार । आपुला निर्धार सांभाळी ॥६६॥
श्रीआदिनाथकुळभूषणा । रामा माझिया गुणविधाना । मायाकाननीं जीव नाना । कष्टले; निजस्थाना पाववी ॥६७॥
जरी मदनुग्रही शिष्य पूर्ण । असल्या मातें देवोनि वचन । चालवी मागिलें तूं वरदान । जे हे अनन्य जन आपंगीं " ॥६८॥
तेव्हां रामें उघडिले अक्ष । म्हणे हे सद्गुरो सर्वधीसाक्ष । मी आज्ञाधिकारी प्रत्यक्ष । तव पदरजासी ठाउका ॥६९॥
म्हणवोनि नेणिवेची बुंथी । नाथिली घेवोनि; श्रीगुरुप्रति । रघुराय प्रार्थी पुढतपुढती । यथानिगुती निजनिष्ठें ॥७०॥
भक्तवत्सल तूं स्वामिनाथ । हे ब्रह्मविद्या अपरिमित । मी कैसे कें आकळूनि, तात । पुढिलां सत्पथ लावावा ? ॥७१॥
हेंचि स्वामिया मागुती सुदृढें । करोनि, उकलावे कुवाडें । मग या आज्ञाधिकारिया पुढें । करोनि, धडफुडे जनी बोधी ॥७२॥
सदया स्नेहभरित जाण । निरंजनींचें अतुल निधान । तुवां मातें वोपिलें जाण । दीन अनन्य पाहोनी ॥७३॥
दुकाळी जेवीं अकिंचन । पीडिल्या, क्षीराब्धि उचंबळोन । लोटला; तेवीं तूं आनंदघन । आलासी धांवून मजलागीं ॥७४॥
कीं त्रिदोषें देहावन्त । व्यापिला दोकोनि, अकस्मात । भिषकें जीवविलें पाजोनि अमृत । तेवीं तूं मत्तात धांवलासी ॥७५॥
म्हणवोनि घातिलें लोटांगण । दाटला अष्टभावेंकरुन । विनवी ’ सूत्रधारिया चेष्टवून । सुखें जगदुध्दरण करी कां ॥७६॥
तुझें जोडल्या कृपामृत । तरी रंकही होय शचीकान्त । मा मी तों पदरजींचा अंकित । अनन्य अपत्य पयपानी ॥७७॥
मियां आपुला आपण भार । कासया वहावा जोजार ? । मम शिरीं तुझें पदपद्मछत्र । तैं कृतान्त किंकर तव कृपें ॥७८॥
परी विनवणी एक दातारा । अनन्याचिया वज्रपंजरा । स्वरुपीं मायेचा पसारा । कैसा कृपाकरा झाला जी ? ॥७९॥
स्वरुपीं इच्छा कैसी झाली । इच्छा मायेतें कैसी व्याली ? । माया त्रिगुणातें प्रसवली । त्रिगुणीं भासली ब्रह्माण्डें ॥८०॥
हें बहुभाषकांचें मत । की भवतारका असे सत्य ? । ते जगद्वंद्या, विवटोनि भ्रांत । मातें प्रकाशित करावे ॥८१॥
जीव-शिव, माया ब्रह्म । शब्दें शोधिलें शास्त्रधाम । नेणोचि कोठें चुकलें वर्म । कैसें विश्राम पावूं तें ॥८२॥
तेवी माया अविद्या नामीं दोन । पिंड ब्रह्मांडीं असे आवरण । परी कैसें ? तें विवरोन । मुळीहून मज सांगें ’ ॥८३॥
तंव सद्गुरु आनंदोन । म्हणती, भला बरवा प्रश्न । केलासी राघवा, सावधान, । ऐके प्रतिवचन ययाचें ॥८४॥
अरे ’ अविद्या ’ आपुलिया आपण । स्वमुखें स्वरुप सांगे निर्वाण । म्हणे ’ मी नाही विद्यमान ’ । परी हे अज्ञ जन न ऐकती ॥८५॥
असो, हे पिंडींची जीवसंसृति । आतां ब्रह्माण्डीची संस्थिति । ’ शिवाड्.सडि.गनी ’ जियेतें म्हणती । विद्याप्रतीति विश्वरुपा ॥८६॥
हा जीव शिवाचा निवाडा । शक्तीसह दाविला धडफुडा । माया ब्रह्मींचा आतां पवाडा । ऐक रे पुढां सांगेन ॥८७॥
मुळीं महाशून्यीं साचार । वर्णव्यक्तिनाममात्र । (४)कांहींच नव्हतें तेथें कीर । अहं जागर जाहला ॥८८॥
तेचि मूळ प्रकृति अवधारा । तेथोनि पुढें मायेची परंपरा । राघवा, गुणमयीं विश्वाकारा । ब्रह्माण्ड वोवरा उभविला ॥८९॥
पंचमहाभूतें परिच्छिन्न । कर्मप्रारब्धें भिन्न भिन्न । पिंडांडादि आब्रह्मभुवन । हेळार्धे रचोन दाविलें ॥९०॥
औट मात्रा औट स्थान । स्वर वर्ण व्यंजनें बावन्न । कर्म ज्ञानेंद्रियें प्राणोपप्राण । इच्छा क्रियमाण बहुविधें ॥९१॥
चारी खाणी चारी वाणी । चौर्यांशी लक्ष जीवश्रेणी । सतासत् क्रियेची दाटणी । बीजारोपणीं रोपिली ॥९२॥
ऐसा मायेचा बाजार । अधोवाहिनी च्राचर । विस्तारिलें शून्याकार । पूर्ण परात्परा लोपोनी ॥९३॥
परी ऐसियामाजी कोणी । विरळा; जीवाची जन्म अवनी । ठायी पाडी देशिकवचनी । अनन्यपणीं साधकु ॥९४॥
हे पावावया निजखूण । (५)राघवा सोऽहं हंसेविण । आन साधन तो शीण जाण । जन्ममरण न टळेची ॥९५॥
ऐकोनी, पदयुगीं ठेवी माथा । रघुवीर म्हणे माझिया ताता । मातें करांबुजीं तत्त्वतां । धरोनि, निजपंथें चालवी ॥९६॥
न्यास मातृका विधी आसन । कांहींच नेणें योगखूण । ध्यान धारणा मुद्रा साधन । सर्व श्रीचरण मज तुझे ॥९७॥
ऐकोनि, सद्गुरु सप्रेम । म्हणती वत्सा तुझें प्रेम । माएं बोलवी अनुक्रम । निगमागम श्रुतिसार ॥९८॥
तेथ तुवां आपुलें चित्त । मेळवोनी, क्रमे योगपंथ मी जो दावीन शब्दसंकेत । येई त्वरित त्यामागें ॥९९॥
रामा स्वरुपीं आनंदलहरी । अहं ब्रह्मास्मि ऐशिया गजरीं । उठल्यासारिसा पवनाधारीं । प्रणवाकारीं प्रवेशला ॥१००॥
तेचि अहमिती प्रथमाध्यासें । त्रिशून्यी त्रिरुपाचे ठसे । संस्थिले मायेनें आपैसे । लीलाविलासें गुणमयी ॥१०१॥
तेचि अकार उकार मकार । ब्रह्मा विष्णु महेश्वर । अर्धमात्रा ते चिदंबर । जाण माहेर तुर्येचें ॥१०२॥
असो अहमिति प्रथमाध्यासें । जीवासी जीवपण अभासे । मागुती तें जैं गुरुकृपा वसे । आला पथ गिंवसे साधका ॥१०३॥
’ हंस ’ म्हणवोनि पिंडाभीतरीं । उतरला; तोचि सोऽहंकारीं । उलटोनी प्रवेशल्या ब्रह्माण्डजठरी । संसृति संहारी तात्काळ ॥१०४॥
तेचि तूंतें उठाउठी । सुगम साधनाचे परिपाठी । राजयोगाची हातवटी । करसंपुटी वोपीन ॥१०५॥
परि तूं शब्द सांडोनि परता । निःशब्दी होय अनुभविता । तैंच योगलक्षणा हाता । चढें रघुनाथा आघवी ॥१०६॥
बाप अहं ब्रह्मेति वचनीं । तात्काळ ठेला दुजा होऊनी । तेचि गुणत्रयाची जननी । मायाराणी जगदंबा ॥१०७॥
तियेचा संचला सिध्दसंकल्प । तेचि आविकल्प शिवाचें रुप । तत्प्रतीयोगी जीवित्व अल्प । न मनी सुकल्प रघुराया ॥१०८॥
परी तो पंचीकृत पिंडी जाण । थोकला, म्हणवोनि जाहला सान । जागृत स्वप्न सुषुप्ति भ्रमण । पावला शीण देहसंगे ॥१०९॥
जन्ममरणें शिणशिणोनी । लक्ष चौर्यांशी तिर्यक् योनी । हिंडला, निबिड तमाचे विपिनीं । दुःखदाटणी असमास ॥११०॥
इतुकें नाथिलें व्हावया चोज । अंतरी सूक्ष्म वासनाबीज । तेणे स्वर्ग नरकभोग भोज । दाविलें निर्बीज सत्यत्वें ॥१११॥
यालागीं वत्सा दृढ येक होय । जे मनोजय आणि वासनाक्षय तो हा अनायासी योग प्रमेय । जोडला अव्यय तुज रामा ॥११२॥
तरीं तुं होवोनि सर्वसाक्षी । (६)आलिया पंथा आपुल्या लक्षी । तेधवां रघुराय ’ सद्गुरु-अक्षीं ’ । निजाक्ष मेळवोनि राहिला ॥११३॥
सांडोनि निःशेष कल्पनाभान । चातकापरी ऊर्ध्व वदन । करोनि; रघुनाथ गुणनिधान । पाहे कृपाधन श्रीगुरुते ॥११४॥
तेथें श्रीपति जोडल्या करीं । संतसज्जना करूणोत्तरीं । विनवी; अवधान मातें चतुरीं । देऊनि, वैखरी वदवा हे ॥११५॥
तुमच्या कृपेचें पोसणें । अपत्य मी तों अज्ञान तान्हें । आळी घेतली लडिवाळपणें । अनन्य म्हणवोनि पुरवा जी ॥११६॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥११७॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय एकतिसावा संपूर्ण ॥
टीपा - (१) यावरी सद्गुरु ब्रह्मानंद । परमसुखद वंदिला ।-ओवी २९ :-
सनातन वैदिक धर्माच्या अनेक वैशिष्ट्यांत ’ परंपरारक्षण ’ हे एक महत्वाचें वैशिष्टयें आहे कुलपरंपरा, वेदाध्ययनपरंपरा
तशीच परमार्थात गुरुशिष्य परंपरा ही आत्मोध्दारासाठीं अत्यंत आवश्यक आहे. येथील २९ ते ३४ ओव्यांतून, अनुग्रह
देतांना सदर पोथींत वर्णिलेल्या सिध्दपरंपरेत कोणती पध्दति अवलंबिली जाते त्याचा सूचक उल्लेख आहे. २९ ते ३०
ओवीतील अर्थ पाहिल्यास सध्यांही पांवस येथें मिळणार्या सोऽहं दीक्षेंत या अर्थाचे नमन आहे हे लं अनुग्रहीतांच्या लक्षांत सहज येईल. हा मंत्र व त्याचा विनियोत हें दोन्हीहि शेकडों वर्षाच्या परंपरेने जसें श्रीगुरुंकडून आल तसेंच पुढे सांगितले जातें हें महत्त्वाचें.
(२) अक्षरद्वयाच्या गजरीं । स्वरुप दाटलें ब्रह्मान्तरीं ।-ओवी ३५ :- ३३ ते ३५ या तीन ओव्यांतूण सोऽहंचा स्पष्ट निर्देश,
तसेंच ’ अहं ब्रह्मास्मि । ब्रह्माहमस्मि ’ हा ’ हंस: सोऽहं ’ चा अप्रत्यक्ष उल्लेख व पुनः अक्षरद्वय या पदानें सोऽहं ’ चा परोक्ष उल्लेख असे तीनदां आजपजपाचे महत्त्वाचे निर्देश आले आहेत.
(३) विदेहानंदीं स्वरुपडोहीं । राममाय तटस्थ -ओवी ३६ :-
श्रीसद्गुरुंनी सांप्रदायिक सोऽहं राजयोगाची दीक्षा देताक्षणींच श्रीरामचंद्रमहाराज देहभान विसरून, तटस्थ राहिले. मनाचे
व्यापार क्षणार्धात थांबले. अशा आशयाचें श्रीपतींनीं येथें वर्ण्सन केले आहे. अगदी थोडया साधकांचे बाबतीत असा अनुभव येतो की दीक्षा देतांत त्या साधकाचें मन सोऽहंशीं तद्रुप होऊन राहते. साहजिकच मग ’ मन हें निश्चळ झालें एके ठायीं । तया उणें काई निजसुखा ! ॥’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणें, स्वरुपाचा अमर्याद आनंदच फक्त त्या मुमुक्षूचे ठायीं उरतो. मात्र ही अवस्था लाखांत एकाद्यालाच प्राप्त होते हें नीट ध्यानांत ठेवले पाहिजे. ज्वालाग्राही वस्तु जाळण्याची
शाक्ति अग्नीमध्यें निःसंशय असते परंतु कापूर आणि लाकूड जळून जाण्याच्या कालांत फार मोठ फरक पडतों या
उदाहरणाप्रमाणें सोऽहं रुपी अग्निशिखा, मनोव्यापार संपूर्ण दहन केल्याखेरीज स्वतःशांत होणारच नाही. फक्त मनाची जात कापरासारखी शुध्द अगर लाकडासारखी रुक्ष व कठिण असल्यास वेळ लागतों किंवा कांहीं क्षणांत काम होते.
(४) मुळीं महाशून्यीं साचार.....कांहींच नव्हते । तेथें अहजागर जाहला-ओवी ८८:-
प्रस्तुत पोथींत वर्णिलेल्या नाथ संप्रदायांत विश्वाच्या मूल कारणाचा ’ शून्य ’ किंवा ’ महाशून्य ’ असा निर्देश केला जातो.
अशा ह्या महाशून्याचे म्हणजेच परमात्मस्वरुपाचे ठिकाणीं जगताचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे ही वस्तुस्थिति आहे पण जीवास नामरुपात्मक व अभासात्मक सृष्टीचा अनुभव येतो त्याचें समाधान काय ? याची स्पष्टता करण्यासाठींच
अद्वैत वेदान्ताच्या अवतार आहे. जीव, जगत् परमात्मा यांचें सत्य स्वरुप हे वेदान्तशास्त्र, शंका निवृत्तिपूर्वक पटवून देते.
या ओवीचरणांतही त्याच अनुरोधानें महाशून्यांत अहंजागर जाहला असें म्हटलें आहे. एकच एक, द्वंद्वशून्य अशा परमात्मस्वरुपांत ’ एकोऽहं बहु स्याम् ’ - मी बहुविध व्हावे असा संकल्प उठला ! हेंच नामरुपात्मक व आभासात्मक
सृष्टीच्या उत्पत्तीचे अगदीं पहिलें कारण होय. या मूळ प्रकृतीपासून पुढें त्रिगुणात्मक माया, तेथून पंचमहाभूतें वगैरे पसारा वाढत चालला. चारी खाणी चारी वाणी । चौर्यांशी लक्ष जीव श्रेणीं ’ असा मायेचा बाजार निर्माण झाला -९२ ओवी
अखेर हा विषय आला आहे.
(५) सोऽहं हंसेविण । आन साधन तो शीण । ओवी ९५ :-
सोऽहं जपाची ही आणखी महत्त्वाची नोंद आढळते. वरील ४ थ्या टीपेंतील मायेच्या जंजाळांतून, आपल्या मूळच्या सच्चिदानंद स्वरुपाकडे जाण्यासाठी तद्रुप होण्यासाठी जीवानें सोऽहं हंसः हें आत्मस्वरुपाचें अखंड स्मरणच केले पाहिजे
हें इतर साधनांना गौणत्व देऊन येथें स्पष्ट केलें आहे. अन्या साधनांना शीण म्हटलें यांतीळ सूक्ष्म अभिप्राय असा असावा की इतर सर्व साधनें ’ देहबुध्दीनें केली जातात आणि ही देह म्हणजेच मी अशी विपरीत कल्पनाच पापपुण्य,
सुखदुःख, जन्ममरण अशा द्वद्वांना कारणीभूत होते. सोऽहं जप हा जन्ममरणरूपी अनर्थ टाळण्याचा अगदीं ’ मूले कुठार: ’
अशा स्वरुपाचा इलाज आहे. तीर्थयात्रा, शास्त्राभ्यास, पुरश्चरणें, प्रदक्षिणा, यज्ञयाग, दानधर्म, ग्रंथपारायणें, पीडितांची सेवा,
वारी, भजन इत्यादि साधनें चित्तशुध्दीला अत्यंत उपकारक खरीच पण ही सर्व साधनें करणारा ’ मी ’ हा जर देहालाच
चिकटलेला असेल तर या साधनांच्या आचरणानें खोटा अहंकार दृढ होण्याची शक्यताच जास्त ! उलट, अंतरंगांत देहाला
चिकटलेला मी जर आत्मस्वरुपाला जडविण्यचा गुरुपदिष्ट सोऽहंचा अभ्यास चालू असेल तर मात्र हींच साधनें स्वतःला सर्व बंधांतूण सोडवायला उपयोगी ठरतात आणि अनभिज्ञ लोकांना मार्गदर्शकही ठरतात. ही साधुसंतांची रीत होती व आहे. ’ मीचि होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । ’ किंवा ’ मी होऊनि मातें । सेवणें आहे आइतें ।’ असे ज्ञानेश्वर माऊलींनी हे अभेदभक्तीचें गुह्य अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरींत प्रकट केलें आहे. सारांश, देहेबुध्दि ते आत्मबुध्दि करावी हें
मुख्यातलें मुख्य ध्येय व त्यासाठींच गुरुपदिष्ट सोऽहं हंसः ॥
(६) आलिया पंथा आपुल्या लक्षी-ओवी ११३ :-
या चरनाच्या स्पष्टीकरणासाठीं अ. २५ व्या १/२ टीपा पाहाव्यात. शिवाय ’ पंथ नीट दाविला (१६/६२) ’ सोऽहं मार्गे नीट जाय ’ (२७/११) ’ लता ऊर्ध्वमुखें जाती । साधका मार्ग दाविती (२९/४९) असे अनेक समानार्थी उल्लेख पहावेत.
कठिण शब्दांचे अर्थ :- गोल्य =मिश्रण, संयोग (९) अंबुधि= समुद्र, - सुधी= सात्विक बुध्दि असलेला (१७) मोहाटवी =
[ मोह+अटवी ] मोहरुपी, अरण्य (१९) मांदूस=पेटी, खोकें. [सं. मंजूषा] (२१) काय (सं. पूं.) = शरीर मराठींत काया (स्त्री)
(४५) दायाद=भाऊबंद (४९) अपंगी [ आज्ञार्थ ] =अंगीकार कर (६८) भिषकें =वैद्यानें [ मूळ सं. भिषक् ] (७५) शचीकांत=शचीचा
पति म्ह. इन्द्र (७७) पयपानी =दूध पिणारा ( आईचें दूध पिणारा बालक असा लक्षणेनें अर्थ ) (७७) कार=खरोखर,
वस्तूतः (८८)