मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय सोळावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय सोळावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीवक्रतुण्डो जयति ॥
माया मोहाचिये रजनीं । मार्ग चुकोनि गेलों विजनीं । हस्ता धरोनि श्रीगुरुंनीं । (१)चित्सूर्यसदनीं मज नेलें ॥१॥
सदनीं गेलियाहीवरी । पूर्वसंस्कार बलवत्तरी । भ्रमोनि म्हणे वनान्तरीं । फिरतों; कोठें सदन माझें ? ॥२॥
मग पूर्व संस्कार मागे लोटिला । चित्सूर्य प्रकाश प्रगट्विला । उदयो अस्त तेथें निमाला । कोंदला एक प्रकाश ॥३॥
प्रकाशें द्दष्टि पूर्ण उघडिली । पदार्थमात्र पाहों लागली । तो गणेशमूर्ति वोळखिली । महाद्वारीं प्रथमेसी ॥४॥
तैसेंचि आंत घेऊनि जाती । चतुष्कोण षटूकोण भू दाविती । बाळा ओळखी ओळखी म्हणती । सदन तुझें हेंच कीं ॥५॥
खुणेसी खूण मिळत गेली । तों दहा खणी माडी देखिली । सहज वरतें दृष्टि गेली । तों द्वादश खणी झळकतसे ॥६॥
एकाहूनि एक गोपुरें । उंच रमणीय मनोहरें । देदीप्यमान मंगलतुरें । वाद्य गजरें दुमदुमले ॥७॥
क्षण एक विश्रांति देऊनी । मज चालविले द्वादशखणी । पैं तळवटीं मनोचक्र रहाणी । येथील करणी काय सांगूं ? ॥८॥
एका खणीं राहतां स्थित । आनंदे सृष्टी भरे निर्भर । दुजे खणीं शोक अनिवार । तिजे चिंतातुर असावे ॥९॥
अन्य खणीं सद्‍वासना । उपजे अन्यत्र करितां गमना । तेथें भलतेंचि वाटे मना । ऐसे नानाविध चमत्कार ॥१०॥
पूर्वी याच गृहीं वस्ती । बहुत दिवस केली होती । स्थळमाहात्म्ये सुखदुःखाप्राप्ति । हे सूक्ष्म गति न जाणे मी ॥११॥
वरी षोडश खणाची माडी । तेथें न लगता अर्धघडी । नेले मज बहु तांतडी । बुध्दि कुडी भांबावली ॥१२॥
तेचि मानूनि विश्रांतिस्थान । अज्ञान सुषुप्तींत जाहलों मग्न । मग तये वेळीं थापटून । सावध करुन काय म्हणती ॥१३॥
वत्सा याच स्थळींची भुलीईं । भुलवोनि जनां वाट चुकविली । ऊर्ध्व निघे या निज राउळीं । वनस्थळीं अधो जातां ॥१४॥
ऐसी आज्ञा शिरीं वंदोनी । ऊर्ध्व पाहे विलोकोनी । तों कपाटें लागलीं दोन्ही । मार्ग कोणीकडे दिसेना ॥१५॥
ऊर्ध्व उडों जंव पाहे । तों पुन्हां खालींच उभा आहे । कृपाळु माझी गुरुमाय । विंदान काय करीतसे ॥१६॥
खेचरी वोढूनि कमान । वायु वेगींचा सोडोनि बाण । सदट दोन्ही कपाटें उघडोन । मार्ग गहन सुखी केला ॥१७॥
तथापिइ मज भय वाटे । आपण पुढें जाहले नेटें । म्हणती वत्सा आहेसी कोठें ? । सदन गोमटें पहा तें तुझें ॥१८॥
तेथें जावोनि जवळ मी पाहे । कोटि सूर्य प्रकाश होय । दृष्टिप्रभे दीपकोनि जाय । तेजोमय सर्व दिसे ॥१९॥
प्रकाश अद्‍भुत परि शांत । अमृतवृष्टी सदैव होत । पिपासार्त कीं क्षुधाक्रान्त । नसे भ्रांत त्या स्थळीं ॥२०॥
हिरे माणिक पाच वैडूर्य । मौक्तिक प्रवाळ अद्‍भुत वीर्य । नील गोमेद प्रतिसूर्य । रंगीं कार्य अनेक दिसे ॥२१॥
काय सांगूं रंगाची प्रौढी । दृग्गोचर होतां थोडी । अवस्थात्रयीं ती न सोडी । ऐसी प्रभा अद्‍भुत ॥२२॥
तेथें सहस्त्रदळपर्यंक । त्यावरी श्रीगुरु पहुडले देख । दृष्टी लावूनि पाहतां सम्यक । मीपण अशेख हारपलें ॥२३॥
ध्येय ध्याता । ज्ञाता ज्ञेय समवेत ज्ञान । सर्व त्रिपुटी या गेल्या विरोन । मीपणेंवीण एकला मी ॥२४॥
गुरुशिष्याची नवाई तेथें मज नाठवेंचि कांही । काय सांगूं कृपेची नवलाई । रंका बाछाई तेवीं झाले ॥२५॥
तेथील सांगावया वृत्तान्त । परा वाचा मौन धरीत । तेथें वैखरी उच्चार करीत । कैसी त्वरित रिघेल ? ॥२६॥
तें सुखाचें सुखधाम । कीं विश्रांतीचें विश्राम । ज्या वर्णनीं निगमागम । थक्कित परम; ते मी काय वानूं ? ॥२७॥
साखरेची कैसी गोडी । पुसतां; सांगतां नये तोंडी । तेंचि सेवन करितां परवडी । मिठी पाडी अनुभवें ॥२८॥
तैसी या वर्णनाची गोष्टी । गुरुपुत्र ह्र्दयसंपुष्टि । सांठवितील; इतर चावटी । करोनि हिंपुटी होतीळ ॥२९॥
असो; जेणें मज मार्गी लाविलें । त्या श्रीगुरुंचीं वंदोनि पाउलें । मच्छेंन्द्र अखंड- योगा बैसले । तेंचि वहिलें सांगेन ॥३०॥
(२)ब्रह्मई अहं ब्रह्मास्मि स्फूर्ति । तेचि झाली मूळप्रकृति । तिसी व्यापूनिया चिच्छक्ति । राहिली, तोचि आदिपुरुष ॥३१॥
अर्धनारी नटेश्वर । तोचि मायोपाधि ईश्वर । शुध्दसत्त्वाचें निजमंदिर । तोचि परेश परमात्मा ॥३२॥
त्या महामायेपासुनी । क्षोम होतां गुणक्षोभिणी । माया झाली, तिजपासोनी । त्रिगुण जननी जाहलि ॥३३॥
सत्त्व विष्णु ब्रह्मा रज । तम शंकरमूर्ति सहज । तमाचें जें निजबीज । तेथें जन्मकाज आकाशा ॥३४॥
आकाशीं जन्म वायूसी । वायूमाजीं प्रसव तेजासी । तेजीं आप, आपीं पृथ्वीसी । ऐसी भूतें जन्मलीं ॥३५॥
ती जडत्वें जडत्वा आली । करोनि परस्परानुमेळीं । चितशक्त्याधिष्ठित वर्तो लागली । सृष्टी झाली यापरी ॥३६॥
एवं त्रिगुण पंचभूतें । अष्टधा झाली प्रकृतीच ते । चौर्‍याऐंशी लक्ष योनीतें । जीव घातले असंख्य ॥३७॥
जीव चिदंश असतां जाण । त्यासी पडले मायावरण । (३)गेला स्वरुपातें विसरून । अहंपणें गोंविला ॥३८॥
होता ब्रह्माण्डायेवढा । तो अणूहुनि झाला थोकडा । जो निष्कलंक धडफुडा ।(४) तो झाला वेडा, कलंकी म्हणे ॥३९॥
(५)म्हणे मीं पाप केलें बहुत । मज ताडितील कृतान्तदूत । अथवा ज्योतिष्टोम अदभुत केलिया स्वर्गी पावेन ॥४०॥
म्हणे मी तों जी किंचिज्ज्ञ । आणि ईश्वर आहे सर्वज्ञ । त्यानें ब्रह्मासी केलें बंन्धन । कैसेनि मुक्तता लाहो ते ॥४१॥
मदिरा पिऊनि झाला वेडा । तो चिंतामणीस मानी खडा । (६)बंधन नसतां, म्हणे सोडा । कां मज खोडा घातिला ? ॥४२॥
कीं चक्रवर्ती सुखशयनीं । पहुडला; तो दरिद्री स्वप्नीं । होवोनि, म्हणे मज दावा कोणी । राजा नयनीं, याचीन त्या ॥४३॥
अहो जयाचे सत्ते विश्व चाले । तो केविल वचनें बोले । म्हणें मज पतिता उध्दरिले । पाहिजे कीं दीनबंधो ॥४४॥
कोण मायेचा बडिवार । बंध नसतां, जीव अपार । भुलवोनि केले तदाकार । स्वरुप पार न पवती ॥४५॥
जैसी चक्रव्यूहाचिई गति । तैसीच मायेची असे रीति । मार्गे जातां सुलभ प्राप्ति । चुकतां-पडती आवर्ती ॥४६॥
अहो गर्भवासाची स्थिति । वर्णिली असे अनेक ग्रंथीं । कथानक सर्व श्रवणीं ऐकती । परी न करिती विचारा ॥४७॥
गर्भी सर्व स्मृति होती । सोऽहं शब्दातें उच्चारी मति । बाहेर निघतां कां विस्मृति ? । हा तों न करिती विचार ॥४८॥
उघडपणें पाहों जातां । आल्या मार्गीच होय चुकता । तरी सहजेंचि घडे गोता । मग निजस्वार्था कां न मुके ॥४९॥
गर्भी नवद्वारें बंद । दशमद्वारें अन्नस्वाद । घेवोनि, गर्भ वाढे विशद । निघतां रोधे मार्ग तो ॥५०॥
(७)एक द्वारें वागणारा । त्यासी नवद्वाराचा पडतां फेरा । जीव भुलला सारा । या सूक्ष्म विचारा न जाणती ॥५१॥
किती सांगूं उघड रीतीं । गुरुपुत्र म्हणतील पडली भ्रांती । तथापि श्रीगुरु स्वयें वदविती । तेथें मम मति काय करी ! ॥५२॥
असो; ऐसी देखोनि अवस्था । दया उपजली दीननाथा । म्हणे विसरले हाच पंथा । काय आताम करावे ॥५३॥
दुर्घट मम मायेची करणी । कोणाही न चुके मजवाचुनी । मच्छेंद्र अवतार म्हणवोनि । झाला जनीं प्रकटता ॥५४॥
खांबसूत्राची बाहुली । नाचवी एकाचे करांगुलीं । एका जैत एका हारिली । तेवींच जाहली परी हे ॥५५॥
स्फूर्तीसवें दृष्टि जाली । आपुलेंचि व्यापे चालविली । जीवरुप बध्दता दाविली । शिवपणें भावविली मुक्तता ॥५६॥
ऐसा आदीश्वर अवतार । पूर्ण होय श्रीनाथ मच्छिंद्र । जीव भुललें जे अपार । त्यांसी भवपार पववी ॥५७॥
इतर अवतारीं चरित्रें अनेक । दुर्ह्रद उदासीन देख । या अवतारीं कर्तव्य एक । मार्ग सम्यक दाखवूं ॥५८॥
जरी रामकृष्णादि अवतार । धरोनि, केला जगदुध्दार । तरी सायुज्यमुक्ति प्रकार । स्वल्पां गोचर जाहला ॥५९॥
एका सन्निधीं एका दुरी । बिभीषण भक्त-रावण वैरी । अर्जुना साह्य करोनि, मारी । पुतना सारी कौरवांची ॥६०॥
रज सत्त्व तमात्मक । अवतार झाले अनेक । शुध्द-सत्त्वमूर्ति एक । मच्छेंन्द्र नायक अवतरले ॥६१॥
राजयोग मूळपीठ । जेणें प्रकटविला निघोट । श्रमरहित अचूक अवीट । (८)पंथ नीट दाविला ॥६२॥
मम संप्रदायी आदिगुरु । किती वानूं तो बडिवारु । दासानुदास मी किंकरु । पादत्राण धरु तयाचा ॥६३॥
जग व्यापोनि दशांगुलें । उरलें म्हणोनि वेद बोले । तें हे परब्रह्म सावळें अवतरले मच्छेंन्द्ररुपें ॥६४॥
मूळ कृतयुगीं अवतार । वर्ष प्रतिपदे मच्छेंन्द्र । धरिते जाहले कृपाकर । जगदुध्दार करावया ॥६५॥
कृत त्रेत द्वापारयुग । पृथ्वी फिरोन तारिलें जग । सत्य सुवर्ण मिथ्या नग । ऐसें सर्वां बिंबविले ॥६६॥
जन सन्मार्गी लवीले अनेक । उरलें कार्य करील गोरख । ऐसें मनीं आणोनि सम्यक । अखंडैक योगीं बैसले ॥६७॥
अति रम्य कृष्णातीर । महास्थान कोळे नरसिंहपुर । सन्निध पाहोनि पर्वत थोर । योग-मंदिरातें उभविती ॥६८॥
कार्तिक शुध्द प्रतिपदेस कलियुगाचे आरंभास । आम्ही बैसूं अखंड योगास । ऐसे गोरखास आज्ञापिती ॥६९॥
आज्ञा ऐकोनि शिष्योत्तम । गोरख घाबरा जाहला परम । म्हणे हे नाथ मंगलधाम । तव पदयुग्म न विसंबे ॥७०॥
तव पद-वियोगीं मियां प्राणा । कैसे वांचवू जी सुजाणा । सांगे सदया सुखसंपन्ना । मज विचारणा अनन्यासी ॥७१॥
नाथ म्हणती वत्सा गोरखा । तुं शिष्योत्तम होसी निका । अनवच्छिन्न एकीं एका । वियोग कैसा बोलती ? ॥७२॥
योगी वियोगाची वार्ता । हें तों बोलोंचि नये सर्वथा । समुद्रीं की थिल्लरीं सविता । प्रतिबिंबता; हे द्वय काय ? ॥७३॥
अविद्योपाधि वेष्टित जीव । त्याची करावया कींव । मत्स्वरुप तूं चिरंजीव । होऊनि; शिवनाम जपे सदा ॥७४॥
आणिक एक दिधलें वरदान । जे स्मर्तृगामित्व घडो पूर्ण । दत्त, नारद कीं वायुनंदन । व्यासासमान विचरे महीं ॥७५॥
कार्तवीर्य कीं शुक आगळा । तैसी तुझी वाढेल लीला । गोरख धांवोनि चरणीं लागला । साष्टांग घातला नमस्कार ॥७६॥
म्हणे सर्व वरदानाहूनी । अधिक सेवा ते कोटिगुणी । अस्थिशृंखाला सेवेवांचुनी । व्यर्थ कोणी वागवावी ? ॥७७॥
योगीं वियोग कांहींच नसे । हें मी कृपें जाणत असे । परी पदसेवेचिया सुखलेशें । अन्यत्र नसे ते गोडी ॥७८॥
तथापि मज आज्ञा प्रमाण । म्हणवोनि घाली लोटांगण । पुनरपि धांवोनि धरी चरण । उचंबळोनि प्रेमभरें ॥७९॥
म्हणे हे साकार सगुण । लोपोनि; नेघे मी तुझें ज्ञान । ऐकोनि, मच्छेंन्द्र सुखावोन । अंतरीं सांठवी गोरक्षा ॥८०॥
तेव्हां मी तूं इया बोला । सहजेंचि शून्यीं ठाव आला । याउपरी वर्तल्या बोला । अवधान श्रोता देईजे ॥८१॥
त्रैलोक्यांत पसरलि मात । अखंड योगा बैसती नाथ । जे ते धांवोनि दर्शना येत । म्हणती कृतार्थ होऊं आम्ही ॥८२॥
तीन मास पर्यंत । तेचि पर्वतीं वास करीत । अन्न जळ विवर्जित । आनंदित सदा असे ॥८३॥
जे कामिक जन धावोनि आले । त्यांचे मनोरथ पूर्ण केले । जेया अधिकारी देखिले । त्यांसी केले कृतार्थ ॥८४॥
दोन मुहुर्तपर्यंत । रात्रौ निद्रित होती नाथ । उरला वेळ सांत्वनांत । घालविताती जनांच्या ॥८५॥
गोरक्ष न निजे अहोरात्रीं । अन्न जळ न सेवीच निर्धारी । गुरुसेवा न विसंबे क्षणभरी । म्हणे चराचरी हें न मिळे ॥८६॥
तंव ते समाधीचें पर्व । पाहों आले निर्जर सर्व । पार्वातीसहित सद्‍गुरु शर्व । गणगंधर्व पातले ॥८७॥
नभीं विमानांची दाटी । सावित्रीसमवेत परमेष्ठी । विष्णु लक्ष्मीस घेऊन पाठीं । उठाउठीं पातले ॥८८॥
अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषीश्वर । आले कुबेरादि यक्ष किन्नर । अप्सरा नृत्य करिती अपार । गारी चरित्र नाथांचें ॥८९॥
अष्ट दिकपाळ उरतले तळीं । मुखी श्रीनाथ नामावळी । जपोनि; वाहती पुष्पांजळी । माथा चरणकमळीं ठेवोनि ॥९०॥
शरद्‍ऋतु द्वितीय मास । कार्तीक शुध्द प्रतिपदेस । रवि हस्त योग दिवस । अखंड योगास बैसले ॥९१॥
करोनियां प्रातःस्नान । सर्वांगासी भस्म चर्चोन । दिधलें सर्व देवतांस दर्शन । आनंदे मन निर्भर ॥९२॥
योगमंदिरास त्रिवार । प्रदक्षिणा, नाथ योगींद्र । करिता; पुष्पांच संभार । वर्षती निर्जर आनंदें ॥९३॥
कोणासी वचन, कोणा पाहून । कोणासी भ्रूसंकेत दावून । कोणासी देऊन आशीर्वचन । करिती समाधान सर्वांचे ॥९४॥
तळीं दर्भ वरुतें अजिन । त्यावरी शुभ मृतु चैल जाण । ऐसें गोरखें केलें आसन । पाहूनि नाथ मनीं तोषले ॥९५॥
उत्तरेस मुख करुन । नाथ करिती आरोहण । घालोनियां पद्मासन । अर्धोन्मीलन अक्षेसी ॥९६॥
दीप प्रज्वलित करुनी । धुनीमाजीं संस्थिला अग्नि । कमंडलु पूर्ण जळें भरोनि । घातला; ठेवोनि; नमस्कार ॥९७॥
कित्येक षोडशोपचारें पूजिती । पाठक वेदघोषें गर्जती । त्या विस्तीर्ण पर्वतावरती । तिळमात्र क्षितिरिती नसे ॥९८॥
ऐसी बहुत जाहली दाटी । नभीं निर्जरांच्या कोटी । व्हावया नाथचरण भेटी । ज्या त्या पोटीं आल्हादु ॥९९॥
दिवस आला दोन प्रहर । तटस्थ पाहती जन समग्र । तों आज्ञापिती नाथ मच्छेन्द्र । गोरखासी तें ऐका ॥१००॥
म्हणती वत्सा मंदिरद्वार । आच्छादावे अतिसत्वर अति सत्वर । राजयोग जीर्णोद्धार । केला; तो चिरकाळ चालवी ॥१०१॥
गोरखें साष्टांगें नमन केलें । चरणांगुष्ठ मुखीं धरिले । अश्रुवें दोन्ही नेत्र भरले । परि आवरिले अति धैर्ये ॥१०२॥
म्हणे पुन्हां सगुण दर्शन । सद्‍गुरु केधवां देशील पूर्ण ? । नाथ हांसोनि तयालागोन । म्हणती अज्ञान कोण हें ? ॥१०३॥
माय्क रचना सर्व ही असे । तेथें गुरुशिष्य कैचे कायसे ? । तथापि तूं पुसिले सौरसें । तरी मी असे तव ह्र्दयीं ॥१०४॥
समाधीचा हाचि दिवस । प्रतिवर्षी प्राप्त होईल तुम्हांस । तेधवां दर्शन देईन अवश्य । दुःखी मानस न करावी ॥१०५॥
ते आनंदाचे अनुकार । ऐकोनि संतोषला फार । झांकोनियां मंदिरद्वार । नमस्कार घातला ॥१०६॥
एकचि झाला जयजयकार । वाद्य गजर होतसे अपार । नासें कोंदलें अंबर । सुख मनोहर काय वानूं ? ॥१०७॥
त्रिरात्र तेथें वास करिती । आनंदाचें पर्व म्हणति । शक्त्यनुसार दानें देती । ब्राह्मण करिती संतर्पणें ॥१०८॥
तईपासोनि त्या पर्वतास । मच्छेन्द्रगड नाम विशेष । ठेवोनि, यात्रेचा पूर्ण दिवस । हाचि नेमिला नेमेंसी ॥१०९॥
शुदह्द प्रतिपदेपासूनी । तृतीयेपर्य़ंत जाण त्रिदिनीं । मोहोत्साहो होतसे जनीं । सर्वत्र नयनीं देखती ॥११०॥
अभ्यासावा राजयोग । ऐसें वाटे जया चांद्ग । तेणें ते स्थळीं लागवेग । अनुष्ठानीं बैसावे ॥१११॥
योग मंदिरासन्निध जाण । त्रिदिन करितां उपोषण । प्रत्यक्ष मच्छेन्द्र प्रकटोन । त्यासी सनातन करतील ॥११२॥
यदर्शी न धारावी मनीं शंका । भावार्थे प्रचीति घडे अनेका । कुटिल दुर्वासनी असती जे का । त्यासी धोका निश्चयेसी ॥११३॥
त्याचि स्थलीं गोरखनाथ । राहिले बहुत काल गुप्त । पुढें दावावया प्रचीत । शिराळे ग्रामांत प्रकटले ॥११४॥
ते कथा परम पावन । श्रोती करोनि एकाग्र मन । मातें देवोनियां अवधान । पुढील प्रकरण चालवावे ॥११५॥
चतुर्थ पासोनि षोडशपर्यंत । नाथलीला वर्णिली अद्‍भुत । येथून वर्णीत गहिनीनाथ । श्रीनिवृत्ति आदि करुनी ॥११६॥
जैशी द्वादश नामें विख्यात । परी प्रकाशे एकचि आदित्य । तैसें द्वादश प्रकरणांत । अत्यद्‍भुत नाथ कथा ॥११७॥
कीं हा द्वादशाक्षरी मंत्र । भवबाधेवरी तीव्र शस्त्र । जेणें ध्रुवबाळ झाला पवित्र । षण्मास -मात्र अभ्यासितां ॥११८॥
पूर्न द्वादश -कळा मित्र । तैसें द्वादश प्रकरण नाथ चरित्र । षोडश कलात्मक रजनीद्कर । तैसें षोडश प्रकरण हे ॥११९॥
(९)चंद्रसूर्यांचिये घसणी । द्वादश कला मिळणी । मिळी सतरावी संजीवनी । अनुभवी ज्ञानी खूण हें जाणे ॥१२०॥
हा अध्याय सोळावा । केवळ संतांचा मेळावा । योगानुभवें पडे ठावा । अभ्यासावा अति प्रीतीं ॥१२१॥
सोळावे प्रकरणाचे अंती । नाथ अखंड योगा बैसती । जे हा अध्याय अभ्यासिती । पुनरावृत्ति त्यां नाहीं ॥१२२॥
श्रीरामदास श्रीपति । श्रोतयांसी करी विनंति । चुकवावया पुनरावृत्ति । प्रसंग चित्तीं धरावा ॥१२३॥
टाकोनियां आळस निद्रा । शरण जावे श्रीरामचंद्रा । तरोनिया भवसमुद्रा । तोचि परपारा जाईल ॥१२४॥
योगीजन- मानस- विश्रामा । निजजन भक्त कल्पद्रुमा । मेघश्यामा निजसुखधामा । श्रीगुरु रामा नमन तूंतें ॥१२५॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१२६॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय सोळावा संपूर्ण ॥

॥टीपा (१) हस्ता धरोनि श्रीगुरुंनीं । चित्सूर्यसदनीं मज नेलें ओव्या १ ते २४ :-
१६ व्या अध्यायाच्या प्रस्तावनेंत, शिष्याला श्रीसद्‍गुरु मूलाधारचक्रापासून सहस्त्रदलापर्यंत सोऽहं धारणेचा जो अभ्यास
शिकवितात त्याचें रुपकात्मक बहारीचें वर्णन आहे. निरनिराळया चक्रांच्या ज्या पाकळया (४,६,१०) इ. मानल्या आहेत त्यावर त्या चित्सदनां ’ तील खोल्यांच्या खणाचें रुपक आहे. मूलाधार -४ पाकळया, स्वाधिष्ठान -६ पाकळया, मणिपूर -१० पाकळया, अनाहत - १२ पाकळया, विशुध्द -१६ पाकळया व आज्ञाचक्र -२ पाकळया असेचं योगशास्त्रांत वर्णन आढळते व त्याचा ५ ते १७
ओव्यांतून श्रीपतींनी, चतुष्कोण, षट्‍कोण, दहा खणी माडी, द्वादश खणी, षोडश खणाची माडी आणि दोन कपाटें याप्रमाणे
शास्त्रशुध्द क्रमानेंच उल्लेख केला आहे. द्वादश खणी म्ह. अनाहत चक्रात प्राण आला की मन प्राणांचे ऐक्य होते.
श्रीत्रेन्दियाचे ठिकाणी अतीन्दिय ज्ञान उत्पन्न होऊं लागते. कर्णात विशिष्ट प्रकारचे ध्वनि ( अनाहत नाद ) उत्पन्न होऊं
लागतात. तोच अनुभव सातव्या ओवींत ’ देदीप्यमान मंगलतुरें । वाद्य गजरें दुमदुमले ॥ असा नमूद केला आहे. शेवटीं २३, २४ व्या ओवींत सहस्त्रदलकमलांत धारणा स्थिरावली की ’ मीपणेवीण एकला मी ’ हा अनुभव फक्त शिल्लक उरतो हेही  प्रचीतीचे बोल वाचकांनी ध्यानांत ठेवण्यासारखे आहेत. हे अनुभव श्रीपतींनीं योगशास्त्राची पुस्तकें वाचून लिहिले नसून, सद्‍गुरु तिकोटेकर महाराजांच्य्दा कृपेनें ते २४ व्या ओवीतील अनुभवांत स्थिरावले होते. तसेंच याच पोथींत पुढे एकदोन ठिकाणीं त्यांनीं असा उल्लेख केला आहे कीं सिध्दचरित्रांतील योगपर ओव्या आपल्या गुरुस्थानीय गुरुभगिनी महायोगिनी श्री गोदामाई कीर्तने यांनी सांगितल्या. ते लक्षांत घेतां पू. गोदूताईचाही योगांतील अधिकार जाणवतो. श्रीगुरुकृपा अगाध हेच खरें !
(२) ब्रह्मी अहं ब्रह्मास्मि स्फूर्ति....सृष्टि झाली यापरी ओव्या ३१ ते ३६ या ओव्यांतून सांगितलेला सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम
उपनिषदांतून ’ आत्मन आकाश: संभूत: । आकाशाद्‍ वायु: वायोरग्नि: । अग्नेराप: । अद्‍भ्यः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम्‍ । अन्नाद्‍ भूतानि । असा वर्णिलेला आढळतो. तसेंच येथील ओव्यांतून वर्णिलेला क्रमही श्रीविवेकसिंधु,
दासबोध्द इ. संतग्रंथांतूनही सांगितला आहे. श्री ज्ञानेश्वरींतील १५ व्या अध्यायातील अश्वत्थवर्णन पहावे.

(३) जीव चिदंश असता जाण .... गेला स्वरुपातें विसरुन । ओवीं ३८ :- ३८ ते ४६ या ओव्यांतून वस्तूत : ब्रह्मरुप असलेल्या जीवात्म्याची माया कशी दैना करते त्याचें वर्णन आहे. जीवाला खर्‍या स्वरुपाचा विसर पाडणें व स्वत:हुन अत्यंत विरुध्द लक्षणाच्या देहाशी तादाम्य करावयास लावणें ही मायाशक्तीची दोन कार्ये आहेत. ’ गेला स्वरुपातें विसरोन । अहंपणें गोविला ॥ यांत दोहींचाही उल्लेख झाला आहे.

(४) तो झाला वेडा, कलंकी म्हणे ॥ -ओवी ३९ :- जीव वस्तुतः ब्रह्मरुप असून अविद्याग्रस्त झाल्यानें स्वतःला देहा एवढेंच मानूं लागला. देहाकडून घडणारी कामें आपण केली असें समजूं लागला. ही भ्रांति केव्हां, कां आणि कशी झाली हे कोणीही सांगूं शकत नाही . देहतादात्म्यामुळें कर्माचा अहंकार घेऊन, कर्माची फळें मला भोगावी लागतील असें जीव मानूं लागला. जीवाच्या स्वरुपांत कांहींही दोष नाहीं क्पण मायेमुळें देहाचे दोष, देहाच्या उणीवा, देहाची अमंगलता, जीव स्वतःचीच समजतो.
’ तो वेडा झाला कलंकी म्हणे ’ याचा अर्थ तो (जीव ) वेडा झाला ( स्वरुप विसरला म्हणून स्वतःस ) कलंकी ( कलंकी लागलेला,
दोषयुक्त ) म्हणे (समजतो).

(५) म्हणे मी पाप केलें बहुत.... स्वर्गी पावेन -ओवी ४० :-
स्थूल सूक्ष्म देहानें घड्लेल्या कोणत्याही कर्माशी जीवाचा वास्तविक कांहींही व कधींच संबंध नाही. तथापि अहंकाराची व देहाची जोडी जमल्यानें घडलेल्या कर्माबद्दल जीवाला यमपुरींतल्या दुःखाचें भय वाटते तशीच स्वर्गसुखाची लालसाही असते. नाथपंथांतील उपदेशांत जीवाला स्वतःचे स्वरुपाची ओळख करुन देतात आणि ती ओळख कधींही न बुजण्याची श्रीगुरु युक्ती शिकवितात. तें स्वरुप पाप-पुण्याच्याही पलीकडचे आहे. मात्र हें समजल्यामुळें साधक पापपुण्याची दिक्कत न बाळगणारा चार्वाकवादी होत नाहीं तर श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं वर्णन केल्याप्रमाणें ’ दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावचि जीवीं
नुगवे । सेवी जे स्वभावें । पैठे होय ’ असा सहजावस्थेंत वागतो.
 
(६) बंधन नसतां, म्हणे सोडा -ओवी ४२ :- जीव हा वस्तुत: परमात्मा असल्यानें, कसलेंही द्वंद्व जीवाच्या ठिकाणीं नाहीं.
पाप-पुण्य, जन्म -मरण, सुख दुःख, इ. द्वंद्वांच्या कल्पना, जीव अविद्येनें ग्रासल्यामुळें करतो. ज्याप्रमाणे नळीवर बसलेला
पोपट, उडून जाण्याचें आपलें स्वाभाविक सामर्थ्य विसरुन, नळीवर बसल्य़ावर पडूं या भीतीनें ती नळी घट्ट धरुन ठेवतो, त्याप्रमाणें जीव हा स्वरुपतः नित्य मुक्त असूनही बध्दता व मुक्तीची कल्पना करुन, ’ आपण बध्द आहोत, मुक्त करा ’ अशी देवाजवळ व साधूजवळ मागणी करतो. येथें हेंही लक्षांत घेतले पाहिजे की हा सर्व कल्पनांचा खेळ असल्यामुळें दयाळु सद्‍गुरु एका कांटयानें दुसरा कांटा काढावा त्याप्रमाणें सोऽहं ही शुध्द कल्पना उपयोगांत आणतात. ही शुध्द कल्पना जीवाला स्वतःच्या खर्‍या स्वरुपापर्यंत नेऊन पोहोंचविते व स्वतः विराम पावते ( पहा अ ८/ टीप ८ )

(७) एक द्वारें वागणारा.... ओवी ५१ :- ४७ ते ५१ ओव्य़ांतून एक सलग विषय आला आहे. गर्भावस्थेंत जीवाला स्वरुपाचें स्मरण असते; इतकेंच नव्हे तर या स्वरुपस्मरणांत तो जीवात्मा निरतिशय सुखांत असतों व म्हणूनच गर्भाशयांतील दुःख नकोसें होऊन तो सुटकेसाठीं ईश्वराची प्रार्थना करतो. या ठिकाणीं डोळे, तोंड, नाक, मलद्वारें इ. देहाची नऊ द्वारे बंद असून फक्त दशम द्वार म्ह. ब्रह्मरंध्र खुलें असते. तेथेंच जीवात्म्याचा सोऽहं जप सुरुं असतो. ओवींतील ’ एक द्वारें वागणार्‍या ’ म्हणजेच सहस्त्रदलकमलांत स्वरुपचिंतन करणार्‍या जीवाचें, जन्माला येतांना तें दशम द्वार बंद होऊन स्वरुपाचा विसर पडतो. देह धरणीवर आल्यावर नऊ दारें उघडतात. पुढें जीव सुखासाठीं डोळे, कान, नाक, इत्यादि दारांतून मनाच्या आधारें बहिर्मुख होतो. हाच ’ नवद्वाराचा फेरा पडणें होय.

(८) पंथ नीट दाविला - ओवी ६२:- नाथसंप्रदायाचा उल्लेख अनेक वेळां ’ आकाशपंथ, गगनपंथ, ऊर्ध्वपंथ असा केलेला
आढळतो. स्वतः सुखरुप असणारा जीवात्मा देहाच्या इंद्रियरुपी अनेक दारांत येतो व विषयसुखाची इच्छा करतो. ही
इंद्रियरुपी सर्व द्वारें ब्रह्मरंध्रापेक्षां देहामध्यें खालच्या बाजूस आहेत. मन स्वभावतः अधोगामी असते. त्याचे संगतीनें
जीवही सुखाच्या इच्छेनें शिश्नोदरापर्यंत खाली येतों, अधोगामी होतो. नाथपंथांत मूळ चूक सुधारण्याची दिशा दाखविली
जातें देहाच्या सर्वांत उच्च ठिकाणी म्हणजेच सहस्त्रदलकमलांत सोऽहं धारणा करण्याची युक्ति सदगुरु शिकवितात. हाच
जीवाला आत्मसुखाचा, त्याच्या मूळच्या स्वरुपाचा नीट पंथ दाखविणे होय.

(९) चंद्रसूर्याचिये घसणी- ओवी १२० :- या ब्रह्मांड गोलामध्ये एकूण बारा सूर्य आहेत. सूर्याच्या बारा कला व चंद्राच्या सोळा कला असतात, अशी समजूत आहे. इडा व पिंगला या नाडयांना अनुक्रमें चंद्रनाडी व सूर्यनाडी अशा संज्ञा आहेत. अशा या इडा व पिंगला नाडयांची म्हणजेच चंद्रसूर्याची घसणी, एकत्र मिळणी, अग्निचक्रांत होते. यांचे एकत्रीकरण जेथे होतें तेथें चंद्र म्हणजे मन आपल्या सोळा कलांसह सूर्य म्हणजे आत्मा त्याच्या बारा कलांत विलीन होते. हीच द्वादश कला मिळणी होय. सत्रावी संजीवनी म्हणजे सहस्त्रार कमलांतून अमृतस्त्राव होतो तो. यामुळें योगी अमर होतो. कवि म्हणतात हे सर्व जे कोणी ज्ञानी म्हणजे अनुभवी असतात तें जाणतातच !

कठिण शब्दांचे अर्थ :- पिपासार्त = तहानेनें व्याकुळ  
(२०) अशेख = अशेंष, संपूर्ण ;  पर्यक = पलंग  (२३) हिंपुटी = कष्टी, नाराज (२९) धडफुडा = निःसंशय, धडधडीत,
कलंकी = कलंक लागलेला, सदोष (३९) ज्योतिष्टोम = एक प्रकारचा वैदिक यज्ञ (४०) केविल वचनें = दीन भाषण
(४४) जैत = विजय (५५) पृतना = सेना (६०) निघोट = ठाशीव, स्पष्ट (६२) बडिवारु= महिमा, श्रेष्ठत्व
(६३) अस्थिशृंखला = हाडकांची सांखळी, लक्षणेनें नश्वर नरदेह (७७) निर्जर = स्वर्गातले देव
(जरा म्ह. वृध्दपण नाही असे )
शर्व = श्रीशंकर  (८७) मृदु चैल = मऊ वस्त्र (९५).         

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP