मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय अठ्ठाविसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो सद्‍गुरु रामा । परा प्राणेशा पुरुषोत्तमा । क्षराक्षरा़ची येथूनि सीमा । मातृका उगमा तूं मूळ ॥१॥
एकधा दशधा समस्त । वाक्‍ पाणि पायुपस्थ । (१) स्वसुखें विचरसी देहेन्द्रियांत । गगनातीत चिद्रुपा ॥२॥
श्रीआदिनाथांपासोनि देखा । मच्छेंद्र गोरक्ष गहिनी ऐका । जी जी वर्णिली गुरुपीठिका । रघुनाथ जनकापावेतों ॥३॥
जैसा दीपाचेनि दीप । लावितां, थोर सानें रुप । निर्धारी तयाचा साक्षेप । सुनाट जल्प जयापरी ॥४॥
यालागी जो श्रीआदिनाथ । तोचि हा श्रीराम की मम तात । आम्हां दीनांच्या कणवा समर्थ । महीं विचरत अनुदिनीं ॥५॥
असो, श्रीआदिनाथापासोनी । संख्या एकादश सिध्दासनीं । सुजन विश्राम कैवल्यदानी । जगदुध्दरणीं अवतरला ॥६॥
लीलावतारी अवनीवर । सुपवित्र कुळीं गौतम गोत्र । कर्मभूमीस योगीश्वर । घेत अवतार दीनार्थे ॥७॥
जनक जननीचे नामाभिधान । प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण । त्याचे कुशीं हें गुण निधान । श्रीराम चिद्‍घन मम गुरु ॥८॥
अहा त्यांचे साद्यन्त चरित । मज वाकशून्याचेनि निश्चित । न वदवें; परी धिंवसा मनांत । अत्यद्‍भुत वर्णनीं ॥९॥
म्हणवोनि पुढत पुढती लवलाहे । ध्याये गाये नयनीं पाहे । तरी निजान्तरा तृप्ति नोहे । भुकेली राहे मनीषा ॥१०॥
ऐशिया सद्‍गुरु चित्सुख राशि । मानसातीत मम मानसीं । राहोनि निजलीला प्रेमेंसी । वदवी, सज्जनासी प्रिय जे का ॥११॥
सांडोनि गुणत्रय पंचभूतें । निरालंबीं चालवी मातें । वाच्य वचन, वक्तृत्वातें । सारोनि, ग्रंथातें चालवी ॥१२॥
यापरी अनन्यापत्यो वचन । ऐकोनि रघुराज कृपाघन । अभय वरदकरें गौरवून । देत आलिंगन सप्रेमें ॥१३॥
तया सप्रेमाचिया गोठी । बोलतं परेसी पडे मिठी । मा, ते कैसेनि येईल वाकपुटीं । मौन कसवटी सांडोनी ॥१४॥
अहा सांडवोनि जीवबुध्दि । झाडोनि देहत्रय उपाधि । निवटोनि आपपर वेलावधि । घेतिलें दयाब्धी आत्मबोधीं ॥१५॥
असताकारासी बिंदुलें । घालोनि आपणियातें मेळविलें । अद्वयबोधें स्वानंदसोहळे । मातें भोगविले श्रीरामा ॥१६॥
ऐसिया जी कारूण्यमूर्ति । एकाननें अल्पमतीं । ध्येय ध्यानादी घेवोनि बुंथी । स्तवनीं केउती सरे मी ? ॥१७॥
तरी तव कृपेचा आवांका । देवोनि सुरस नेटका । ह्रदयीं वसोनि अनुवादे का । सज्जनजनका दिनमणि ॥१८॥
श्रीआदिनाथकुलप्रकाशा । योगमूर्ति योगाधीशा । सच्चिद‍घनानंदावतंसा । निबिडतमानाशा तमारि ॥१९॥
सच्चिदानंद त्रिपदासाठीं । साकारलासी आब्रह्मकोटी । पिंडांड क्षराक्षराचे घटीं । व्यापोनि मूळपीठीं नांदसी ॥२०॥
तेथें दुजेनवीण मी एक । अस्ति भाति प्रियेसी देख । नामरुपाचा धुवोनि कलंक । रिघे दीन रंक स्तवनासी ॥२१॥
(२) सांडोनि देहत्रयाची खोळी । लंघोनि अवस्थात्रयाच्या वोळी । दिधली निजसुखाची नव्हाळी । स्वपदातळीं रक्षोनी ॥२२॥
मातें कडेखांदी वाहोनी । निजमुखींचा मम आननीं । प्रेमपडिभरें कवळ घालुनी । वाढविले जननी करतळीं ॥२३॥
दुर्लभ तवाननींचा सुरस । प्रेमपडिभरें सुधारस । प्यावया अभिनव धरिला सोस । माये त्वां हव्यास पुरविला ॥२४॥
यापरी अबोलणी जी जी । घेतली आळी पुरवी माझी । आतां ग्रंथान्वयाचे काजीं । राहोनि वाकध्वजीं विराजे ॥२५॥
माझे परमगुरुपर्यंत । वर्णिले सिध्दचरित । आतां तव लीलेस अपेक्षित । श्रोतयांसमवेत मन माझें ॥२६॥
सद्‍गुरु महादेवाचे करा । स्वशिरीं वाहोनि रामचंद्रा । आम्हां अनाथा भवसागरा । तारिले दुस्तरामधूनी ॥२७॥
ऐशिया श्रीराम सद्‍गुरु । भवाब्धिमाजिलें तारक तारूं । अनन्य जीवासी देऊनि थारु । पाववी परपारु अनायासें ॥२८॥
तुझिया बिरुदाचे समपदा । माथां वाहोनि भवआपदा । दुरावलों; जी आनंदकंदा । चिद्‍घनानंदा श्रीमूर्ति ॥२९॥
भवाचिया भेणें सकळ । जीव झाले अतिव्याकुळ । परी तूं आम्हा सदय कृपाळ । नेदिसी अतळों भवबाधा ॥३०॥
तुझिया समपदाचें छत्र । माथां वाहोनि; घोरांदर । मायानदीचा लंघिला पूर । दुराविले दूर जन्ममृत्यां ॥३१॥
तुझ्या सदया सकृप संचार । अजन्म्या आम्हांचिलागी कीर । तुवां आदरिला अवनीवर । भवभय दुस्तर जाणोनी ॥३२॥
अगा उदाराचिया राया । सद्‍गुरु रामा प्राणसखया । करुणानिधी तरणोपाया । दावोनि, माया निवटिलीसी ॥३३॥
तुवां निज पितयातें पाही । देवोनि भाक, स्वस्वरुपाही । ठायीं पाडोनि; पुढिलांतेंहीं । लाविली सोई साधकां ॥३४॥
ना ते माया नदीचिये लोटे । वाहावले जी मोठमोठे । विश्वामित्रा सम तापसी लाठे । तेथें जीव मी कोठे ! कोण केवा ?॥३५॥
नाहीं भक्ति नाहीं ज्ञान । क्रियाकर्मादि आघवा शून्य । (३) पंचभूतीं सानुला होवोन । अवंती जन्ममरण येरझारा ॥३६॥
अहं देही अहं जीव । अहं ममतेचाचि गौरव । अहमात्मा हा पुसोनि ठाव । विचरे अभिनव अवकळा ॥३७॥
परी अंतरी श्रमाचा लेशु । न मनोनियां बुध्दिभ्रंशु । जन्ममरणावर्ती पशु । भंवे निशीं दिवस अगणित ॥३८॥
हा हा तूंतें सर्वोत्तमा । सर्वव्याप्ता आत्मयारामा । सुखैकमूर्ति परिपूर्णका। नेणोनि दुर्गमा रातलों ॥३९॥
बा तुवां जन्म कर्म गुण । अजन्म्या आमुतें आचरोन । देखी लाविसी; आडरान । भरलिया अज्ञान जीवासी ॥४०॥
सिध्द साधकीं जे जे प्रणीत । मोडोनि ऐस ऐसे सत्पथ । अव्हाटाभरीं भरिलें चित्त । लाभ अखिलार्थ नेणोनी ॥४१॥
ऐशिया अज्ञाना अतिमूढा । इष्ट देवोनि, आपुले कडा । वोढोनि; काळाच्या पाडिसी दाढा । यापरी गाढा तव महिमा ॥४२॥
अगा कनवाळा कृपामूर्ति । अगा दीनोध्दारा जानकीपति । तुझे गुण गण गणनीं आपुली मति । रिघेल केउती कैसेनि ? ॥४३॥
तंव श्रोते बोलती आतां । जें बोलसी ते गोड तत्त्वतां । परी आपुले मूळ भावार्था । घेवोनि, ग्रंथा चालवी ॥४४॥
राघवें निजतातासी भाष्य । दिधलियाचा कवण उद्देश । तरी तें आम्हां रसाळ सुरस । पाजोनि सुधारस निववी का ॥४५॥
सिध्दचरित्र चिंतामणि । तूं हे खाणी आजिचे दिनीं । उघडलिसी आम्हांलागुनी । त्यांतील शब्दमणी लेववी ॥४६॥
सिध्दचरित्र अपूर्व कथा । ऐकतां धणी न पुरे तत्त्वतां । यालागी मागिले भावार्था । घेवोनि, ग्रंथा चाल वेगीं ॥४७॥
आजि दशेन्द्रियीं साचार । श्रवणेंद्रियाचें भाग्य थोर । निज जनकासी धीर गंभीर । बोलिला रघुवीर काय ? सांगे ॥४८॥
ऐकोनि श्रोतयांचा आदर । कथाश्रवणीं अति सादर । तैं श्रीरामपदीं नमस्कार । घालोनि, सुखकर वदतसे ॥४९॥
अहो जी संतमूर्ति कृपाळा । अवधान मातें अरुष बाळा । नवल देवोनि, पाळिला लळा । बोबडिया बोला परिसोनि ॥५०॥
सिध्दचरित्र ग्रंथ कोडीं । वर्णनिं मन्मति अत्यंत थोडी । परि अवधाना देवोनि, गोडी । वदवा आवडी निजकृपें ॥५१॥
तुम्हां संतांचे वचनेंकरुन । जेवीं चातकालागोनि घन । तेवी वोळला राम चिद्‍घन । ह्रदिस्त राहोनि जगदात्मा ॥५२॥
परी चातक तृषा ते किती । तृप्त करील आघवी क्षिती । स्वतात-मिषें श्रीराममूर्ति । साधकाप्रति निववील ॥५३॥
तें अवधारा संतश्रेणी । सुकृताचळीं एके दिनी । प्राप्त काळाचिये मांडणी । प्रबोध दिनमणि उदेला ॥५४॥
(४) तदा ’ नारायणा ’ चे अंतरी । सद्‍गुरुप्राप्त्यर्थ चिंता भारी । उदेजोनि; भेदिली जिव्हारी । येती लहरी कष्टाच्य्दा ॥५५॥
दुर्धर वैराग्य अग्नि शिखा । तेणें पंचीकृताचा तवका । विराल्या मनबुध्दि चित्तादिका । संसार नेटका सुचेना ॥५६॥
म्हणे हरहर आघवी मियां । वयसा द्डविली कीं वांया । आतां मातें सद्‍गुरुराया । केधवां पायां दाविसी ॥५७॥
प्रपंचीं बहुसाल तत्त्वतां । विचरोनि, जोडिले वित्त गोता । ना तें पुण्य ना पुरुषार्थ । आयुष्य वृथा दडविले ॥५८॥
ऐसियापरी असमसाहसा । शिणशिणोनि श्वासोच्छ्‍वासा । सोडोनि; हाय म्हणे जगदीशा । सकला मी कैसा नागवलों ॥५९॥
धांव पाव बा नारायणा । अमूर्तमूर्ते अनंतकल्याणा । माझ्या लोपलिया निजधना । देवोनि, अनन्या आपंगी ॥६०॥
चुकल्या ठेवियाचे ठाया । तूं वांचोनि सद्‍गुरुराया । कोणें दावावें बा गा माझिया । सांगे सदुपाया करुणाब्धि ॥६१॥
ऐशिया ग्लानीं आत्यंतिका । व्यापिलें देखोनि निजाचा सखा । घाबरा होवोनि पुसिलें हें कां । आदरिलें जनका दुःखातें ? ॥६२॥
कां हे आदरिली विकळता । वांछितसा कवणिये अर्था । काय तुम्हातें न्यून तत्त्वतां । गमलें चित्ता स्वामीचिया ? ॥६३॥
ऐसा आनंदानंद नाथ । निज जनकासी जानकीकांत । सद्‍गुरु माझा श्रीराम तात । पुसोनि, सद्‍गदित जाहला ॥६४॥
कळवळयाची जाति विचित्र । त्यामाजीं हे तों पितापुत्र । येरयेरां अभिन्नान्तर । आन विचार कें असे ? ॥६५॥
न धरत चालिलें स्फुंदन । नयनीं लोटलें जीवन । दोघां पडिलें आलिंगन । सुखसंपन्न स्वाधिकारी ॥६६॥
ऐसी अतुल मुक्ता मुमुक्षा । मिळणी ज्ञान विज्ञान दक्षा । जाहलीं; परी पुढील अपेक्षा । सर्वधीसाक्षा जाणवली ॥६७॥
मग ती परमावस्था चांगा । परि ते धीरें लोटोनि मागां । म्हणती वत्सा राघवा गा । माझ्या अंतरंगा विसांविया ॥६८॥
बा रे तुजसारिखा मातें । पुत्र लाहोनि परवस्तूतें । भेटी नोहे; म्हणवोनि चित्तें । खेदें आयुष्यातें क्षीण केलें ॥६९॥
तरी स्नेहाळा माझिये उदारा । जरी तूं आलासी रामचंद्रा । तरी या दुस्तर भवसागरा । मधूनि परपारा पाववी ॥७०॥
म्यां ग्रंथाचे अवलोकन । बहुतापरी समाधान । व्हावयासी केलें आपण । परि न वचेनि शीण अंतरींचा ॥७१॥
यालागी मातें रघुनंदना । सदुपाय सांगे; शांतवी मना । कोणती धरुं ध्यान धारणा । जन्ममरणा नाशक ॥७२॥
माहावाक्यार्थ सप्रतीति । निजानुभवीं बाणेल वृत्ति । देहीच जोडे विदेहस्थिति । ते दशा केउती श्रीरामा ? ॥७३॥
दुजेन वीण एकलें एक । आब्रम्ही संचले चिदैक्य । कामकर्दमाचा कलंक । नलगेचि देख सर्वथा ॥७४॥
ध्येय ध्याता आणि ध्यान । त्रिपुटी गुणेसी होय क्षीण । ऐसें अव्यंग अचिंत्य साधन । कें ? ते रघुनंदना मज सांगे ॥७५॥
राघवा जर्जरीत जरा । इयेचा अंतरी भेदरा । हे काळनदीमाजिले पुरा । लोटील सैरा वाहुटिये ॥७६॥
अरे या नदीचे खळाळीं लक्ष चौर्‍यांशी जीव सकळी । जन्म मरणाचे हलकल्लोळीं । झाले रवंदळी कासाविसी ॥७७॥
हे पाहोनि रघुनंदना । धीर न गिंवसे माझिया मना । विपरीत अत्यंत उठे कल्पना । तरी सद्‍गुरुराणा भेटवी तूं ॥७८॥
भेटवितांचि सम साम्य पायीं । मिठी घालीन उभय बाहीं । जेथें कळिकाळा रीघ नाहीं । परात्पर पाही पूर्ण ब्रह्म ॥७९॥
देखोनि अवस्थाद्‍भुत तात । राम झाला रोमांचित । म्हणे कैं हे वृत्ति होईल शांत । सद्‍गुरुनाथ कैं भेटे ? ॥८०॥
धन्य मुमुक्षा धन्य तात । म्हणवोनि हरुष शोकांन्वित । झाले रघुनाथाचें चित्त । मेदिनी सांडित नयनाश्रू ॥८१॥
आतां मातें सद्‍गुरुची । कोण सांगेल शुध्दी साची । कैं हे तात अंतरीचीं । ऐकेन प्राप्तीचीं उत्तरें ? ॥८२॥
स्वानन्दोन्मुख हर्षभरित । कैं मी देखेन माझा तात । संसार बागुलें भयाभीत । केलें चित्त व्यामोही ॥८३॥
तरी तो आतां निजवस्तूचा । दाता कैवल्यदानी साचा । त्यातें ठायीं पाडोनि; पित्याचा । ह्र्त्ताप साचा हरवीन ॥८४॥
वोसरे अंतरीचा शीण । ऐसें मृदुमधुर वचन । तातासी सांगोनि समाधान । नमस्कारोनि तोषवी ॥८५॥
अहर्निशीं सन्निधानी । अनालस्य पितृसेवनीं । कालक्रमणीं तोष मानी । उरला संच्चिंतनीं सारित ॥८६॥
भगवल्लीला सुसंवादें । गद्यपद्यादि ऐक्यबोधें । पितृखेदासी विरवोनि; सुबुध्दे । परमानंद प्रकटिला ॥८७॥
अहो मम ध्येय श्रीराम । सच्चिदानंद स्वानंद धाम । जेथें वसे तो परिपूर्ण काम । साकार ब्रह्म जगद्‍गुरु ॥८८॥
तेथें दुःख शोक मोह । कैसेनि राहील दुःसमूह । ठायींचे ठायीं सांडोनि गेह । निमाली सर्व तत्क्षणीं ॥८९॥
ऐसिया परी सदानंदीं । ध्येय ध्यान पूजाविधि । अनाग्रही देह प्रारब्धीं । ठेवोनि सुधी सुखरुप ॥९०॥
पितापुत्री सदभ्यासी । यथोचितें यम नियमेंसी । आगमोक्त कर्मे अहर्निशीं । शास्त्रोक्त दीक्षेसी आचरिती ॥९१॥
उदय अस्तीचे राहाटी । जीविकावर्तनादि अटाटी । ते ते आघवी पूर्ण दृष्टि । ब्रह्मार्पण पुष्टि पावली ॥९२॥
खुंटली भ्रांत मनाची धांव । पुसिला बध्दमुक्तीचा ठाव । गुरुवाक्ये सद्रूप राणीव । भोगी सदैव समसाम्य ॥९३॥
ऐसे सदानंद स्वार्थी । आयुष्य वेंचिलें परमार्थी । शेष राहिलियाची स्थिति । तीही निगुती अवधारा ॥९४॥
यजन याजन अध्ययन । अध्यापन, प्रतिग्रह; दान । ऐक्यानुभवी षट्‍कर्म चिह्न । शास्त्रोक्त संपन्न देहगेही ॥९५॥
आप्तवर्गादि स्वजन मित्रा । प्रतिपाळिलें दारापुत्रा । यापरी स्वयें गृहाचारा । केलें आपपरा समदृष्टी ॥९६॥
भूतमात्रीं सदय परम । संपादिल गृहस्थाश्रम । द्विज देव तीर्थी श्रध्दासंभ्रम । अंतरीं निर्भ्रम गुरुवाक्यें ॥९७॥
भागवतधर्मी भाग्यनिधि । निष्काम कर्मे भगवत्पदीं । चतुर्विध धर्मार्थादि । पुरुषार्थसिध्दि साधिलि ॥९८॥
तदुपरी पुढें तुर्याश्रमीं । देह ठेवोनि, परंधामीं । स्वल्पकाळें आत्मारामीं । परमविश्रामीं पावलें ॥९९॥
तेव्हां गुरुदेव आणि तात । सुपुत्रीं निश्चयो अचंचलित । ऐक्य भावें ब्रह्मीभूत । कर्मे दशान्त सारिलीं ॥१००॥
परी अंतरीं उदासीन । पितृवियोगाचा शीण । नावरे न धरवे म्हणवोन । रामें विचारणा मांडिली ॥१०१॥
अहो हा अघवा असदाकार ।  मायिक अवघें वोडंबर । निश्चयें; परि दुर्निवार । मातापितरीं वियोग संभवेना ॥१०२॥
यति सर्वस्वातें सांडी । विरजाहोमीं आघवे मुंडी । परी मातृमोहे थोकला दंडी । राहे पिंडीं वेदाज्ञे ॥१०३॥
मा येराची काय कथा ? । ज्ञाता, परि सद्‍गुरुनाथा । मानसीं नावरे वियोगव्यथा । पुनःपुन्हां ताता आठवी ॥१०४॥
जेवीं उपासका उपास्यदैवता । तेवींच पिता श्रीरघुनाथा । भिन्नभावो कहींच चित्ता । स्पर्शिला नव्हता राघवीं ॥१०५॥
ते अवचिता कालवशें । एकाकी समाधान अपैसें । लोपलें तेणें चिंता विशेषें । वाढली दिसे जनदृष्टीं ॥१०६॥
असो, येथोनि रामचंद्र । सद्‍गुरुप्राप्त्यर्थ संचार । करील, ते कथा मनोहर । श्रोतीं सादर परिसावी ॥१०७॥
ऐसी दीनाचि माउली । श्रीपति वत्साची गाउली । श्रीगुरुमाय वदती जाहली । तीच लिहिली कथा येथें ॥१०८॥
श्रीपति म्हणे संतांप्रति । तुमचें अवधान कृपामूर्ति । मज वाक्शून्या देवोनि मति । वदवा अतिप्रीति ग्रंथार्थु ॥१०९॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥११०॥
श्रीराम चंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय अठ्ठाविसावा संपूर्ण ॥

टीपा -(१) एकधा दशधा समस्त.....विचरसी देहेंद्रियांत -ओवी २ :-
सद्‍गुरु हे शिष्याला मूर्तिमंत परब्रह्म स्वरुपच असतात आणि ’ एकं सद्‍ विप्रा बहुधा वदन्ति ’ ’ एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति ’
’ नेह नानास्ति किंचन ’ असें श्रुतिप्रामाण्य असल्यानें, शिष्य ह्या चराचर सृष्टींतील कोणत्याही पदार्थाला अगर शक्तीला
सद्‍गुरुस्वरुप मानून श्रीगुरु परब्रह्माचें स्तवन करुं शकतो. येथील दुसर्‍या ओवींत शरीरांतील प्राणशक्तीला गुरुस्वरुप मानलें
आहे ते उचितच होय. एकच प्राणशक्ति प्राण अपान व्यान उदान व समान या पांच मुख्य प्राणाच्या रुपानें व नाग, कूर्म,
कृकल देवदत्त व धनंजय अशा संज्ञांनीं उपप्राणरुपानें दशधा म्ह. दहा ठिकाणीं शरीरला व्यापून आहे. त्या शक्तिरुपानें
तूंच देहेंद्रियांतून ’ स्वसुखे विचरसी । ’ असे अध्यायाच्या मंगला चरणांत श्रीगुरुंचें स्तवन केले आहे.

(२) सांडोनि देहत्रयाची खोळी । दिधली निजसुखाची नव्हाळी -ओवी २२ :-
स्थूल देह, सूक्ष्म देह व कारण देह म्हणजेच अनुक्रमें पंचभौतिक शरीर, वासनात्मक लिंग शरीर व अज्ञान -अशी देहत्रयाची
आत्मस्वरुपावर खोळ आहे, आवरण आहे. सद्‍गुरु हें परोक्षज्ञानानें म्हणजेच शब्दज्ञानानें, या तिन्ही देहांचा व तुझा कांहीं
संबंध नाहीं, तूं त्यांचा दृष्टा आहेस असा शिष्यास बोध करतात व पुढे ’ सोऽहं ’ भावानें हेंच शब्दज्ञान अनुभविण्याची युक्ति
शिकवितात. हा त्रिपुटीवेगळा अनुभव म्हणजेच अपरोक्ष ज्ञान, साक्षात्कार होय. या ओवींत कवि स्वानुभाव सांगत आहेत.
मुकुंदराजविरचित ’ परमामृत ’ या छोट्याशा ओवीबध्द ग्रंथांत अतिशय सुबोध शब्दांत प्रकरण ४, ५, व ६ मध्यें या तिन्ही
देहाचें निरसन कसें करावयाचें हा बोध केलेला आढळतो. सबंध परमामृत ग्रंथच या दृष्टीनें जिज्ञासूंना चिंतनीय आहे.

(३) पंचभूतीं सानुला होवोन । अवंती जन्ममरण येरझारा -ओवी ३६ :-
सर्वव्यापी असलेलें चैतन, मायावश होऊन पंचभूतात्मक साडेतीन हात देहामध्यें जीवदशेला येतें. सानुलें म्ह. मर्यादित होते.
ह्या जीवाला जोपर्यंत स्वत:च्या सर्वव्यापक स्वरुपाची जाणीव होत नाही, जोपर्यंत ’ वस्तुतः मी परमात्मा आहे ’ या
बोधावर जीव येत नाहीं तोंपर्यंत देहाकडून घडलेलीं कर्मे मीं केली असें भ्रमानें समजून त्या कर्माची फळें भोगण्यासाठी
त्या जीवात्म्याला एकामागून एक, सारखे अनेक योनींत देह घ्यावे व सोडावे लागतात. तात्पर्य, जीव पंचभूतीं सानूला
झाल्याने जन्ममरणरुपी फेर्‍यांना आमंत्रण देत असतो, अवंतण करीत राहतो असा या ओवीचरणांतील शब्दार्थ आहे.

(४) तदा ’ नारायणाचे ’ अंतरीं । सद्‍गुरुप्राप्त्यर्थ चिंता भारी -ओवी ५५:-
श्री तिकोटेकर महाराजांचे जनक -पितुःश्री ’ नरहरपंत ’ यांनीं संन्यास दीक्षा घेतली होती. ते प्रेषाच्चारानें ’ नारायण ’ स्वरुप
झाले होते. परंतु प्रत्यक्ष ब्रह्मानिष्ठ सद्‍गुरुंची कृपा झालेली नसल्यामुळे एकदा त्यांना अत्यंत खेद वाटला. ही विषण्णता
६१ व्या ओवीपर्यंत व्यक्त झाली आहे. येथे ’ नारायण ’ शब्दानें श्रीगुरुंच्या संन्यासी वडिलांचा निर्देश आहे.

(५) धीर न गिंवसे माझिया मना ।..... तरी सद्‍गुरु राण भेटवी तूं - ओवी ७८ :- ६८ ते ७८ या ओव्यांतून पुनः महाराजांच्या
’ नारायणस्वरुप ’ पिताजींची मनोव्यथा वर्णिली आहे. श्रीरामचंद्र महाराज हे शेंडेफळ असल्यानें व स्वामीचीं सेवा करीत
असल्यानें स्वामींना ( वडिलांना ) महाराजांबद्दल फार प्रेम होते. येथें आपलें मनोरथ पुरविण्यासाठी वडील हे मुलाला तळमळून
सांगत आहेत.

(६) निजवस्तूचा दाता .....ठायीं पाडोनि । पित्याचा ह्र्त्ताप हरवीन ॥ ओवी ८४ :-
श्रीरामचंद्रमहाराज हे योगभ्रष्ट कोटींतीळ सत्पुरुष असून खरे खरे सुपुत्र असल्यानें ७८ व्या ओवींपर्यंत पित्यानें व्यक्त केलेली
आत्मोध्दाराची तळमळ ऐकून महाराजांसही गंहिवरुन आले. पूर्ण आत्मसमाधानाची खूण देणारा सद्‍गुरु आपल्या वडिलांना
लाभून, त्यांच्या मुखांतून धन्यतेचे उद्‍गार आप्ण कधीं ऐकूं असें महाराजांना तीव्रतेनें वाटूं लागले. म्हणूनच असा सद्‍गुरु
मिळविण्यासाठीं या ओवींत महाराज मनोमन प्रतिज्ञा करीत आहेत.

(७) तदुपरी पुढे तुर्याश्रमीं । देह ठेवोनि परंधामीं पावले-ओवी ९९ :-
पित्याला परमसमाधान प्राप्त व्हावे एतदर्थ सद्‍गुरु शोधासाठी श्रीरामचंद्र महाराजांनीं मनाशीं प्रतिज्ञा केली खरी; परंतु
अहर्निश पितृसेवेंत असल्यामुळें त्यांना या उद्देशानें अन्यत्र कोठें जाणे शक्य नव्हते. येथील ८७,८८ व ८९ या तीन ओव्यांच्या
अर्थाचें मनन केलें म्हणजे असें दिसते की श्रीमहाराजांनी आपल्या ठिकाणचें ’ विभूतिमत्व ’ प्रकट करुन, कपिल महामुनींनीं
जसा आपल्या देवहूनि मातेस आत्मज्ञानाचा उपदेश करुन कृतार्थ केलें तसे महाराजांनींही ’ पितृखेदास विरवोनी । परमानंद
प्रकटिला ॥ " येथील ९० ते ९९ ओव्यांतून श्रीपतींनीं श्रींच्या वडिलांच्या जीवनाचें संक्षेपानें सिंहावलोकन करुन, ते समाधिस्थ
झाल्याचा उल्लेख ९९ व्या ओवींत नमूद केला आहे.

कठीण शब्दांचे अर्थ :- पाणि=हात (२) पायुपस्थ =दोन्ही अधोद्वारें [ पायु+उपस्थ ] (२) सुनाट जल्प= वायफळ बोलणें
धिंवसा=धीर, धिटाऐ (९) वेलावधि = समुद्रांची मर्यादा (१५) बिंदुले घालणें = टिंब घालणे, पूज्य मांडणें म्ह. नाहीसें करणें
(१६) एकाननें = एका तोंडानें (१७) लाठे = प्रबळ, श्रेष्ठ, समर्थ (३५) अवंती =अवंतणे. (क्रि) आमंत्रण देतो. किंवा अवन =पोषण
करुन वाढविणें (३६) देखी लावणें = स्वतः आचरुन मार्ग दाखविणें (४०) स्व+तात= मिषें = आपल्या वडिलांचें निमित्त करुन
(५३) तुर्याश्रम = आश्रम व्यवस्थेंतील चौथा म्ह. संन्यासाश्रम . (९९) दशान्तकर्मे = आप्त वारल्यानंतर सुतक फिटेपर्यंत
करावयाचे धार्मिकविधि. (१००)

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP