श्रीगणेशाय नमः ॥
नमो जी सद्गुरु । नमितांचि, अनन्या पैलपारु । पावनिशी भवसागरु । क्षराक्षरनिर्धारु बोधुनी ॥१॥
तो बोध चौ वाचेसी पर । मन बुध्दयादि आगोचर । परि तूं अनन्याचा आदर । देखोनि, अनुच्चार वोपिसी ॥२॥
असो, मागां एकवीस । अध्यायान्तीं महादेवास । अभय वरदकरें देवोनि भाष । एकाक्षरासी योजिती ॥३॥
देखोनि मुमुक्षुदशा तीव्र । कृपेनें द्रवला रामचंद्र । म्हणे बा रे सखया धरी धीर । येतुला शोक कासया ? ॥४॥
आधींच तूं गुंडाख्याचा शिष्य । याहीवरी निज आयुष्य । जे तुवां वेंचिले अशेष । तपामाजीं ॥५॥
येणें मानें थोरु । जया अंगी अधिकारु । तया शिष्यें सेविल्या सद्गुरु । धन्य होई ॥६॥
मी ही बापा आजवरी । बहुत हिंडलों महिवरी । परी तुज ऐसा अधिकारी । विरळा देखों ॥७॥
यालागीं बा आतां । न करावी हे चिंता । शीघ्र तुझिया मनोरथा । पावशील ॥८॥
ऐसी बोलुनि भाक । तया बैसविलें सन्मुख । मग दृष्टी पुरविली नावेक । शिष्यावरी ॥९॥
तया दृष्टीच्या उन्मेखें । अंतरामाजीं प्रकाश फांके । तनु फुंजिली सुखें । महादेवाची ॥१०॥
मग प्राणापाना समेटी । करोनि; दावी उठाउठी । समाधीची हातवटी । श्रीरामचंद्र ॥११॥
तंव मनाचें उन्मन । होऊनि, नुरे देहभान । अखंड बैसला निमग्न । ब्रह्मसुखीं ॥१२॥
ऐसी झालिया स्थिति । मग कैची भवभ्रांति ? । उडाली द्वैतस्फूर्ति । महादेवाची ॥१३॥
दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपुटी गेली विरोन । आणि ब्रह्माहमस्मि भान । तेंही नुरे ॥१४॥
ऐसी गुरुकृपा -होडी । लाधोनि, गेला पैलथडी । परी समाधीची गोडी । सांडवेना ॥१५॥
एकसरे अहोरात्र । महादेव बैसे समाधींत । सुरतसुखीं उन्मत्त । कामी जैसा ॥१६॥
ऐसा देखोनि शिष्य छंदु । काय म्हणती करुणासिंधु । हा गा बरा नव्हे नादु । समाधीचा ॥१७॥
जरी हो कां अत्यंत सुख । तथापि तें वृत्त्यात्मक । वृत्ति जातां; अचूक । तेंही नासे ॥१८॥
वृत्तीचे जें अवलंबन । तेंचि मोठें बंधन । यालागी हें व्यसन । सांडी बापा ॥१९॥
(१)नावेक होतां व्युत्थान । जरी मोडे समाधान । तरी तें संमूळ अज्ञान । जाण बापा ॥२०॥
काय जोंवरी दर्पण । तंवचि मुखा असतेपण ? । वांचोनि काय वदन । नष्ट होई ? ॥२१॥
नातरी तिमिरस्थळीं । दीपे वस्तु देखिली । तैसीच दिसे; मालवली । जरी ज्योत ॥२२॥
म्हणोनि जें ज्ञेय । तें एक वेळ दृश्य होय । तरी न पावे अपाय । ज्ञापकाभावीं ॥२३॥
येथ ज्ञापक समाधि । अवधारी गा सुबुध्दि । इया दीपें ज्ञेय -निधि । देखावा गा ॥२४॥
(२)मग जेथ जेथ जाय बुध्दि । तेथ आयती समाधि । इया बोला त्रिशुध्दि । आन नोहे ॥२५॥
ऐसा जो निश्वळ दृढ । बुध्दीत झाला रुढ । (३)तयाचि नांव अखंड । समाधि ऐसें ॥२६॥
मग बैसो पद्मासनी । अथवा हिंडो जनी वनीं । परी समाधीची हानि । होईचिना ॥२७॥
तरी आतां हे सोपाधिक । सांडोनि, धरी नित्य एक । मग तूं अखंड सुख । पावशील ॥२८॥
ऐसा श्रीरामभानु । अंतरी घालितां बोध किरण । ढिलें पडलें आलिंगन । समाधीचें ॥२९॥
दशा सारोनि एकीकडे । आपण होतां ब्रह्म चोखडें । तेंचि पाही जिकडे तिकडे । महादेव ॥३०॥
ब्रह्मविद ब्रह्यैव भवति । इया वचना बोले श्रुति । ते बाणली प्रतीति । तया अंगीं ॥३१॥
तें देखोनि रामचंद्र । आनंदें दाटला सान्द्र । उदय पावतां पूर्ण चंद्र । उदधि जैसा ॥३२॥
जे शिष्य पूर्ण होतां । सुख निपजे सद्गुरुचित्ता । तें तोचि एक तत्त्वतां । जाणों शके ॥३३॥
कां जे शिशुस्तनपान । देखोनि होय समाधान । तें मातेवांचूनि आन । कवण जाणे ? ॥३४॥
असो, मग तया सुज्ञा दिधली शिष्यासी आज्ञा । परियेसी पुढती प्राज्ञा । सांगो आम्ही ॥३५॥
प्रियकरा आतां तुंवां । येथोनि जगदुध्दार करावा । संचरोनि महादेवा । दक्षिण दिशे ॥३६॥
दिधली आज्ञा गुरुरावें । स्वीकारोनि महादेवें । वंदिलें मग एकभावें । सद्गुरुपद ॥३७॥
वंदोनियां समचरण । केलें सद्गुरुसी भाषण । प्रेमयुक्त आणि पूर्ण । आत्मानुभवें ॥३८॥
महादेवें केला प्रश्न । कीं आम्ही गुंडाख्यचरण । सेवोनि उभयता; हे खूण । झांकिली कैसी ? ॥३९॥
येरु म्हणे यया बोला । तुवां जो प्रश्न केला । तयाचें उत्तर मजला । बोलतां नये ॥४०॥
नातरी हे गोठी । सद्गुरुंनीही प्रकटी । माझिया गा निकटीं । केली नसे ॥४१॥
येर्हवीं तरी कसवटी । वांचोनी सांगणें गुजगोष्टी । ऐसी नोहेचि राहाटी । सद्गुरुची ॥४२॥
मुमुक्षा वैराग्य खडतर । ऐसा व्हावा अधिकार । तैचि करिती अंगीकार । प्रणताचा ॥४३॥
परिसोनि यया बोला । श्रीचरणीं माथा ठेविला । मग महादेव निघाला । देशान्तरीं ॥४४॥
भ्रमण करीत देशोदेश । शरण आलिया उपदेश । देत चालिला योगीश । महादेव ॥४५॥
नासिक क्षेत्र पंढरपूर । तेथोनि वाई महाबळेश्वर । देखोनि; आला योगीश्वर । सांतारप्रांतीं ॥४६॥
॥कर्हाडपाशी एक गां । ’ बोरगाव ’ जया नांव । तेथें तो येई राव ज्ञानियांचा ॥४७॥
गांवापाशीं रमणीय । सकल तीर्थाची माय । अमृताही जिचें तोय । लाज आणी ॥४८॥
ऐसी पवित्र कृष्णास नदी । झुळुझुळु वाहे सन्निधीं । देखोनि म्हणे अंबुधि । कारुण्याचा ॥४९॥
की आतां कांहीं दिवस । येथेंचि करावा वास । रम्य स्थळ, नाहीं त्रास । जनांचाही ॥५०॥
कां की मोठे नगर । जेथे असती समर्थ थोर । तेथ आम्हां भीति फार । पूज्यतेची ॥५१॥
अहो आला अमुक ज्ञानी । मग तो खरा हो, का मानी । ऐसी जंव का कानीं । वार्ता येई ॥५२॥
तंव भोळेजन धांवत । बाया पोरांचिया समवेत । येवोनियां; दंडवत । पडती पुढें ॥५३॥
मग कोणी देती धन । कोणी मिष्टान्न भोजन । ऐसी करिती मान । नानापरी ॥५४॥
अनपत्य याचक पुत्र । आंधळे मागत्ती नेत्र । कुष्ठी म्हणती गात्र । बरे करा ॥५५॥
ऐसे बहुधा संसारीक । घेरिती तया लोक । परी त्यांत ज्ञानशोधक । ऐसा विरळा ॥५६॥
ऐसी पट्टणाची रीति । जेथे मूर्खाची संगति । तेथ करावी ना वस्ती । नावेकही ॥५७॥
नातरी खेडीं भिकार । जेथें नीचांसी व्यवहार । तेही आम्हां साचार । योग्य नव्हे ॥५८॥
परि तैसा नव्हे हा गांव । आवडे आम्हां योग्य ठाव । ऐसें चिंतोनि महादेव । तेथ राहे ॥५९॥
आही महानदी वाहे । वरी महा-देव राहे । तेणें वाटे क्षेत्र हें । वाराणशी ॥६०॥
जेथ महादेव मिरासी । नदी समान गंगेसी । ऐसा गांव वाराणसी । कां न म्हणों ? ॥६१॥
करी कृष्णस्नान । सेवी मधुकरीचें अन्न । आणि सर्वदा निमग्न । ब्रह्मानंदीं ॥६२॥
आधींच नलगे होता पसारा । त्यावरी निवर्तलीई दारा । मग योगावांचोनि दुसरा । मार्ग नेणे ॥६३॥
अहर्निशीं योगयुक्त । ब्रह्मानंदी डुल्लत । नदीतीरीं एकान्त । सेवीतसे ॥६४॥
परी ऐसा ब्रह्मवेत्ता । आपुल्या गांवी असतां । नवल; तयाची योग्यता । नेणे कोणी ॥६५॥
येर्हवीं तरी साधूजन । झांकोनि आसती निजज्ञान । कष्टें मेळविलें धन । कृपण जैसा ॥६६॥
लोक म्हणोत हा मूढ । कां लागलें यया वेडे । ऐसी घेतली चाड । जीवी तया ॥६७॥
पैं हे गा सत्पुरुष । निजज्ञानाचा प्रकाश । होतांचि म्हणती नाश । सर्वस्वीं जाहला ॥६८॥
आधी कृपणाचें धन । वरी देखतां नेत्र हीन । मग तयाचे दर्शन । केवी होई ? ॥६९॥
तैसे हे संतजन । गुप्त राखिती जाणपण । झांकला जैसा हुताशन । राखेमाजीं ॥७०॥
याहीवरी ऐसे लोक । जया नाहीं निकी पारख । कांच हिरा दोन्ही एक । मोले लेखिती ॥७१॥
ऐसा दो पक्षीं प्रतिबंध । गुप्त वस्तु जन अंध । मग कैचा वस्तुबोध । तया दृष्टीं ? ॥७२॥
परी असो हे वाग्जाळ । यापरी दीनदयाळ । क्रमीत असतां काळ । ब्रह्मानंदी ॥७३॥
तेथें एक कुलकर्ण्याची । पत्नी पतिव्रता साची । सेवा करी तयांची । एक-भावें ॥७४॥
अकस्मात एके दिवशीं । इच्छा उपजली मानसी जे घ्यावा स्वामीपाशीं । अनुग्रहो ॥७५॥
म्ग धरोनि दृढ चरण । अनन्यभावें जाय शरण । विनवी ’ माझें जन्ममरण । निवारावें ’ ॥७६॥
देखोनि बाईची भक्ति । करुणासागरीं आली भरती । मग कुरवाळोनिइ ऊठ म्हणती । महादेव ॥७७॥
मस्तकीं ठेवोनि कर । सकळ वेदांचे सार । निःशब्द नामोच्चार । श्रीनें दाविला ॥७८॥
मंत्रोच्चार दहा वेळां । होतां, तेजाचा बंबाळा । दिसे गगनीं वाटोळा । सूर्य जैसा ॥७९॥
तयामाजीं चोखडें । सद्गुरुचें रुपडें । देखोनि झालें वेडें । चित्त तिचें ॥८०॥
आनंदाश्रुं भरले डोळे । काया न्हाली स्वेद जळें । वारंवार उचंबळे । सत्त्वसुखें ॥८१॥
दशा झळंबली अनावर । मूर्च्छित पडली धरणीवर । तंव गुरुराये सत्वर । सावध केली ॥८२॥
मग उघडोनि नेत्रकमळें । चरणीं मस्तक ठेविलें । म्हणे मी धन्य झालें । आपुल्या कृपें ॥८३॥
आतां इतुकीच इच्छा तीव्र । की जें देखिलें रुप सुंदर । तेंचि असावे निरंतर । दृष्टीपुढें ॥८४॥
यावांचोनि कांही । दुजी अपेक्षा नाहीं । तंव सद्गुरु म्हणे ’ आई । तैसेंचि होवो ’ ॥८५॥
ऐसा परी सद्गुरुनाथ । पुरवी तिचे मनोरथ । मग ती घेवोनि चरणतिर्थ । जाय आनंदें ॥८६॥
सद्गुरुकृपा झाली थोर । वरी सतीचा अधिकार । मग तेथें साक्षात्कार । कां न होई ? ॥८७॥
अहो नवल हे केवढी । सद्गुरुकृपेची प्रौढी । शरणागतां लवडसवडी । मुक्त करिती ॥८८॥
येर्हवी तरी पदारविंदा । भ्रमर झालिया संसारान्धा । नेत्र देणें हाचि धंदा । ज्ञानियांचा ॥८९॥
याचिलागीं तया हिंडणे । याचिलागी जनीं असणें । किंबहुना शरीर धरणें । याचिलागीं ॥९०॥
अंतरी उगवतां ज्ञानवल्ली । बाह्य चिह्ने पालट्लीं । रुपान्तरा पवली । गर्भिणी जैसी ॥९२॥
(४)नातरी वैद्य चतुर । भेटलिया रुपान्तर । पावे जैसा आतुर । क्षयरोगी ॥९३॥
तैसी हे पतिव्रता । महादेवकृपा होतां । पालटोनि गेली सर्वथा । क्रियाजाती ॥९४॥
(५)परैक्यध्यानासाठीं । तियेचि विघडे नित्य रहाटी । जैसी जारिणीची विटीं । सक्त होतां ॥९५॥
जेथ घालावे तिखट । तेथ घाली पीठ । शर्करास्थानीं मीठ । क्षिरीमाजीं ॥९६॥
निजानंदाचिया ऊर्मी । विपर्यास होई गृहकर्मी । परी पतिसेवा दानधर्मी । कधी न चुके ॥९७॥
अहो नवल हे चोखटें । तें आवडे वोखटें । ऐसें गाणें उफराटें । संसाराचें ॥९८॥
विपायें आपला सुत । पाहों लागला वेदान्त । म्हणे कीं ’ झाला महतघाट । तीर्थरुपाचा ’ ॥९९॥
तेवींच निजकांता । संतचरणीं वोळंगता । वाटे झाली रता । परपुरुषासी ॥१००॥
भांग कनक अफू सेवन । किंवा हो का मद्य प्राशन । परी नको म्हणती व्यसन । वेदान्ताचें ॥१०१॥
ऐसे जे हे जन । शिश्नोदर परायण । तया वाटे मरण । सत्संगति ॥१०२॥
असो, ऐसी भार्या -स्थिति । देखोनि म्हणे पति । कैसेनि हे विकृति । एकाएकीं ॥१०३॥
हा काय भूतसंचार ? । कां म्हणो रोग विकार ? । का पिसें लागले थोर । इजलागीं ? ॥१०४॥
पूर्वी होती सुगरण । प्रपंचीं मजसमान । परी तें गेलें जाणपण । कवणे ठायीं ? ॥१०५॥
बैसल्या ठायीं बैसे । आणि विनाकारण हांसे । हाय देवा पिशाच्च कैसे । लागलें हें ? ॥१०६॥
हेंही असो एक वेळीं । जे पत्नी जाहली खुळी । परी मांडिली दिवाळी । ब्राह्मणांची ॥१०७॥
आल्या गेल्या ब्राह्मणां । जरी वाढों लागे अन्ना । तरी काय कोरान्ना । मागावे म्यां ? ॥१०८॥
आणि अन्न वाढणें तेंही । पंक्तिभेदें मुळीच नाहीं । एकसरी दूधदहीं । घालीच घाली ॥१०९॥
ऐशिया परी बाईल । झाली जरी प्रतिकुळ । तरी आतां होईल । प्रपंच कैसा ? ॥११०॥
ऐसा तियेचा भर्ता । अहर्निशीं करी चिंता । तंव तयाचे कानीं वार्ता । आली ऐसी ॥१११॥
की महादेव नामा । कोणी एक द्विजन्मा । आला आहे गांवीं; महिमा । तयाचा हा ॥११२॥
त्यांही दिधला उपदेश । तेणेंचि होय बुध्दीभ्रंश । पत्नीचा, आणि नाश । प्रपंचाचा ॥११३॥
ऐसी वार्ता येतांचि कानी । पेटला तयाचा क्रोधाग्नि । पादस्पर्शे जैसा फणी । फडा करी ॥११४॥
म्हणे जो ऐसें वेड । लावी कांतेसी दुवाड । तयाचा निश्चयें सूड । उगवीन मी ॥११५॥
जो येतुला दुःखावह । कवण म्हणे तो अनुग्रह ? । लागला दुजा शनिग्रह । आम्हांसी हा ॥११६॥
पाय लागता जयाचे । घर होई सोनियाचें । तेंचि म्हणावे साचे । साधुपुरुष ॥११७॥
येर्हवी ऐसे वंचक । भूमीवरी अनेक । हिंडती जनां दुःख । द्यावयासी ॥११८॥
देती द्रव्य ना दारा । सहाय्य ना संसारा । आणि घालिती पसारा । अनुग्रहाचा ॥११९॥
उपदेशाच डांगोरा । पिटोनि, वंचीत स्त्रिया पोरां । ऐशियांते देई थारा । तोचि मूर्ख ॥१२०॥
ऐसें निंदा -वाग्जाळ । बोलोनि तो बरळ । महादेवाचा छ्ळ । करूं पाहे ॥१२१॥
जाणों केलें साहित्य । नरक यात्रेचें हे सत्य । जे साधूचें पारिपत्य । चितिलें दुष्टें ॥१२२॥
होता तया एक कुमरु । तोही तैसाचि कठोरु । का जे बीज तैसा तरू । अंकुर घेई ॥१२३॥
पुत्रा घेवोनि बरोबरी । आला विप्राशेजारी । मग साधूची पूजा करी । निंदापुष्पें ॥१२४॥
चोरा सांपडलासी भला । कुशल प्रश्न हाचि पाहिला । मग आणिक वर्षाव केला । निंदा शब्दीं ॥१२५॥
जन्मापासोनि शिव्या । पहिल्या आणि नव्या नव्या । योजूनि देती तया । पितापुत्र ॥१२६॥
निंदा शब्दाचा झाडा । होतांचि; घेवोनि कोरडा । दुष्टें वोढिला कडकडा । पाठीवरी ॥१२७॥
याहीवरी तृप्ति । होईचिना तया चित्तीं । मग ते दुष्ट हिरोनि घेती । आसनादिक ॥१२८॥
यापरी ते सद्रिपु । विप्रा गांजिती अमूपू । जैसा हिरण्यकश्यपु । प्रल्हादासी ॥१२९॥
परी नवल तयाची शांति । जो ऐशिया दुष्टा आघातीं । तिळमात्रही चित्ती । ढळेचिना ॥१३०॥
भूताघात सहनीं । जरी प्रशंसिली धरणी । परी तीही याच्या उणी । शांतीपुढें ॥१३१॥
येर्हवी तरी चोखटी । स्वरुपी पडलिया मिठी । संत घालिती गांठी । देह-प्रारब्धा ॥१३२॥
प्रारब्धाचा क्षय । भोगावांचोनि न होय । ऐसा तयाचा निश्चय । रुढ झाला ॥१३३॥
ऐशियाच्या मुखांतुनी । जरी निघे क्रोध-वाणी । होळी होय तेचि क्षणीं । छळकाची ॥१३४॥
परी जेथें नसे मुळी कोप । तेथें कैचा निघे शाप ? । कां जें शुध्द सात्त्विक तप । ज्ञानियाचें ॥१३५॥
सांडूनि आपुलें मंडळ । जरी भानु ये पृथ्वीजवळ । तरी लोकसृष्टी सकळ । जळोनि जाई ॥१३६॥
नातरी समुद्र रेषा । सांडोनि, धांवे भलतैसा । तरी मग लोक कैसा । सुखी राहे ? ॥१३७॥
परी जैसे हे दोघे । सामर्थ्य असोनि अवघे । प्रकाशें आणि मेघें । जीवविती जग ॥१३८॥
तैसे हे सज्जन । जरी सामर्थ्य परिपूर्ण । तयापासोनि अकल्याण । होईचिना ॥१३९॥
परी अधी अर्धी मोडली । वरी काकें अधिष्ठिली । तये निमित्तें खाली पडली । फांदी जैसी ॥१४०॥
तैसे एक होय वर्तमान । मूळ तयाचें जाणे कवण । परी जगा झालें कारण । बोलावया ॥१४१॥
एके दिवशीं अकस्मात । पडिला कुलकर्ण्याचा सुत । व्याधि नसतां मुखांत । मृत्यूचिया ॥१४२॥
मग लोक म्हणती सकळ । जो व्यर्थ केला साधू छ्ळ । तया कर्माचें फळ । वोढवलें हें ॥१४३॥
आधीं झाला पुत्रशोक । वरी दोष लविती लोक । तेणे तो बुडाला दुःख । सागरामाजीं ॥१४४॥
ऐसें होतां दुःख वाड । तयाची मोडली खोड । किंबहुना आमरण वेड । लागलें तया ॥१४५॥
येर्हवीं तरी हा लोकापवाद । कां पा म्हणावा विरुध्द । जे का येवढा अपराध । प्रत्यक्ष केला ॥१४६॥
आजि एक कुपथ्य केलें । आणि उदिया दुवाड झालें । तरी, तेंचि म्हणती भोवलें । तया लोक ॥१४७॥
जरी नेणतां उपपत्ति । कार्य-कारण संगति । दिसे तैसी बोलती । प्रत्यक्षत्वें ॥१४८॥
तरी हा लोकापवाद । न म्हणों आम्ही विरोध । जें, पाहतां दिसे संबंध । लोकदृष्टया ॥१४९॥
गुरुत्वें दुजा कैलासपति । छळिला जेणें महादेव यति । तो कां न पावे गति । मन्मथाची ? ॥१५०॥
नातरी भस्मासुर । प्राणा मुकला सत्वर । तोही प्रताप थोर । महादेवाचा ॥१५१॥
मीही म्हणे महादेव । बरवें साजे तयां नांव । जयाचा ऐसा प्रभाव । लोकां भासे ॥१५२॥
परि असो; हा न्याय । केवळ काकतालीय । अथवा हो का सप्रमेय । कैसाही हो ॥१५३॥
तरी एक सिध्दान्त निका । जे, साधूचिया छ्ळका । नरकापासोनि सुटका । त्रिशुध्दी नोहे ॥१५४॥
असो, आतां एक थोर । श्रोते वर्णू चमत्कार । जेणें दिसे साक्षात्कार । महादेवाचा ॥१५५॥
श्रीपति वंदिला ज्येष्ठ भ्राता । तुम्ही सज्जनीं धरिलें हातां । तुमचेनि प्रसादें तत्त्वतां । श्रीरामचरिता गाईन ॥१५६॥
’ कृष्णसुत ’ हे करोनि नाम । ह्रदिस्थ सद्गुरु माझा राम । तो भक्तकामकल्पद्रुम । आत्माराम बोलेल ॥१५७॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१५८॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय बाविसावा संपूर्ण ॥
टीप :- (१) नावेक होतां व्युत्थान । जरी मोडे समाधान - ओवी २० :-
पातंजल योगशास्त्रांत चित्तवृत्तींचा निरोध हाच योग मानला आहे. धारणा टिकून ध्यान स्थिरावले की हा योग साधतो.
परंतु कालांतरानें पुन्हां वृत्ति निर्माण झाली की समाधींतून व्युत्थान होते. मुख्यतः व्यवहारकालीं हा समाधींतला आनंद
त्या योगी व्यक्तीस भोगतां येत नाही. नाथ पंथांतील श्रीगुरुपदिष्ट सोऽहं जपाचा अभ्यास करणार्या साधकास समाधानासाठी
मुद्दाम सर्व व्यवहार सोडावे लागत नाहींत व जसजसे मन ह्या जपांत मुरुं लागते तसतसे व्यवहारांतही मनाचें समाधान
अढळ राहतें. येथें श्रीरामचंद्र महाराजांना तीच समाधि अभिप्रेत आहे.
(२) मग जेथ जेथ जाय बुध्दि । तेथ आयती समाधि ओवी २५ :-
या ओवीचें स्पष्टीकरणासाठीं २१ ते २५ या सर्व ओव्यांचा एकत्रित विचार करावयास हवा. तो असाः संप्रज्ञात समाधींत
[ याला ध्यान किंवा अभ्यास म्हणतात ] जी वस्तु दिसते, जें आत्म्याचें दर्शन घडतें, ते समाधीच्या वेळीं अनुभवाला आलें
व व्युत्थानकालीं अनुभवास न आले तरी ती वस्तु म्ह. आत्मा कधीही नाहींसा होत नाही. तो अखंड निरंतर असतोच.
संप्रज्ञात समाधीच्या वेळीं पाहाणार्या द्रष्टयाचा, ज्ञापकाचा एर्हवी अभाव असला तरीही आत्म वस्तु असतेच. ती नाहीशी
होत नाही सूक्ष्म बुध्दी असलेल्या ! या ज्ञापक समाधीच्या दिव्य ज्ञेयाचा विधि म्ह. आत्मा पाहावा. तो निधि अविनाशीं
असतो हे हीं लक्षांत ठेवावे. मग जिथें जिथें बुध्दि जाईल तिथें तिथें आयतीच समाधि घडेल. हीच श्रीज्ञानदेवांची
’ अव्यत्यया समाधि ’ (अ.१८) होय. ही समाधि नामप्रेमाची आहे. ताटस्थ्य समाधि नव्हे.
(३) तयाचि नांव अखंड । समाधि ऐसे - ओवी २६:-
सोऽहं म्हणजे मी परमात्मा आहे, माझें मूळचे रुप ते आहे असा बुध्दीचा निश्चय सहजतेनें व कायमचा होण्यासाठी
नाथपंथांत सो. ऽ हं जपाचें अमोध साधन सांगितलें आहे. संकल्प विकल्प हें मनाचें स्वरुप आहे व निश्चय करणें हें
बुध्दीचें कार्य आहे. ’ मी परमात्मा आहे. ’ या ऐवजीं ’ मी देह आहे ’ असा बुध्दीचा विपरीत निश्चय झाला व त्यामुळें
देहासंबंधीं अनंत संकल्प विकल्पाच्या रुपानें मन अखंड चंचलतेनें जीवात्म्यालाही नाचवू लागले. म्हणूनच सोऽहं च्या
अर्थाचें जर चिंतन केले आणि मनालाही त्या जपाचे अनुसंधान लावले तर या एकाच महामंत्रानें मनाचें मनपण मोडते,
बुध्दीचा यथार्थ निश्चय होतो. अभ्यासानें तो दृढ होतो. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वर्णिल्याप्रमाणें ’ जेथ मन आणि बुध्दीचें
ऐक्य आथी ’ असे हें योगसार सोऽहं भाव उपासनेंत आहे. जो साधक श्रीगुरुकृपेनें अशा यथार्थ निश्चयानें राहतो तो
यावज्जीव अखंड समाधीतच असतो. या समाधींत व्युत्थान ही दशाच नाही.
(४) नातरी वैद्य चतुर .....आतुर क्षयरोगी -ओवी ९३:- ओवींतील शब्दाचा अन्वय लावला कीं अर्थ चटकन ग्रहण होतो.
’ नातरी चतुर वैद्य भेटलिया जैसा आतुर ( म्ह० मरणोत्मुख ) क्षयरोगी रुपान्तर पावे. -अर्थ स्पष्ट आहे.
(५) परैक्यध्यानासाठीं । विघडे नित्य राहाटी -ओवी ९५:-
श्रीसद्गुरुंचा अनुग्रह झाल्यानंतर साधक ज्या वेळीं दीर्घकाल, निष्ठापूर्वक, निरंतर या जपाचा अभ्यास करतो तेव्हां त्याला
पूर्ण ब्राह्मीस्थिति प्राप्त होते. । कांही व्यक्तींना पूर्वीच्या जन्मांतील अभ्यासामुळें या जन्मांत दीक्षा होताच ’ मी देह नव्हे
मी परमात्मा आहे ’ हा बोध तात्काळ ठसावतो. ’ तुका म्हणे कानीं आइकिली मात । तोचि झाला घात जीवपणा । असें
महाराजांनीं वर्णिले आहे. मात्र असे उदाहरण लाखांत एक असते. त्यांचा अभ्यास पूर्वजन्मींच झालेला असतो. या दीक्षेत
श्रीगुरु शक्तिपात करीत असल्यामुळे कांही विशेष सत्त्वगुणी साधकांना ताबडतोब प्रकाश, नाद इ. अनुभव येऊं लागतात.
आत्मसुखाचा अनुभव थोडक्यात कालांत येतो आणि तें सुख अमर्याद, अविनाशी, अवीट असल्यानें मन त्या अनुसंधानांतच
रंगवून ठेवण्यासाठीं असे साधक ’ जग काय म्हणेल ’ याची पर्वा न करतां लौकिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करुनही भ्रमिष्टा-
सारखे वागतात. येथें वर्णिलेल्या स्त्रीलाही त्या सुखाची चटकन चटक लागल्यामुळे सांसारिक कामाकडे तिचें लक्ष लागेना.
व्यवहार विस्कळित झाले. वागणे अनियमित दिसू लागले. त्याचेंच येथें वर्णन आहे.
कठिण शब्दाचें अर्थ : समेटी = समेट, ऐक्य (११) पट्टण = शहर, मोठा गांव (५७) आतुर =मरणोन्मुख (९३) विटीं = मूळ शब्द विट.
विट म्ह. जार, त्याचे ठिकाणीं (९५) कोरडा = चाबुक (१२७)