श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमोजी आदिनाथा । हिमनग-नंदिनी कांता । षडास्य गणपतीच्या ताता । तव पदीं माथा ठेविला ॥१॥
अर्धनारी नटेश्वर । स्वरुप दिसे मनोहर । नारी पाहतांचि ईश्वर । पुरुषाकार भासती तूं ॥२॥
पुरुष स्वरुप विवरितां । नारीच भासे तत्त्वता । सूक्ष्म दृष्टीनें पाहतां उभयतांही न देखों ॥३॥
जुनाट बहु काळाचा । पितामह ब्रह्मदेवाचा । परी छंद तुज कामाचा । संग स्त्रीचा न सोडिसी ॥४॥
तुजवांचूनि गरोदर । जाहली जरी ते नार । तुज आवडे चमत्कार । हाचि थोर वाटतो ॥५॥
तुज निजवोनि माजघरीं । करीतसे बाजीगिरी । तरी आवडे प्राणेश्वरी । लंपटा भारी स्त्रियेसी तूं ॥६॥
ती जंव पाहे तुजकडे । तूं सूक्ष्म धरिसी रुपडें । ती जेथें जेथे पव्हाडे । तयाही पुढें तूं उभा ॥७॥
ती निर्बुजोनि परततां । जुनाट पुरुषा तुज पाहतां । जिणें टाकोनि प्राण देतां । ह्रदयीं प्रेता तूं धरिसी ॥८॥
तिचा बडिवार पाहतां । श्रमलासी तूं वयातीता । सुखें निद्रा करुं आतां । ऐसें चित्ता जरी आले. ॥९॥
तरी न सोडिसी तियेसी । ह्र्दयीं आकर्षोनि धरिसी । जागृत होतां तेजोराशि । जीवविसी तिजलागीं ॥१०॥
मग ती विचारी मानसीं । मज सुटका नाहीं ययासी । मग न विसंबे तुजसी । अहर्निशी सन्निध ॥११॥
कोठे कोठें विहार करी । तुज नेतसे बरोबरी । कोणी देखों आले जरी । पाठी धरी तुझी ते ॥१२॥
नाना चमत्कारें खेळे । तुझे सत्तेवरी लोळे । कोणी उघडोनि पाही डोळे । तों ती पळे तुजमागे ॥१३॥
झणी दृष्टी लागेल तिसी । म्हणवोनियां आच्छादिसी । पाहतया सन्मुख होसी । प्रीति ऐसी तिजवरी ॥१४॥
तीही तुजवरी लिंबलोण । क्षणाक्षणा उतरी जाण । कोणा पाहों नेदी क्षण । आच्छादून ठेवी तूंतें ॥१५॥
कोणी तुज पहावया । हठ निग्रह धरोनियां । बैसतां; मागे तें दे तया । परी पायां न पाहों दे ॥१६॥
अहर्निशी अथवा संधी । सर्वदा ही विषयछंदी । नाचती मिथुनें अनादि । वर्णिती बंदी वेद हेचि ॥१७॥
खांदीं घेवोनियां नोकरी । फिरसी आब्रह्मभुवनवरी । सर्वकाळ नृत्य कुसरी । पाहतां, नेत्रीं भूल पडे ॥१८॥
क्षणें ऊर्ध्व दिसे नारी । क्षणें पुरुषही निर्धारी । तळीं ऊर्ध्व वेरझारी । अहोरात्रीं शिणतसा ॥१९॥
परी श्रम नाही सर्वदा । हाचि गोड वाटे धंदा । स्थिर करी कोणी एकादा । त्याचा गोविंदा जीव घेसी ॥२०॥
(१)ऐसें हें अनादि मिथुन । वर्णितां, वेद जाहले दीण । महानुभाव विद्वज्जन । धरोनि मौन राहिले ॥२१॥
क्षणें गुप्त क्षणें प्रकट । क्षणें अवतार खटपट । जना दावावया वाट । खटाटोप तुमचा हा ॥२२॥
हें वर्णावयाची गोडी । वेद जाहले बांदवडी । देवऋषि घडोघडीं । अति आवडी वर्णिती ॥२३॥
ऐसा तुझा महिमा । अगम्य निगमागमा । तो तूं दयाळा श्रीरामा । सुगम आम्हां जाहलासी ॥२४॥
गोकुळीं गौळियांच्या घरीं । श्रीहरी अष्टमावतारीं । येतां, सुलभ सर्वोपरी । गोरक्षपोरीही होय ॥२५॥
ते काय जाणती अज्ञान । केउतें तुझें महिमान । परी तो धरिला अभिमान । पतितपावन नामाचा ॥२६॥
यास्तव तारिसी सकळां । गौळिया गौळणी गोपाळा । शेखीं पशुपक्षी वाघुळा । ऐसी लीला अगम्य ॥२७॥
तैसेंचि आम्हां झालें येथें । माय माउली कृपावंतें । रामें घेतले वोसंगतें । गुणदोषातें न पाहतां ॥२८॥
नातरी आमुची स्थिति । पाहतां, रोमांच उठती । परी केवळ तूं कृपामूर्ति । संरक्षिती निजदासा ॥२९॥
हेंचि साच कैसेही परी । राहावे श्रीमंताचे घरीं । त्याचा तो अभिमान धरी । दुसर्या नेत्रीं न पाहों दे ॥३०॥
समर्थाघरींचें श्वान । तया सर्वही देती मान । हेंचि सत्य सत्य वचन । अनुभव पूर्ण सर्वांसी ॥३१॥
असो; मागील प्रकरणी । रामा ध्यास गुरुदर्शनी । लागला; तोही म्हणे मनीं । यासी भेटोनि धन्य करुं ॥३२॥
इतुकी झालीसे कथा । पुढें काय वर्तली वार्ता । तीच ऐकावी जी श्रोता । सावध चित्ता करोनी ॥३३॥
गुरुशिष्याचे एकची पोटीं । कीं परस्परांची व्हावी भेटी । कांही दिवस गेलियापाठी । घडली गोष्टी ते ऐका ॥३४॥
चिंचणी ग्रामाबाहेरी । राजा पुष्पवटिका करी । त्याची व्यवस्था रामा-करी । देत निर्धारी राजेन्द्र ॥३५॥
तेथें जावोनि प्रतिदिनीं । राजसेवा संपादुनी । पुष्पें तुळशी स्वहस्तांनीं । आणिती तोडोनि पूजेसी ॥३६॥
ऐसा असे नित्य नेम । तों एके दिनीं राम । दिन लोटला तीन याम । पहाया आराम निघाले ॥३७॥
तों श्रीपंढरीचे मार्गी । पुरुष देखिला भव्यांगी । धांवोनि नमिला साष्टांगी । जो राजयोगी सद्भावें ॥३८॥
असतां गाणगापुरांत । दृष्टांती येवोनियां दत्त । ज्याचे वोसंगी घालित । तीच मूर्त प्रत्यक्ष दिसे ॥३९॥
म्हणवोनियां प्रेमभरें । चरणीं लागला राम त्वरें । तेही ह्र्दयीं धरोनि ’ बा रे । म्हणती खरें प्रेम तुझें ’ ॥४०॥
इतुके बोलोनिया हासे । (२)रामा घाली मायेचे फासे । आपण ग्रामीं येतसे । राम जातसे बागेकडे ॥४१॥
ग्रामी बापू इंदुलकर । नामें ब्राह्मण भाविक नर । रामाचा जो प्रीतिपात्र । बहिश्वर प्राणचि ॥४२॥
समानशील कीं तें व्यसन । तयासी मैत्री घडे पूर्ण । बापू इंदुलीकर ब्राह्मण । परमनिपुण परमार्थी ॥४३॥
नित्य ज्ञानेश्वरी श्रवणा । बापूचे गृहीं रामराणा । जात असे; तया गृही जाणा । आला पाहुणा श्रीगुरु ॥४४॥
पाहोनियां आनंदमूर्ति । बापू स्वगृही राहविती । आदरातिथ्यही करिती । धन्य मानिती आपणां ॥४५॥
राम जाय आराम मार्गे । उष्णें तापली सर्वांगें । म्हणोनि वृक्षच्छाये रिघे । विश्रांति घे क्षणभरी ॥४६॥
किंचित् नेत्रोन्मीलन । होतां , पडलें वाटे स्पप्न । गाणगापुरीं जो ब्राह्मण । स्वप्नी सुजाण पाहिला ॥४७॥
तोचि ब्राह्मण येवोनि । म्हणे रामा वोळखी मनीं । सद्गुरु जो मोक्षदानी । तुंते स्वप्नी दाविला ॥४८॥
ज्याचे वोसंगीं घातले तुज । तेचि ते हे महाराज । विचार करी; साधी काज । मुक्त आज झालों आम्ही ॥४९॥
इतुकें सांगोनियां गेले । राम शुध्दीवरी आले । चहूंकडे पाहूं लागले । घाबरले निजमनीं ॥५०॥
म्हणे कैसी पडली भुली । मजसाठीं गुरुमाउली । प्रकट होवोनियां आली । न वोळखिली कैसी म्यां ? ॥५१॥
कैंचा बाग कैचें जाणें । घाबरला जीवे प्राणें । म्हणे माझे सद्गुरुराणे । कोठें जाणे करतील ? ॥५२॥
याचि ग्रामी राहतील । कीं अन्य ठाया जातील ? । परी आहेती क्षमाशील । उपेक्षितील मज कैचे ? ॥५३॥
मी अज्ञान बालक त्यांचा । तो बाप दीन अनाथांचा । अंतर-भाव जाणे साचा । मज दासाचा कोण दोष ! ॥५४॥
मियां नाहीं गर्व केला । कैसी भुली पडली मला । नकळे श्रीगुरुची लीला । ऐसा लागला ध्यास रामा ॥५५॥
मग तेथून परतला । स्वगृहातें त्वरें आला । मनीं विचार करुं लागला । श्रीगुरुला कोठें पाहूं ? ॥५६॥
ऐसा जाहला चिंताक्रांत । म्हणे बापूस सांगो मात । यास्तव त्याच्या गृहा जात । तो सद्गुरुनाथ बैसले ॥५७॥
पाडस देखे हरिणी । की बाळ पाहे जननी । तैसें धांवत जावोनी । मिठी चरणीं घातलीं ॥५८॥
उचलोनियां आलिंगिला । बाळ चुकला सांपडला । हर्ष जैसा होय मातेला । श्रीगुरुला जाहलें तैसें ॥५९॥
सद्गुरुसी प्रेमभडसा । सच्छिष्याचा येत कैसा । हें सद्गुरुपुत्र जो साचा । तोचि याचा अनुभवी ॥६०॥
ध्रुव प्रल्हादादि नारद । या अनुभवाचा सुस्वाद । जाणताती; येर मतिमंद । यांचा अनुवाद व्यर्थचि ॥६१॥
करोनियां हास्यवदन । दाविली अंतरीची खूण । घेते सन्निधीं बैसवोन । समाधान वाटे रामा ॥६२॥
सूर्य अस्तास जाण्यास । बराच होता अवकाश । ज्ञानेश्वरी पहावयास । श्रीगुरुस आणून देती ॥६३॥
सोडोनियां पुस्तक पाहे । तों निघाला षष्ठाध्याय । अर्थ सांगती सद्गुरुराय । प्रेम न समाये अंतरी ॥६४॥
जे श्रोते सभाग्याचे । ते श्रवणा बैसले साचे । रामदासी आदि ग्रामीचें । नित्य नेमाचे मिळाले ॥६५॥
ग्रंथ गर्भीचा भावार्थ । सांगतां, श्रोते तटस्थ । होवोनियां एकचित्त । ऐकती ग्रंथ आनंदे ॥६६॥
षष्ठाध्यायीं योगमार्ग । अर्जुना कृष्ण यथासांगे । सांगे, प्रेमभरें अव्यंग । राजयोग परिपूर्ण ॥६७॥
परि तो युध्दाचा समय । अर्जुना गुंतवितां न ये । भूभार हरणीं उपाय । श्रीकृष्णराय योजिती ॥६८॥
म्हणे ऐशा युध्दप्रसंगी । पार्था गुंतवूं जरी योगीं । तरी भूभारहरनालागीं । कोण जगीं दुसरा ? ॥६९॥
यास्तव म्हणती हा योग । सिध्दीं जाणें कठिण भाग । वायु बांधवेल साड्.ग । परी योगाड्.ग अवघड ॥७०॥
ऐसें सांगूनियां आर्य । संपादी आरंभिलें कार्य । पुढें होवोनि आचार्य । छात्रवर्य बोधिला ॥७१॥
सांगितली उत्तरगीता । तेव्हां खूण बिंबली पार्था । लय लक्ष ध्यानी गुंततां । सायुज्यता सहजचि ॥७२॥
मग म्हणे देवाधिदेवा । आजि भक्तभ्रमर -राजीवा । हा जी पूर्वीचाचि ठेवा । आजि स-दैवा उघडिला ॥७३॥
युध्द्काळीं पुरुषोत्तमा । हेंचि सांगसी षष्ठमा । माजीं; परि न कळे आम्हां । कल्पद्रुमा ऐसे कां ? ॥७४॥
अरे हा योग बहु सुगम । म्हणत होतासी कां दुर्गम । लय लक्ष ध्यानाचें वर्म । यदुत्तम कां न सांगा तें ? ॥७५॥
ऐसा पंडुकुलावतंस । कृष्ण-मानस -राजहंस । अर्जुन, पुसतां तयास । प्रत्युत्तरास दे कृष्ण ॥७६॥
म्हणे सत्य सत्य पार्था । तुज तैंचि सांगो गुह्यार्था । परी उकलोनिया पंथा । नव्हे दाविता समय तो ॥७७॥
ऐसा होता सुखसंवादु । अर्जुनास ठसावला बोधु । मग पार्थ ना गोविंदु । ब्रह्मानंदु परिपूर्ण ॥७८॥
ऐसा ग्रंथगर्भीचा अर्थ । जाणे एक श्रीगुरुनाथ । तो उघड करितां भावार्थ । श्रोते विस्मित ऐकती ॥७९॥
म्हणती आम्ही आजवरी । नित्य वाचूं ज्ञानेश्वरी । गीतार्थही विवरुं; परी । रीति दुसरी आजिची हे ॥८०॥
एक म्हणती हा हठयोग । व्यर्थ झिजवोनियां अंग । शेखी सिध्दी न पवे साड्.ग । हा अव्यंग मार्ग नव्हे ॥८१॥
दुसरा म्हणे हेंचि खरें । आमुचें मत नाहीं दुसरें । परी आजि सज्जनशेखरें । या प्रकारें कां सांगितलें ? ॥८२॥
याची पाहतां श्रीमूर्ति । असंभाव्य वाटे कीर्ति । यासी पुसों ऐसी स्फूर्ति । आम्हाप्रति कायसी ? ॥८३॥
ऐसें परस्परें बोलतां । (३)कोणी न माने ग्रंथार्थ । संध्यासमयो प्राप्त होतां । श्रीगुरु ग्रंथा बांधिती ॥८४॥
सर्वी केलें साष्टांग नमन । रामें शिरीं धरिलें चरण । महादेव दे आशीर्वचन । अनंतकल्याण तुम्हां असो ॥८५॥
सूर्यबिंब अस्ताचळीं । मंद तेज दिसे सोज्ज्वळी । पश्चिम दिशा शोभूं लागली । प्रभा फांकली सर्वत्र ॥८६॥
बहु काळें आला भ्रतार । वाटे आत्यंतिक मित्र । यास्तव वस्त्रे अलंकार । चित्रविचित्र लेववी ॥८७॥
ती ही पसरोनि बाहे । आलिंगना आली आहे. । हाही ह्र्दयीं शिरुं पाहे । भासताहे जना ऐसे ॥८८॥
पक्षी वृक्षीं किलबिलती । आपुलाले स्थल शोधिती । धेनु पुच्छें उभारिती । धांवत येती वत्सभेटी ॥८९॥
वत्सें सदनी हंबरती । आपुले मातेसी बाहती । पथिक ग्रामामाजी येती । ठाव पाहती वस्तीस ॥९०॥
अग्निहोत्री स्नान करिती । भस्म सर्वांगी चर्चिती । होम द्यावया सिध्द होती । अग्नितृप्तीकारणें ॥९१॥
ऐसा सोहळा पाहत । ग्रामाबाहेरी श्रीगुरुनाथ । संध्या करावया येत । निर्झर वाहत ज्या स्थळीं ॥९२॥
समागमें रामराय । आणि मार्तंडपंत । आहे । संध्या जाहलिया; पाय । धरोनि, काय विनविती ॥९३॥
आपण ग्रंथ प्रस्तावना । केली ती न पटे कोणा । खरें गुह्य काय सुजाणा । आम्हां दीना सांगावे ॥९४॥
किंचित् सुहास्यवदन । करोनि सुप्रसन्न मन । उभयतांही केला प्रश्न । त्याचें समाधान सांगती ॥९५॥
म्हणती सुलक्षणी कान्ता । प्रेमें पती आलिंगितां । मीनल्या संयोग सुखानंता । रतिसुखवार्ता तैं कळे ॥९६॥
तोंवरी जें बोलणें । तें वाटे लाजिरवाणें । तैसें गुरुपदेशाविणें । कैसें बाणे अध्यात्म ? ॥९७॥
तैल, वर्ती आणि अग्नि । एकत्र सर्व ही असोनी । एका हातवटीवांचोनि । दीप नयनीं न प्रकाशे ॥९८॥
जें जें वाचे बोलतां आलें । तितुकें ग्रंथी विस्तारलें । जें अबोलणें वहिलें । ते लिहिले कें जाय ? ॥९९॥
म्हणवोनियां सर्व ग्रंथीं । मार्ग सद्गुरुच दाविती । हें न जाणोनि, मूढमति । वृथा करिती वाग्जल्प ॥१००॥
गुरुवांचूनि परमार्थ । कळों येतां, वाचिता ग्रंथ । तरी श्रीराम मूर्तिमंत । शरण जात कां वसिष्ठा ? ॥१०१॥
ऐसी गुरुमुखींची वाणी । ऐकता, राम लागे चरणीं । म्हणे मी धन्य त्रिभुवनीं । मोक्षदानी भेटलासी ॥१०२॥
कैसें करूं गुरुपूजन । काय द्रव्य त्यालागुन । पाहिजे; हें न जाणे दीन । कृपा करुन सांगावे ॥१०३॥
ऐसी ऐकतांचि वाणी । हांसे श्रीगुरु मोक्षदानीं । म्हणे परमार्थालागोनि । द्रव्य वेंचणें कासया ? ॥१०४॥
द्रव्ये साधतां परमार्थ । तरी गोपीचंदादि विख्यात । राज्य समुद्रवलयांकित । सोडोनी जात का अरण्या ? ॥१०५॥
मुख्य पाहिजे विश्वास । आणि अभ्यासी कसावी कास । हेंचि पुरे सद्गुरुस । करी आस तो गुरु नव्हे ॥१०६॥
ऐसे गुरुमुखीचें शब्द । ऐकोनि, राम राहिला स्तब्ध । शिरीं धरी चरणारविंद । धन्य प्रारब्ध म्हणे असे ॥१०७॥
ऐसें सांगोनियां गूज । ग्रामी आले श्रीगुरुराज । अरवडे ’ नामे द्विज । भावार्थ सहज, वसे ग्रामीं ॥१०८॥
त्याचे गृही वसतीस । राहाविसी श्रीगुरुस । चुकी न पडों दे सेवेस । राम-मानस तत्पर ॥१०९॥
करोनियां उपहार । शयनी पहुडलें योगीन्द्र । चरणसंवाहनी कर । राज द्विजवर योजीत ॥११०॥
जो जों घडे चरणसेवा । तों तों आनंद रामदेवा । म्हणे मम भाग्याचा ठेवा । आजि बरवा सांपडला ॥१११॥
सेवा करिता कांहीं वेळ । काय बोले दीनदयाळ । वत्सा शिणलासी प्रेमळ । भक्त केवळ तूं खरा ॥११२॥
आतां सुखें करी निद्रा । आम्हांसीही आली तंद्रा । आज्ञा देतां रामचंद्रा । गुरुपदमुद्रा वंदिली ॥११३॥
महादेव योगिराजें । निद्रा केली समाधीसेजे । सोऽहं ध्वनि चाले सहजें । नाद गाजे अनुहताचा ॥११४॥
राम चरणसन्निधानीं । पहुडे; ऐके तो ध्वनी । म्हणे ऐसी सुस्वर वाणी । गायक जनीही न ऐकों ॥११५॥
निद्रा नये रामालागुनी । म्हणे केव्हां सरेल रजनी । माझा गुरु मोक्षदानी । उपदेशुनी मज तारील ॥११६॥
जैसी नवोढा पतिव्रता । पतिसमागमीं तीव्रता । म्हणे अस्ताचळी सविता । आजि जातां कां वेळ करी ? ॥११७॥
यापरी माझिया ताता । रामा जाहली जी अवस्था । ती स-दैवास प्राप्त होता. । मुमुक्षुता साच मानूं ॥११८॥
आतां होतां प्रभातवेळ । दीनवत्सल गुरु दयाळ । उपदेशोनि राम बाळ । तृप्त तात्काळ करील ॥११९॥
मुळी माझा राम पावन । मार्गी लावावया जन । स्वयें दावी आच्रोन । गुरुमहिमान वाढवी ॥१२०॥
आतां महादेव मुनि । बोधितील रामालागुनी । ती कथा श्रोतेसज्जनीं । सावध मनीं परिसावी ॥१२१॥
केउता बोधसागर । आणि केउता मी पामर । कैसा ग्रंथी करुं विस्तार । म्हणवोनि कर जोडिले म्यां ॥१२२॥
श्रीपदीं ठेवोनियां भाळ । विनविला दीनांचा दयाळ । वरी आज्ञापिती केवळ । ग्रंथ सफळ तुझेनि हो ॥१२३॥
तुज आमुचें आशीर्वचन । आणी आज्ञाही प्रमाण । तरी चिंता दारुण । वृथा करुन कां शिणसी ? ॥१२४॥
ऐसा मुमुक्षु कैवारी । त्रितापतप्तातें गोदावरी । सद्गुरु सांगे आज्ञा, शिरीं । ती अत्यादरें धरिली म्या ॥१२५॥
आतां पुढिलिया प्रकरणीं । केवळ चिद्रत्नाची खाणी । उघडितील मोक्षदानी । श्रोते सज्जनी सावध व्हावे ॥१२६॥
तुमचें मज कृपादान । होतां ग्रंथा; शोभायमान । होईल, हेचि प्रमाण । यास्तव चरण वंदितों ॥१२७॥
ग्रंथ न्यून कीं पूर्ण झाला । हेंही श्रीपति मतिमंदाला । नुमजेचि; शून्य मी चरणाला । यास्तव लागला तुमच्या ॥१२८॥
राम-महादेव संवाद । मिषें जीवा होईल बोध । टाकोनिया इतर वेध । श्रोते सुबध्द व्हा तुम्ही ॥१२९॥
सागरासाठी भागीरथी । झाली जनां उध्दरती । तीच होईल येथें गति । सावध चित्ती परिसा जी ॥१३०॥
सिध्द चरित्र महासागर । तुमचें कृपा -जहाज थोर । तुम्हींच होऊनि कर्णधार । पैलपार पाववा ॥१३१॥
रामा सद्गुरो चिद्घना । विश्वव्यापका परिपूर्णा । वारंवार विज्ञापना । कृपा दीनावरी असों दे ॥१३२॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१३३॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय तिसावा संपूर्ण ॥
॥टीपा- (१) ऐसें हें अनादि मिथुन । वर्णितां वेद जाहले दीन ॥-ओवी २१ :-
या अध्यायाच्या मंगलाचरणाच्या १ ते २१ ओव्यांतून श्रीपतीच्या प्रतिभेनें एक वेगळीच भरारी मारली आहे. ’ जगत: पितरौ
वन्दे पार्वती परमेश्वरौ ।’ अशा जगाच्या आद्य मायपित्यांचा दिव्य रतिविलास येथें कवीनें वर्णिला आहे. प्रत्येक ओवींतील
लक्ष्यार्थ अत्यंत ह्र्दयगम असून कवीचे कल्पनाचातुर्य व अर्थसौष्ठव याचे येथे उदात्त दर्शन घडते. श्री ज्ञानेश्वरमहाराजांच्या
’ अनुभवामृतांतील ’ पहिल्या ’ शिवशिक्तिसमावेशन ’ या प्रकरणांतील विषय जाणत्याकडून समजावून घेतल्यास या मंगलाचरणातील रसास्वाद फार उत्तम रीतीने घेतां येईल.
(२) राम घाली मायेचे फासे । राम जातसे उद्यानीं ॥-ओवी ४१ :-
ओवी क्र. ३५ पासून ६२ अखेरपर्यंत श्रीरामचंद्रमहाराजांच्या चरित्रांतीळ जो एक अद्भूत प्रसंग वर्णिला आहे तो साधकांना
विचार करावयास लावणारा आहे. या ओवीचा पूर्वसंदर्भ असा की श्रीमहाराज नित्याप्रमाणे, चिंचणी मुक्कामीं बागेंत फुलें
आणावयास जात असतांना । वाटेंत अवचित श्रीसद्गुरु महादेवनाथांचें दर्शन झाले. गाणगापुरांत श्रीदत्तप्रभूंनीं दाखविलेली
हीच गुरुमूर्ति हेंही त्यांनी ओळखलें. इतकेंच नव्हे श्रीगुरुचे पायावर त्यांनी मस्तक ठेवले. सद्गुरुंनी उचलून छातीशी धरलें-
इतके झाल्यानंतर स्वाभाविकपणें, श्रीरामचंद्रमहाराजांसारखा जाणता व गुरु प्राप्तीची तीव्र उत्कंठा लागलेला पुरुष एक
क्षणदेखील श्रीगुरुंची कास सोडणार नाहीं. पण श्रीगुरुंनी जें हास्य केले त्यांत महाराजांस एक प्रकारची भुरळ पडली व ते
सरळ बागेकडे चालते झाले. या प्रसंगांतून मुमुक्षु जीव हें शिकूं शकतो कीं आपलें सद्गुरु हे ईश्वरनियोजित असतात.
इतकेंच नव्हे तर त्यांच्या कृपेचा क्षणदेखील ठरलेला असतो. तसेच सद्गुरूंची इच्छा झाल्यास, कृपा करण्यापूर्वी शरणागताची
ते सौम्य अगर कठोर परीक्षादेखील घेतात. ज्या सत्पुरुषाच्या ठिकाणी आपण सद्गुरु म्हणूण श्रध्दा ठेवली अशा साधूनें
सांप्रदायिक दीक्षा देण्यापूर्वी आपली कसलीही परीक्षा घेऊं नये व आपण मागतांक्षणींच अनुग्रह द्यावा अशी कोणाची भाबडी
समजूत असेल तर त्या व्यक्तीनें हा प्रसंग विशेष मनन करण्यासारखा आहे.
(३) कोणी न माने ग्रंथार्था ।.....श्रीगुरु ग्रंथा बांधिती -ओवी ८४ :-
चिंचणी येथें श्रीरामचंद्रयोगीं, श्री. बापू इंदुलीकर, मार्तंण्डपंत, कोणी एक रामदासी -अशी कांहीं परमार्थप्रेमी मंडळी इंदुलीकराचें
घरी बसून श्रीज्ञानेश्वरीचेम पठण, अर्थचिंतन, चर्चा वगैरे करीत आसत. येथील ६३ ते ८४ ओवीपर्यंत जी हकीकत वर्णिली आहे
तीवरुन, वर उल्लेखिलेल्या परमार्थप्रेमी मंडळांपैकी कोणी संप्रदायपूर्वक व गुरुपदिष्ट पध्दतीनें श्रीज्ञानेश्वरीचा अभ्यास करीत
होते असें दिसत नाहीं. हे सर्व लोक जिज्ञासू अवश्य होते. त्यामुळे साधारणत: गीतेच्य श्लोकांचा अर्थ व श्रीज्ञानदेवांच्या
ओव्य़्चांचा जो सहर सुलभ भावार्थ लक्षांत येतो एवढया सामग्रीवर त्यांची नित्यश: चर्चा होत असल्यानें ओव्यांची व
श्लोकांची समजूत पटण्याची एक विशिष्ट दिशा नकळत ठरुन गेली होती. " बिंब तरी बचके एवढे । परी प्रकाशात्रैलोक्य
थोकडे । शब्दा़ची व्याप्ति तेणे पाडें । अनुभवावी ॥" या माउलींच्याच ओवीचा त्या मांदियाळीला श्रीमहादेवनाथांच्या सहाव्या
अध्यायावरील निरुपणामुळे अनुभव आला. श्रीमहादेवनाथ हे गुरुपरंपरेनें श्रीज्ञानदेवांचेच संप्रदायांतीळ असल्यामुळें सोऽहं
उपासनेच्या अधिष्ठानावर त्यांचा ज्ञानेश्वरी व गीतेचा अभ्यास झालेला ! या ठिकाणच्या निरुपणांत उत्तर गीतेला महत्त्व
देऊन, श्रीकृष्णानें ’ सांगितली उत्तर गीता । तेव्हां खूण बाणली पार्था । ’ अशा अनुरोधानें केलेलें निरुपण अगदीच वेगळ्या
बैठकीवरचे वाटल्यानें जमलेले श्रोते जरा चकित झाले ! या विवेचनांतील अधिक खोल अर्थ काय आहे. तें या ज्ञानेश्वरीच्या
अभ्यासकांपैकीं कोणी अधिक जिज्ञासेनें विचारावे व खारा अर्थ समजून घेण्याची कोणाला तळमळ आहे ते पहावे असा
श्रीगुरुंचा हेतु होता. परंद्तु श्रीरामचंद्रमहाराज व मार्तण्डपंत यां दोघांशिवाय कोणीही उत्कंठित दिसले नाहीत. आपापसांत
श्रोत्यांनीं थोडीशी नापसंती व्यक्त केली. या प्रसंगाच्या परिसमाप्तीच्या ९२ ते १०० ओव्याही बघण्यासारख्या आहेत. इतर
सर्व श्रोत्यांप्रमाणेंच श्रीरामचंद्रमहाराज व मार्तंण्डपंत हे देखील त्या प्रवचनानें विस्मित झाले होते पण यांत कांहीं.
गूढार्थ असला पाहिजे व तो श्रीगुरुंनाच विचारावा अशी त्या दोघांनाच तळमळ लागली व ते महादेवनाथांसमवेत
जलाशयावर संध्येसाठीं आले. तेथेंच त्यांची तळमळ पाहून श्रीगुरुंनीं सांप्रदायिक गुरुबोधाची आवश्यकता पटवून दिली.
कठीण शब्दांचे अर्थ :- हिमनगनंदिनी = हिमालयाची मुलगी अर्थात् पार्वती (१) षडास्य = सहा मुखांचा [ कार्तिकेय ]
(१) बाजीगिरी = नजरबंदीचा खेळ (६) निर्बुजणें = गोंधळून जाणें, लज्जित होणें (८) बांदवडी = बंदीखाना
(२३) प्रेमभडसा = प्रेमाचा अनिवार उद्रेक, लोट (६०) तैल. वर्ती = तेल आणि वात (९८)