श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी सद्गुरुनाथा । जय जयाजी पूर्णमनोरथा । जय जयाजी अज अजिता । गुणातीता निरंजना ॥१॥
जय जयाजी पुराणपुरुषा । जय जयाजी पूर्ण परेशा । जय जयाजी सर्वाधीशा । दुर्जन नाशा अवतरसी ॥२॥
ब्रह्मा विष्णु आणि हर । हे तुझेचि अंशावतार । यांचिया हातें करवूनि व्यापार । तूं निर्विकार सर्वदा ॥३॥
सूर्य रश्मीं निर्मी मृगजळा । परी तो तयाहूनि निराळा । तैसी तुझी अगम्य लीला । भक्तप्रतिपाळा गुरुराया ॥४॥
भू आप अनलानिल । आकाश, हीं पंचभूतें सबळ । करोनि परस्परानुमेळ । ब्रह्माण्डगोळ चालविसी ॥५॥
सृष्टयारंभीं योजिसी ’ ह ’ कारा । दाविसी नानाविध आकारा । तोचि तूं परिणामी ’ स ’ कारा । योजूनि, संहार करीतोसी ॥६॥
हा ब्रह्माण्डींचा प्रकार । तैसाचि पिंडींही चमत्कार । ऐसा पिंड ब्रह्माण्ड ऐक्याकार । असतां, पामर नेणती ॥७॥
अकार उकार मकार । रज सत्त्व तमाचें बिढार । अर्धमात्रा मिळोनि ॐकार । ब्रह्माण्डाकार उभविता ॥८॥
पिंडीं जागर स्वप्न सुषुप्ति । चौथी तुरीयावस्था म्हणती । पुढें वाच्यांशाची स्थिति । उभय संवित्ति नसेचि ॥९॥
ऐसे पिंड आणि ब्रह्माण्ड । दोहीकडे समान थोतांड । असतां, नेणती जन मूढ । तुझे गूढ कृपेविणें ॥१०॥
तुझा पद्मकर माथा पडे । तैं डोळियाचें पडळ उघडे । करतळामळवत् दृष्टी पडे । स्वरुप रोकडें ज्याचें तया ॥११॥
मग पिंडब्रह्माण्डा भेद । तिळप्रायही न दिसे प्रसिध्द । निजस्वरुपीं पावोनि आनंद । भेदाभेद विसरती ॥१२॥
दशेन्द्रिय मनाधीन । तें मन स्वरुपीं होतां लीन । कासया उरेल द्वैतभान । मुळीहून नसे जें ॥१३॥
मना आवरावे कैसे । आवरितां नावरे प्रयासें । तयाविणें ज्ञान दिसे । स्थिरावे कैसे कोणासी ? ॥१४॥
मनासी आकळिल्य़ाविण । प्राप्त नोहे आत्मज्ञान । ऐसें भगवदगीतेचें वचन । त्याचें विवरण न करिती ॥१५॥
बोलतां आला पूर्ण वेदान्त । आणि आलोडिले अनेक ग्रंथ । परी स्वाधीन न येतां चित्त । सर्वही व्यर्थ खटाटोप ॥१६॥
’ शाब्दे परेच निष्णांत । तयापासीच भागवत । धर्म शिकावे; हें एकादशांत । तृतीयांत सांगितलें ॥१७॥
जरी शब्देंचि कार्य होते । तरी महानुभाव गुरु कां दावितें ? । सदगुरु दावी जे खुणेतें । तैंचि ये तें प्रत्यया ॥१८॥
याचि करितां ’ परे ’ हें वचन । श्रीभागवतीं असे जाण । याचिकरितां गुरुमुखें मन । आधीं स्वाधीन करावे ॥१९॥
मन असे पवनाधीन । त्या पवनासी मुरडवून । आणूनि दावितां निजस्थान । मग चैतन्य कोंदाटे ॥२०॥
हें इतरां महासांकडें । परी तव कृपा जयासी जोडे । तो, दवडितांही येकीकडे । मागें पुढें चैतन्यचि ॥२१॥
ऐसा तुझ्या कृपेचा बडिवार । ब्रह्मादिकां अगोचर । परी उचंबळलासी कृपासागर । हें भाग्य थोर आमुचें ॥२२॥
जैसें साक्षात् ब्रह्म रुपडें । तक्रार्थी नाचे गौळियांपुढें । पेंधा कुबजा वेडेवाकुडे । बोले बोबडे तेंचि गोड ॥२३॥
तैसें आमुचें पाहतां कर्म । कुलाचार अथवा धर्म । एक धड नाहीं; तथापि श्रम । घेऊनि; प्रेम वाढविसी ॥२४॥
तूं तंव परब्रह्म निर्धार । परी आमुचेंचि भाग्य थोर । गुण नसतां अंगीकार । करिसी; पामर नुपेक्षिसी ॥२५॥
असो; सदतिसावे प्रकरणीं । समंधासी गति देवोनी । विप्र स्त्रियेसीही मुक्त करोनी । कीर्ती जनीं वाढविळी ॥२६॥
पुढें काय करिती सद्गुरु । तोचि ऐकावा चमत्कारु । विजापूज नामें नगरी थोरु । अवनीवरी विख्यात ॥२७॥
तया ग्रामीं रामचंद्र । नामें उपनाम कलमडीकर । महाशैव आणि चतुर । भक्ति थोर शिवाची ॥२८॥
नित्य वाचीतसे शिवगीता । शिवार्चनें शुध्दी चित्ता । यास्तव तयाकडे सुपथा । जावेसे गुरुनाथा मनीं आले ॥२९॥
म्हणोनि गेली तयाचे घरीं । तंव ते गेले ग्रामान्तरीं । परी तयाचा पुत्र नरहरी । बहु सत्कारी गुरुराया ॥३०॥
तयाची पाहूनि नम्रता । अवलोकूनि पूर्वार्जिता । कृपे पात्र केला पुरता । वरदकर माथां ठेविला ॥३१॥
एक दिवस तेथें राहुनी । पुन्हां पावले त्रिकुटस्थानीं । तों कलमडीकर ग्रामाहूनी । निजसदनीं पातले ॥३२॥
स्त्रियेनें श्रुत केला समाचार । म्हणे त्रिकुटस्थ श्रीरामचंद्र । सद्गुरु आले येथवर । त्यांही नरहर उपदेशिला ॥३३॥
तें न माने तयाचे चित्ता । म्हणे हे लेंकरुं परमार्था । काय जाणेल ? बोध वृथा । जाय तत्त्वतां अपात्रीं ॥३४॥
ऐसें स्वचित्तीं रामें मानिलें । परी नरहरीस जें लाधलें । तें तंव न राहेचि उगलें । वृध्दी पावलें दिसमासीं ॥३५॥
पुढें कांहीं दिवस गेले । तों कलमडीकरास स्वप्न जाहलें । (१)जे अपमृत्यूनें तुज गांठिले । होता, भले, संन्यासी ॥३६॥
ऐसें स्वप्न उषःकाळीं । होतां, रामवृत्ति गजबजली । मृत्यु काहणीही नव्हे भली । मा अंगा जडलिया गति कोण ॥३७॥
वृत्तान्त सांगितला स्त्रियेसी । तेही घाबरी जाहली मानसीं । परी पतिव्रता धैर्यासी । धरुनि; मानसीं विचारी ॥३८॥
संन्यास म्हणजे शिखा सूत्र । त्यागिल्या भले न; वेद शास्त्र । कर्म आचरोन फलाशा मात्र । त्यागितां, पवित्र संन्यास ॥३९॥
वरी वस्त्रें घेतली भगवी । आंत कामक्रोध नागवी । जळो जळो ती संन्यासपदवी । व्यर्थ आघवी विटंबना ॥४०॥
परी काम्याशा जावयालागीं । सदगुरु करणें लागे जगीं । देव आहे समीप भागीं । श्रीराम योगी त्रिकुटस्थ ॥४१॥
आणि तयाचा साक्षात्कार । आम्हां आला असे साचार । पुत्र -मस्तकीं ठेवितां कर । स्थित्यंतर प्रत्यक्ष ॥४२॥
जें संन्यासकर्मे पाविजे । तेंच योगें फळ लाहिजे । ऐसें भगवदवचन गाजे । कां मन माझें दचकावे ? ॥४३॥
अहो आमुचा पुत्र नरहरी । अल्पवयी अनधिकारी । गुरुकृपा होतां त्यावरी । नवल परी जाहली ॥४४॥
जयासी विषय वाटे विषवत् । सदैव राहे समाधिस्थ । विश्व पाहे स्वप्नवत् । स्वस्थ चित्तें राहुनी ॥४५॥
करितां, मज वाटे तो सम्यक । रामचरणीं । ठेवावा मस्तक । मग जें उचित, तें आवश्यक । करावे लौकिक जाणोनी ॥४६॥
ऐसे पतिव्रतेचें वचन । ऐकतां वाटले समाधान । आणि पुत्राचीही प्रचीत पाहून । राम-मन सुखावे ॥४७॥
मग तिकोटे ग्रामी जाऊन । श्रीगुरुसी साष्टाग नमन । करोनि; सहकुटुंब आले घेऊन । स्वगृह पावन करावया ॥४८॥
सुदिवस सुमुहुर्ती । करमडीकर उपदेश घेती । (२)अंगीं बाणतां योगस्थिति । मृत्युभीति उडाली ॥४९॥
आधीच ते परम निपुण । सत्कर्मे शुध्द अंतःकरण । बाणतां राजयोगाची खून । समाधान पावले ॥५०॥
त्याच दिवशीं तयाचे स्नेही । नाम पंढरीनाथ पाही । तेही जाहले अनुग्रही । उभतांही धन्यतम ॥५१॥
ते उभयतांही सेवा विख्यात उभयताही सद्गुरुभक्त । गुरुसेवेसी सादर चित्त । धन्य जीवित मानिती ॥५२॥
स्वप्नी सांगितला जो संकेत । तोचि समय होतां प्राप्त । रामचंद्र जाय स्नानार्थ । वापी आंत तये वेळीं ॥५३॥
स्नानाकरितां बुडी मारिली । तों महापाषाण होता तळीं । तो आदळला तयाचे कपाळीं । वेदना आली अतिशय ॥५४॥
तया वेदनेनें किंचित । कलमडीकर मूर्च्छागत । झाले; त्यांतही असे भासत । श्रोत्र संत ऐका तें ॥५५॥
कोणी एक अद्भूत पुरुष । मूर्च्छागत सन्निध असे । म्हणे समर्थाचिया सहवासें । अपमृत्यु निरसे रामचंद्रा ॥५६॥
जो मार्ग तुम्ही संपादिला । त्यावरी काळाचा न चले घाला । मार्कण्डेय याचि मार्गाला । धरोनि; वांचला चिरकाळ ॥५७॥
इतुकें पाहोनि आली स्मृति । आश्चर्य वाटलें रामाप्रति । म्हणे तारिलें श्रीगुरुमूर्ति । नातरी ’ पुण्यतिथी ’ आजचि ! ॥५८॥
येवोनि सर्व सांगितलें । श्रीगुरुनें आजि वांचविलें । प्रेम गुरुचरणीं होतें पहिलें । तें दुणावले येथोनी ॥५९॥
ऐसें ऐकोनियां सर्व । म्हणती न दवडावे हें पर्व । सोडोनि ज्ञानादि ज्ञाति-गर्व । धरिती भाव रामचरणीं ॥६०॥
ग्रंथ तों आलासे समाप्ती । परी रामाची अपार कीर्ती । ती आवरिताही नावरे चित्तीं । मंदमती मी काय करुं ? ॥६१॥
(३)अक्कलकोटी श्रीगुरु असतां । बोधिली राजमातेची माता । तियेसी सुभानु नामें होता । पुत्र विख्यात कीर्तीनें ॥६२॥
परी राज्यलोभवशें । उभयतांत होते वैमनस्य । रामें उपदेशितां तीस । शुध्द मतीस पात्र जाहली ॥६३॥
ब्रह्मादि पिपीलिका पर्यंत । तियेसी दुसरें न भासत । मग द्वेष करावया येथ । कोण दिसत तियेसी ? ॥६४॥
श्रीमन्मलप्रभातीरीं । विख्यांत ’ तुरगाढ ’ नामें पुरी । तेथील सुभानु राज्याधिकारी । ज्या साहाकारी भूतनाथा ॥६५॥
परीपुत्राचें करणें अद्भुत । मातेस न वाटूनि प्रशस्त । राहिली अक्कलकोट येथ । कन्यागृहांत सुखरुप ॥६६॥
तेथ राम उपदेशीत । निःशेप क्रोध पावला शांत । म्हणे पुत्रासही लावावा सुपंथ । न जावो व्यर्थ नरदेह ॥६७॥
ऐसा करोनि सुविचार । त्वरित पावली तुरगाढपूर । पुत्रासी म्हणे रामचंद्र । गुरु त्वरें करी तूं ॥६८॥
पुत्रा नरजन्माऐसी जोडी । न मिळे; वेचिल्या द्रव्यकोडी । ऐसी वयसा व्यर्थ न दवडी । सेवी तांतडी गुरुचरण ॥६९॥
आधींच ती जन्ममाता । तयावरी लागली सत्पथा । तियेचि वचनोक्ति ऐकतां । चरणीं माथा पुत्र धरी ॥७०॥
मातें अपराध आजिवरी । केले; ते तूं क्षमा करी । तुझें अनुशासन माझे शिरीं । तदनुसारी वर्तेअन ॥७१॥
ऐसें विनवूनि तियेसी । सत्कार पुरस्सर रामासी । आणवी तुरगाढपुरासी । स्वात्मसुखासी पावावया ॥७२॥
’ आम्माक्काच्या ’ आग्रहास्तव । रामें उपदेशिला सुभानराव । तयाचा प्रकट होतां भाव । बहुतेक गौरव करिताती ॥७३॥
तुरगाढपुर हें सांप्रत । ’ तोरगल ’ नामें विख्यात । तेथें शिष्य जाहले असंख्यात । त्यांत शंभू दीक्षित बहु मान्य ॥७४॥
आधींच ती शुध्दीभूमि । तयावरी विनटला रामीं । साक्षात्कार पूर्ण नवमी । दिनीं ग्रामीं होय तया ॥७५॥
इतरही जाहले शिष्यवर्ग । परी दीक्षितावरीच तोषला भर्ग । जयाचा जैसा पूर्वसंसर्ग । तैसाचि श्रीरंग वोळे तया ॥७६॥
चिंतामणीपाशी कांजी । अथवा कल्पतरूपाशीं भाजी । तैसा चिंती सुभानजी । प्रपंच काजी कांहीं एक ॥७७॥
तें तंव सहजें सिध्दी जाय । परी परमार्थी नागोवा होय । मिळतां जाह्नवीचें तोय । मृगजळ काय धुंडावे ? ॥७८॥
असो, जयाचें जैसें प्राक्तन । तैसी बुध्दि होय गहन । सद्गुरु सत्कारिला पूर्ण । वस्त्रे भूषणें देवोनि ॥७९॥
कुटुंबसहित तये ग्रामीं । स्वल्प दिवस राहिले स्वामी । रायासी म्हणती जातो आम्ही । चित्त नामी तुझे असो ॥८०॥
’ सन्निध वास्तव्य इच्छितो दास ’ । ऐसा आग्रह करी बहुवस । परी तें न माने रामास । म्हणती प्रवास आवडे आम्हां ॥८१॥
त्रिकुटीं येतां श्रीरामचंद्र । विजापूरस्थ शिष्यवर । पंढरीनाथ आणि रामचंद्र । दर्शनालागीं पातलेम ॥८२॥
चरणावरी ठेवोनि शिर । साष्टांग घात्ला नमस्कार । सद्गुरुरायें मस्तकी कर । ठेवोनि, सत्वर उठविले ॥८३॥
ते विनविती बहुत प्रकारीं । स्वामी राहावे विजापुरी । ते नावडे राम अंतरी । यास्तव गृह करी नूतन ॥८४॥
तिकोटें येथें गृह घेऊन । सद्गुरुसी करिती समर्पण । मग वंदूनियां श्रीचरण । आज्ञा घेऊन परतती ॥८५॥
आणखी ऐका एक मात । प्राप्त जालें ’ कन्यागत ’ । राम तीर्थविधीस येत । उगार ग्रामांत एक वेळ ॥८६॥
माघ मास उष्ण काळ । प्राप्त जाहला सायाह्य वेळ । मिळोनियां शिष्य सकळ । निघाले तात्काळ संध्येसी ॥८७॥
समागमें राम सद्गुरु । जो भवसिंधूचें महातारुं । तोही निघता जाहला सत्वरु । श्री-कृष्णा तीर पहावया ॥८८॥
आधीच तें कृष्णा तीर । कन्यागत सूर्य, पर्व पवित्र । तेथें पातले साधु सत्पात्र । तो महिमा अपार काय वर्णू ? ॥८९॥
हस्तपाद प्रक्षाळुनि सवेग । प्राणायाम करिती साड्.ग । कांही शिष्य चिंतिती चांग । म्हणती व्यंग एक एथ ॥९०॥
नारद बैसतां स्वर्धुनीतीरीं । नीर चढत जाय पायरी । जे स्पर्शोनि साधु -चरण शिरीं । शुध्दता भारी पावन मी ॥९१॥
सांप्रत काळीही पंढरी । माजी चंद्रभागा तीरीं । बोधले आदि साधू जरी । येती, तरी नीर चढे ॥९२॥
ऐसा असतां चमत्कार । या स्थळीं कां आलें अंतर ? । ऐसें चिंतिती; तंव कृष्णा नीर । चढों अपार लागलें ॥९३॥
नसता कोठें पर्जन्य धारा । जळ कां चढे सैरावैरा । ऐसें वाटलें जना इतरां । (४)विकल्पी साक्षात्कारा पावले ॥९४॥
येवोनि लागले श्रीगुरुचरणीं । म्हणती धन्य धन्य तूं देवचूडामणि । रामे किंचित सुस्मित करुनी । आशीर्वचनीं गौरविले ॥९५॥
(५)शब्द ठेविता वाल्मीकि दक्षा । आणि सीतेची करिता परीक्षा । जाह्नवी शिष्यां लावी शिक्षा । त्याहीपेक्षा अपूर्व हें ॥९६॥
साक्षात् ती जगन्माता । आणि त्रेतायुगींची ती वार्ता । सांप्रत कली प्रबळ असतां । ऐसी कर्तव्यता दाविली ॥९७॥
राम चरित्र क्षीरसागर । असंभाव्य पसरला थोर । परी आज्ञा मर्यादा वेळी परिकर । उल्लंघनीं पामर अशक्त मी ॥९८॥
तथापि पसरोनिया पदरा । किंचित् मागूनि घेतिले अवसरा । तितुक्यांतही चमत्कारा । अति सुंदरा सांगेन ॥९९॥
मियां वेडयावाकुडया बोलीं । सद्गुरुची कीर्ति वर्णिली । (६)परी सद्गुरुपत्नी माय माउली । नाही गायिली स्वल्पही ॥१००॥
ती तंव पतिसेवा करुनी । नाना चमत्कार दावूनी । निजानंदी निमग्न होऊनी । उन्मनी मिळणी मिळाली ॥१०१॥
शांतकुंभ आणि कान्ति । कीं दीप आणि ज्योति । ती उभयतां एक मूर्ति । ब्रह्मसंवित्ति अभेद ॥१०२॥
ऐसी ती पातिव्रता शिरोमणि । पतीसह असतां करवीर पत्तनीं । बहिर्दिशेसी एके दिनीं । सहज जननी चालली ॥१०३॥
करवीर क्षेत्र आग्नेय कोनीं । देवी पद्मावती अभिधानी । पद्मालयाचें सुंदर पाणी । घेऊनि, जननी जाय दूर ॥१०४॥
तों तये स्थानीं एक रक्षक । राजाज्ञेनें पादचारक । होता तिष्ठत नीच सेवक । दृष्टी सम्यक पाहे इतें ॥१०५॥
करोनि दावूं राजसेवा । तांब्या नेऊनि अधिकार्या द्यावा । मनी अणोनि ऐसा हेवा । पाऊल ठेवावा जों पुढें ॥१०६॥
तों काय जाला चमत्कार । दोन्ही अंध जाहले नेत्र । चित्तीं समजला तो पामर । की हें थोर दैवत असे कोणी ॥१०७॥
मग जोडोनि दोन्ही हात । साष्टांग घातले दंडवत । म्हणे मी पतिताहूनि पतित । तैसीच कृपावंत तूंही अससी ॥१०८॥
अपराध जाहला नेणतपणीं । तो क्षमा कीजे वो माय जननी । अंध जाहल्या नेत्र दोन्ही । मग जनीं वनीं कष्टचि की !॥१०९॥
म्यां देखिले तुझे चरण । इतुकेंचि पुण्य; तारी दीन । करुणा भाकी धाय मोकलून । तेणें सकरुण माय जाहली ॥११०॥
सारोनियां शौचविधि । करचरण क्षालणें, शुध्दि । होवोनि, कृपा करी निरवधि । तेणें ’ आधीं ’ मुक्त तो होय ॥१११॥
तात्काळ आले दोन्ही नयन । पादचारी करी नमन । ऐसा तारी एक तो दीन । सदयपण किती वानूं ? ॥११२॥
आणावाया दुग्ध माता । एके दिनी बाहेर जातां । एका कर्णधाराचे घरी तत्त्वतां । जनसमूह रडतां ऐकिलें ॥११३॥
म्हणवोनि जाय तयाचे घरीं । साक्षेपें पुसतां तया सुंदरी । म्हणे, कां आकांत करिता भारी । दुःखसागरीं बुडोनी ? ॥११४॥
ते म्हणती आमुचे बाळक । काळें गिळिलें आतांचि; देख । बहुत दिवसा हेंचि एक । नयनसुख देत होते ॥११५॥
दुसरे नाहीं विश्रांतीसी । आम्ही गती करावी कैसी ? । आम्हा करोनिया परदेशी । कैलासवासी बाळ जाहलें ॥११६॥
आमुची आली नाहीं करूणा । मारिला माझा बाळ तान्हा । आतां न ठेवूं आपुल्या प्राणा । म्हणोनि रुदना पुन्हां करी ॥११७॥
माता म्हणे तयासी । प्रेत तरी पाहूं द्या मजसी । पाहूनि इयेच्या मुखचंद्रासी । धैर्य तयासी वाटलें ॥११८॥
म्हणती कोणी देवी असे । ऐसें आम्हां भासतसे । की साक्षात लक्ष्मी दैववशें । हाकेसरसे पातली ? ॥११९॥
म्हणोनि मृत लेकराची माया । घेवोनि आली’ सन्निध पाया । मृत बालका ठेवोनियां । मोकलोनि धाया आक्रंदे ॥१२०॥
म्हणी योगमाये आदिजननी । तुंचि माझी कुलस्वामिनी । आप्त इष्ट पिता जननी । दुसर तुजहुनि मज नसे ॥१२१॥
ऐसे बहुता परी रडे । तें वर्णितां ग्रंथ वाढे । सद्गुरुपत्नी फेडी सांकडें । तेंचि पुढें परिसा जी ॥१२२॥
जानकी अवलोकी बाळकास । तों निःशेष राहिले श्वासाच्छ्वास । म्हणे कैसे करूं यास । नको अपेश मज देऊं ॥१२३॥
ऐसी चित्तीं करुनि प्रार्थना । दीन अनाथाचा पाहुणा । विनविला पति सद्गुरुराणा । काय वचना बोलिली ॥१२४॥
म्हणे वृथा करिता शोक । भुकेने ग्लानी पावले बाळक । दुग्ध आणवोनियां देख । स्वकरें मुख स्पर्शिलें ॥१२५॥
करोनियां दुग्धाचें मिष । स्वकरें वोती अमृतरस । अंतरीं करतां प्रवेश । चेतना बाळास जाहली ॥१२६॥
बाळकें दोन्ही नेत्र उघडिले । टकमका पाहूं लागलें । हस्तपादा चळण आलें । आनंदले आप्त सर्व ॥१२७॥
बाळ कडिये घेवोनियां । गडबडा चरणीं लोळे माया । म्हणे बाळा अरे तान्हया । तुझी माया हे जानकी ॥१२८॥
गुरुपत्नीस म्हणती सर्वही । धन्य धन्य तूं सीताबाई । आम्हां बाळक दिधले पाही । कैची कांहीं मूर्च्छना ! ॥१२९॥
बाळ मरण पावलें सत्य । परी तुवां उठविले हें यथातथ्य । तुझें आशीर्वचन हें पथ्य । महिमा कथ्य न आम्हां ॥१३०॥
ऐसी स्तुति करितां फार । दंडवत घालिती वारंवार । ऐसा करोनि जयजयकार । निघे सत्वर तेथोनी ॥१३१॥
ऐसे अनेक चमत्कार । प्रतिदिनीं दाविले नाना प्रकार । लिहितां, विस्तार होईल फार । म्हणवोनि सार तितुकेंचि लिहिलें ॥१३२॥
आतां ग्रंथ आला शेवटीं । परी सांगेन एकचि गोष्टी । श्रोती रान न धरावा पोटीं । वृथा चावटी म्हणवोनी ॥१३३॥
एकाहूनि एक चढ । गोष्टी सांगसी तितुक्या गोड । तेणें आमुचें न पुरे कोड । परी तुज आड गुरुआज्ञा ॥१३४॥
तथापिइ शेवटील कळस । कथा सांगावी अति सुरस । आमुचे अति क्षुधित मानस । श्रीगुरुकथारस सेवावया ॥१३५॥
ऐसा श्रोतियांचा सोस । पाहोनि, वक्त्यास जाहला तोष । साष्टांग नमूनि श्रीगुरुस । सांगेन गोड घास शेवटींचा ॥१३६॥
अक्कलकोटीं असतां श्रीगुरु । काय जाहला चमत्कारु । तोचि ऐका भाविक नरु । जेणे भवज्वरु दूर होय ॥१३७॥
राजा आपुले वाडियांत । सुशोभित कारंजे महालांत । श्रीगुरुसी राहवीत । सत्कारयुक्त नृपेंन्द्र ॥१३८॥
तेथें शिष्य जहागिरदार । नामें अमरगोलकर । असतां जाहला । भाविक नर । अति सादर सद्गुरुसेवे ॥१३९॥
रात्रौ सद्गुरु करिता भजन । करोनि पादसंवाहन । मग निद्रेसी जाय आपण । हें नेमाचरण असें त्याचें ॥१४०॥
संध्यादि कर्म सारोनि घरीं । नित्य नेमान्वयें रात्रीं । चरणसेवेसी बापू सत्वरी । येतां; नेत्रीं चमत्कारे ॥१४१॥
बापू पातले द्वारापाशीं । तों दोघी स्त्रिया चरणसेवेसी । करीत बैसल्या सद्गुरुपासीं । तेजोराशी देखिल्या ॥१४२॥
दोघी अलंकारें मण्डित । दोघी कनकाम्बरें वेष्टित । जैसी विद्युल्लता झळकत । पदर रुळत तैशापरी ॥१४३॥
रुपें यौवनसंपन्ना । सरळ नासिका आकर्ण-नयना । चंद्र लाजोनिया वदना । आकाश गमना करी जाणों ॥१४४॥
असो तयांचा रुप प्रकाश । वर्णावया मज नाहीं अवकाश । बापूनें पाहतां तयांस । द्वारीं तैसाचि राहिला ॥१४५॥
बापू मनीं असे भावीत । कीं राजस्त्रिया येवोनि येथ । श्रीगुरुची सेवा करीत । स्वस्थ चित्तें बैसल्या ॥१४६॥
म्हणोनियां मुहुर्तमात्र । बापू तेथेंचि राहिला स्थिर । पहातसे वारंवार । तों प्रेमें सादर सेविती ॥१४७॥
मग विचारी निजमानसीं । चुकविता न ये नित्य नेमासी । आंत जातां आपणासी । सद्गुरुपाशीं, काय चिंता ? ॥१४८॥
स्त्रिया असोत त्या कोणी । आम्हासी केवळ मायबहिणी । म्हणवोनि आंत प्रवेशुनी । सन्निध जाऊनि जंव पाहे ॥१४९॥
तंव त्या दिसती दिव्यांगना । करिती पादसंवाहना । बापू करीत विज्ञापना । नामाभिधाना सांगा जी ॥१५०॥
त्या न देती प्रत्युत्तर । तंव जागे जाहले श्रीगुरुवर । बापूसी म्हणती प्रश्नोत्तर । करिता साचार कोणासी ? ॥१५१॥
तंव त्या दोघी स्त्रिया न दिसत । गुप्त जाहल्या अकस्मात । बापू जाहला वृत्तान्त सांगत । सद्गुरु किंचित हासिन्नले ॥१५२॥
पुन्हां पहुडले सुखासनीं । बापूनें जाणितलें मनीं । की ऋध्दि-सिध्दी दासी होऊनि । सद्गुरुचरणीं लागती ॥१५३॥
तयांसी हे तों उदास । परी त्या पुरविती आपुली आस । ऐसें जाणोनि सावकाश । चरणसेवे प्रवर्तला ॥१५४॥
आम्हा सर्व छात्रवर्गात । सद्गुरु शुश्रूषणीं रत । एक ’ दुर्गादेवी ’ च विख्यात । जी गणगोत गुरु मानी ॥१५५॥
समर्थापासीं वेणी । कीं नामदेवापासी जनी । तैसी अनलस रात्रंदिनीं । सद्गुरुसेवनीं सादर ॥१५६॥
मातापिता दैवत । गुरुपुत्रादि तेचि आप्त । सर्वांचे संगोपनीं रत । राहुनि, कृतार्थ जाहली ॥१५७॥
श्रीपति दोनी कर जोडोनी । सद्गुरुसी साष्टांग नमुनी । श्रोतयां करितसे विनवणी । कृपा दीनीं असों द्यावी ॥१५८॥
तुम्ही घेवोनि श्रम सायास । येथवरी पावविला दास । उत्तीर्ण नव्हे उपकारास । अनेक जन्मासही घेतां ॥१५९॥
मूळ गाथा तुरगाढपुरीं । आरंभूनि, स्वयें श्रीहरी । अथणी नाम ग्रामामाझारीं । पूर्ण करी श्रीसद्गुरु ॥१६०॥
शालीवाहन शकामाझारीं । अठराशे हे एक संवत्सरीं । मज आज्ञापिती करवीरीं । ग्रंथ करी म्हणवोनि ॥१६१॥
मियां धरिले दोनी चरण । मी अज्ञान, मतिमंद, दीन । कैसें करुं ग्रंथलेखन । जेणे सज्जन मानवती ॥१६२॥
पद्मकर ठेवोनियां शिरीं । म्हणती वत्सा चिंता न धरी । ग्रंथ निःशंक आरंभ करी । चुकल्याः गोदावरी सांगेल तुज ॥१६३॥
ऐसी आज्ञा वंदोनि शिरीं । ग्रंथ आरंभिला करवीरीं । ग्रंथी उपदेश प्रकरणें सारी । गोदावरी करी स्वयें ॥१६४॥
तथापि न निभे मजकडून । तेव्हां ’ बाबा ’ नामाभिधान । याजकरवीं सहा प्रकरणें । करवी आपण तारकु ॥१६५॥
परी सर्व प्रकरणान्तीं । नाम माझें स्थापिती । तथापि मी मंदमति । ग्रंथसमाप्तीं न पाववी ॥१६६॥
प्रपंची कसोनियां कांस । स्त्री पुत्रांचा जाहलों दास । रात्रंदिवस तोचि हव्यास । मग ग्रंथ समाप्तीस कें पावे ? ॥१६७॥
परी ते माझी पिता-जननी । धन्यतमा या त्रिभुवनीं । तियेचे पूर्ण कृपें करुनी । श्रीगुरुचरणीं जडियेलों ॥१६८॥
माझ्या अपराधांच्या कोटी । माता पितरीं ठेवोनि दृष्टी । सद्गुरुही घालिती पोटीं । देत कष्टी न होऊं ॥१६९॥
तैसीच माता गोदावरी । उणें न पडों दे तिळभरी । पदोपदीं मज सावरी । उपकार शिरीं तियेचे ॥१७०॥
शके अठराशे हे ( ) माझारीं । मागुती सद्गुरुची स्वारी । निररायें आणविली करवीरीं । ग्रंथ सिध्दीं न पवतां ॥१७१॥
कथेंत आणखी आली कथा । किंचित् क्षमा करावी श्रोता । निररायाचें नाम निघतां । लेखणी तत्त्वतां न चलेचि ॥१७२॥
निरराय हे कोणाचे कोण । स्वल्पांत करुं तयाचें कथन । पुढें करुं ग्रंथ संपूर्ण । किंचित् अवधान मज द्यावे ॥१७३॥
रामराय विख्यात जनीं । जयानें आंग्लभूमिस्था -पासोनी । नूतन ग्राम संपादूनी । भलें म्हणवोनि घेतले ॥१७४॥
तयाचे हे चतुर्थ नंदन । गर्भश्रीमंत असतां जाण । जयासी बाळपणापासून । आवडे ज्ञान बहुसाल ॥१७५॥
प्रापंचिक सर्व सुख । न्यून नसतां कांहीं एक । पारमार्थिक बुध्दि सम्यक । ऐसे स्वल्प लोक कलीमाजीं ॥१७६॥
निरराय प्रापंचिक सुख । केवळ मानीतसे विख । पूर्व सुकृतौघ उत्तम देख । म्हणोनि क्षणिक सर्व वाटे ॥१७७॥
बहुत शोधिले ऊर्वीमण्डळ । साधुसंतांही भेटला पुष्कळ । परी चित्ताची तळमळ । निरसीसा दयाळ न भेटे ॥१७८॥
कित्येकीं सांगितले उपदेश । तद्वत् आचरे, करोनि सायास । परी न मिळतां साक्षात्कारास । पुन्हां उदास जाहला ॥१७९॥
जयासी ज्या वस्तूची आवडी । तयासी तैसेच मिळती सवंगडी । कोणी स्नेही सांगे तांतडी । कीर्ति गाढी रामाची ॥१८०॥
तयासी जाऊनि त्रिकुटीं भेटे । म्हणतां, निरराय तैसाचि उठे । जाऊनि, सद्गुरुचरणीं लिगटे । म्हणे ’ वाटे मज लावा ’ ॥१८१॥
तयाचा पाहुनि शुध्द भाव । कृपा करी सद्गुरुराव । पायवणी घेतांचि; सर्व । संशय वाव जाहले ॥१८२॥
अंतरामाजीं जें जें ठसे । तेंचि बाहेर सर्व दिसे । निररायास जाहले तैसें । सबाह्य कोंदलेसे परब्रह्म ॥१८३॥
श्रीगुरु सद्भावें समाधान । परी देवोनि वस्त्राभरण । सर्वत्रीही राहिले लीन । यास्तव कथन केलें हें ॥१८४॥
राम संचारतां महीं । पुष्कळ शिष्य जाहले पाही । गेले स्वोध्दारार्थ गुरुगृहीं । निरराय कीं कृष्णशास्त्री ॥१८५॥
असो, तया निरराया । सर्व छात्रांची ठेवोनि दया । सुखासन त्रिकुटा पाठवूनियां । भक्तजन माया आणविली ॥१८६॥
मी गेलों चरणदर्शना । पुसे अनाथाचा राणा । ग्रंथ पूर्ण जाहलेला आणा । म्हणतां, मौना धरिले म्यां ॥१८७॥
जाणोनियां अंतरभाव । किंचित् दाविती क्रोधाद्भ्व । म्हणती " ग्रंथी धरुनि हांव । कित्येक जीव निमाले ॥१८८॥
ग्रंथ पूर्ण जाहलियाविणें । नाहीं आम्हां येथोनि जाणें । ” आज्ञा मागूनि; भेणें भेणें । तेथोनि निघणें म्यां केलें ॥१८९॥
करवीरापासोनि अर्धयोजन । उत्तरे प्रयाग-तीर्थ पावन । विशेश मकरस्थ सूर्य जाण । उत्तरायण पर्वकाळ ॥१९०॥
राहोनि त्रिवेणीच्या तीरीं । उरल्या ग्रंथा आरंभ करी । श्यामसुंदर मूर्ति साजिरी । धरिली अंतरी रामाची ॥१९१॥
जैसें मुळीं पडतां पाणी । फापावे लागे वृक्ष मेदिनीं । तैसे श्रीगुरु धरितां ध्यानीं । वैखरी वाणी सरसावली ॥१९२॥
ऐसिये प्रकारें ग्रंथ पूर्ण । माझिये हातें करविला तूर्ण । ग्रंथाचें आद्यन्त लेखन । करी ’ गजानन ’ निजांगें ॥१९३॥
मी पिशाच्च लिपी लिहावा प्रबंध । त्यातें गोदावरीनें करावा शोध । मग गजाननें शुध्दाशुध्द । पाहोनि; बालबोध
ल्याहावा ॥१९४॥
यापरी ग्रंथ जाहला पूर्ण । येणें तुष्टी पावोत श्रीचरण । श्रीपति त्याचे पायींची वहाण । सर्वा नमन करीतसे ॥१९५॥
जैसा जयाचा भावार्थ । तयासी तैसीच येईल प्रचीत । म्हणोनि येथें फलश्रुत्यर्थ । लिहुनि; ग्रंथ न वाढवी ॥१९६॥
दोन्ही जोडोनिया हस्त । श्रीगुरुचरणीं ठेवोनि हेत । बाळकृष्णात्मज लिही ग्रंथ । तो मानोत संत स्वानंदें ॥१९७॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१९८॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय अडतिसावा संपूर्ण ॥
टीपा- (१) अपमृत्यूनें तुज गांठिले । होता, भलें संन्यासी ॥- ओवी ३६ :-
विजापुरांत रामभाऊ, कलमडीकर नाम्क कोणा एका शिव उपासक व्यक्तीला अनुग्रह देण्यासाठी श्रीरामचंद्र महाराज त्यांचे
घरीं गेले होते. त्यावेळी तें घरीं नव्हते. त्यांच्या अल्पवयीं ’ नरहरी ’ नांवाच्या मुलाचा भाग्ययोग होता; त्याला श्रीनीं
मंत्रोपदेश दिला ! ’ हा मुलगा काय साधना करणार ? ’ असा कलमडीकरांच्या मनांत संशय आला. तों एक दिवस रामभाऊंना
स्वप्न पडलें व " अपमृत्यूचा लौकरच योग आहे पण संन्यास घेतल्यास हा अपमृत्यु टळून भलें होईल ! " अशी सूचना मिळाली.
(२) अंगीं बाणतां योगस्थिति । मृत्युभीति उडाली ओवी ४९ :- काषायवस्त्रे, द्ण्डकमण्डलु इत्यादि संन्यास दीक्षेची बाह्य चिह्नें
आहेत. मुख्य संन्यास देहतादात्म्याचाच करावयाचा असतो. ही देहबुध्दि नाहींशी करण्याचा मार्ग हा संन्यास मार्गच होय.
व श्रीरामचंद्रमहाराजांच्या परंपरेंतील सोऽहं दीक्षेंत हा आंतरिक संन्यास शिष्यास दिला जातो, हें सर्व लक्षांत घेऊन व
स्वतःच्या अल्पवयीं मुलाची देहबुध्दि गुरुपदेशानंतर क्षीण झालेली प्रत्यक्ष अवलोकन करुन, कलमडीकरांच्या कुटुंबानें
३९ तें ४८ ओंव्यातून " श्रीतिकोटेकर महाराजांकडून अशी संन्यासदीक्षा घेण्याचा " योग्य सल्ला दिला. तो पटल्यानें रामभाऊंनीं
श्रीमहाराजांना सपत्नीक घरी आणून त्यांचा उपदेश घेतला. ’ सोऽहं " मंत्र दीक्षेच्या प्रभावानें रामभाऊंचें मृत्यूचें भय नाहींसे
झालें. या ओवींतील ’ मृत्युभीति उडाली ’ हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. देह म्हणजेच मी अशी जोपर्यंत जीवाची विपरीत
कल्पना असते तोंपर्यंत हा देह सोडून आपण कधीं जाऊं नये असें जीवाला वाटते व म्हमूनच ’ मृत्यु येऊं नये ’ अशी
अंतःकरणांत वासना राहते. मृत्युची भीति वाटते ती या प्रकारच्या स्वरुपाच्या अज्ञानामुळें ! तें अज्ञान फक्त श्रीगुरु नाहींसें
करतात. देहाचें प्रारब्ध श्रीगुरु नाहीसें हें साधकांनी नीट लक्षांत ठेवले पाहिजे. व त्या दृष्टीने पुढील ५३ ते ५८ ओव्यांतील
हकीकत वाचनीय आहे. देहप्रारब्धांत रामभाऊंना जो अपघाताचा कुयोग होता त्याप्रमाणें अपघात घडून आलाच ! ’ मी
शरीर नव्हे मृत्यु शरीराला आहे ’ असा बोध त्यांचे अंतःकरणांत रुजल्याने रामभाऊंची ’ मृत्युभीति उडाली ’ होती इतकेंच !
(३) अक्कलकोटीं असतां । बोधिली राजमातेची माता । -ओवी ६३ :-
मागील अध्यायांत अक्कलकोटच्या राजाला अनुग्रह दिल्याची हकीकत आली आहे. येथें राजाच्या मातामहीलाही श्रींनीं
संप्रदाय दिल्याचा उल्लेख आहे. येथें सुभानराव नामक इचा पुत्र तोरगळ संस्थानचा अधिपति होता. राजघराण्यांतील कांहीं कलहामुळें ही अंमाई आपल्या मुलास सोडून अक्कलकोटांत स्वतःच्या मुलगी- नातवाजवळ राहात असे, श्रीमहाराजांचा अनुग्रह होऊन थोडाफार अभ्यास होतांच अंमाईच्या मनांतील पुत्रविषयक द्वेष नाहींसा झाल हें अत्यंत
महत्त्वाचें होय. इतकेंच नव्हे तर दिलजमाई होऊन अम्माईनें महाराजांस मुलाकडे तोरगळला नेले. मुलानेंही आईची क्षमा
मागून श्रींचा अनुग्रह घेतला असा पुढेंच कथाभाग आहे.
(४) जळ चढे सैरावैरा । विकल्पी साक्षात्कारा पावले -ओवी ९४ :- कृष्णातीरी उगार मुक्कामीं घडलेला एक लीलाप्रसंग
८६ ते ९५ ओव्यांतून वर्णिला आहे. ’ देवर्षि नारद महाराज गंगेच्या तीरावर येतांच गंगा स्वतःला साधुचरणरजानें पवित्र करण्यासाठीं पायर्या चढून येत असे. तसेंच कलियुगांतही माणकोजी बोधल्यांसारखे साधुसंत चंद्रभागेच्या तटीं आले कीं पदस्पर्शासाठीं पाणी वाढत असे हें आम्ही ऐकलें वाचलें आहे. श्रीरामचंद्र महाराजही तसेच थोर सत्पुरुष असून
आतां तसा अनुभव कां आला नाही ? ’ अशी शंका महाराज कृष्णातीरी आल्यावर कांहीं शिष्यांच्या मनांत आलीं. तोंच
कोठेंही पावसाचें चिह्म नसतांना [ माघ मास -उष्णकाळ ] एकाएकी कृष्णाबाईचें पाणी पुरासारखें वाढूं लागले अर्थात्
’ विकल्पी साक्षात्कारा पावले ! ’ संशयस्तांना रोकडा अनुभवच मिळाला !!
(५) जाह्मवी शिष्यां लावी शिक्षा । त्याहीपेक्षां अपूर्व हें ॥-ओवी ९६ :-
वरील टीपेंतील हकीकतीला अनुलक्षून श्रीपतींनीं या संबंध ओंवीत एक पौराणिक दाखला दिला आहे. ’ वाल्मीकि ऋषींना [ इतर शिष्य असलेल्या अशा ] ऋषीमुनींनी बोल लावला व सीतेची परीक्षा घेतली त्या वेळीं स्वतःजाह्नवीनें त्या संशयीं
शिष्यांना धडा दिला - त्याहीपेक्षां हें येथील श्रीगुरुंचें चरित्र अद्भुत आहे ’ असा या ओवींतील अर्थ आहे. तो अधिक स्पष्ट होण्यासाठीं वाचकांनीं श्रीरामविजय ’ ग्रंथांत्तील अ. ३७ मधील ओव्या ११३ ते १२६ हा भाग पहावा त्यांत ही कथा खुलासेवार स्पष्ट केली आहे. लोकापवादामुळें श्रीरामांनीं सीतेला वनांत सोडल्यानंतर वाल्मीकींनीं तिला आश्रय दिला. त्यावेळीं त्यांचेजवळ अध्ययन करणार्या शिष्यमंडाळीनीं ’ हें विघ्न येथें कशाला आणलें ? ’ असे विचारलें. ही जरी खरी
पतिव्रता असेल तर आतां येथेंच भागीरथीला प्रकट करवील ’ अशीही त्यांनीं परीक्षेची अट घातली. सीतेच्या प्रार्थनेनें गंगा तात्काळ प्रकट झाली व या विकल्पी शिष्यांना चांगली अद्दल घडविण्यासाठीं विस्तार पावूं लागली तेव्हां मात्र
’ सीतेसी करिती नमन । माते आश्रय जाती बुडोन । आम्हासी रक्षावया तुजविण । कोणी दुजे दिसेना ॥" अशी
सीतामाईला काकुळतीनें प्रार्थना केल्याशिवाय ऋषींना गत्यंतरच राहिले नाहीं असा हा थोडक्यांत संदर्भ आहे. प्रस्तुत
टीपेच्या ओवींतील ’ त्याहीपेक्षां अपूर्व हें ’ याचा अभिप्राय असा कीं, वरील प्रसंग घडला तेव्हां त्रेतायुग होते, सीता ही
साक्षात् जगज्जननीं होती व गंगेनें दाखल द्यावा यासाठीं वाल्मीकींच्या शिष्यांनीं प्रकट बोलून दाखविले होते ! उलट
कलीसारख्या महापापमय युगांद्त श्रीमहाराजांच्या शिष्यांच्या मनांत नुसता संशय येतांच कृष्णाबाईने उचंबळून येऊन
श्रींच्या थोरवीची जाणीव दिली म्हणून ’ त्याहीपेक्षां अपूर्व हें ! "
(६) सद्गुरुपत्नी माय माउली । नाहीं गायिली स्वल्पही - ओवी १०० :-
अखंड सौभाग्यसंपन्न जानकीमाय ह्या श्रींच्या धर्मपत्नी व आद्य शिष्या होत्या. अशा महासाध्वीचे कांहीं गुणानुवाद वर्णन
केले नाहींत अशी श्रीपतींना खंत वाटली. येथील सुमारे ३० । ३५ ओव्यांतून त्यांचे चमत्कार त्यांनी वर्णिले आहेत.
ओव्य़ांतील, जननी, माय, माता, माउली हे शब्द अर्थातच गुरुपत्नीला उद्देशून आहेत कारण गुरुकलत्र हे शिष्यांची माताच होय !
कठिण शब्दांचे अर्थ :-
आलोडन करणें = ग्रंथांचें, अवलोकन, अध्ययन करणें (१६) तक्रार्थी = ताकाची इच्छा करणारा (२३) भर्ग = तेज, लक्षणेनें तेज
स्वरुप सद्गुरु (७६) शातकुंभ = सोनें (१००) पिशाचलिपी = मोडी लिपी ( १९४)