मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय दहावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय दहावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशायनम: ॥
माझे दिव्य हृदय कमल । तेथें स्थापिलें श्रीपद-युगुल । जे तेजोमय अति सोज्वळ । महिमा अकळ जयाची ॥१॥
मन सुमन हाचि मोगरा । सुगुण गुणी दोर साजिरा । गुंफूनि समर्पिला दयासागरा । परात्पर सोयरा श्रीराम ॥२॥
अहं ममतेचा जाळिला धूप । सोऽहं वाती प्रकाश दीप । भावभक्ति नैवेद्य अमूप । अर्पण केले श्रीचरणीं ॥३॥
त्रिगुण गुणी विडा जाण । त्रयोदश प्रकारें परिपूर्ण । सुरंग रंगला पावन । ऐक्य मिळणी मिळोनियां ॥४॥
दुराशा जाळूनि सुफळ फळ । श्रीपदीं अर्पिलें सुरस रसाळ । शुद्ध सत्त्वाचा सोज्वळ । कर्पूरदीप उजळिला ॥५॥
सोऽहं मंत्राच्या मंत्राक्षता । वाहिल्या श्रीगुरुच्या माथां । देहसामग्रीविण तत्त्वतां । पूजा सांग पैं केली ॥६॥
जन्म मरण निवृत्ति-साधना । यस्य स्मृत्या सोडली जाणा । ऐसा सद्गुरु रामराणा । हृदयामाजीं पूजिला ॥७॥
तंव तो मम माथा ठेवूनि कर । म्हणे तूं ग्रंथ वदे साचार । गोरखें उद्धरिला राजेन्द्र । पुढें काय प्रकार जाहला ? ॥८॥
मग ते आज्ञा शिरीं वंदुनी । श्रीपति श्रोतयां करी विनवणी । तुम्हीं मातें अवधान देउनी । कथा - कथनीं शुद्ध करा ॥९॥
श्रीगिरीहूनि गोरक्षातें । निरोप देऊनि मच्छेन्द्रनाथें । आपण कांहीं काळ तेथें । स्वस्थचित्तें राहिले ॥१०॥
पुढेम तेथूनि निघाले । फिरत सिंहलद्वीपासी गेले । जेथें स्त्रियांचें प्राबल्य आगळें । राज्य सर्व तयांचें ॥११॥
तेथील जी का मुख्य राणी । परमपावन पुण्यखाणी । नामें अवधारा पद्मिनी । तियेनें श्रीसिद्धा पाहिलें ॥१२॥
पूर्वपुण्यौघ वोळला । कीं सुकृताचळ उंचावला । चित्तीं सद्भाव उदेला । सिद्धासी नयनीं पाहतां ॥१३॥
मग ते म्हणे स्वामी कृपा करुनी । ये स्थळीं कांहीं काळ क्रमोनी । मग जाइजे अन्यस्थानीं । कृपानिधि कनवाळा ॥१४॥
आम्हां स्त्रियांची अधम जाति । त्यांत स्त्रीराज्यीं राज्यप्राप्ति । राज्यैश्वर्ये मदोन्मत्ती । होऊनि, अध:पातीं पडियेलो ॥१५॥
मनुष्य जन्मांतें पावोनियां । व्यर्थ की जन्म गेला वांया । तारी तारी सद्गुरुराया । म्हणोनि पायां लागली ॥१६॥
ऐकोनि तियेच्या दीन वचना । कृपा उपजली सिद्धाचे मना । देऊनि सोऽहं शब्दाची धारणा । समाधिशेजे पहुडविली ॥१७॥
व्युत्थान पावोनि ती अबला । धावोनि लागे चरणकमलां । म्हणे मुक्त केलें जी दयाळा । भवपाश शृंखला तोडोनी ॥१८॥
तियेची अत्युत्कट भक्ति पाहोनी । नाथ राहिले तये स्थानीं । तों अत्यद्भुत जाहली करणी । ती सज्जनीं परिसावी ॥१९॥
तेथील राज्याची जितुकी सीमा । त्यांतील यापरी असे महिमा । कीं स्त्री न पवे पुरुषसंगमा । मारुति-बुभु:कारें गर्भ धरी ॥२०॥
सहा सहा महिने होतां । मारुती बुभु:कारें गर्जे तत्त्वतां । तेधवां गर्भवतीची अवस्था । ऐसी कीजे; श्रोता अवधारी ॥२१॥
अहो कन्या जैं जठर कुहरी । असिल्या, ते सुखरुप नारी । आणि पुत्र असलिया उदरीं । भूमीवरी पतन पावे ॥२२॥
ऐसी संवत्सरामाझारीं । (१)प्रति अयनाची नवलपरी । यालागीं पद्मिनी जोडल्या करीं । नाथा नमस्कारी निजभयें ॥२३॥
कां जे आपण गर्भवती । नाथकृपें जाहली निगुती । तेव्हां कुमर कीं कन्या निश्चिती । सिद्धाप्रति विचारी ॥२४॥
नाथ म्हणती वो पद्मिनी । तुवां भीतीतें मनींहुनी - । सांडोनि, सदैव शंकर ध्यानीं । सावधानी असावे ॥२५॥
कां जो अंजनीचा बाळ । तोचि आमुचा जाश्वनीळ । स्वामी अदिनाथ कृपाळ । साह्य सर्वकाळ आम्हासी ॥२६॥
तुझे पोटीं होईल सुत । तो तयाचा परमभक्त । कीर्ति वाढवील जगतांत । मीननाथ नामेंसी ॥२७॥
ऐसें नाथे आश्वासितां । पद्मिनी जाहली प्रसन्न चित्ता । प्रेमें पदरज वाहूनि माथा । श्रीनाथपदा लागली ॥२८॥
जैसा अरुणाचली सूर्य चढे । तैसा दिवसभासें गर्भ वाढे । दिवस पूर्ण भरता रोकडे । पुत्ररत्न प्रसवली ॥२९॥
त्या देशीं तो अपूर्व सोहळा । महोत्साह झाला, सकळा । वर्णिती सर्व सिद्ध-लीला । गुढिया तोरणें उभवोनी ॥३०॥
नालच्छेदनापूर्वी देख । पद्मिनीनें वोसंगीं घातलें बालक । सद्गुरुचरणीं अर्पूनि सम्यक । म्हणे दीनपालक तूं धन्य ॥३१॥
आजवरी ऐसा सोहळा । कोणीच येथें न पाहिला डोळां । जे पुत्ररत्नासी अबला । स्त्रीराज्यांत पावली ॥३२॥
तें तुवां आजि घडविलें । जे मुक्याहातीं वेद पढविले । विजयगुढीतें चढविलें । मढविलें वज्रकवचें बाळका ॥३३॥
धन्य महिमा सिद्धराया । म्हणोनि वारंवार लागे पाया । लोटांगण घेत लवलाह्या । प्रदक्षिणा करोनी ॥३४॥
नाथ म्हणती तिजलागुनी । आश्चर्य न करी वो साजणी । आदिनाथाची विचित्र करणी । अघटित घटणीं समर्थ ते ॥३५॥
नाथ-धर्मे वांचणे बालकासी । तरी धर्मनाथ नाम यासी । ऐसें ऐकोनि अति संतोषी । तेंचि नाम स्थापिलें ॥३६॥
बुभु:कारें गर्भसंभव । श्रोतीं न मानावा नवलाव । जगद्व्यापी सद्गुरुराव । काय एक न करवी ? ॥३७॥
अश्वत्थामा सोडोनि ब्रह्मास्त्रा । म्हणे नि:पांडवी करीन धरा । तेथें उत्तरेचिया गर्भागारा - । माजीं रक्षिलें देवरायें ॥३८॥
असो; पद्मिनीचे मनीं । चिरकाल रहावेत नाथ-मुनि । म्हणवोनि प्रसन्नता पाहोनी । अमृतवचनीं प्रार्थितसे ॥३९॥
म्हणे जी आम्ही अबला भीरु । न साहूं तव वियोग-ज्वरु । तूं तंव कृपेचा सागरु । अभय वर मज दीजे ॥४०॥
स्वामींनीं ये स्थळाहुनी । कधींही नवजावे अन्यस्थानीं । म्हणोनि दृढ लागली चरणी । स्फुंदस्फुंदोनि सप्रेमें ॥४१॥
तुमचे चरणसेवेवांचून । माझा न वजावा एक क्षण । वियोग होतांचि देह पतन - । व्हावा, ऐसा वर देई ॥४२॥
मच्छेन्द्र म्हणती ऐक राजसे । योगीं वियोग कहींच नसे । मी तूंपणाचें जाळूनि पिसें । सर्वदा विलसे ब्रह्मरसीं ॥४३॥
सुबुद्धे, एकार्णवाचे ठायीं । थिल्लरोदका मुळींचि ठाव नाहीं । तैसी ब्रह्मीं गुरु-शिष्य नवाई । कैंची आणिली कोठोनि ? ॥४४॥
ती म्हणे जी देवाधिदेवा । ब्रह्मसुखाच्या महानुभवा । ज्या चरणदर्शनें आलों दैवा । ते चरणसेवा न सोडी मी ॥४५॥
जळो जळो त्याचें ज्ञान । जळो शाब्दिक समाधान । जो विसरे सद्गुरुचरण । त्याचें वदन न यों दिठीं ॥४६॥
म्हणोनि चरणीं घातली मिठी । म्हणे कृपाळुवा जगजेठी । येवढीच आशा माझिये पोटीं । जे हे चरणसेवा न विसंबे ॥४७॥
ऐसी ऐकोनि दीन वाणी । दयाब्धि म्हणे तिजलागोनी । गोरक्ष येईतों, तव सदनीं । वास करीन निर्धारी ॥४८॥
ऐसें वचन होता ते क्षणीं । पद्मिनी विचार करी मनीं । म्हणे गोरख न येती इये स्थानीं । ऐसा उपाय योजावा ॥४९॥
आपुले राज्याचे सीमेवरी । रक्षक ठेविले निर्धारी । म्हणे कानफाटिया ये अवसरीं । प्रवेशों नेदावा सर्वथा ॥५०॥
ऐसी आज्ञा करोनि दृढतर । सेवक ठेविले सीमेवर । आपण सद्गुरुसेवे तत्पर । अहोरात्र राहिली ॥५१॥
यापरी मूळ असे कथा । अज्ञानी जन न जाणता । म्हणती स्त्रीस भुलोन तत्त्वतां । नाथ राहिले ते द्वीपीं ॥५२॥
ज्यांची बहिर्मुख दृष्टि । तेथें अज्ञानाचीच वृष्टि । तयासी जरी सत्य सांगेल परमेष्टि । तरी तो कष्टी सर्वदा ॥५३॥
असो; सिंहावलोकनें श्रोता - । परिसावी जी मागील कथा । राजासी बोधोनि तत्त्वतां । पुढें गोरक्षें काय केलें ? ॥५४॥
ते कथा परमसुंदर । पुढिलिये प्रकरणीं साचार । श्रीगुरु वदवील कृपाकर । श्रीपति किंकर जयाचा ॥५५॥
गोरख कानिफाची भेटी । आनंदें कोंदाटेल सृष्टि । ते सुखसोहळ्याची गोष्टी । श्रोतयां पुष्टिकारक ॥५६॥
आधींच ग्रंथ सिद्धचरित्र । तेथें ही कथा अतिपवित्र । जे पद्मिनीस प्राप्त पुत्र । नाथकृपें जाहला ॥५७॥
अपुत्रस्य गतिर्नास्ति । ऐसें बोले वेदश्रुति । ज्यास पाहिजे पुतप्राप्ति । तेणें ही कथा वाचावी ॥५८॥
श्रावण कार्तिक माघ मास । या तीन मासीं महिमा विशेष । राहूनियां व्रतस्थ अशेष । ग्रंथ भावार्थे वाचावा ॥५९॥
येथें श्रोते आशंका घेती । जरी ग्रंथ प्रौढी असती । तरी भावाभावाची निगुति । गुंती कासया असावी ? ॥६०॥
तैं कल्पवृक्षातळीं । जो जे मनोरथासी पाळी । तेंचि बैसे त्याचे कपाळीं । तैसें या स्थळीं सिद्ध होय ॥६१॥
गोरक्ष चिंचे सन्निधानीं । तीन मासांत प्रतिदिनीं । सायंप्रातर्मध्याह्नीं । तीन आवर्तनें करावीं ॥६२॥
तीन मासाचे शेवटीं । स्त्रीपुरुषें पूजावा धूर्जटी । श्रद्धा धरोनियां पोटीं । ग्राम्य गोष्टी सोडोनी ॥६३॥
यथानुशक्त्या द्विजभोजन । कानफाटया जेववावे तीन । पुस्तकाची पूजा करुन । ब्राह्मणासी पैं द्यावें ॥६४॥
भावार्थे ऐसें करितां जाण । वांझही पावे पुत्ररत्न । असत्य मानील त्या पतन । कदाकाळीं चुकेना ॥६५॥
श्रीपति विनवी रामराया । तुझी गुण कीर्ति गावया । मति देइजे स्वामिया । पतित पाया लागतसे ॥६६॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भव गज विदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥६७॥
श्रीरामचंद्रार्पण मस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥
॥अध्याय दहावा संपूर्ण॥
=========

टीपा - (१) प्रति-अयनाची नवल परी - ओवी २३ :- पद्मिनीच्या स्त्रीराज्यांत मारुतीच्या केवल बुभु:कारानें स्त्रिया गर्भवती होत हें आश्चर्य होय. हा काळ दर सहा महिन्यांचा असे. उत्तरायण व दक्षिणायन अशा दोन अयनांत प्रतिवर्षी असा अर्थ.

कठिण शब्दांचे अर्थ : - जाश्वनीळ = श्रीशंकर (२६)
लवलाह्या = लगबगीने, आतुरतेने (३४) थिल्लरोदक - डबक्यांतील पाणी (४४) परमेष्ठी = ब्रह्मदेव, परमेश्वर (५३) अशेष = बाकी न ठेवता, संपूर्ण (५९) यापैकीं थिल्लर व अशेष (अशेख) हे दोन्ही शब्द याच अर्थानें श्रीज्ञानेश्वरींत अनेकदा आले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP