एके दिवशी एक पारधी शिकारीला गेला. तेथे त्याने निरनिराळ्या जातीचे अनेक प्राणी मारले. ते पाहून सर्व प्राणी घाबरले व आपापले प्राण वाचविण्यासाठी गुहेत व झाडीत लपून बसले. प्राण्यांचा हा भित्रेपणा पाहून सिंह मोठ्या आवेशाने त्यांना म्हणाला, 'अहो मी जिवंत असता, तुमच्या केसाला धक्का लावण्याची कोणाची प्राज्ञा आहे ? माझ्याकडून तुमचं रक्षण झालं नाही तर माझी काय किंमत राहिली ? तर तुम्ही असे भिऊ नका. माझ्या शौर्यावर आणि शक्तीवर विश्वास ठेवून शांत रहा. मी एका क्षणात तुमच्या शत्रूचा नाश करतो.' अशा प्रकारे मोठ्या घमेंडीत सिंह बोलत व मधूनमधून डोळे वटारून, शेपटी आपटीत आहे तोच त्या पारध्याने मारलेला एक बाण येऊन त्याच्या पंजात घुसला. त्या वेदनेने व्याकुळ होऊन तो मोठ्याने ओरडला, तेव्हा कोल्हा त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाला, 'महाराज, ज्याने आपल्या बाणाने तुमच्यासारख्या बलवान प्राण्यालाही घायाळ केलं, तो पराक्रमी शत्रू कोण असावा बरं ?' सिंह त्यावर म्हणाला, 'मित्रा, माझा अंदाज अगदीच चुकला. समोर हातात धनुष्य घेतलेला माणूस उभा आहे, त्यानंच मला घायाळ केलं, अन् आम्हा प्राण्यांना तो केवळ अजिंक्य आहे.'
तात्पर्य - नुसते शौर्य व सामर्थ्य यापेक्षा बुद्धीबळाची योग्यता मोठी आहे.