एकदा एका सिंहाने बोकडाची शिकार केली तेव्हा त्याची शिंगे लागून त्याला जखमा झाल्या. त्यामुळे सिंहाने संतापून असा हुकूम सोडला की, 'शिंगं असलेल्या जनावरांनी आजच्या आज अरण्यातून निघून जावं.' हा हुकूम अमान्य करून जर एखादं शिंगाचं जनावर इथे राहिलं तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल.' हा हुकूम ऐकून बैल, रेडे, हरिण, बोकड इत्यादि शिंगे असलेली जनावरे पळत सुटली. त्यांच्याबरोबर एक ससाही पळू लागला. आपल्या लांब कानाची सावली पाहून त्याला वाटले ती आपली शिंगेच आहेत असे समजून सिंह कदाचित् आपल्यालाही शिक्षा देण्यास कमी करणार नाही. पळता पळता एक ओळखीची चिमणी त्याला भेटली. तो तिला म्हणाला, 'चिमूताई, रामराम ! आता येतो. आमचे हे उंच कान काही आम्हाला सुखानं राहू देत नाहीत. कानाऐवजी शिंग आहेत असं समजलं जाण्याची अधिक शक्यता आहे !' चिमणी हसून म्हणाली, 'काय ? तुझ्या कानाला शिंग समजून सिंह तुला शिक्षा करील ? वेडा तर नाहीस ना तू ?' ससा त्यावर म्हणाला, 'चिमूताई, तू वाटेल ते म्हणालीस तरी माझे कान ही माझी शिंगच आहेत असं जर एखाद्यानं सिद्ध करायचं ठरवलं तर हल्लीच्या बेबंदशाहीत ते सहज सिद्ध करून दाखवू शकतील.'
तात्पर्य - एकदा बेबंदशाही सुरू झाली म्हणजे एखाद्या निरपराधी माणसावरसुद्धा निष्कारण आळ येण्याचा संभव आहे.