एका गरुड पक्षीणीने एका मोठ्या झाडाच्या उंच फांदीवर आपले घरटे केले. त्या झाडाच्या मध्यभागी एक ढोली होती. त्यात एक रानमांजर राहत असे व झाडाच्या मुळाशी पोकळ जागा होती त्यात एक रानडुकरी आपल्या पिलांसह राहात असे. एके दिवशी मांजर गरुड पक्षिणीकडे जाऊन तिला म्हणाले, 'बाई, काय सांगू ? आपल्यावर मोठा अनर्थ गुजरण्याची वेळ आली आहे. ती खाली असलेली डुकरी सगळा दिवस झाडाच्या मुळाशी उकरीत असते. एकदा झाड उपटून पडलं म्हणजे आमची पिलं सहजच आपल्या हाती लागतील, 'असं तिला वाटतंय. मी तर आता काय करावं याच काळजीत आहे.' अशा प्रकारे गरुड पक्षिणीच्या मनात भिती उत्पन्न करून ते दुष्ट मांजर तिला न कळत डुकरी जवळ आले व खिन्न चेहरा करून तिला म्हणाले, 'बाई, आज तुम्ही कुठं बाहेर जात नाही ?' डुकरी म्हणाली, 'कां बर?' मांजर म्हणाले, 'सहजच पण खरं सांगायचं तर तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना म्हणत होती की डुक्करी बाहेर गेली की, तिची पिलं मी तुम्हाला खाऊ घालीन, आणि एक मांजरीचं पिलू तोंडी लावायला देईन. हे तिचं बोलणं मी प्रत्यक्ष ऐकलं. आता मी जाते. माझी मुलं घरी एकटीच आहेत.' इतके बोलून ते आपल्या ढोलीत गेले. याप्रमाणे पक्षीण व डुकरी यांच्यात एकमेकींच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगून त्या मांजराने त्यांच्या मनात एकमेकींविषयी द्वेष उत्पन्न केला व खाणे मिळविण्यासाठी रात्री बाहेर जावे व दिवसा आपल्या ढोलीत पिलांजवळ बसून साशंक दृष्टीने खालीवर पहावे, असा क्रम त्याने ठेवला. ही त्याची वर्तणूक पाहून डुकरी व पक्षीण ह्या एकमेकींविषयी इतक्या साशंक झाल्या की, त्या आपली जागा सोडून कित्येक दिवस बाहेर पडल्या नाहीत. याचा परिणाम असा झाला की, त्या व त्यांची पिले अन्न न मिळाल्याने उपासमारीने मरण पावली व त्या दुष्ट मांजराची चंगळ झाली !
तात्पर्य - स्वार्थी व चहाडखोर माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून शेजार्याशी शत्रुत्व करणे हा मूर्खपणा होय.