एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'
तात्पर्य - व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.