एके वेळी काही मजुर दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला, इतक्यात त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून त्या मजुरांना फार नवल वाटले व ते त्याच्याकडे कौतुकाने पहात उभे राहिले. तो बेडूक त्या दगडाच्या आत कसा जन्मला, कसा जगला याविषयी आपापसात बोलू लागले. त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला, 'अरे बाबांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो. माझ्या बरोबरीचा असा आज एकही प्राणी या जगात नाही. भगवंताचं आणि माझं कूळ एकच. अन मीही त्याच्या सारखाच पुढच्या प्रलयापर्यंत जगणार !' तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, 'बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे. मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?'
तात्पर्य - खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो.