एके दिवशी काही प्राणी एका सुंदर तरूण कोल्ह्याला सिंहाच्या आज्ञेने धरून ठार मारण्यासाठी घेऊन चालले असता एका लांडग्याला त्या कोल्ह्याची दया आली. त्याने सिंहाजवळ रदबदली करून कोल्ह्याचा प्राण वाचविण्याचा निश्चय केला. मग तो त्या प्राण्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला, 'अधिकारीहो, या कोल्ह्यानं असा कोणता अपराध केला आहे?' प्राण्यांपैकी एकाने सांगितले, 'ह्या कोल्ह्याने बर्याच कोंबड्या मारून खाल्ल्या अन् हा इतका उद्धट आहे की, खुद्द सिंह महाराजांनी स्वतःसाठी राखून ठेवलेला एक लठ्ठ कोंबडाही याने मारून खाल्ला !' हे ऐकून कोल्ह्याला लांडगा म्हणाला, 'हा तुझा अपराध फारच मोठा आहे नि या बाबतीत मी जरी काही रदबदली केली तरी तिचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही.' इतके बोलून लांडगा आपल्या वाटेने निघून गेला.