श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर माहेरा नेई ॥
त्रिभुनमान्या नमिए कन्या चरणि ठाव देई ॥धृ०॥
क्षणभंगुर तनु मिथ्या माया साच ब्रह्म गमले ॥
त्रिगुण तंतुने वेष्टियले गुरु यास्तव पदि रमले ॥
षड्रिपु पंचविषय झोंबती भवपुरि मी दमले ॥
अत्रिनंदना वारि यातना कोणि दुजे नाही ॥ श्रीपाद०॥१॥
करुनि अकर्ता नाही तुजला दुःखाची वार्ता ॥
धरुनी दंडा शासन करिसी अडमार्गी रिघता ॥
सन्मार्गाते कोणि न लावी तुजवाचुनि दत्ता ॥
नेती म्हण ती वेद श्रुती ती थकली शास्त्रे साही श्री० ॥२॥
त्यजि निष्ठुरता कोमल ह्रदयी प्रेमांबर झाकी ॥
थोरपणाची होइल हानी अपकीर्ती लोकी ॥
मी बालक तू जननी दत्ता घेई निज अंकी ॥
वेडवाकडे शब्द बोबडे ऐकुनिया घेई ॥श्री०॥३॥
निजकरुनेचा पाझर सोडी मजवरि गुरुराया ॥
भवबंधन हे झडकरि तोडी श्रमली बहु काया ॥
ज्ञान-ज्योतिचा प्रकाश पाडी हरवुनि ही माया ॥
अन्य मागणे नसे दयाळा नमि कृष्णाबाई ॥४॥