येतो आम्ही लोभ असू दे ॥
श्रीदत्ता प्रेम वसू दे ॥
हा प्रपंच लटिका सारा ॥
जाणुनिया तव पदि थारा ॥
तरि पावन अत्रिकुमारा ॥
करि मजला विधिहरिहरा ॥
लागला विषयविषवारा ॥
मम अंगी झोंबत सारा ॥चाल॥
नसे सौख्य मला संसारी ॥
यास्तव मी आले द्वारी ॥
मम दुःख कोण निवारी ॥
तुजवाचुन कोप नसू दे ॥येतो आम्ही० ॥१॥
जे अगम्य स्वर्गि सुरांसी ॥
ते रूप दाविले मजसी ॥
कोटि चंद्र उणे ते ज्यासी ॥
भासते मला नयनासी ॥
क्षयरोगि कोडे कुष्ठांसी ॥
तू दर्शनि पावन करिसी ॥चाल॥
तव वर्णन सतत करावे ॥
सच्छास्त्री मन विवरावे ॥
मागते बालस्वभावे ॥
मम अंतरि ध्यान ठसू दे ॥ येतो आम्ही०॥२॥
ऐकूनि दिनाची वाणी ॥
होय सद्गद अवधुत स्वमनी ॥
मग कृपाकटाक्षे त्यांनी ॥
आलिंगुन प्रेमकरांनी ॥
ते वदले अमृत वाणी ॥
होय सौख्य तुला जा सदनी ॥चाल॥
धरि दंडकमंडलु हाती ॥
सर्वांगी चर्चुनि विभुती ॥
श्रीदत्त दिगंबर मूर्ती ॥
म्हणे कृष्णा चित्ति वसु दे ॥ येतो आम्ही०॥३॥