भजन - १
तुझे सगुण रूप ध्यावे ।
माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥
मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा ।
पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥
मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी ।
लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥
नको कुणी साधना, तूची असो मन्मना ।
तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥
भजन - २
करुणाघना ! दीनपावना !
कुलभूषणा ! दे दर्शना ॥धृ॥
तुजवीण त्राता न कुणी आम्हाला, सुख दे मना । दे० ॥१॥
भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना मना । दे० ॥२॥
गति तुकड्याची वाहो स्वरूपी, पदि याचना । दे० ॥३॥
भजन - ३
सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहताना मनासी हरी ॥धृ॥
अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले ।
गळा वैजयंती साजिरी । पाहताना० ॥१॥
कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा ।
वाजवितो मधुर बासरी । पाहताना० ॥२॥
दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे ।
मुक्ति लाभे, जपा अंतरी । पाहताना० ॥३॥
भजन - ४
किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी ।
मनि लावितसे अति वेड मला ॥धृ॥
पद-कमलावर तुळशि-दले ही, शोभति उटिया पद-युगुला ॥१॥
वक्षस्थळावर माळ विराजे, कटि पीतांबर हा कसला ॥२॥
मोरमुकुट हा अति झळके शिरि, अधरि धरी पावा अपुला ॥३॥
तुकड्यादास म्हने मज शेवटि, देशिल ना प्रभु ! भेट खुला ॥४॥
भजन - ५
वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी ।
मोहिनी या बंसिची हृदयास लागू दे चवी ॥धृ॥
चित्त हे झुरते सदा, ती मधुर बंसी ऎकण्या।
काढ हा पट आडवा, मन लागु दे रुप पाहण्या॥१॥
श्यामसुंदर कटि पितांबर, मूर्ति चिमणी साजिरी ।
कुंजवनिच्या गोपिकांना, तारिशी तू निर्भरी ॥२॥
दास तुकड्या प्रेमयोगी, बंसरी द्या मागता ।
ना हवे मग दुसरे मज, गंधही त्या स्वर्गिचा ॥३॥