मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ८१ ते ८५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ८१

सद्गुरु अपुला सखा, गडे हो ! सद्गुरु अपुला० ॥धृ॥

निर्मोही, निर्भयी निरंतर, मार्ग दावि भाविका ॥१॥

अजर, अमर हा आत्मा साक्षी, होउ न दे पारखा ॥२॥

निज स्वरुपाचा बोध दावुनी, दूर करी यम-दुखा ॥३॥

तुकड्यादास म्हणे या या रे ! तिळभरि विसरू नका ॥४॥

भजन - ८२

मशि बोल सख्या घननीळा रे ! ॥धृ॥

तव बोले मन उन्मत होते, लागे निजरुपि डोळा रे ! ॥१॥

निर्मळ रुप तव विमल सुदर्शन, दूर करी कळिकळा रे ! ॥२॥

मोरमुकुट पीतांबर शोभे, गळा वैजयंति माळा रे ! ॥३॥

तुकड्यादास म्हणे तव बोले, नाशे विषय-उमाळा रे ! ॥४॥

भजन - ८३

मी पाहि तसा रुप धरशिल ना ? मज पावन तू हरि करशिल ना ?

मी पाहता तुज तू दिसशिल ना ? मी हासता तू हरि ! हसशिल ना ?

(अंतरा)

सुंदर वनि वेलांच्या तळुनी ।

झुळझुळ नदि वाहे वळवळुनी ।

गर्द तरू हिरवळले मिळुनी ।

अधरि बंसि तू धरशिल ना ? ध्वनि मधुर कर्णि तू भरशिल ना ? ॥१॥

(अंतरा)

मयुर-पिसारा मुकुटावरती ।

कांबळ खांदी, उरि वैजंती।

कुंडल-शोभा झळके खुलती ।

मन्मंदिरि तू स्थिरशिल ना ? ह्या प्रेम-सुखी उध्दरशिल ना ? ॥२॥

(अंतरा)

एकांताच्या हृदयाकाशी ।

मी पाहिन तव श्याम रुपासी ।

आळवीन तुज मग हृषिकेशी !

देह-भाव मग हरशिल ना ? मज तव स्वरुपी लिन करशिल ना ? ॥३॥

(अंतरा)

नित्य असा मी करि अभ्यासा ।

स्फूर्ति सदा देशिल ना दासा ? ।

नाकरि हरि ! मम आस हताशा ।

कृपा-हस्त शिरि धरशिल ना ? हा तुकड्या अपुला करशिल ना ? ॥४॥

भजन - ८४

कुणि भावबळे आणा हरिला । कुणि प्रेमबळे आणा हरिला ॥धृ॥

ना कळतो तो यम-नियमांनी, ना कळतो तप साधुनिया ।

ना कळतो वनि जप करण्याने, भक्तीने वश होय भला ॥१॥

कठिण मार्ग हा असाध्य बहुता, योग-याग-विधि-प्रणवाचा ।

साध्य होय प्रभु गोड गाउनी, जैसा द्रौपदिला झाला ॥२॥

कृत-त्रेता-द्वापारी बघता, कठिण मार्ग वेदे वदला ।

'कलीयुगी प्रभु नाम-बळाने, वश होई' संती कथिला ॥३॥

तुकड्यादास म्हणे आला हरि, भारतभू ही बघण्याला ।

म्हणा 'धर्म हा जात लया, प्रभु ! का ऎसा निष्ठुर झाला ?' ॥४॥

भजन - ८५

हरिनाम मधुर मनि गाइ सदा । गुरुवचनी निर्भय राहि सदा ॥धृ॥

सोडुनिय ही विषय-चिंतना, माया-मोह-विकाराची ।

सद्‍ विचार मनि वाहि सदा, गुरु-वचनी० ॥१॥

'अखिल जगाचा चालक तो प्रभु', भाव असा दृढ ठेवुनिया ।

ममतेने जग पाहि सदा, गुरु-वचनी० ॥२॥

असत्यता ही नष्ट करोनी, नीतीने संसार करी ।

जन-सेवा-श्रम साहि सदा, गुरु-वचनी० ॥३॥

तुकड्यादास म्हणे, इहपर घे गोड करुनिया या देही ।

आत्म्याची घे ग्वाही सद, गुरु-वचनी० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP