मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १११ ते ११५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १११

मराठे शूर-वीरांनो ! निकामा स्वस्थ का बसला ?

धैर्यबल खोवुनी सगळे, भिकारी दास कां झाला ? ॥धृ॥

बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा ।

शिवाजी 'शिवबा' म्हणवताना, रायगडि छत्रपति झाला ॥१॥

कधी शिवला न भीतीला, रंगला राजनीतीला ।

म्हणे 'दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला' ॥२॥

गर्जला सिंह जणु धावे, मिळविला तोरणा किल्ला ।

राष्ट्रीचे दास्य खंडुनी, सुखी केले जना सकला ॥३॥

शोभते का तुम्हा ऎसे, तयाचे वंश म्हणवोनी ? ।

प्राण द्या राष्ट्र-सेवेला, भितीने भ्याड का झाला ? ॥४॥

अहो ! मरणे अणी जगणे, दोन्हिही सारखे अपणा ।

ती तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या अपुला ॥५॥

भजन - ११२

कसा हरि ! स्वस्थ तू आता ? वेळ ही काय उरलीसे ? ।

राहिला धर्म किती ऎसा, तुला का याद नुरलीसे ? ॥धृ॥

जनाची वृत्ति बहिरोनी, पुरी नास्तीकता आली ।

न कुणि पुसताति कोणाला, प्रेम-मायाच हरलीसे ॥१॥

न साधू लक्ष दे धर्मा, न पंडित सांगती वर्मा ।

स्वार्थता भासते सगळी, दयेची वाट सरलीसे ॥२॥

अशी ही अवदशा आता, कोठवरि ठेविशी देवा ! ।

हाक घे दास तुकड्याची, वासना हीच धरलीसे ॥३॥

भजन - ११३

प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ॥धृ॥

कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती ।

कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ॥१॥

कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे ।

तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ॥२॥

कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी ।

न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ? ॥३॥

कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला ।

सुखास्तव झुरती सारे, कळेना मार्ग कोणासी ॥४॥

म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे ।

दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी ? ॥५॥

भजन - ११४

जगाचा मोह ना सोडी, कसा होशील रे ! साधू ? ॥धृ॥

बहु लोकेषणा मागे, न मिळतो वेळ ध्यानासी ।

खोवुनी वेळ ही ऎसी, कसा होशील रे ! साधू ? ॥१॥

इंद्रिये स्वैर चहू देशी, विषय भोगावयासाठी ।

लावुनी पाश हा पाठी, कसा होशील रे ! साधू ? ॥२॥

फसविती वासना सगळ्या, जगाच्या सौख्य-मोहाने ।

न वृत्ती स्थीर करिशी तू, कसा होशील रे ! साधू ? ॥३॥

म्हणे तुकड्या गृहस्थी हो, करी संसार नीतीने ।

जराशा पोट-भीतीने, कसा होशील रे ! साधू ? ॥४॥

भजन - ११५

मना रे ! ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष्य विषयाचे ॥धृ॥

प्रपंची कोण सुखि झाला ? न दिसला, एकिला ऎसा ।

जयाने राम वश केला, वंदिती पाय जन त्याचे ॥१॥

विषय हे नाडिती देहा, नि आयूही फुकी धाडी ।

प्रभु-सुख घे जीवी धरुनी, न भय मग जन्म-मरणाचे ॥२॥

म्हणे तुकड्या धरी नेमा, स्मराया श्रीहरी-नामा ।

नामची नेइ निजधामा, न इतरे कोणि कामाचे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP