मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १०१ ते १०५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १०१

कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ?

सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥

न कोणी वेर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी ।

लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥

मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली ।

बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुखे फिरती ॥२॥

संतही सांगती ऎसे, पुराणे गर्जती ऎसे ।

अनुभवा सांगती ऎसे, धडपडी व्यर्थ का धरिशी ? ॥३॥

धरी सत्संगती जाई, मने मनि उन्मनी लावी ।

तो तुकड्यादास दे ग्वाही, सुखी मग तू स्वये होशी ॥४॥

भजन - १०२

उणा पाहशील दुसर्‍याला, उणीवेने उणा होशी ।

समजशी पूर्णता सगळी, अमर सुख अनुभवा घेशी ॥धृ॥

न जग हे तिळ उणीवेचे, असे भरले सुखत्वाचे ।

प्रभू नटुनीच जग साचे, पाहतो मौज ही खाशी ॥१॥

कुठे तो वृक्ष होऊनी, पाहतो शांतता अपुली ।

कुथे नदिच्या प्रवाही हा, राहुनी तृप्ति दे त्यासी ॥२॥

कुठे होऊनिया राजा, प्रजेला सूख दे सगळ्या ।

कुथे होऊनि अतिदीन, मागतो भीक जनतेसी ॥३॥

सर्व हा देवची नटला, जाणुनी अनुभवा घेणे ।

तो तुकड्यादास सांगतसे, भागवति रीत ही ऎसी ॥४॥

भजन - १०३

नसावा लोभ दुष्टांचा, मित्र जरि जाहला अपुला ।

असावा प्रेम थोरांचा, वैरि जरि भासला अपुला ॥धृ॥

कुणि अति प्रेम दावोनी, कापताती गळा वेळी ।

फसे हा जीव त्या योगे, नासतो जन्म हा अपुला ॥१॥

कुणी अति वैरही दावी, आपुले सार्थकासाठी ।

परी तो वेळ साधोनी, कामी ये थोर तो आपुला ॥२॥

धरावा संग ऎशाचा, जिवासी सत्यता लाभे ।

म्हणे तुकड्या हरी-भजने, सुसंगी मोक्ष हा अपुला ॥३॥

भजन - १०४

धर्म कसला गुलामांना ? खेळ हा पोरखेळांचा ॥धृ॥

आज जी देवळे बघतो, उद्या त्या मसजिदी होती ।

कधी त्या चर्चची बनती, न उरला नेमची त्यांचा ॥१॥

दुजाच्या सांगणी वागे, कशाची भक्ति मग जागे ?

न साधे धर्म या योगे, कळे हा भावची साचा ॥२॥

तुम्ही बोला तसे वागू, परी अम्हि धर्मची सांगू ।

देह हा जाहला पंगू, न उरला लेश शक्तीचा ॥३॥

न एका निश्चयी लागे, फिरे दुजियाचिया मागे ।

तो तुकड्यादास हे सांगे, बिघडला मार्गची त्याचा ॥४॥

भजन - १०५

शिकविते ज्ञान का गीता, बना हो सर्व संन्यासी ? ।

सोडुनी धर्म हे सारे, घरामधि झोप घ्या खाशी ॥धृ॥

वाहवा ! अर्थ करणारे, आणि लोकांसि वदणारे ।

भ्याडपण लावुनी सारे, राष्ट्र हे लावले फाशी ॥१॥

वीरांना भक्ति लावूनी, टाळ देऊनिया हाती ।

पिटविले टाळके त्यांचे, बनवुनी दास आणि दासी ॥२॥

अर्थ या भक्ति-ज्ञानाचा, असा नाहीच कोठेही ।

मेलियापरि जगी रहावे, वाढवोनी उरी खासी ॥३॥

गिता हे सांगते सर्वा, 'लढा अन्याय-प्रतिकारा, ।

'प्रभू हा साथ दे सर्वा, धर्म हा श्रेष्ठ सर्वासी' ॥४॥

म्हणे तुकड्या 'अहंकारा न धरता मर्द व्हा सारे ।

गाजवा धर्म सत्याचा, जगाचा भारतीयासी' ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP