भजन - १६६
किति सुंदर चंद्र मनोहर हा, गमतो जणु राजा तार्यांचा ॥धृ॥
सुख देत किती नभ-मंडळ हे, जिव मोहुनि नेत विकार्यांचा ॥१॥
या सृष्टिवरी तरी तेच गती, प्रभु शोभत आश्रय जीवांचा ॥२॥
जे भक्त तया भजती नमती, जिव प्राणचि तो या सर्वांचा ॥३॥
तुकड्यादास म्हणे जग सारे, घेत प्रकाश तया हरिचा ॥४॥
भजन - १६७
अभिमान खरा अति दुःखद हा, कधि जाउ नयेचि तया वाटे ॥धृ॥
क्षण एक न राहि, धरी लिनता, क्षण एकचि येति तया काटे ॥१॥
नसताचि कुळी अति होत बळी, विषयास धरी अपुल्या लाटे ॥२॥
धनद्रव्य मिळे तरि काय पहा, मग दीन जना दुरुनी दाटे ॥३॥
तुकड्या म्हणे तोचि खरा नर हो ! अभिमान न ज्या क्षणमात्र उठे ॥४॥
भजन - १६८
मन संयम तो अति दृढचि करा, मग काहि कुणाला नाहि कमी ॥धृ॥
धिर देउनिया उतरा रणिहो, मग मृत्यु जरी ये शीर नमी ॥१॥
संसार भयानक डोंगर हा, परि संयमियासि न दुःख कमी ॥२॥
जग हे पलटो उलटो सगळे, तरि चित्त नसो तिळमात्र भ्रमी ॥३॥
संयम घ्या तुकड्यादास म्हणे, मग जन्मवरी नच व्हाल श्रमी ॥४॥
भजन - १६९
श्रम घेउनिया भ्रम जात नसे, मग काय असे जन हे करिती ? ॥धृ॥
मन लावुनिया संसार करी, परि दुःख अती शरिरी भरती ॥१॥
अति द्रव्य कमावुनि आणुनिया, मग चोरांचे घरटे भरती ॥२॥
सुत-दारि अतिशय मोहुनिया, मग शेवटि आपणची मरती ॥३॥
तुकड्या म्हणे एक न लाभ मिळे, मग कष्ट करोनी काय गती ? ॥४॥
भजन - १७०
हरि गात चला, हरि गात चला, हा मार्ग भला सकळास खुला ॥धृ॥
सुख दुःख सहा मनि शांत रहा, निजज्ञानरुपी मनसोक्त डुला ॥१॥
संसार पिसे आत्मास नसे, हा भास मुळापासून भुला ॥२॥
आनंदि रहा प्रभु-छंदि रहा, भव-वैभव हे मनि तुच्छ तुला ॥३॥
तुकड्यास रुचे पदची हरिचे, मनि ध्यास चला मग मोक्ष खुला ॥४॥