भजन - १९१
गडे हो ! वेळ अशी गमवाल, शेवटी चौर्यांशी भोगाल ॥धृ॥
दुनिया दिसते रंग-रंगीली, जीव-जिवांनी छान छबीली ।
व्यर्थची पाहुनिया भाळाल, शेवटी ० ॥१॥
ज्वानी अंगी काढी जोर, पळती जसे काननी ढोर ।
त्यापरि कोंडवाडिया जाल, शेवटी ० ॥२॥
जैसे करणे तैसे भरणे ? न चुके कोणाच्या दैवाने ? ।
वाजविल अंती यम तो गाल, शेवटी ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे त्या कामा, सोडुनि भजा हरी घनश्यामा ! ।
नाही तरी कुणाचे न्याल ? शेवटी ० ॥४॥
भजन - १९२
जग हे गुणकर्माची खाण, मिळेना दुसर्याला मुळि मान ॥धृ॥
ज्याने द्यावे त्याने घ्यावे, अपुल्या दैवे लेणे ल्यावे ।
नाही तरी व्यर्थ हा प्राण । मिळेना ० ॥१॥
कोणी ढोंगी पुढती येती, शेवटी मोठी होय फजीती ।
जन फेकी निंदेची घाण । मिळेना ० ॥२॥
दिसती पाय पाळण्या आंत, परिते दाविति अपुली जात ।
लपेना देउनियाही दान । मिळेना ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे सर्वांसी, सादर व्हावे सत्कर्मासी ।
तेव्हा धाडिती दे विमान । मिळेना ० ॥४॥
भजन - १९३
काननी या नदीच्या तटी, कोणि केली तृणाची कुटी ? ॥धृ॥
बाग वसंत-ऋतुचा नवा, जैसा शालू दिसे हिरवा ।
वृक्ष-वेली डुले गोमटी, रम्य वाटे मुळांच्या लटी ॥१॥
भृंग गुंजार करिती वनी, कोकिळा गातसे रागिणी ।
श्यामता बादलांची उठी, मयुर पिंजारती पंखुटी ॥२॥
मंद पवने टपकती फुले, खेळती वानरांची पिले ।
धावताती निराच्या तटी, मारुनिया उड्या कोल्हटी ॥३॥
पुष्पि गुंजारती भोंगुळे, शुभ्रवर्णी निळे पीवळे ।
शोभती वृक्षियांच्या पटी, उडति पक्षी-कुळे गोमटी ॥४॥
मागे शीला किती भव्य ह्या, व्याघ्र सापादिकासी पहा ।
धावती अस्वला रानटी, गर्जती जंबुके धाकुटी ॥५॥
रम्य त्या डोंगराच्या दर्या, चरति रोही हरिणी सांबर्या ।
वाहताति झरणे चोरटी, भवति कंदामुळांच्य गुटी ॥६॥
मधि सिंहासने साजिरी, कोण बसताति यांच्या वरी ? ।
जणुं स्वर्गाचि ही चौपटी, प्रेम लागे किती या मठी ॥७॥
सृष्टिसौंदर्ये ही ओतली, रम्य-भू भोवती शोभली ।
साठवावी गमे संपुटी, साधुनिया तपस्या तटी ॥८॥
दास तुकड्या मनी गुंगला, पाहता रंगि या रंगला ।
मुक्ति लाभो इथे शेवटी, नाम-स्मरणी न होवो तुटी ॥९॥
भजन - १९४
खेळे खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥धृ॥
भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऎकता ।
रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥१॥
जात होती यमुनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी ।
माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥२॥
दास तुकड्या म्हणे ही लीला, देव गोकुळासी खेळला ।
उध्दरील्या सख्या गौळणी, राधिकेच्या मना मोहुनी ॥३॥
भजन - १९५
दैव-गती ही न्यारी, बुध्दी काय करील बिचारी ? ॥धृ॥
दानशूर हरिश्चंद्र वाहतो, पाणी डोंबा-द्वारी ।
श्रीकृष्णासम साह्य असोनी, पांडव फिरति भिकारी ॥ बुध्दी ० ॥१॥
सती दौपदी दैवगतीने, ओढि सभेमाझारी ।
रामचंद्र प्रभु चौदा वर्षे, भ्रमति पहाडी खोरी ॥ बुध्दी ० ॥२॥
कर्मगतीच्या अवघड मार्गे, वाहति सकल नर-नारी ।
तुकड्यादास म्हणे होणारे, न चुके देव-असुरी ॥बुध्दी ० ॥३॥